मोठ्या प्रश्नाचे छोटे उत्तर

 

मोठ्या प्रश्नाचे छोटे उत्तर


कुछ तो बोलो,  अब मै क्या करु.  आप थोडा मदत करलो.  कोई है तो बताओ.  आप के पास छोडू क्या इसे.  माझ्यासमोर जिग्या बसली होती.  ओडिसाची.  नव-याच्या एका परिचितांची बायको.  गेल्या सहा-सात वर्षापूर्वी ओळख झाली होती.  होती, म्हणजे, कोरोनाची सुरुवात झाली आणि हे दोघंही आपल्या गावाला गेले, ओडिसाला.  तेव्हा तिथून एक-दोन वेळा फोन केला.  नंतर वर्क फ्रॉम होम असल्यामुळे जवळपास तीन वर्ष गावीच रहिले.  जिग्या गावी गेली तेव्हाच तिला पाचवा महिना लागला होता.  करोनानंतर वर्क फ्रॉम होम संपले.  त्या दोघांच्याही कंपनीनं नोकरीवर प्रत्यक्ष हजर व्हा, असा इशारा दिला आणि दोघंही परत आले.  सोबत चार वर्षाचा मुलगा.  गावाला एकत्र कुटुंब.  जिग्या आणि तिचा नवरा ऑफीसचे काम घरुन करतांना मुलाची सर्व जबाबदारी त्याच्या आजी-आजोबांनी आणि इतर कुटुंबियांनी घेतली.  जिग्या इथे परत आल्यावर पहिला प्रश्न आला तो पाळणाघराचा.  गेल्या तीन साडेतीन वर्षात त्यांचा इथला सर्व संपर्क तुटला होता.  पहिला आठवडा घराची साफसफाई आणि पाळणाघराच्या शोधात गेला.  नशिबानं ही मंडळी रहात असलेल्या इमारतीसमोरच पाळणाघर आणि छोट्या मुलांची शाळा होती.  तिथे मुलाला शाळेत घातलं आणि ही दोघं मोकळी झाली.  मग आता प्रश्न काय, हा माझा प्रश्न.  त्यावर जिग्या म्हणाली, अभी उसको छुट्टी हो गया.  स्कूल खतम और बेबीसिटींग को हप्ताभर छुट्टी.  अब इसे कहा रखू.  हमको छुट्टी नही.  इधर पहेचान नही.  हम तो किसीसे भी बात करता नही.  अब बच्चा कहा रखे.  आप बोलो, कोई है क्या. 


जिग्याच्या या प्रश्नावर मी तिच्याकडे नाही तर माझ्या नव-याकडे रागानं बघितलं.  कारण तिचा नवरा माझ्या नव-याच्या ओळखीचा.  त्यातून तिची माझ्याबरोबर ओळख झालेली.  बरं ओळख म्हणजे, ही मंडळी कोरोनात गावाला गेली, तेव्हाही काहीतरी काम सांगून गेली होती.  ते काम केलं की नाही, याची खात्री करण्यासाठी एक फोन केला.  नंतर जिग्याला मुलगा झाला तेव्हाचा एक फोन.  तिच परिस्थिती परत आल्यावर.  घरात काम करण्यासाठी कोणी मावशी आहे का म्हणून फक्त फोन आला.  आम्ही नंबर दिल्यावर धन्यवाद बोलून फोन बंद.  आता ही तिघं अचानक आमच्या घरी धडकली.  चहा-पाणी, झाल्यावर त्यांनी येण्याचे कारण सांगितले.  मुलाची शाळा होती, तिथेच त्याचे पाळणाघर होते.  एप्रिल आणि मे महिन्यात एक-एक आठवडाभर या पाळणाघराला सुट्टी असते.  याबाबत या दोघांना आधीच कल्पना दिली होती.  तेव्हा या दोघांनी ऑफीसमधून सुट्टी घ्यायचं ठरवलं होतं.  नाहीतर गावाहून कोणालातरी बोलवणार असं ठरवलं.  पण एप्रिल महिना असल्यानं दोघांच्याही ऑफीसनं सुट्टी रद्द केली.  आयत्यावेळी सांगितल्यामुळे गावाहूनही कोणी यायला तयार नव्हतं.  आता या छोट्या मुलाचा प्रश्न या दोघांसमोर होता.  त्यात जिग्याचं वागणं असं होतं, की ही आमची जबाबदारी नाही, आम्ही तुम्हाला ओळखतो, म्हणजे तुमचीच जबाबदारी.  मी तिच्या या बोलण्यानंच रागानं नव-याकडे बघितलं.  त्यातही तिचा तो हम किसी से भी बातभी नही करते, हा डायलॉग.  ही काय अभिमानानं सांगायची गोष्ट आहे का.

मी तिला विचारलं, तुमच्याकडे काम करायला मावशी येतात ना, त्यांना विचारलं का.  तर उत्तर नाही.  वो मावशी को कुछ आता नाही, हमारा बच्चा कैसे संभालेगी.  या तिच्या उत्तरावर मी लगेच विचारलं, उसको कुछ आता नही, तो काम पर क्यु रखा.  यावर त्या दोघांकडेही उत्तर नव्हतं.  मी आता त्या जिग्याला ताब्यात घेतलं.  जिग्या, आपका बात करनेका तरीका गलत है.  असं स्पष्ट शब्दात सांगितलं.  त्यावर ती दोघंही चमकून बघू लागली.  मी तिच्या नव-याला विचारलं, ही अशीच नेहमी बोलते का.  मुळात तुम्ही


आमच्याकडे काही मदत मागायला आलात, पण याआधी आमच्याबरोबर संपर्क ठेवला होता का.  आम्ही ब-याचवेळा तुम्हाला मेसेज पाठवले, फोन केला.  तर तुमचा काहीच रिप्लाय आला नाही.  निदान इथे आल्यावर तरी सहज म्हणून कधी घरी आलात, की आम्हाला घरी बोलवलं.  फक्त कामासाठी फोन करायचा, निदान ते काम झालं, तर आभार व्यक्त करायला तरी संपर्क करायचा.  फक्त कामापुरता माणसांचा वापर करायचा.  तुमच्याकडे जी मावशी काम करते, ती आमच्याच संपर्कातून तुमच्याकडे आहे.  ती तुमच्याबद्दल वाईट सांगते असे नाही, पण तिला तुम्ही कसे वागवता.  जरा तिच्याबरोबर आपुलकीनं चार शब्द बोलला असतात तर तिनं आनंदानं तुमच्या मुलाची जबाबदारी घेतली असती.  मी पूर्णपणे त्या महिलेला ओळखते.  तुमच्यापेक्षा चांगल्या घरामध्ये ती काम करते,  पण तुमच्याकडे जो अनुभव येतो, तो अन्य कुठेही नाही, असे तिनं नाराजीनं सांगितलं आहे.  राहीला प्रश्न तुमच्या मुलाचा.  आम्ही ओळखीचे म्हणून मुलाला आमच्याकडे हक्कानं घेऊन आलात, हे छान वाटलं.  फक्त गरज लागल्यावर माणसं शोधण्यापेक्षा मैत्रीसाठी माणसं शोधावी, असं मला वाटतं.  त्यातही हम तो किसी से भी बात भी नही करते, हे अभिमानानं सांगण्याची गोष्ट नाही.  मान्य आहे, तुम्ही दोघंही मोठ्या पोस्टवर आहात, रग्गड पैसा कमवता, पण आता तो पैसा तुमच्या मुलाला सांभाळणार आहे का, अशावेळी तर माणूसच हवा ना. 

माझ्या या बोलण्यावर दोघांनीही आपले अँपलचे फोन हळूच मागे घेतले.  दोघंही मान खाली घालून बसले होते.  जिग्या म्हणाली, कोन कैसा होगा, इसलीए बात नही करती.  पण समोरचा कसा आहे, हे बोलल्याशिवाय कसे समजणार,  हे मी तिला विचारले.  त्यावर त्या दोघांचेही चेहरे अजून पडले.  एव्हाना त्यांच्या छोट्यानं आमच्या लेकाच्या सर्व गाड्या काढून त्यांचे विश्व निर्माण केले होते.  त्या लहानग्याला सांभाळायला मला काहीच अडचण नव्हती.  पण माझा पाय घरात असतो कुठे,  मी तिला मला जमणार नाही, पण माझ्या काही मैत्रिणी सुट्टीमध्ये ग्रुपनं मुलांना सांभाळतात, त्यांना विचारु का म्हणून विचारले.  चारजणींचा हा ग्रुप आहे.  मुलं सारख्या वयाची.  पाळणाघरावर अवलंबून असणा-या.  तिथे सुट्टी असेल तर चौघीही आळीपाळीनं एकमेकींच्या मुलांना सांभाळतात.  जिग्याला विचारुन मी त्यातील एकीला फोन केला.  जिग्याचं नशिब छान होतं.  त्यांच्या मुलांना सुट्टी नव्हती, पण मुलांसोबत आठवडाभर बाहेर फिरण्याचा बेत त्यांनी आखला होता.  चौघींपैकी दोघींनी आठवड्याचे पहिले तीन दिवस आणि दुस-या दोघींनी नंतरचे तीन दिवस अशी विभागणी केली होती.  मैत्रिणींला विनंती केली, एक पाचवा बाळ सांभाळाल का आठवडाभर.  तिनं पलीकडून एकच प्रश्न विचारला, मुलगा कसा आहे,  खेळकर आहे ना. माझ्यासमोर जिग्याचा मुलगा गाड्या घेऊन


आपला-आपला खेळत होता.  मी हो म्हणताच, मैत्रिणीनंही हो म्हटले.  मी जिग्याला आणि तिच्या नव-याला हो सांगितले.  दोघंही खूष झाले.  पण, फक्त गरज म्हणून वापर करु नका, अशी समजही या दोघांना मी दिली.  जिग्या म्हणाली, गलती हो गया.  सॉरी.  घर जाके मावसीकोभी सॉरी बोलूंगी.  नंतर बराचवेळ दोघंही बोलत होते.  घरी जायला निघाले, तेव्हा त्यांचा मुलगा अजून थांबूया म्हणून हट्ट करायला लागला. 

जवळपास अर्धा दिवस माझ्याकडे थांबून तिघंही आपल्या घरी गेले.  जातांना पुन्हा एकदा दोघंही सॉरी आणि थॅंक्यू म्हणून गेले.  मी सुद्धा तिला पुन्हा एकदा, बोलत जा, बोलल्याशिवाय माणसं जोडता येत नाहीत, असा सल्ला दिला.  त्यावर हो म्हणत ती घरी गेली.  आता तिच्या या हो ला पालवी कधी फुटेल काय माहीत. 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

    

Comments

  1. अशीच माणसं भेटत असतात..तू चांगला विषय मांडला छान...

    ReplyDelete
  2. Khup Chan lekh

    ReplyDelete
  3. पैसे येतील,जातील,पण जोडलेली माणसे आपल्यापासून दूर जात नाहीत. पैशांचे महत्त्व आहेच पण वेळेला माणसे नसतील तर पैसेही काम करीत नाहीत.

    ReplyDelete
  4. संवाद हेच अनेक समस्यांवरचं उत्तर असतं!! खूप छान लिहिलंय तुम्ही!!

    ReplyDelete

Post a Comment