नव्या वाटा...नव्या हाका...
गुरुवारचा उपवास. सकाळची जेवणाला सुट्टी. त्यामुळे मिळालेल्या वेळात कुंड्याची साफसफाई सुरु केली. सोबतीला सनम पुरीचे गाणे रंगात आले असतांनाच फोनची रिंग वाजली. नंबर सेव्ह केलेला नव्हता, म्हणून पहिल्यांदा घेतला नाही. पुन्हा रिंग वाजली. तोच नंबर. फोन घेतला आणि स्पिकरवर लावला. तिकडून मी रेवती बोलतेय...रेवती...असा आवाज आला. माझं अर्ध लक्ष मिरच्यांची रोपे लावण्यात, अर्ध लक्ष त्या सनमच्या गाण्यात. त्यात ही रेवती कोण ते आठवेना. म्हणून मी विचारलं कोण रेवती. तिकडून आवाज आला, अग ओळखलं नाहीस का, मी रेवती, आपण क्लासमध्ये भेटलो होतो. मी आता पुण्याला गेलेय रहायला. म्हणून तुला फोन केला. आम्ही कायमचे शिफ्ट झालो. अचानक ठरलं सगळं. म्हणून कोणालाही सांगता आले नाही. आता सर्वांना फोन करतेय. तू कधी पुण्याला आलीस तर नक्की ये. एवढं बोलून रेवती थांबली. आता मी फ्लॅशबॅकमध्ये गेले. लेक अगदी लहान होता, तेव्हा बुद्धीबळाच्या क्लासला जायचा. तिथे ही रेवती नावाची मैत्रिण भेटलेली. नंतर बुद्धीबळाचा क्लास संपला, पण आमची मैत्री कायम राहिली. अगदी रोज नाही पण पंधरा दिवसात, महिन्यातून फोन व्हायचा. अलिकडे मात्र हा दुरावा वाढत गेला होता.
एव्हाना मला रेवती कोण हे पूर्णपणे आठवले होते. पलिकडे अजून ती फोनवर होती. अग आठवले का मी तुला. विसरलीस का, म्हणून परत तिचा आवाज आल्यावर मी पूर्णपणे ताळ्यावर आले. दोन्ही हात मातींनी भरले होते. मी तिला सांगितलं, फक्त एक मिनिट दे, फोन स्पिकरवर आहे, हात
स्वच्छ करुन बोलूया. रेवती हो, म्हणत शांत राहिली. काही क्षणातच मी हात स्वच्छ करुन तिच्याबरोबर बोलायला लागले. पहिल्यांदा सॉरी म्हटलं. मी ओळखलं नाही, अशी प्रांजळ कबुली दिली. अचानक तू पुण्याला का शिफ्ट झालीस. इथलं घर काय केलंत. तुझा लेक पुण्याच्याच कंपनीमध्ये आहे ना. तुम्हीपण तिकडेच गेलात म्हणून, अशी माझी सरबत्ती सुरु झाली. रेवती निवांतपणे हसली.
रेवतीचा नवरा वर्षभरापूर्वी रिटायर्ड झाला. त्याचवेळी मुलाचे इंजिनिअरिंग झाले, त्याला
नोकरी मिळाली ती पुण्यात. काही वर्ष तो
शिक्षणासाठीही घरापासून दूर होता. आता
नोकरीच्या निमित्तानंही दूर रहाणार होता, म्हणून त्यानं तिथेच येण्याचा आग्रह
धरला. आई-बाबा आपल्यासोबतच रहातील म्हणून
सुरुवातीला एक भाड्याचा फ्लॅटही घेतला.
रेवतीचं आणि तिच्या नव-याचे मन काही या शहरातून निघत नव्हते. पण रेवतीचा नवरा रिटायर्ड झाल्यावर त्यांना
वेगळा अनुभव आला. काय रिटायर्ड का. आता काय करणार. पेन्शन किती मिळते. भागतं का.
मुलगा पैसे देतो की नाही. असे नको
वाटणारे प्रश्न यायला लागले. वास्तविक
रेवतीच्या नव-यानं व्यवस्थित प्लॅनिंग केलेलं.
रिटायर्ड झाला तरी त्याच्या परिचीत सीएचे काम आहे त्याच्याकडे. ते ऑनलाईन आहे. त्यातही त्याला शेअर्सची चांगली माहिती
असल्यामुळे त्यातही गुंतवणूक चालू आहे.
एकूण नोकरी संपली तरी पैसे सुरळीत येतील, अशी व्यवस्था आहे. रिटायर्ड झाल्यावर सुरुवातीला आर्थिक बाबींवरुन
प्रश्न यायला लागले, तेव्हा त्यांनी एक-दोघांना आपला प्लॅन सांगितला. पण नंतर तेच तेच प्रश्न यायला लागल्यावर मात्र
तो वैतागला. मी कशाला सांगू. म्हणून चिडचिड सुरु झाली. तो ब-यापैकी व्यस्त होता. रेवतीच्या मते नोकरीपेक्षा या कामातच त्याचा
जास्त वेळ जातोय. हे सर्व ठिक चालू
असतांना आसपासच्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात केलेली ढवळाढवळ त्यांना नकोशी
झाली. सकाळ संध्याकाळ चालायला बाहेर पडलं
की, आता काय आराम का. हा प्रश्न कानावर
यायला लागला.
या सर्व प्रश्नांनी रेवतीचा नवरा चिडत होता. आमचं आयुष्य आमचे आर्थिक
प्रश्न. मग बाकीच्यांना काय पडलीय. मला पेन्शन किति मिळते हे विचारणारे आणून देणार आहेत का पैसे, असे प्रश्न विचारुन तो रेवतीला भंडावून सोडत होता. रेवती हे प्रश्न पुढे तिच्या लेकाला पास करत होती. तो तिकडे पुण्यात. नवी नोकरी आणि त्यातून घेतलेल्या मोठ्या घराची जबाबदारी सांभाळत होता. त्याचीही धावपळ होत होती. शनिवार रविवार तो आपल्या घरी आल्यावर रेवती त्याला आठवडाभर चालेल असा नाष्टा देत असे. पण असे किती दिवस करायचे हा त्याचा प्रश्न होता. शेवटी तिघांनी एकत्र बसून यावर तोडगा काढला, तो पुण्याला कायमचे शिफ्ट होण्याचा. घराचा पत्ता बदलणे ही एक कसरत असते. मात्र निर्णय घेतल्यावर आठवड्याभरात रेवतीच्या नव-यानं प्रत्यक्षात काही कार्यालयात जाऊन आणि लेकानं ऑनलाईनवर सर्व प्रक्रीय पूर्ण केली. या दरम्यान रेवतीनं सामानाची बांधाबांध केली. एका ओळखीच्या एजन्टला गाठून रहाते घर भाड्यावर द्यायचे आहे, असे सांगितले. रेवतीचे घर मोठे. पाण्याचा व्यवस्थित पुरवठा. गाडीचे पार्कींग. त्यामुळे घराला लगेच भाडेकरु मिळाला. त्याला घरी बोलवलं. त्याची सर्व माहिती घेतली. नवं लग्न झालेलं जोडपं होतं, सोबत त्याची आई होती. लगेच हा व्यवहार झाला. पोलीस ठाण्यातील प्रोसेसही झाली. रेवती सांगत होती, एका आठवड्यात आम्ही एवढी कामं केली की घरी जेवण करायलाही फुरसत मिळाली नाही. आठवड्याभरात सगळं झालं. या दरम्यान तिचा लेक दोनवेळा येऊन गेला. सोबत गाडीही असल्यामुळे जातांना त्यांनी काचेचं सामान नेलं. दुस-या खेपेला अन्य महत्त्वाचं सामान आणि फायली नेल्या.
घर सोडण्याच्या आदल्या दिवशी रेवती आणि तिच्या नव-यानं ती रहात असलेल्या सोसायटीमधील त्यांच्या परिचित कुटुंबांमध्ये जाऊन त्यांचा निर्णय सांगितला. तसेच फ्लॅटमध्ये येणा-या भाडेकरुची माहिती दिली. सर्वांसाठीच हा धक्का होता. पण रेवतीनं नव्या प्रवाहात सामिल होण्याचा निर्णय घेतलेला. आता महिना होऊन गेला, दोघंही पुण्याला गेलेल्याला. रेवती खूष होती. खुप वर्षांनी ते तिघंही एकत्र रहात होते. मुलाचा डब्याचा आणि जेवणाचा प्रश्न सुटला होता. तो खुष होता. लेक शाळेत असतांना ती लवकर उठून त्याचा डबा करत असे, मग बागेत चालायला जात असे. आता तेच शेड्युल पुन्हा सुरु झालंय. लेक डबा घेऊन कामाला गेला, की दोघंही बागेतून
चालून येतात. मग नवरा त्याच्या शेअर्सच्या कामाला बसतो. आणि रेवती घरातील अन्य कामांना लागते. आसपास काही ओळखी झाल्या आहेत, त्यांना तिच्या नव-यानं घरातून काम करतो, म्हणून सांगतो. बहुधा जो फ्लॅट त्यांनी भाड्यांनी घेतला आहे, तोच विकत घ्यायचा आता विचार चालू आहे. एकूण काय, रेवती पुण्याला कायमस्वरुपी रहाणार होती. तिच्या या सर्व गोष्टीमधली शेवटचे शब्द माझ्या मनाला लागले. ती सांगत होती, माझ्या नव-याचा स्वभाव पहिल्यापासून अबोल. तो आणि त्याची नोकरी एवढेच त्याचे विश्व होते. त्यातले एक विश्व संपले तेव्हा त्याच्या मनाची काय चलबीचल चालू होती, ते मला समजत होते. पण आमच्या गोतावळ्याला ते समजले नाही. लोकं उगाच कुणाच्याही आयुष्यात ढवळाढवळ करतात आणि पैशाचा हिशोब विचारु लागतात. समोर व्यक्ती भेटली की विचारा, कसे आहात, काय वाचलंत, कुठला चित्रपट बघितलां असं विचारा ना...थेट पैशाच्या व्यवहात घुसतात.
रेवती जवळपास दोन तास बोलत होती.
मध्ये फोन दोनवेळा कट झाला. आम्ही
दोघींनी पुन्हा चालू केला. दोन तासानंतर,
चल पुण्यात आलीस की ये, म्हणत आणि इथे आलीस की आमच्याकडेच ये, म्हणत आम्ही दोघींनी
एकमेकींचा निरोप घेतला. रेवतीचा फोन
झाल्यावर मी बराचवेळ त्या फोनकडे बघत होते, नव-याचे दोन मीसकॉल येऊन गेले
होते. मला आठवलं आमच्याकडेही ही
रिटायर्डमेंटची बेल वाजायला लागली होती. एकूण
काय तयारी सुरु करण्याची वेळ झालेली....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
वेगवेगळ्या विषयांवर खूपछान लिहिता तुम्ही!!
ReplyDeleteSai खूप सुंदर वास्तवदर्शी व भावस्पर्शी
Deleteआपले शहर,तिथली नात्यात ओढ असलेली माणसे स्वतःचे घर सोडून दुसरीकडे जाणे अवघड असते.पण काही निर्णय ठामपणे घ्यावे लागतात.
ReplyDeleteलांब कितीही गेले तरी अशी नाती तुटत नाहीत.ती जपण्यात मजा आहे.
अगदी खरं आहे.
ReplyDeleteअगदी खरं आहे
ReplyDelete