एका शब्दाची जखम

 

 एका शब्दाची जखम




कधी नव्हे तो मला रविवारी निवांत मिळाला होता.  नवरा कुठल्याश्या मिटींगला गेलेला, सकाळचा नाष्टा पोटभर झालेला.  दुपारी काही खाण्याइतकी भूक नव्हती.  त्यामुळे कलिंगडाचा ताबा घेतला.  कलिंगड साफ करता करता शेजारी असलेल्या फोनवर एकामागोमाग एक मेसेज येत होते.  पण कलिंगडाच्या रसानं भरलेले हात मोबाईलला लावण्याचा धीर झाला नाही.  काही मिनिटात कलिंगडाच्या फोडीनं भरलेली एक माझ्यापुरती डिश घेतली आणि दोन डबे फ्रिजमध्ये ठेवले.  सर्व साफसफाई केल्यावर कलिंगड खाता खाता मोबाईल बघितला.  धडाधड आलेले मेसेज अनुचे होते.  अगदी जुनी मैत्रिण.  पार दुस-या टोकावर रहाणारी.  एवढ्या दुपारी कशाला तिने कशाला आठवण काढली म्हणून मेसेज बघितले आणि मला धक्का बसला.  एरवी हळुवार असणा-या अनुचा शेवटचा मेसेज होता, तूपण मला विसरलीस का...असा होता.  म्हणून वरचे मेसेज बघितले.  तर काय करतेस, कुठे आहेस, बिझी आहेस का, बोलू का, असे मेसेज होते.  मला त्यांना उत्तर देता आले नव्हते, म्हणून तिनं मला विसरलीस का असा मेसेज टाकलेला.  दुपारचे दोन वाजलेले.  बाहेर बघायचं धाडसही नव्हतं, इतकं उन तापलेलं.  त्यात अनुचा असा मेसेज वाचल्यावर मी तिला थेट फोन केला.  काय ग...आज तू कशी मोकळी, तुला बरा वेळ मिळाला म्हणून मीच तिच्यावर पहिला अटॅक केला.  त्यावर अनु म्हणाली,  सर्व बाहेर गेलेत, मी एकटीच आहे घरात.  अग मी पण एकटीच आहे, हे माझं वाक्य बाहेर येतय ना येतंय तोच पलिकडून अनु म्हणाली, मी येऊ का तुझ्याकडे.  माझी काहीच हरकत


नव्हती.  पण गाडीवरुनही तिचं घर माझ्या घरापेक्षा अर्धातास दूर होतं.  त्यात बाहेरचं तप्त वातावरण बघता, मी तिला म्हटलं अग उन किती आहे.  तोपर्यंत बहुधा अनुनं निघायची तयारी चालू केली होती.  राहूदे, मी येते....बोलूया.  एवढं म्हणत बाईंनी फोन बंद केला.  तिनं फोन बंद केल्यावर मी तिचा आवाज पुन्हा आठवून बघितला.  अनुचे मेसेज जसे हळवे होते, तसाच तिचा आवाजही हळवा असल्याची जाणीव झाली.  आता मला काळजी वाटू लागली, अनु सहज येत आहे की काहीतरी बिघडले आहे. 

हातातली कलिंगडाच्या फोडींची डिश तशीच बाजुला ठेऊन मी कामाला लागले.  फ्रिजमध्ये शक्यतो पाण्याची बाटली नसतेच.  पण अनुला लागलं तर, म्हणून एक पाण्याची बाटली फ्रिजमध्ये ठेवली.  काहीतरी खाऊ करायला हवा होता, म्हणून दोन पांढरे कांदे चिरायला घेतले.  पोहे भिजवले.  खोब-याची वाटी बाहेर काढली. फोडणी टाकेपर्यंत बेल वाजली.  मी घाईघाईनं दरवाजा उघडला.  अनु आत आली आणि धाडकन कोचावर बसली.  डोक्याभोवती गुंडाळलेला रुमाल बाजुला सारला.  गॉगल काढला आणि मला तिचा चेहरा दिसला.  बाई बहुधा रडल्या असाव्यात.  मी पाणी आणलं, तोपर्यंत तिनं बाथरुमध्ये जाऊन चेहरा वारंवार धुण्याचा प्रयत्न केला.  पण चेह-यावरच्या खुणा काही पुसल्या जात नव्हत्या.  अनुं, तिचा नवरा आणि अनुची बारा वर्षाची मुलगी असे त्रिकोणी कुटुंब. शक्यतो अनु लेकीला सोडून


कुठेही जात नसे.  मग आत्ता काय झालं, हा माझा प्रश्न होता.  पण ते विचारायचं धाडस नव्हतं. 

अनुला पाणी दिलं आणि पोह्यांच्या दोन डिश भरल्या.  वरुन भरपूर खोबरं टाकलं. ऐश. सोबत कलिंगडाच्या फोडींचा डबाच बाहेर घेतला.  पाण्यासाठी छोटा मातीचा गडू बाहेर घेतला.  माझी ही सर्व जमवाजमव अनु शांतपणे बघत होती.  पोह्यांच्या डिश पाहून म्हणाली, जेवणाला सुट्टी का.  मी म्हटलं, अग नवरा बाहेर आहे, मला भूक नाही,  म्हणून मधला मार्ग पकडला.  अनु यावर शांत राहिली.  मग म्हणाली, या मधल्या मार्गानंच आपण कायम गुलामीत राहणार आहोत.  गुलामीत....अनुच्या या शब्दांनी मी चमकले.  काय झालं,  सर्व ठिक ना म्हणून तिला विचारलं.  आदल्या दिवशी तिच्या लेकीची परीक्षा संपलेली.  ती तिच्या आजीकडे रहायला गेली.  अनु आणि तिचा नवरा दोघंच घरी होते.  घराचे सामान भरायचे होते,  त्यासाठी अनुने नव-याला दुस-या दिवशी म्हणजे, ती माझ्याकडे आली होती, त्या दिवशी सोबत चलायला सांगितले.  पण त्यानं आधीच कोणाबरोबर तरी लग्नाच्या पत्रिका वाटायला येणार असल्याचे कबूल केले होते.  या गोष्टीवरुन दोघांच्यात वाद झाला.  शब्दाला शब्द लागला.  अनुचा नवरा घराबाहेर पडतांना तिच्यासाठी पैसे ठेऊन गेला.  पण नशिब समज, मी आहे, दुसरा कोणी असता तर बाहेर कुणाबरोबर जात आहे हे सांगितलंही नसतं.  कुणा बाईबरोबर फिरत नाही ना...तुझं नशिब म्हणून माझ्यासारखा नवरा मिळाला....असा हक्काचा नवरेशाहीचा डायलॉग मारुन गेला होता.  अनु इथेच दुखावली होती.  अनुच्या लग्नाला चौदा वर्ष झालेली.  अनु मला विचारत होती, लग्नाच्या एवढ्या वर्षानंतरही नवरा असा डायलॉग तोंडावर मारतो, हा माझा अपमान नाही का.  त्याला जाणवलं असेल का या त्याच्या बोलांनी मी किती दुखावलेय.  तो गेल्यापासून मी विचार करतेय, माझी या घरातील किंमत काय.   फक्त नव-यानं माझ्यावर केलेली मेहरबानी हिच किंमत आहे, का हा विचार मनात येतो.  त्यानं दुस-या कुठल्याही बाईचा माझ्याव्यतिरिक्त विचार केला नाही, ही त्याची खरोखरोच मेरबानी आहे का...आणि मी, माझ्याकडून असा डायलॉग मारला असता तर...मी त्याला म्हटलं असतं, तर माझं कोणाबरोबर लफड नाही हे तुझं नशिब समज, तर काय झालं असतं ग....सांग ना. 

अनु बोलत होती.  समोरचे पोहे थंड झाले होते.  माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं.  या नवरेशाहीला जशाच तसे बायांनी दिले तर किती घरातील संसार गळून पडतील.  पण ती बाई असते.  सर्व घाव सोसते, बरेचसे मनात ठेवते, आणि फारच जड झाले तर अनुसारखी व्यक्त होते.  पण ते व्यक्त होतांनाही फार गाजावजा होणार नाही, याची काळजी घेते.  अनुलाच्याही मनात हे घाव असह्य झाले.  ती मोकळी झाली, पण माझ्या मनात प्रश्नांचे काहूर उठले.  अनुनं तिची पोह्यांची डिश संपवली आणि कलिंगडाकडे मोर्चा वळवला.  बहुधा


सकाळपासून काहीही खाल्लेलं नव्हतं.  मी सुद्धा निमुटपणे खाऊ लागले.  दोघीही बराचवेळ निवांत बसलो.  एक चित्रपट बघण्याचा प्रयत्न केला.  गाणी ऐकली.  अगदी फार कमी गप्पा मारल्या.  त्याही मुलांच्या.  संध्याकाळचे साडेचार वाजले तेव्हा अनुची पुन्हा चुळबूळ चालू झाली.  चल निघते, तुझा उगाच दिवस खराब केला.  नाही ग, म्हणत मी तिला थांबवलं.  दोन आंबे कापून समोर ठेवले.  पुन्हा दोघी गप्प बसलो.  अनु...म्हणून मी तिला हाक मारली.  काही नाही ग...आता थोडी ठिक आहे.  घरी जाते.  दुसरीकडे कुठे जाणार आपण.  लेकीला आणते रात्री, ती आली की जरा बरं वाटेल.  अनु आली तशी गेली.  पण मला अस्वस्थपणा देऊन गेली.

माझ्या मनातून काही ती जात नव्हती.  शेवटी न राहून रात्री नऊच्या सुमारास फोन केला.  फोन तिच्या लेकीनं उचलला.  मावशी,  बाबाला बरं नाही.  आई त्याचा खाऊ करतेय  म्हणून तिनं आगाऊ माहिती दिली.  मग अनु फोनवर आली.  अग हे माझ्यापाठोपाठ घरी आले.  दिवसभर उन्हात फिरले ना त्याचा त्रास झाला.  डोकं जड झालंय.  आता ताळ्यावर आलेत....खिचडी टाकलीय ती देते त्यांनी...उद्या बोलू, चल, म्हणून तिनं फोन ठेवला.  हेच तर वैशिष्ट असतं बाईचं.  मनावर हजारो घाव झेलून हसत उभं रहायचं कौशल्य यालाच बाईपण म्हणतात, बहुधा.

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. अगदी खरं आहे खूप छान.

    ReplyDelete
  2. नवरा सांभाळायचं सार्वजनिक दुखणं

    ReplyDelete
  3. महेश टिल्लू20 April 2024 at 18:49

    खरे आहे,पुरुष मंडळी कसेही वागतात freedom असल्याप्रमाणे मात्र घरातल्या स्त्रीला सर्वांना सांभाळून घ्यावे लागते.प्रसंगी अपमानही सहन करावा लागतो.पुरुष मंडळींनीही आपली जबादारी ओळखून राहायला हवे. पहिल्यापासून उत्सुकता वाढवणारा लेख आहे .असो

    ReplyDelete
  4. महेश टिल्लू20 April 2024 at 18:52

    संसारात नवरा बायको या दोघांची सारखीच जबाबदारी असते, प्रत्येकाने ती ओळखून वागावे,नहीतल कलह वाढत जातात.इगो बाजूला ठेवला तर असे प्रसंग कुणाच्याच आयुष्यात येणार नाहीत.

    ReplyDelete
  5. आदरणीय सई जी साष्टांग नमस्कार प्रत्येक ठिकाणी आणू ही असतेच फक्त अनुला मत कसे व्यक्त करायचे हेच तिला समजत नाही...
    तुम्ही अतिशय सुंदर छान मांडणी केली धन्यवाद

    ReplyDelete
  6. आपापलं वर्तुळ जपंत एकमेकांच एक वर्तुळ निर्माण करणं म्हणजे सहजीवन!! पण असं वर्तुळ निर्माण करणं ही एक कला आहे,भल्याभल्यांना जमंत नाही!!

    ReplyDelete
  7. Khup chhan lekh21 April 2024 at 00:55

    Jayant Bane

    ReplyDelete

Post a Comment