घर असावं घरा सारखं

 

घर असावं घरा सारखं


अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दुपारी एकच्या सुमारास नव-याचा फोन आला.  ही काही नेहमीची फोनची वेळ नव्हती, त्यामुळे काहीतरी काम असणार असा अंदाज करत फोन उचलला.  त्याच्या एका परिचितांकडे गृहप्रवेशाची पुजा होती, तिथे जायचं होतं.  नव-यानं फोन वरुन सांगितलं, आपल्यासाठी रात्री आठ ते साडेआठची वेळ ठेवली आहे.  मला काही समजलं नाही.  पुजा आहे ना, मग आपल्यासाठी वेगळी वेळ कशाला ठेवलीय, म्हणून मी त्याला उलट प्रश्न केला.  तेव्हा कळलं, की पाहुण्यांची गर्दी नको, म्हणून त्या यजमानांनी प्रत्येक पाहुण्यांना एक टाईम स्लॉट दिला होता.  आत्तापर्यंत इंटरव्हूसाठीचा टाईम स्लॉट ऐकला होता.  आता पुजेसाठीही टाईमस्लॉट द्यायला लागले का, म्हणून मी नव-याला विचारलं.  तो वैतागला.  ऑफीसचे काम चालू होते.  तुला काय करायचं,  आपल्याला फक्त तिथे दिलेल्या वेळेत पोहोचायचंय, हे लक्षात ठेव.  त्यांच्याक़डे जायला अर्धा तास लागेल, तू तयार रहा, मी ऑफीसवरुन आल्यावर लगेच निघायचं.  ऑर्डर वजा विनंती करत त्यानं फोन ठेवून दिला. 

संध्याकाळी नवरा त्या टाईमस्लॉटच्या धाकानं अर्धातास लवकर आला. 


निघतांना घाई नको म्हणून मी दुपारीच भेटवस्तू घेऊन ठेवली होती.  ती पिशवी घेऊन आम्ही निघालो.  शहराबाहेर झालेल्या या मोठ्या सोसायटी म्हणजे, आलीबाबाच्या गुहेसारख्या आहेत.  पाच-दहा मिनिटाच्या शोधानंतर आम्हाला हवी असलेली विंग मिळाली.  त्याच्याखाली बाहेरुन आलेल्या गाड्यांना पार्कींग नव्हती.  ती पार्कींगची जागा शोधेपर्यंत अजून पाच मिनीटं गेली. अखरे बाराव्या मजल्यावरील त्या घरात जाण्यासाठी आम्ही लिफ्टमध्ये आलो, तेव्हा आठ वाजून पाच मिनिटे झाली होती.  बाहेरच्या सजावटीवरुन नवीन घर कुठले ते समजत होते.  नवरा पुढे गेला.  त्याला पाहून घराचे यजमान पुढे आले.  नमस्कार, चमत्कार झाले.  त्यांनी माझा परियच करुन दिला.  घराची वास्तुपुजा होती, पण घर खाली होते.  माझी नजर पाहुण्यांना शोधू लागली.  त्यांनी आम्हाला पुजा जिथे मांडली आहे, त्या देवघरात नेले.  नमस्कार केला.  तिथे अजून एक कुटुंब होते.  त्यांच्यासोबत त्या गृहस्थांच्या पत्नी होत्या.  आमचा पुन्हा परिचय झाला.  मग आम्हा दोन्ही कुटुंबाना घर दाखवण्याचा कार्यक्रम सुरु झाला.  घर मोठं.  तीन बेडरुम, देवघर, किचन, हॉल आणि गेस्टरुम सुद्धा. 

घराचे इंटेरिअर एक नंबर होते.  कुठंही गर्दी नाही की पसारा नाही.  पहिला नंबर किचनचा लागला.  ते इटालीयन पद्धतीचे होते.  इटालीयन पद्धतीच्या किचनमध्ये काय खुबी असते, याची आम्हाला माहिती देण्यात आली.  त्या किचनमध्ये सजावटीसाठी काही छोटी रोपं ठेवली होती.  त्यामुळे किचनमध्ये फ्रेश वाटतं.  बरं फोडणीचा वास घरभर पसरु नये म्हणून विशेष फॅन होता.  किचनच्या सर्व रॅक आम्हाला उघडून दाखवण्यात आल्या.  आम्ही शक्यतो, काचेचीच भांडी वापरतो.  जुना चमचासुद्धा ठेवला नाही. सर्व नवीन भांडी घेतली.  जेवणासाठी हे एक नवीन कलेक्शन आलं आहे, ते घेतलं म्हणून त्या नव्या कलेक्शनची महिती दिली.  पुढे होती घरातील सिनिअर्स रुम.  पण ते दोघंही घरात नव्हते.  काही नातेवाईकांसोबत ते जेवायला गेल्याची माहिती मिळाली.  या खोलीत सर्व सुविधा करुन ठेवल्या होत्या.  अगदी छोटा टिव्ही आणि फ्रिजचीही वेगळी सोय होती.  त्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या, सिरिअल वेगळ्या.  उगाचच त्यांना त्रास नको म्हणून


ही वेगळी सोय केल्याची माहिती मिळाली.  मग आली ती मुलाची रुम.  त्याच्याही रुममध्ये वेगळा टिव्ही.  शिवाय अभ्यासाच्या जागी लॅपटॉप.  सगळं जागेवर ठेवलेलं.  पण तो लेक काही रुममध्ये नव्हता.  तोही बहुधा त्याच्या मित्रांसोबत बाहेर गेलेला.  मग घराच्या यजमानांची रुम.  तिथेही टिव्ही...तिथलं इंटेरिअरही वेगळ्या धाटणीतलं.  त्याची माहिती मिळाली.  मग आलो मुख्य हॉलमध्ये हॉटेलची रुम वाटावी एवढी तो हॉल टापटीप.   बरं इथंही टिव्ही....तो थोडा मोठ्या आकाराचा.  या ब्लॉकच्या इंटेरिअरसाठी चायनीज वास्तूशास्त्र आणि इंडोनेशियाच्या वास्तुशास्त्राचीही मदत घेतल्याचं त्यांनी सांगितलं.  माझ्या मनात उगीचच शंका डोकावली.  भारतात, ही चायनीज वास्तूशास्त्र आणि इंडोनेशियाची वास्तुशास्त्र चालतात का.  बहुधा नव-याला माझ्या मनातील शंका समजली असावी.  त्यानं माझ्याकडे डोळे मोठे करुन बघितले.  एव्हाना आमचा टाईम स्लॉट संपला होता.  सगळं घर दाखवल्यावर यजमानांनी प्रसाद म्हणून एक छोटा डब्बा हातात दिला.  उगाच हात खराब नको व्हायला म्हणून....असं एक वाक्यही त्याला जोडलं.  जेवणाचा काही पत्ता नव्हता.  माझ्या मनात होशोब सुरु झाला.  आता इथून निघालं तर घरी जायला अजून चाळीस मिनीटं तरी लागतील.  सकाळचा प्रसादाचा शिरा घरी होता.  फक्त भाकरी टाकून थोडी पिठी केली तरी काम होईल, हा विचार करत असतांनाच यजमानांनी दोन कुपनं आमच्या हातात दिली.  हे काय नवं, म्हणून मी ती आलटून पालटून पाहिली.  मग त्यानींच सांगितलं.  जेवणाची कुपनं आहेत.  ती मोठी सोसायटी असलेल्याच परिसरात एक हॉटेल होतं.   तिथे जाऊन जेवायचं.  घरात उगीचच गर्दी नको आणि तुम्हालाही जेवतांना त्रास नको म्हणून आम्ही आधीच सोय केली आहे, अशी पुष्टीही त्यांनी दिली.  अर्थातच कुपन हातात टेकवत त्यांनी आम्हाला सरळ शब्दात आता तुम्ही निघा, असं सांगितलं होते.  कारण पुढची वेळ कुणाला तरी दिली होती, आणि ती मंडळी आली आहेत, हे लिफ्टच्या आवाजावरुन कळले.  आम्ही पुन्हा एकदा नमस्कार करुन  निघालो.  लिफ्टमध्ये आमच्यासोबत दुसरं कुटुंब होतं, तेवढा वेळ मी शांत राहिले.  खाली आल्यावर पहिल्यांदा नव-याचा ताबा घेतला.  तूच त्यांना हा ब्लॉक घ्यायला सांगिलंस ना.  नव-याचा वास्तूशास्त्राचा अभ्यास चांगला आहे, त्यामुळे अनेकवेळा परिचितांना वास्तुशास्त्राबद्ल तो माहिती देतो.  तो हो, म्हणेपर्यंत मी दुसरा प्रश्न विचारला, मग ते चायनीज वास्तुशास्त्राचाही तुझाच सल्ला.  तेव्हा त्यांनी मला सांगितलं, मला फक्त ब्लॉक घेण्याबाबत विचारलं, ते मी सांगितलं,  बाकीचं मला काही माहित नाही.  आमचे हे बोलणे सुरु असतांना त्या यजमानांचे वडिल आले.  त्यांनी नव-याला ओळखलं.  सोबत त्यांच्या पत्नीही होत्या.  त्यांनी ओळख करुन दिली.  ते त्यांच्या एका नातेवाईकांना हॉटेलमध्ये घेऊन गेले होते.  त्यांचे जेवण झाल्यावर त्यांना निरोप देऊन परत आले होते.  आम्ही जेवायला जाणार ना, म्हणून विचारलं.  वास्तविक असं कुपन घेऊन हॉटेलमध्ये जेवायला जाणं, मला पटत नव्हतं.  माझा चेहरा बघून नव-यानं सांगितल, निघतांनाच आम्ही भरपूर नाष्टा करुन निघालो आहोत, त्यामुळे फारशी भूक नाही.  पुन्हा कधीतरी नक्की येऊ जेवायला.  आम्ही नमस्कारासाठी हात जोडताच, ते आईबाबा कावरेबावरे झाले.  असं

कसं.  अहो जेवायला जा ना.  नाही म्हणू नका.  चला, आम्ही येतो, तुमच्यासोबत.  तुम्हाला हवं ते घ्या. पण दोन घास खा.  आम्हाला बरं वाटेल.  त्यांचा आग्रह थांबत नव्हता.  शेवटी ते आम्हाला त्या हॉटेलमध्ये घेऊनच गेले.  आम्ही त्या दोघांनाही तुम्ही जेवलात का म्हणून विचारलं.  तर दोघंही घरातील मंडळींसाठी थांबले होते.  एव्हाना नऊ वाजून गेलेले.  त्यांना आमच्यासोबत जेवणाचा आग्रह केला.  त्यांनी पहिला मुलाला फोन केला.  त्याने रात्री दहा पर्यंत पाहुणे येणार आहेत, तुम्ही जेऊन घ्या म्हणून सांगितले.  मग आमची चौघांची पंगत त्या हॉटेलमध्ये बसली.  गप्पा मारत जेवण झालं.  तोपर्यंत अजून दोन कुटुंब त्या हॉटेलमध्ये दाखल झाली होती.  ते आजी आजोबा त्यांना सोबत देण्यासाठी परत थांबले. 

घरी परत असतांना दोनवेळा फोन वाजला होता.  मावशीचा फोन.  भावानं नवीन घर घेतलेलं.  त्याची पुजा होती. तू कधी येणार.  दोन दिवसासाठीच ये. बरीच कामं आहेत.  म्हणून ऑर्डर मिळाली.  मगाशी आलेली सर्व मरगळ दूर झाली.  ब-याचवेळा गोतावळ्याच्या या ऑर्डरी फ्रेश करणा-या असतात, याची जाणीव झाली. 

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. मस्तच! खुसखुशीत लेख!!

    ReplyDelete
  2. लेख वाचून मनात आलं की पूर्वी वास्तूशांत, नवीन घरातला ‌सत्यनारायण अशी ‌आमंत्रण यायची तिथं नातेवाईकांची मांदियाळी असायची. भेटीगाठी व्हायच्या.‌ते‌ सगळं संपलंय आणि नुसता व्यवहार उरलाय!! विचार करायला लावणारा लेख... ललिता छेडा

    ReplyDelete
    Replies
    1. मोबाईल, टिव्ही, वॉशिंग मशीन, एसी अशा घरातील सर्व वस्तू अधिक सुविधाजनक आणण्याचा प्रयत्न होतो. त्या घरात आल्या की मग त्यांना जास्त महत्त्व मिळतं....या दोघांचीही सांगड घातला आली पाहिजे. घरात असलेली माणसं आणि घरात येणारे पाहुणे हे खरे घरातील आनंदाचा ठेवा असतो....

      Delete
  3. महेश टिल्लू12 May 2024 at 05:27

    आजचे वास्तव व नात्यात आलेली कृत्रिमता योग्य शब्दात मांडली आहे.
    घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती

    ReplyDelete
  4. अगदी खरं, घराच्या भिंती या बोलक्या झाल्या पाहिजेत...

    ReplyDelete

Post a Comment