बंध मैत्रीचे, जीवाभावाचे..

 

बंध मैत्रीचे, जीवाभावाचे..


तुम्ही आयुष्यात काय मिळवलं....हा प्रश्न कोणी मला विचारला तर मी सांगेन की माझ्याकडे मोठा खजिना आहे.  हा खजिना किती मोठा आहे, याची मोजदाद मी कधी केलीच नाही.  कारण ते माझ्या हातात नाही.  या खजिन्यात सोनं आहे.  मोती, हिरे, माणिक यांच्यासह अनेक अमुल्य हिरे आहेत.  रुप्याचा ढीग आहेत. हा खजिना उघडला की त्यातील ते जडजवाहीर लखलखून जातात.  त्यांच्या तेजानं सर्व आसमंत झळाळून जातो.  मग या खजिन्याच्या प्रकाशात मी न्हाऊन घेते.  तृप्त होते.  डोळ्यात आनंद अश्रूंची दाटी होते  आणि मन समाधानानं भरुन जातं.  एखाद्या राज्याची मी साम्राज्ञी असल्याची ती भावाना असते.  हिच सर्व भावना माझ्या मनात ३१ मे २०२४ रोजी होती.  काय दिवस होता हा.  वयानं पन्नाशीचा टप्पा पार केला.  या पन्नाशीला सुवर्णझळाळी लावली ते गाव, गप्पा आणि चूल या पुस्तकानं.  माझं पहिलं पुस्तक.  या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त झालेल्या छोटेखानी कार्यक्रमानं मला खूप काही दिलं. आपल्या आयुष्यात मित्र-मैत्रिणींचे स्थान किती आहे, याची जाणीव पुन्हा झाली.  पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा आनंद आहेच, पण या सर्व समारंभाला या मैत्रीच्या
स्नेहबंधानं लावलेली सोनेरी झालर ही माझ्यासाठी अनमोल भेट ठरली. 

१२ जानेवारी २०१९ रोजी प्लॅनेट सई या माझ्या ब्लॉगचा शुभारंभ झाला.  छत्रपती शिवाजी महाराजांवरील पहिला ब्लॉग होता.  त्या ब्लॉगला सुरुवात


केली, तेव्हाच नवरा म्हणाला,  आपण तुझ्या या ब्लॉगचे पुस्तक करायचे.  तेव्हा मी त्याच्या या प्रस्तावाला हसण्यावर नेले.  आज प्लॅनेट सई ३०० ब्लॉगच्या टप्प्यात असतांनाही नव-याचा हा आग्रह कमी झाला नाही.  उलट त्याला ठामपणा आला.  त्यातूनच त्यानं पुस्तकाचं काम स्वतःवर घेतलं.  ब-याचवेळा सांगूनही मी जेव्हा ऐकत नाही, तेव्हा तो माझ्याच एका खमक्या मित्राकडे माझी तक्रार करतो.  हा मित्र म्हणजे, नाशिकचा मनोज मालपाणी.  जयंतनं त्याला फोन करुन प्लॅनेट सई या पुस्तकाबद्दल सांगितले.  मनोजनं त्याच्या शैलीत जयंतला तेव्हा सांगितलं होतं, तिला काय समजतं, काढूया पुस्तक....मी येतो.  जयंत तेव्हापासून कामाला लागला.  पण माझा नन्नाचा पाढा संपत नव्हता.  जयंतनं त्याच्यापरिने चार ठिकाणी चौकशी केली आणि शेवटी आम्ही आमच्या घरी गेलो.  डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार.  प्रभू कापसे यांना भेटून जयंतनं पुस्तक काढण्याची विनंती केली, तेव्हा ३१ मे ला फक्त पंधरा दिवस बाकी होते.  एवढ्या कमी वेळात पुस्तक काढणे शक्य नाही, नंतर प्रकाशन करा, असा सल्ला आम्हाला यापूर्वी मिळाला होता.  पण प्रभू कापसे म्हणाले, त्यात काय....आम्ही उद्या पुस्तक काढू शकतो.  त्यांच्या याच विश्वासातून गाव, गप्पा आणि चूल या पुस्तकाचे प्रकाशन झाले.  अवघ्या पंधरा दिवसात प्रभू कापसे आणि वैदेही जांदे यांनी माझ्या लेखांना पुस्तकाचा आकार दिला.  वैदेहीच्या कलेतून गाव, गप्पा आणि चूलचे मुखपृष्ठ सजले.  या पुस्तकासाठी दोघांनी अहोरात्र मेहनत घेतली.  या दोघांचे पुस्तकाचे काम चालू असतांना माझ्या मैत्रीमधील कोहीनूर हिरा असलेली संत साहित्य अभ्यासक प्राची गडकरी हिने या पुस्तक समारंभाच्या सोहळ्याची जबाबदारी घेतली.  कार्यक्रमाचे ठिकाण,  त्या दिवशीचा मेनू, पाहुण्यांचे स्वागत या सर्व कामाची नियोजनबद्ध आखणी केली.  मी ब-याचे कार्यक्रमांचे नियोजन केले

आहे.  पण स्वतःचा कार्यक्रम म्हटलं की फे फे होते.  माझंही तसंच झालं होतं.  एक ना धड भाराभर चिंध्यांसारखी मी सर्वकडे पळत होते.  पण प्राची ठाम होती.  तिचं नियोजन एवढं परफेक्ट होतं, की पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या ती अध्यक्षस्थानी होती,  तिचा मान मोठा होता,  पण हा माझ्या मैत्रिणीचा कार्यक्रम हे सांगत ती समारंभस्थळी सर्वात आधी येऊन तयारीला लागली होती.  अशी मोठ्या मनाची माणसं फार विरळ असतात.  अर्थात माझ्या मैत्रीच्या खजिन्यातील प्राची, वैदेही आणि प्रभूजी यांचे स्थान खूप मोठे आहे. 

वैदही जांदे बद्दल काय सांगावे.  आमची डोंबिवलीकर कार्यालयापुरती ओळख आता एका कुटुंबासारखी झाली आहे.  कार्यक्रम ठरला तेव्हा बाई माहेरपणाला गेल्या होत्या.  पण तिथूनही रोज रात्री फोन करुन पुस्तकासंदर्भात चर्चा व्हायची.  एकूण सर्व जांदे परिवारानं माझ्या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली.  वैदेहीचे सासू सासरे लेकीच्या कौतुकाला आले ते अगदी कार्यक्रम संपल्यावर आवराआवर करेपर्यंत मदतीला होते.  भार्गवी आणि वेदश्री या आमच्या चिमण्यांनी पुस्तक प्रकाशनासाठी वेगळी थिम राबवली.  वैभव जांदे हा बॅंकेत मोठा अधिकारी,  पण या कार्यक्रमासाठी हात जोडून उभा होता.  काही कमी दिसलं की धावत होता. 

बरं सोहळ्याला आलेल्या व्यक्तींची थोरवी किती सांगू.  कार्यक्रम ठरलाच मुळी दहा दिवसात.  त्यामुळे खूपजणांना बोलवण्याची इच्छा होती, त्यांनाही बोलावता आले नाही.  धुळ्याचे वैद्य सतिष बोरकर आणि वैद्य ज्योती बोरकर हे दांम्पत्य त्यापैकीच.  मी धुळ्याला रहात असतांना या दोघांच्याही मायेच्या छायेत वाढले.  माझ्या पहिल्या पुस्तकाची प्रस्तावनाही या दोघांनीच


लिहिली आहे.  त्यांनी या कार्यक्रमासाठी भरभरून आशीर्वाद दिला.  बाकी या कार्यक्रमाला जी मंडळी आली, ते सगळेच त्यांच्या क्षेत्रातले तारे होते.  राहूल लोंढे हे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत.  मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सचिव आहेत.  मात्र हे पद बाजुला ठेऊन राहुल आमच्या मैत्रीच्या धाग्यानं कार्यक्रमाला हजर होते.  तेही अगदी वेळेवर.  धुळ्याचा माझा मित्र नितीन पाटील ही असाच.  कार्यक्रम पत्रिका पाठवल्यावर अवघ्या पाच मिनिटात त्यांनी तिकीट बुक केल्याचा फोटो पाठवला आणि कार्यक्रमाला वेळवर हजर झाला.  त्याआधी माझ्या नावाचे गोल्डन पेन पाठवून आश्चर्यचकीत केले.  माझ्या मनोज नावाच्या मित्राचे काय सांगावे.  बहुधा ही मनोज नावाची मंडळी पक्के मित्र असतात.  कारण मनोज मालपाणी हा माझ्या मैत्रीचा हिरा आहे.  त्याला पकडून जोरात भांडू शकते.  रडू शकते.  त्याच्यावर हक्क गाजवू शकते.  हा माझा हक्काचा मित्र निवडणुकीचे सर्व व्याप बाजुला ठेऊन माझ्या कौतुकसोहळ्याला हजर होता.  दुसरे मनोज म्हणजे, आमचे मनोज महेता आणि मधुरा मेहता.  या उभयतांनी मला डोंबिवलीत ओळख दिली.  हे दांम्पत्य माझ्या मैत्रीच्या व्याख्येत आहे, सोबत गुरुस्थानीही आहे.  सगळ्या व्यापातून वेळ काढत हे दोघंही या कार्यक्रमासाठी हजर होते.  राजेंद्र गमरे हा माझा व्हिडिओ ग्राफर मित्र थेट झारखंडहून आलेला.  बाकी आमच्या दर्शन सामंत मॅडम, विंदा भुस्कुटे, मीना गोडखिंडी, पै काका, अनुराधाताई आपटे, ललिता छेडा, जयश्री कर्वे, भारती मोरे, प्रभाकर भिडे काका ही मंडळी केवढी मोठी.  पण घरचा कार्यक्रम म्हणून पुस्तक सोहळ्यात वावरली.  बाकी सर्व मित्रपरिवाराचे काय कौतुक करावे.  आमचा रेवदंड्याच्या एसआरटी मित्रपरिवार प्रशांत, अजित, संदिप, संतोष आणि सहकुटुंब आलेली हेमा यासर्वांसाठी मी काय करते, माहित नाही.  पण या सर्वांच्या प्रेमाच्या ओलाव्यात मात्र अथांग डुंबण्याचे भाग्य मला लाभले आहे.  या सर्व प्रवासात वार्डे गुरुजी यांचे स्थान सर्वोच्च आहे.  त्यांचे चिरंजीव

रमेश वार्डे हे सहपरिवार या कार्यक्रमासाठी रेवदंड्याहून हजर होते.  तेही अगदी वेळेच्या आधी.  त्यांच्या या उपस्थितीनेच मला केवढा आधार वाटला, हे शब्दात व्यक्त होणार नाही. 

आमच्या मैत्री परिवारातील बारी कुटुंब हे तर अजब रसायन आहे.  कधी या माणसांनं पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा फोटो काढला आणि कधी तसाच केक करुन आणला, हे कळलं देखील नाही.  शिवाय कार्यक्रमाचे बॅनर लावण्यापासून ते काढण्यापर्यंत सर्व जबाबदारी न सांगता घेतली.  माझा लेक कार्यक्रमाला नव्हता.  पण त्याचे मित्र कार्यक्रमला हजर होते.  त्यांनी लेकाला सगळा कार्यक्रम लाईव्ह केला.  कधी, कसा हे मला माहितच नाही.  पण अशीच ही मैत्रीची साखळी सुरु आहे, याचा अभिमान वाटला.  माझ्या निर्मिती, उमा, भावना या मैत्रिणी,  श्रेयासारखी छोटी मैत्रिण या सर्व हात जोडून उभ्या होत्या.  तू फक्त सांग, आम्ही आहोत.  या सर्वांच्या सहयोगातून माझ्या पहिल्या पुस्तकाचे बारसे झाले.  असाच कितीतरी मोठा मित्रपरिवार या बारश्याला आनंदानं उपस्थित होता.  त्यांची नावं राहिली आहेत. याची जाणीव आहे.  पण माझा परत या मैत्रीवर विश्वास आहे.  कारण या मैत्रीत राग, रुसवा नाहीच.  आहे तो फक्त प्रेमाचा ओलावा.  धन्यवाद हे खरे मैत्रीत मानू नयेत, पण औपचारिकपणे तरी सर्वांना हात जोडून नमस्कार आणि धन्यवाद मंडळी....

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. आदरणीय सई जी धन्यवाद
    अपन फार सुंदर वर्णन केलय!!

    ReplyDelete
  2. खूSSप सुंदर वाचतांना जणु काही आपण त्या कार्यक्रमात बसलो आहोत असेच वाटले.इतके हुबेहुब वर्णन अप्रति

    ReplyDelete
  3. व्वा सई , अभिनंदन. लॉस्ट माय फ्रेंड , बाहेर जावे लागले , येऊ शकलो नाही , क्षमस्व

    ReplyDelete
    Replies
    1. तुला मीस केलं अजय....भेटूया कधीतरी नक्की.

      Delete
  4. महेश टिल्लू1 June 2024 at 15:06

    खूप अभिमानास्पद कामगिरी.पुस्तक प्रकाशन आणि तेही अवघ्या १५ दिवसात ही अशक्य गोष्ट प्रत्यक्षात खरी करून दाखवली त्या सर्व टीम चे आभार मानावे तेवढे कमी आहेत.त्यामागे परमेश्वराचे अधिष्ठान आहे हेच सिद्ध होते.असेच छान छान लेख लिहित रहा.
    त्यापुढील पुस्तक प्रकाशन सोहळ्याला मी अवश्य येईन. धन्यवाद.

    ReplyDelete
    Replies
    1. महेशजी धन्यवाद. डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवारच्या सहकार्याने हा कार्यक्रम आणि माझे पुस्तक झाले.

      Delete
  5. हे मैत्रं असंच चिरंतन राहो..पुस्तकासाठी अभिनंदन!!

    ReplyDelete
    Replies
    1. डॉक्टर धन्यवाद

      Delete
  6. खूप आनंद वाटला. अभिनंदन👍🙏

    ReplyDelete
  7. Chhanach lihila aahe.

    ReplyDelete
  8. I missed the opportunity to attend the function and interact with you and your family Sai ji.

    ReplyDelete
    Replies
    1. ओके....तुम्हाला वेळ असेल तेव्हा नक्की सांगा.....नक्की भेटूया...

      Delete

Post a Comment