रात्रीच्या त्या निरव शांततेत कसला तरी भयानक आवाज करत एक गाडी गेली. एसीच्या आवाजातही तो त्या गाडीचा चीड आणणारा आवाज, माझ्यासारखीच अशा अनेकांची झोप उडवून गेला असणार. मनात आलेला एक अपशब्द दाबत असतानाच तो पठ्ठ्या पुन्हा त्याच गुर्मीत आला आणि तशाच आवाजात सुसाट निघून गेला. त्यापाठोपाठ गल्लीतील कुत्र्यांच्या भुंकण्याचे आवाज कितीतरी वेळ येत होते. घड्याळाचे काटे रात्रीचे १२.४० दाखवत होते. ही माणसांची झोपेचीच वेळ आणि अशा बेभान गाडी चालवणा-यांची जागण्याची वेळ असावी. डोळ्यावर आलेली गाढ झोप कुठल्याकुठे निघून गेली. या आवाजानं एका मैत्रिणीचे आयुष्य नजरेसमोर येऊ लागले. एका काठीच्या सहाय्यानं तिचं अवघं आयुष्य चालू आहे. वयाच्या अकराव्या वर्षी एक सुसुट गाडी आली आणि तिला धडक देऊन गेली. मग कितीतरी दिवस तो लहान जीव हॉस्पिटलच्या खाटेवर पडून होता. आईवडील डोक्याला हात मारुन घेत होते. महिन्याचा पगार झाला की त्याचे आधीच वाटे ठरलेले असतात ते घर. त्यात हा एवढा खर्च. मग काय मिटवामिटवी. ज्यानं धडक दिली, त्याच्या बापानं एक बंडल हातावर टेकवलं. मनात नको असतांनाही बापानं ते घेतलं. आणि ही उभी राहिली, ती काठीवर. वयाच्या अकराव्या वर्षी काठीच्या आधारावर चालायला शिकली. आता पन्नाशीत असेल. तिच्यासोबत तिच्या काठीचीही उंची वाढलीय. पण अजूनही अशा सुसाट गाड्यांचा आवाज झाली की ती थरारते...
काही ओळखी या अशा होतात, की त्या व्यक्तींना कधीही भेटलं, तरी त्यांच्या वेदनांनी मनात कालवाकालव होते. अशीच एक मैत्रिण मला भेटली आहे. सविता. तिचं छोटं दुकान आहे. बिस्कीटं, चॉकलेट, पाव, बटर, दूध असं सर्वकाही. लेक लहान होता, तेव्हा कधीतरी मी या दुकानात गेले होते. त्याला आवडतं त्या श्रीखंडाच्या गोळ्या तिथे मिळायच्या. पहिल्यांदा गेले तेव्हा तिचा चेहरा रुक्ष असायचा. अगदी दोन-तीन शब्दात संवाद संपला. मग पुन्हा गेले....तेव्हा हे शब्द वाढले. मग माझी खरेदी वाढली....फे-या वाढल्या, तसा सवितासोबतचा संवाद वाढत गेला. सविता गल्यावर बसलेली असायची. कोणी खरेदीसाठी आले की पहिला तिचा हात शेजारी उभ्या असलेल्या काठीवर जायचा. तिच्या पेक्षा उंच असलेली ही काठी मग तिचा सगळा भार पेलायची. एका पायावर भार टाकत बाकीचा भार काठीवर टाकत ती या छोट्याशा दुकानात सफाईदार वावर करायची. चांगली ओळख झाल्यावर तिच्या चेह-यावरचा रुक्षपणा दूर झाला. लेकाचे आणि माझे हसून स्वागत व्हायला लागले. गप्पा वाढल्या. अशा काही गप्पांमध्ये जाणवलं की रस्त्यावरुन एखादी गाडी जोरात गेली, की सविता दचकायची. भेदरायची. काही वेळ स्तब्ध व्हायची. मग तिचा चेहरा तसाच रुक्ष व्हायचा. सगळा संवाद थांबायचा. सविता गुमान आपल्या काठीला पकडून तिच्या जागेवर बसायची. एकदा लेक सोबत नसतांनाही असाच प्रसंग झाला. ती शांत झाली. तशीच काठीच्या आधारानं तिच्या जागेवर जाऊन बसली. गटागटा पाणी प्यायली. चेह-यावर तोच भाव. मी न राहून विचारलं होतं, काय झालं. गाडी जोरात गेली की तू कावरीबावरी का होतेस सविता.
बराच वेळ ती बोलली नाही. मी पुन्हा विचारलं, तर तिच्या डोळ्यात पाणी आलं. या गाडीनं आयुष्यभराची भेट दिली आहे ही बघ, म्हणून काठीकडे बोट दाखवलं. मला काही समजलं नाही. सविता सांगू लागली, जन्मानं काठी सोबत आली नव्हती. अगदी छान हसरी, खेळती होती. चाळीतल्या सर्व मुलींपेक्षा खेळात पुढे. सार्वजनिक पुजेच्या खेळात सर्व बक्षीस सवितालाच मिळायची. वयाच्या अकराव्या वर्षी अशीच चाळीसमोर खेळत असतांना एक बेभान झालेली गाडी चाळीच्या कम्पाऊंडमध्ये घुसली. ती थेट तिच्या पायावरच थांबली. कुठलीशी मोठी बाईक होती. गाडी चालवणारा ती गाडी तशीच तिच्या पायावर टाकून पळून गेला. आजुबाजुच्या लोकांनी जोर लावून गाडी उचलली. तोपर्यंत सवितानं किंचाळून सर्व चाळ डोक्यावर घेतली होती. आई, घरकामासाठी गेलेली. वडिलही कुणाच्या तरी दुकानात कामाला होते. आजुबाजुच्या लोकांनी सरकारी दवाखान्यात दाखल केलं. महिनाभर तिथेच होती. पायांच्या तळव्यांचा चक्काचूर झालेला. त्यामुळे उभं कसं रहाणार हा प्रश्न होता. या महिनाभराच्या दरम्यान ती हॉस्पिटलच्या खाटेवर झोपून
वेदना सहन करत होती, तर तिचे आईबाबाही एक वेदना सहन करत होते. ती वेदना मानसिक जास्त होती. मान्य आहे, अगदी हातातोंडाला घास येईल, असे घर, पण दोन्हीही मुलींवर मनापासून प्रेम करणारे. सवितापेक्षा एक धाकटी बहिण आहे. आपल्या ताईला झालेल्या या अपघातानं तिच्या चेह-यावरचं हसू हरवलं. आईबाबांना खर्चाचे गणित काही सुटेना. दोन ऑपरेशन झाली. औषधांची यादी मारुतीच्या शेपटीसारखी वाढू लागली. शेजारपाजारच्यांनी जमेल तेवढी मदत केली. तेही अशाच परिस्थितीतून जाणारे. बाबांनी कामाच्या ठिकाणाहून एक महिन्याचा पगार घेतला. आईनंही अशीच उसणवारी केली. शेवटी एक दिवस त्या मुलाचा बाप आला. फळाची एक पिशवी सविताच्या बाजुला टेकवली. सगळा खर्च माझा, काळजी करु नका, म्हणत बापाच्या हातात पैसे दिले. आई होती. ती चिडली. माझ्या पोरीचे पाय गेले. पण तिच्या हुंदक्यांना किंमत नव्हती. बापानं पैसे हातात घेतले आणि घायमोकलून रडू लागला. नंतर कधीतरी जाऊन त्यानं पोलीसांना चूक आपल्याच पोरीचा असल्याचं सांगितलं म्हणे. पण त्यानंतर आईबाबा बोलेनासे झाले. एक पाय गुडग्यापासून कापल्यावर हातात काठीच घ्यावी लागणार ना. अशी काठी घेतलेली पोरगी जेव्हा हॉस्पिटलमधून घरी आली, तेव्हा आईनं कोण तमाशा केला. बापाला मारलंही. हो हताश होता. लेकीच्या पाया पडला. माफी मागितली. म्हणाला, पैसे कुठून आणू. पुढच्या महिन्याचा पगार आधीच संपलाय, पुढच्या महिन्यात कसं होणार. तरीही आई शांत होईना, मग म्हणाला, चल सर्वजणं जाऊन जीव देऊया. आपल्याला जगायचा हक्क नाही. तोही रडू लागला. सर्व शेजार पाजार जमा झाला. सर्वच डोक्याला हात लावून बसले. आपल्या नशिबाला कोसत सर्वांनी आईची समजूत काढली. आपल्यापेक्षा खूप श्रीमंत आहेत, आपली ऐपत नाही, त्यांच्याबरोबर भांडायची. झालं गेलं विसरुन जा. म्हणून आजुबाजुच्यांनी आईची समजूत काढली. तिनं त्या गाडीवाल्या पोराच्या नावानं कितीतरी वेळा बोटं मोडली असतील ते हिशोबात नव्हतं.
सुरुवातीचे काही दिवस हिची आणि काठीची लढाईच सुरु होती. कारण अवघा भार त्या काठीला सहन करायचा
होता. दहावेळा धडपडाची. रडायची.
मग आई, त्या पोराला शिव्या द्यायची.
आणि रडत बसायची. शेवटी काठीनं हात
पकडला. पुढे मोठी झाल्यावर या काठीसह
पोरीचा लग्नाच्या मंडपातला भाव शून्य ठरला.
धाकट्या बहिणीचं लग्न झालं. सविताचं
फक्त लग्न न करता नाव बदललं. लंगडी. त्याच लंगडेपणाला पुढे करत कुठल्याश्या
योजनेतलं कर्ज मिळालं. मग हे दुकान सुरु
केलं. वडील आता नाहीत. आई आणि सविता त्याच चाळीच्या कोप-यातील खोलीत
रहातात. आता चाळ रिडेव्हलपींगला जाणार आहे
म्हणे. अजूनही सविताच्या हातातून काठी
पडली तर आई हाताची बोटं मोडत काहीतरी पुटपुटते आणि पदर डोळ्याला लावते. सविता मग काठी पकडत तिचा आवाज करते.
त्या गाडीच्या आवाजानं जागी झाल्यावर हिच सविता आणि तिच्या काठीचा आवाज माझ्या कानी रुजी घालू लागला. झालं गेलं ते विसरायचं. वर्तमानाचा विचार करायचा. भूतकाळात झालेल्या गोष्टी पुसून टाकायच्या. ही वाक्य बोलायला किंवा लिहायला छान वाटतात. पण या वाक्यात जी माणसं भोव-यासारखी फसतात ना, त्यांना विचार, त्यांना कसं वाटतं ते. पुण्यात घडलेल्या त्या अपघातात ज्या दोघांचा मृत्यू झाला ना त्यांच्या आई वडिलांना या वाक्यात टाकून बघा. पोटचं मूलं गेलं, हे पचवणं सोप्प नाही. तेही कोणी अमिरजाद्याच्या चुकीमुळे. मृत्युनंतर झालेली त्याची अवहेलना आणि मारणा-याची बडदास्त. त्यातून तो न्यायालयाचा तो जामिनासाठी आलेला पहिला निर्णय. इथे थोडीशी बेरजेची चूक झालीय. दोन मृत्यूंची नोंद आहे. पण खरे मृत्यू सहा आहेत. त्या दोघांच्या आई वडिलांच्या मृत्यूची तर दखलच घेतली नाही. अहो ज्या तरुण लेकराला खांदा देतो, तो बाप मेल्यातच जमा असतो. त्या लेकाच्या तिरडीनं झुकलेले त्यांचा खांदे पुढच्या आय़ुष्यात कधीही ताठ होत नाहीत. आणि त्या आईचं काय....तिच्या हातून कधीही गोडधोड होत नाही. गोडधोड काय, साधस जेवण केलं तरी ते तिला तिच्या लेकराविणा मातीमोल लागतं. ही माणसं जिवंतपणी मेल्यासारखीच आहेत की. त्यामळे ती निबंध लिहिण्याची शिक्षा दिली होती ना....तिच्यात वाढ झाली पाहिजे. या चार आईबापांच्याही मृत्यूची नोंद धरुन त्यांच्यासाठीही निबंध लिहायाला सांगितले पाहिजेत. बाकी काय सवितासारख्या काठ्या कितीतरी आहेत. दुस-याच्या कर्माची फळं स्वतःच्या अंगाखांद्यावर झेलत जगणारी...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Nice lekh
ReplyDeleteNice lekh
ReplyDeleteNakki karen share
ReplyDeleteApratim
ReplyDeleteराग वेदना दुःख संताप असहायता सगळ्या भावना दाटून आल्या
ReplyDeleteआदरणीय सई जी नमस्कार
ReplyDeleteआपण वर्णन केलेल्या शरीरावरच्या जखमा त्यासोबत मनावर झालेल्या जखमा यांचा अतिशय मार्मिक शब्दात वर्णन केलेले आहे.
मी सुद्धा अशा अपघातातून गेलेलो आहे!!
एन तारुण्यात शरीरावर झालेली जखम काळानुसार माणूस विसरून जातो मात्र मनावर झालेली जखम ही कधीही विसरू शकत नाही...
दादा पाटिल
लग्न न होता सविताचं नाव बदललं. लंगडी. भूतकाळात व वर्तमान काळात.... वाक्य बोलायला व लिहायला सोपी वाटतात पण.... खरंच आज तुझा प्रत्येक शब्द त्या अपघातातील वेदनाची जाणीव करून देत आहे
ReplyDeleteएखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या बेफाम गाडीचालकाना अती कठोर शासन केले पाहिजे.नुकताच पुण्यात हिट अँड रन प्रकार घडला आहे, दोन तरुणांचा जीव गेला आहे.त्या कुटुंबाला किती संकटाना सामोरे जावे लागते याची आपण कल्पना करू शकत नाही.
ReplyDeleteछान व वास्तविक जाणीव करून देणारा लेख
ReplyDelete