डब्बा ऐसपैस.....

 

डब्बा ऐसपैस.....


अग तू काय खेळत होतीस ते तरी सांग...एका चिमुरडीनं विचारलेल्या या प्रश्नामुळे क्षणात लहानपणीचे सगळे विश्व समोर उभे राहिले.  गेल्या आठवड्याचाच प्रसंग.  एका मैत्रिणीनं सहज विचारलं, आज लेकीचा रिझल्ट आहे, तू येशील का बरोबर.  शाळेत जायला आता या वयात खूप आवडायला लागलं आहे.  त्यामुळे मी पटकन हो म्हटलं.  मैत्रिणीची चारचाकी.  तिच चालवणार.  तिची लेक, ती आणि मी.  मला माझ्या शाळेच्या निकालाची आठवण यायला लागली.  तेव्हा कोणी पालक सोबत येत नसत.  १ मे ही सार्वत्रिक परीक्षेचा निकाल लागण्याची तारीख असायची.  आपणच जायचं, आणि ते निकालाचं हिरव्या, निळ्या किंवा पिवळ्या रंगातील कार्ड घेऊन घरी यायचं.  मग त्यातील गुणांवरुन घरी काय रामायण, महाभारत व्हायचं तो वेगळा विषय.  असो.  पण आताची परीक्षांच्या निकालांची पद्धत खूप बदललेली.  माझ्या लेकाच्या शालेय वर्गादरम्यान मी त्याचा अनुभव घेतलला.  आता पाच वर्षानंतर पुन्हा अशा शालेय परीक्षांच्या निकालाचा अनुभव घेत होते.  मैत्रिणीची लेक परी चौथीत.  अगदी बिंधास्त होती.  निकाल काय लागेल याचे तिला टेन्शन नव्हतेच.  तो लागल्यावर तिची आई तिला काय ट्रिट देणार याची ती यादीच आईकडून वदवून घेत होती.  शाळेत पोहचलो.  तिथे तिच्या नंबरचे टोकन मिळाले.  तो नंबर येईपर्यंत पुढच्या वर्षाच्या पुस्तकांची मोठी पिशवी मिळाली.  ती ताब्यात घेऊन आम्ही रिझल्ट असलेले एक छोटे पुस्तकच घेतले.  परीचा वर्षाचा सगळा रिझल्ट त्यात होता.  तिच्या टिचरने तिचे अभिनंद केले.  परी खूष.  मग मैत्रिणीनं त्या सगळ्या पुस्तकांचे पैसे, शाळेच्या फी चे काही आगाऊ शुल्क ऑनलाईन भरले.  मोबाईलच्या बटनांची टुकटुक आणि तो पैसे मिळाल्याच्या मेसेजचा


आवाज आला आणि आम्ही निघालो. 

गाडीत बसल्याबसल्या परीनं आईच्या मोबाईलचा ताबा घेतला.  तिच्या बाबाला पहिला रिझल्ट सांगितला.  मग आजी आजोबा.  काही मैत्रिणींना फोन करुन त्या रिझल्ट घेऊन गेली का ती चौकशी झाली.  मग परी आणि तो मोबाईल, एवढेच विश्व चालू झाले.  परीचा दिवस होता तो, म्हणून तिनं सांगितलेल्या ठिकाणी आम्ही तिघीही गेलो.  परीनं तिच्या आवडीच्या पदार्थांची ऑर्डर दिली.  पिझ्झा, पास्ता,बर्गर या सगळ्यांची गर्दी तिथं होती. आम्ही दोघींनी एकच डिश घेतली ती वाटून घेण्याचं ठरवलं आणि कॉफी.  हे सर्व करतांना आमचं ते सगळं मेनूकार्ड वाचून झालं होतं.  त्यावर बरीच चर्चा करुनही झाली.  पण परी, तिनं तिची ऑर्डर अगदी आल्याआल्या दिली आणि मोबाईलमध्ये डोकं घालून बसली.  दोनवेळा मी आणि मैत्रिणीनं तिला मोबाईल बाजुला ठेवायला सांगितलं,  पण तिचं एक मिनिट हे उत्तर काही संपेना.  शेवटी आम्ही मागितलेले पदार्थ आले.  आता तरी मोबाईल बाजुला ठेव बाळा...म्हणून आम्ही तिला कळकळीची विनंती केली. 

त्या विनंतीमुळे किंवा समोर आलेल्या तिच्या आवडत्या खाऊमुळे परीनं तो मोबाईल बाजुला ठेवला.  तिच्यासमोर असलेल्या बर्गरचा भलामोठा घास घेऊन मग बाईंचा मोर्चा माझ्याकडे वळला.  ए, मावशी, तु काय करायचीस ग सुट्टीत.  तू कुठला खेळ खेळायचीस.  तेव्हा मोबाईल नव्हता ना....आई सांगते.  ती लहान होती, तेव्हा अख्खी सुट्टी मामा आजोबांच्याकडे जायची.  भरपूर खेळायची.  तु कुठला खेळ खेळायचीस.  तू पण तुझ्या मामा आजोबांकडे जायचीस का.  परीच्या बर्गरचा मोठा घास घेत बोलत होती.  पण तिच्या प्रश्नांनी माझ्या हातातला घास तसाच राहिला.  लहानपणी आम्ही काय खेळत मोठं झालो, ही परीची उत्सुकता होती.  पण तिच्या मामाचं गाव मात्र नसल्याचं दुःख होतं.  परीचा मामा, म्हणजे, माझ्या मैत्रिणीचा भाऊही तिच्याच आसपास रहात होता.  तो सुद्धा नोकरी करणारा.  तशीच परीची मामीही नोकरी करणारी.  सुट्टीची मारामारी.  त्यात ते दोघंही सरकारी


नोकरीत होते.  निवडणुकांमुळे त्यांना सुट्टीही घेता येत नव्हती.  दरवर्षी आठवड्याची सुट्टी घेऊन ही दोन्ही कुटुंब आपल्या गावी जात असत.  मामांची दोन मुलं आणि परी यांच्यासाठी तो आठवडा मजेचा असायचा.  पण यावर्षी तो आठवडाही मिळणार नव्हता.  परीचा बाबा ऑफीसच्या कामाला दुस-या देशात, मामा-मामी नोकरीच्या मागे.  त्यामुळे मोबाईलशिवाय परीला पर्याय नव्हता. 

परीनं पुन्हा मला विचारलं, सांग ना, तुमचे खेळ कोणते होते.  तेव्हा अलगद एक शब्द बाहेर आला, डबा ऐसपैस.  तूपण तोच खेळ खेळायचीस.  माझी आईपण.  म्हणत परीनं मला आणि तिच्या आईला टाळी दिली.  त्या टाळीसोबत आमच्या दोघींचीही कळी खुलली.  आम्ही दोघींनीही हसत एकमेकींना टाळी दिली.  परी, अग हा खेळ असा होता की त्यात सगळा व्यायाम व्हायचा.  अगदी शारीरिक आणि मानसिकही.  त्यातूनच आम्हाला टिमवर्क म्हणजे काय, हेही कळलं.  तू आहेस ना, त्यापेक्षा लहान वयापासून आम्ही हा खेळ खेळलो, याच खेळातून आमची मैत्री पक्की झाली.  अजूनही आमच्या मैत्रीणी आहेत बरं का लहानपणीच्या.  हे ऐकल्यावर परीच्या पुढचा प्रश्न होता.  फोटो आहे का ग, मला दाखवशील का.  यावर काय बोलणार.  परीला हळुवार सांगितलं, अग परी, तेव्हा हवा तेव्हा, हवा तसा फोटो काढण्यासाठी मोबाईल नव्हता.  म्हणून तर आम्ही एवढो खेळू शकलो.  फक्त एक डबा, करवंटी किंवा डब्याचं फुटलेलं झाकणं, काहीही असलं तरी आमचा खेळ व्हायचा.  राज्य कोणावर आलं आहे, याचा हिशोब करायचा.  मग खेळाच्या बॉन्ड्री ठरवायच्या.  आणि जो तो लपायला जायचा.  कोणीतरी चतूर लपून एखादा आवाज काढायचा.  त्या आवाजाचा माग काढत मग तो राज्य असलेला मुलगा जाईपर्यंत अजून एखादा धावत येऊन डबा उडवून लावायचा.  मग काय, पुन्हा त्यावर राज्य....खेळ सुरु.  या एका खेळातून किती गोष्टी शिकलो हे आम्हालाच कळलं नाही.  आम्ही दोघीही त्या आठवणीनं हसू


लागलो.  माझ्यावरचं राज्य तर कधी जायचंच नाही.  दादा कायम मला डब्बा गुल करायचा, हे तिनं सांगितलं आणि आम्ही दोघी अजूनच हसू लागलो.  आता परीला त्या डब्बा ऐसपैसची गोडी वाटू लागली.  अजून सांग ना...अजून सांग ना...म्हणत तिनं आमच्याकडून ब-याच गंमत्ती ऐकून घेतल्या.  मग मलापण खेळायचं आहे असा हट्ट धरला.  आता आली का पंचायत.  सोसायटीच्या आवारत आम्ही कशा धावणार.  मग एक उपाय निघाला,  पुढच्या आठवड्यात एका फार्महाऊसमध्ये छोटीशी पिकनीक करण्याचा प्लॅन ठरला.  परी खुष.  आम्ही परत निघालो.  पुन्हा परीच्याच हातात मोबाईल.  पण ती डबा ऐसपैस असं टाकून सर्च करत होती.  आम्ही दोघीही खुष.  ब-याच वर्षांनी डबा ऐसपैस खेळायला मिळणार म्हणून....

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. Nice lekh and naav khup perfect aahay ase vatale

    ReplyDelete
  2. मस्त लेख आहे जुन्या आठवणी जाग्या झाल्या..

    ReplyDelete
  3. khup chhan lekh

    ReplyDelete
  4. महेश टिल्लू5 May 2024 at 05:12

    लेख वाचेन मलाही बालपणाची आठवण झाली.मी सुधा असे अनेक प्रकारचे खेळ खेळलो आहे. रम्य ते बालपण. आपल्या पिढीने जे अनुभवले ते आताची पिढी कल्पना करू शकणार नाही.सर्व कसे एकोप्याने , एकमेकांना मदतीच्या भावनेतून प्रेमाने वागत असत.हेवेदावे, आपसात निकोप स्पर्धा असायची.
    खरे आहे, आत्ताच्या मोबाईल हातात असणाऱ्या पिढीला हे सुख अनुभवायला नाही मिळणार

    ReplyDelete
  5. आम्ही पण खूप खेळलो आहोत आमच्या टिळकनगरमथल्या विसावा सोसायटीत,खूप मजा यायची! या लेखाने त्या आठवणींना उजाळा मिळाला!!

    ReplyDelete

Post a Comment