ज्ञानप्रतिभा

 

ज्ञानप्रतिभा



एक-दीड वर्षापूर्वी मला एका कार्यक्रमाला बोलवलं होतं.  स्वरुपिणी महिला मंडळाचा कार्यक्रम होता.  मंडळाच्या अध्यक्षांबरोबर परिचय झाला.  अजून एका व्यक्तीबरोबर माझी ओळख करुन देण्यात आली, त्या मंडळाच्या संस्थापिका होत्या.  दुधाळ गोरा रंग आणि हसतमुख चेहरा.  वावरतांना त्यांच्या  स्वभावातील सौम्यपणाची झलक मिळत होती.  महिला मंडळाच्या त्या संस्थापक अध्यक्षा होत्या.  पण अध्यक्षपदाची कमान आणि अधिकारही त्यांनी सहजपणे दुस-या सहकारी महिलेकडे सोपवले होते.  संपूर्ण कार्यक्रमात मी संस्थापिका आहे, हे असंच हवं, असच करा, हे माझं आहे,  अशी कसलीही अधिकारांची बळजबरी नाही की ढवळाढवळ नाही.  त्याचवेळी मी त्या पासष्टी ओलांडलेल्या पण तरुण पिढीचे भरभरुन कौतुक करणा-या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडले.  त्या म्हणजे, प्रतिभा बिवलकर.  तेव्हा प्रतिभाताईंची अगदी वरवरची ओळख होती.  स्वरुपिणी महिला मंडळाच्या संस्थापिका, ज्ञानेश्वरी, भगवतगीतेच्या अभ्यासक अशीच त्यांची ओळख मला होती.  मात्र हळूहळू प्रतिभाताईंच्या कार्याची व्याप्ती समजत गेली.  त्यांनी पार केलेला ज्ञानसागर मोठा आहे.  पण याचा अहं त्यांच्याकडे नाही.  कधीही, कुठेही भेट झाली तरी आत्मियतेनं चौकशी आणि आदरानं बोलणं.  कुठेही मी पणा नाही, की स्वतःची प्रौढी नाही.  ज्ञानेश्वरीच्या अभ्यासक असलेल्या प्रतिभाताईंबरोबर जेव्हा अशाच सहज गप्पा मारण्याचा योग आला, तेव्हा त्यांच्या स्वभावातील एक-एक उलगडत गेला. 

प्रतिभाताईंचा जन्म कोकणातला.  जैतापूर, राजापूचा.  त्यांचे वडील, सिताराम करंदीकर हे पोस्टमास्टर.  सात बहिणी आणि एक भाऊ,  शिवाय सहा आत्या, तीन मामा, पाच मावश्या अशा भल्यामोठ्या कुटुंबात प्रतिभाताईंचा वावर होता.  वडील पोस्टमा्स्टर असल्यामुळे बदली व्हायची.  राजापूर, देवगड, मालवण, फोंडाघाट, कणकवली अशा ठिकाणी शिक्षण झाले.  वडिलांची फिरतीची नोकरी असली तरी, त्यांचा शिक्षणासाठी आग्रह होता.  घरात वाचनाचे संस्कार होते.  यातूनच सर्व भावंड उच्चविद्याविभूषीत झाली.  प्रतिभाताईंनी कणकवलीच्या शिवाजी विद्यापीठातून एम.ए. भूगोल ही पदवी घेतली.  पुढे रत्नागिरीतून बीएड पूर्ण केले.  रत्नागिरीच्याच गोगटे महाविद्यालयात त्या भूगोलाच्या प्राध्यापिका म्हणून रुजू झाल्या.  १९८३ मध्ये त्यांचे लग्न विवेक भालचंद्र बिवलकर यांच्याबरोबर झाले तेव्हा त्यांचे वय २७ होते.  त्याकाळी मुलीच्या दृष्टीकोनातून लग्नासाठीचे हे वय म्हणजे, खूपच होते.  पण बिवलकर कुटुंबात प्रतिभाताईंचे त्यांच्या मुळ नावासह स्वागत झाले.  पती विवेक बिवलकर हे इंजिनिअर, सासरेही इंजिनिअर तर आजेसासरे शिक्षणाधिकारी. बिवलकर कुटुंबियांचे विचार प्रगत.  लग्नात खर्च करण्यापेक्षा त्या नवीन दाम्पत्याला मदत करावी, असे विचार.  त्यामुळे प्रतिभाताई आणि विवेक बिवलकर यांचे लग्न अतिशय साधेपणानं झालं.  अशा कुटुंबात आल्यावर त्यांच्या अभ्यासू स्वभावाला पुरक वातावरण मिळाले.  लग्नानंतर त्या पेंढारकर महाविद्यालयात भुगोलाच्या प्राध्यापिका म्हणून रुजू झाल्या.  तीन वर्ष ही नोकरी केली.  दरम्यान प्रणव या मुलाचा जन्म झाला.  त्यांच्या पतीसोबत त्यांना दिल्ली, बंगाल या राज्यात रहावे लागले.  बंगालमध्ये असतांना प्रतिभाताईंनी त्यांच्याकडे काम करायला येणा-या महिलेकडून बंगाली भाषा शिकून घेतली.  जवळपास सहा वर्षाचा हा कालखंड प्रतिभाईंना ज्ञानेश्वरी आणि भागवतगीतेला जोडून गेला. 

मुलगा आठ वर्षाचा झाल्यावर त्यांनी पुन्हा डोंबिवली गाठली.  आता नोकरी


करण्यापेक्षा अन्य काहीतरी कर, असा सल्ला त्यांना पतीकडून मिळाला.  एव्हाना ज्ञानेश्वरी आणि भगवतगीतेचा अभ्यास चांगलाच चालू झाला होता.  मग डोंबिवलीतील सामाजिक संस्थांमध्ये सभासद व्हायला सुरुवात केली.  तेव्हाच प्रतिभाताईंनी रहात असलेल्या भागाचा अंदाज घेतल्यावर येथील महिलांसाठी एखादे सामाजिक मंडळ चालू करावे अशी कल्पना त्यांना सुचली.  मग काही महिलांना सोबत घेऊन त्यांनी घरोघरी जाऊन आपली संकल्पना सांगितली.  अशातूनच १९९६ मध्ये स्वरुपिणी महिला मंडळाची स्थापना झाली.  प्रतिभाताई या मंडळाच्या पहिल्या संस्थापक अध्यक्षा झाल्या.  आज या मंडळाच्या दोन शाखा आहेत, आणि २०० हून अधिक सभासद आहेत. 

याचदरम्यान त्यांचा लक्ष्मीबाई देव यांच्याबरोबर परिचय झाला.  त्यांनी प्रतिभाताईंचा भगवतगीतेचा अभ्यास बघून गीता धर्म मंडळाची परीक्षा देण्यास सुचवले.  ही परीक्षा त्या चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याच, पण गेली २५ वर्षा याच मंडळाच्या ज्ञानेश्वरीवरील परीक्षांच्या परिक्षक म्हणून त्या काम करत आहेत.  याच देव कुटुंबियांनी प्रतिभाताईंना ज्योतिष विषयाचा अभ्यास करायला सुचविले.  मग त्यांनी डोंबिवलीतील प्रसिद्ध ज्योतिषी, श्री श्री भट यांच्या ज्योतिष वर्गात प्रवेश घेतला.  हा अभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांना पती विवेक यांच्याकडून मोठी भेट मिळाली.  प्रतिभाताई बिवलकर, ज्योतिषी अशी पाटी त्यांनी सोसायटीच्या गेटवर लावली.  ती पाटी पाहून प्रतिभाताईंना खूप अप्रूप वाटले.  आज प्रतिभाताईंचे मान्यवर ज्योतिषांमध्ये नाव घेतले जाते.  तेव्हा त्या पती विवेक बिवलकर यांचा हा अनुभव आवर्जून सांगतात.  यात त्यांची प्रवचनकार म्हणूनही ओळख होत होती.  पार्ले येथील लोकमान्य सेवा संघात त्यांचे पहिले प्रवचन झाले.  त्यानंतर प्रतिभाताई कधी थांबल्या नाहीत.  पसायदान, वंदे मातरम, भागवतगीता, टिळक आणि सावरकर अशा अनेक विषयावर त्यांची दिड हजारावर प्रवचने झाली आहेत. 

कोरोनाकाळ हा प्रतिभाताईंच्या प्रतिभेला आणखी एक लकाकी देऊन गेला.  कोरोनाचा काळ सुरु झाला, तेव्हाच त्यांना नातू झाला.  अशावेळी नातवाचे दुपटी, टोप्या शिवण्याची जबाबदारी त्यांनी उचलली.  पण हे सर्व करत असतांना ज्ञानेश्वरी आणि गीतेचे अध्ययन चालू होते.  तेव्हा त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना एखाद्या विषयावर ऑनलाईन प्रवचन देण्याची कल्पना सुचवली.  शब्द हा विषय घेऊन प्रतिभाताईंनी पहिले प्रवचन दिले.  त्यानंतर गीता, ज्ञानेश्वरी, भेटलेल्या व्यक्ती आणि भेट दिलेली मंदिरे या विषयावर प्रतिभाताईंचे व्हिडिओ आले आहेत.  सकळीक व्हिडीओंचा हा टप्पा आता २०० च्या टप्प्यावर आहे.  या सर्वांसाठी त्यांना त्यांची सून जान्हवी हिचा खूप मोठा पाठिंबा मिळाला.  पण माणसानं कधीतरी थांबलं पाहिजे, हे सांगत प्रतिभाताई या टप्प्यावर थांबणार आहेत. आता अन्य काहीतरी नवीन करु अशी त्यांची तयारी सुरु आहे.  याच कोरोना काळात प्रतिभाताईंनी अमेरिकेतील मराठी बांधवांसाठी ५२ ऑनलाईन व्याख्याने दिली.  हे सर्व यश ज्ञानेश्वरीच्या अध्ययनातून मिळाले आहे, असे नम्रपणे प्रतिभाताई सांगतात.  मामा दांडेकर, साखरे महाराज, सातारकर महाराज यांच्यासह पावसच्या स्वरुपानंदांची अभंग ज्ञानेश्वरी, नरसोबा वाडीहून मिळालेली लिखीत ज्ञानेश्वरी आज त्यांच्याकडे आहेत.  प्रतिभाताई या सर्वांचा खजिना असा उल्लेख करतात.  बाबामहाराज सातारकर यांची ज्ञानेश्वरी त्यांनी माहिती देता देता


सहज माझ्या हातात ठेवली.  चंदनाच्या पेटीत असलेल्या या ज्ञानाच्या महासागराला स्पर्श करायला मिळाल्याचे भाग्य मला मिळाले, ते प्रतिभाताई यांच्या सहससाध्य स्वभावामुळेच.  याच सर्वात त्यांनी पहिल्यांदा आळंदीला गेल्याचा अनुभव सांगितला.  त्या दिवशी नेमकी आळंदीला अलोट गर्दी होती.  पण तेथील एका व्यक्तीनं प्रतिभाताईंना ध्यानकक्षात जाण्यास सांगितले.  तिथे गेल्यावर समोर ज्ञानेश्वरांची भव्य प्रतिमा बघितल्यावर त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरु झाल्या.  ज्ञानेश्वरी आणि भगवतगीतेच्या अखंड अध्ययनात गुंतलेल्या असलेल्या प्रतिभाईंना सामाजिक भानही आहे.  त्यामुळेच त्या लहान मुलांचे कपडे शिवून ते गरजूंना देतात.  शिवकाम, भरतकामाची त्यांना आवड आहे.  व्याख्यान, प्रवचनासंदर्भात कोणी मार्गदर्शन मागितले तर त्यासाठी त्या लगेच तयार असतात.  व्याख्यानात विषयाची मांडणी कशी असावी हे त्या सोप्प्या भाषेत विशद करतात,  पुजेची चौकट असते, तसेच विषयाचे असते. त्याच चौकटीवर पुजेचे सर्व सामान व्यवस्थित ठेवावे लागते.  तशीच विषयाची मांडणी केली की, विषय अधिक सहजपणे प्रेक्षकांना समजतो हे त्या समजावून सांगतात.  याशिवाय प्रतिभाताईंची ११ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.  त्यात मंत्रोपचार आणि उपासना या पुस्तकाचाही समावेश आहे.  प्रवचन आणि लेखनात अग्रेसर असलेल्या प्रतिभाताईंचा चतुरंग पुरस्कार, नवदुर्गा पुरस्कार, गीतागौरव

पुरस्कार, गोमती पुरस्कारानं सन्मान करण्यात आला आहे. 

काहींपासून सांभाळून राहिले पाहिजे आणि काहिंना सांभाळून ठेवले पाहिजे, हे प्रतिभाताईंचे ब्रीदवाक्य आहे.  कुठल्याही कामात यश मिळण्यासाठी सातत्य महत्त्वाचे असते.  प्रतिभाताईंकडे बघून याची प्रचिती येते.  ज्ञानेश्वरी आज त्यांना मुखोग्दत आहे.  पण प्रतिभाताईंचे समाधान झालेले नाही.  अजूनही याच ज्ञानसागराच्या अध्ययनात त्या रममाण होतात.  यातच अवघ्या विश्वात फिरण्याचे सूख असल्याचे त्या सांगतात.  मी पणा सोडणे अवघड असते,  पण ही अवघड पायरी पार केली की जीवनाचा खरा आनंद प्राप्त होतेो.  प्रतिभाताई यांचे जीवन तसेच आहे.....

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

 

 

 

 

Comments

  1. लेख खुप छान आहे,आपले !!मनःपुर्वक अभिनंदन!!

    ReplyDelete
  2. Khup chhan lekh

    ReplyDelete
  3. अप्रतिम लेख..खरच प्रतिभाताई आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे

    ReplyDelete
  4. लेख खुपच छान आहे. पण लेख वाचुन मन गलबला.आदरणीय गुरुवर्य प्रतिभाताई नावाप्रमाणेच तुम्ही उच्च कोटीच्या प्रतिभावंत आहात ,अशा महान व्यक्तीच्या सहवासात राहण्याचे भाग्य आम्हा मंडळीना लाभते ते स्वरुपिणी मंडळातून व स्वरुपिणीच्या पहील्या अध्यक्षा प्रतिभाताई. खरोखर आमचे आम्ही भाग्यवान समजतो. सई बने आपण ही माहीती या लेखाद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवलीत त्याबद्दल त्रिवार नमस्कार.

    ReplyDelete
  5. शीला माने.

    ReplyDelete
  6. अतिशय सुंदर लेख आणि प्रतिभाताईंचे व्यक्तीमत्व अतिशय समर्पकपणे लिहीले आहे.

    ReplyDelete
  7. खूप छान लेख लिहला आहे.
    प्रतिभाताई महान व्यक्तीमत्व आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. खुप छान लेख प्रतिभाताईंचा
      त्यांच्यातील प्रतिभेला नमस्कार.💐

      Delete
  8. सौ.अर्चना चित्राव

    ReplyDelete
  9. खूप छान प्रतिभाताईंवरील लेख. वर्णन जसे आहे तसे.आम्हाला खूप अभिमान आहे प्रतिभा ताईंचा.

    ReplyDelete
  10. सई बने यांनी आमच्या प्रतिभाताईंचे त्या अगदी जश्या आहेत तसेच लिहिले आहे. आम्ही धन्यता मानतो की त्याचा सहवास त्याचे मार्गदर्शन आम्हाला सर्वगुणसंपन्न अशा प्रतिभाताई लाभल्या आहेत.

    ReplyDelete
    Replies
    1. प्रतिभा ताई.. आमच्या प्रतिभा ताई...त्यांना आम्ही जवळून पाहतोय...अनुभवतोय...त्या अश्याच आहेत..त्या गुरू आहेत. मोठी बहीण आहेत..मैत्रीण आहेत..मार्गदर्शक आहेत..हितचिंतक आहेत..हिरा पारखणाऱ्या जौहरी आहेत...मुख्य म्हणजे त्या आमच्या ताई आहेत..

      Delete
  11. प्रतिभावंत आम्हाला गुरूस्थानी असलेल्या
    प्रतिभाताईंवरील हा लेख., अगदी त्यांच यथार्थ चित्रण करणारा आहे. अशा गुरू, मार्गदर्शक आमच्या आहेत हे आमचं भाग्यच आहे. त्यांची साथ आणि आशीर्वाद आम्हाला सदैव लाभावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
    🙏🙏🙏

    ReplyDelete
  12. खूप छान लेख आहे.

    ReplyDelete
  13. व्यासंगी विदुषी आहेत प्रतिभाताई!!

    ReplyDelete
  14. यथार्थ वर्णन.

    ReplyDelete
  15. अतिशय नम्र व्यक्तिमत्व शांत ठेवणाऱ्या नंदादीपासारखे..

    ReplyDelete
  16. प्रतिभा या शब्दाचा खरा अर्थ म्हणजे आपल्या कार्यकर्तृत्वाने सिद्ध केलेल्या प्रतिभाताई... आपल्या या लेखाने प्रतिभाताईंचे विचार नक्कीच पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरतील

    ReplyDelete
  17. नमस्कार प्रतिभाताई
    आपल्या बद्दल हा लेख वाचून अतिशय आनंद आणि अभिमान वाटला त्या बरोबर आम्हाला आपल्या ज्ञानसागरा चा प्रत्यय वेळोवेळी घेता येतो .अश्या गुरुवर्य आम्हाला लाभल्या हे आमचे सौभाग्य च आहे .आपल्या कडे बघून एकच म्हणावेसे वाटते "साधी राहणी उच्च विचार " अगदी नावा प्रमाणे .नमस्कार

    ReplyDelete
  18. अतिशय यथार्थ वर्णन ,त्यांचे हे अमूल्य कार्य असच चालू राहू दे ,त्या साठी शुभेच्छा !

    ReplyDelete
  19. नमस्कार,
    प्रतिभाताई तुमच्याबद्दल लिहीलेला लेख वाचला.किती सहज हे सगळ करता कौतुक वाटल.तसच न मागता गरज ओळखून मदत करण्याचा गुणही मला अनुभवायला मिळाला.नातवाच्या वेळेस झबली टोपडी कुंची दुपटी व पाचवी षष्ठीच्या पूजेची माहीती पाठवलीत.खरच खूप आधार वाटला.असेच कार्य आपल्या हातून घडत राहो ही सदीच्छा.

    ReplyDelete

Post a Comment