छंदात रंगले मी..
छंद. किती छोटासा शब्द. पण हा शब्द ज्याच्या आयुष्यात नसेल ना त्याचे आयुष्य शून्य असते. आणि ज्याच्या आयुष्यात हा छंद नावाचा छोटासा, गोजिरा शब्द सामावलेला असेल ना त्याचे आयुष्य हे चाफ्याच्या फुलांसारखे असते. जिथे जाईल, त्याला सुगंध देणारे. अशाच छंदात रंगलेल्या एका व्यक्तिमत्वाच्या मी प्रेमात पडले आहे. या व्यक्तीचे वय अवघे ८२ वर्षाचे आहे. मात्र त्यांचा उत्साह हा त्या अंकाच्या अगदी उलट येणा-या आकड्याएवढा आहे. या व्यक्ती म्हणजे, अनुराधाताई जनार्दन फाटक. उत्तम वाचक, गाडगे बाबांच्या जीवनाच्या अभ्यासक, कथाकथनकार अशी ओळख असलेल्या अनुराधाताईंनी अनेक महिलांना स्वयंरोजगाराचा मार्ग दाखवला आहे. अत्यंत सुबकपणे त्या कापडी पिशव्या शिवतात. ऑफीसला जातांना उपयोगी पडतील अशा पर्स ते पिकनिकला जाण्यासाठीच्या बॅग पासून अनेक कापडी पिशव्या अनुराधाताई सराईतपणे शिवतात आणि शिकवतातही. अनुराधाताईंनी या सर्व कलांची छंद म्हणून अधिक जोपासना केली आहे. त्यांच्यामते या सर्वांतून मिळणा-या समाधानामुळे आयुष्यात अधिक रंगत आली आहे. अनुराधाताईंचा हाच स्वभाव, त्यांच्या चेह-यावरील गोड हास्यातून समोरच्या व्यक्तिला चुंबकासारखा खेचून घेतो. गोरापान वर्ण आणि चेह-यावरील सात्विक समाधान असलेल्या अनुराधाताईंचं अवघं जीवनच छंदात रंगले मी...या थाटाचं आहे.
डॉक्टर भास्कर जोशी हे अनुराधाताईंचे वडील. त्यांचे माहेरचे नाव सुधा जोशी. लहानग्या सुधाचे शिक्षण अनेक गावांमध्ये झाले. वडील, डॉ. भास्कर जोशी हे गुरांचे डॉक्टर. त्यामुळे त्यांची बदली ही खेडेगावात व्हायची. जबलपूर मधील पाटण जिल्ह्यातील शाळेत सुधाचे शिक्षण सुरु झाले, ते हिंदीमधूनच. घरी सुधासह चार भावंडे. आई-वडील, दोघंही शिक्षणाचे आणि वाचनाचे पुरस्कर्ते. त्यांच्या याच संस्कारात वाढत असलेल्या सुधाची पुढची शाळा, थेट जळगावं जिल्ह्यात झाली. तेथील जामुत या खेडेगावात वडीलांची बदली झाली. मग अमरावती, वरुड, तिवसा असा सगळा प्रवास झाला. इयत्ता नववीपर्यंत अशा सर्व खेडेगावात शिक्षण झालेल्या सुधाला १० वी मध्ये असतांना नागपूरला शिक्षणाची संधी मिळाली. तिथे त्यांच्या काकांचे घर होते. वडीलांच्या फिरतीच्या नोकरीमुळे मग त्यांची आई आणि अन्य भावंडेही नागपूरला शिक्षणासाठी आली. नागपूरला धरमपेठ शाळेत त्यांची दहावी झाली. नंतर याच धरमपेठ कॉलेजमध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेतला.
नागपूरला आल्यावर सुधासाठी नवे दालन उघडले गेले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची व्याख्याने ऐकण्याची संधी मिळाली. आधीच आईमुळे वाचनाची गोडी लागली होती. आई, गो.नि. दांडेकर यांची पडघवली कांदबरी या भावंडांना नेहमी सांगत असे. त्यातून या सुधावर भाषेचे आणि व्याख्यानाचे नकळत संस्कार होत गेले. बी.ए. च्या शेवटच्या वर्षाला असतांना सुधाचे लग्न डोंबिवलीच्या जनार्दन गणेश फाटक यांच्याबरोबर झाले आणि त्या अनुराधा
फाटक झाल्या. जनार्दन फाटक हे तेव्हा रेल्वेत नोकरीला होते. शिक्षणाचे महत्त्व जाणणा-या जनार्दन फाटक यांनी अनुराधाताईंना आपली पदवी पूर्ण करण्याचा आग्रह केला. त्यांच्याच पाठिंब्यानं अनुराधाताईंनी बीए ही पदवी घेतली. संसार सुरु झाला. जयंत आणि हेमंत या दोन्ही मुलांच्या संगोपनात अनुराधाताई व्यस्त झाल्या. पण यातही त्यांची वाचनाची आवड कायम होती. जनार्दन फाटक हेही अभ्यासू. त्यामुळे घरात वाचनसंस्कृती नांदत होती. यात ठाणे मराठी ग्रंथ संग्राहलायातून अनुराधाताईंनी ग्रंथपाल अभ्यासक्रम पहिल्या पहिल्या नंबरानं केला. हे वाचनाच्या आवडीनं शक्य झाल्याचं अनुराधाताई सांगतात. याच वाचनाची बैठक त्यांची एवढी पक्की झाली की, या फाटक दाम्पत्यांनं अवघा भारत पालथा घातला आहे. अनुराधाताईंना प्रवास वर्णन वाचण्याचा छंद आहे. ही प्रवास वर्णनं वाचून अनुराधाताई त्याच्या नोट्स काढायच्या. मग त्यातून त्यांचा प्रवासाचा प्लॅन तयार व्हायचा. आता आपण युट्यूब बघून जसे प्रवासाची तयारी करतो, तसेच अनुराधाताई प्रवास वर्णन वाचून कधीच करायला लागल्या होत्या. गो. नि. दांडेकर यांचे आम्ही भागीरथाचे पुत्र हे पुस्तक वाचून अनुराधाई आणि जनार्दन फाटक यांनी भाकडा-नंगल धरण प्रकल्प बघितला आहे. बरं अनुराधाताईंची स्मरणशक्ती एवढी दांडगी की, ती कांदबरी कधी वाचली, त्या फिरायला कधी गेल्या यांच्या तारखा त्या सांगताताच, पण ओघवत्या वाणीतून त्या पुस्तकातील उताराही जसाच्या जसा सांगतात. भाकडा-नंगल धरण प्रकल्प बघितल्यावर या जोडप्यानं असेच नाथ सागर धरणही बघितले आहे.
वाचनाची आवड जपणा-या अनुराधाताई या दरम्यान शिवणकामही करायला लागल्या होत्या. त्यांची ही आवड बघता जनार्दन फाटक यांनी त्यांना एक मैत्रिण भेट म्हणून दिली. ही मैत्रिण म्हणजे, शिलाईमशीन. अनुराधाताई आणि या मशिनचे ऐवढं गुळपीठ जमलं, की या दोघीही एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवू लागल्या. एव्हाना मुलं मोठी झाली. ती शिक्षण आणि नोकरीसाठी बाहेर पडली. एवढी वर्ष मुलांभोवती विश्व असलेल्या अनुराधाताईंनी मग एककीपणा जाणवू लागला. त्यांच्या एका मैत्रिणीनं त्यांना पद्मजा मंडळात .येण्याचा आग्रह केला. त्या जेव्हा या मंडळात गेल्या, तेव्हा कांदेनवमी होती. मंडळात महिलांसाठी स्पर्धा होत्या. दोन मिनीटात मराठी नाटकांची नावे लिहायची होती. अनुराधाताईंनी यात पहिला क्रमांक पटकावला. या घटनेनं त्यांचा आत्मविश्वास वाढला. मग अन्यही चांगल्या मंडळांची माहिती मिळाली. व्यासंग वाढला. तसा पुस्तकांचा आवाकाही वाढला. गाडगेबाबांच्या साहित्याचा त्यांनी अभ्यास केला. वृंदा कौजलगीकर या एका मैत्रिणीने त्यांचे पहिले गाडगेबाबांवर व्याख्यान जिजाऊ संघात ठेवले. हा पहिलाच प्रयोग यशस्वी झाला. आज अनुराधाताई, पुणे, मुंबई, ठाणे, डोंबिवली येथे गाडगे बाबांच्या जीवनावर व्याख्यान देतात. तेही दीड तास.
या त्यांच्या वाचनाच्या व्यासंगाबरोबरच त्यांनी कापडी पिशव्या बनवण्यास सुरुवात केली. आज त्यांच्या या अनोख्या छंदातून प्रवासी बॅग, साडी कव्हर, पर्स, पिकनीक बॅग त्या सहज बनवतात. बरं बाजारात एखादी नवीन डिझाईनची बॅग बघितली तरी ती सहज करण्याचं कसब त्यांच्या हातात आहे. याच पिशव्यांमधील सफाई स्मिता तळेकर या मैत्रिणीला आवडली. त्यांनी
रंजना आणि प्रमोद करंदीकर यांच्यापर्यंत अनुराधाताईंचे नाव पोहचवले. हे दोघंही कर्जत येथे शबरी सेवा संघ नावाची संघटना चालवतात. ऑगस्ट महिन्यात जेव्हा शेतीची कामे संपतात, तेव्हा ठाणे आणि धुळ्याच्या ग्रामीण भागातील महिलांचे ते निवासी शिबीर आयोजीत करतात. त्यांना काही कलाकुसरीच्या वस्तू शिकवल्या जातात. आता या सेवाकामात अनुराधाताईंचाही सहभागी होतात. दोन दिवस त्या या सेवा संघात राहून या महिलांना पिशव्या शिकवतात. त्यांचा हात या कापडी पिशव्यांवर इतका आहे की, हातातील छोटी पर्स अगदी काही मिनीटात त्या तयार करतात. मला हे सर्व सांगताना, शिवण कामाच्या कितीतरी सोप्या ट्रिक सांगितल्या की, मी सुद्धा त्यांच्याकडे या कापडी पिशव्या शिकण्याच्या वर्गात भरती होण्यासाठी नाव नोंदवलेच. असो. यातून अनुराधाताईंचा उत्साही स्वभाव स्पष्ट होतो. त्यांच्याकडे अशा अनेक महिला पिशव्या शिकण्यासाठी येतात. अनुराधाताई, त्यांना हातचं राखून न ठेवता शिकवतात. यातून त्यांनी अनेक महिलांना स्वयंरोजगार सुरु करण्याची प्रेरणा दिली आहे.
कथाकथन हा अजून एक छंद
अनुराधाताईंनी जोपासला आहे. त्याचीही
सुरुवात नकळत झाली. एका कार्यक्रमासाठी
टिव्हीचे युनिट आले होते. त्यांना सर्व
माहिती अनुराधाताईंनी दिली. पुढे त्यातील
साऊंड रेकॉर्डीस्टनं अनुराधाताईंना, तुमचा आवाज माईकसाठी एकदम परफेक्ट असल्याची
दाद दिली. हिच प्रेरणा घेऊन त्यांनी
कथाकथन करायला सुरुवात केली. हे वयाच्या ६५
मध्ये सुरु झालं बरं. आता वयाच्या ८२ व्या
टप्प्यात त्यांच्या कथाकथनाचे अनेक प्रयोग झाले आहेत. विजया वाड यांची निरोप ही कथा त्यांचा आवडती
आहे. अनेक ठिकाणी त्यांनी बक्षीसं मिळवली आहेत.
अगदी जांभूळपाड्यातही त्यांनी कथाकथनाचा कार्यक्रम केला आहे. यासाठी अनुराधाताई कुठलीही जाहिरात करीत नाहीत. हे आणखी एक विशेष.
सतत कार्यमग्न रहाणे अनुराधाताईंना आडवते. याच त्यांच्या स्वभावामुळे ८२
वय हे फक्त सांगण्यासाठी आहे. त्यांचा उत्साहा हा एखाद्या पंशवीशीतील तरुणीसारखा आहे. मध्यंतरी हाताला दुखापत झाली होती. तेव्हा डॉक्टरांना शांत बसा, असे सांगितले. त्याचेच त्यांना टेन्शन आले. अखेर नुसतं बसण्यापेक्षा त्यांना महिलांना घरी बोलावून कापडी पिशव्या शिकवण्यात आपला वेळ घालवला. एकूण काय अनुराधाताई या आयडल आहेत. नवीन पिढीशी समरस किती व्हावं हेही अनुराधाताईंकडूनच शिकावं. हातातील स्मार्ट फोनचा त्या पुरेपूर वापर करतात. वॉटसअपच्या माध्यमातून त्यांनी अनेक मैत्रिणी जोडल्या आहेत.
उगाच वयाची साठी ओलांडली की
अनेकजण तक्रार करत फिरतात, आता काय, साठी झाली, हातपाय दुखतात, काही होत नाही अशी तक्रारींची माळ संपत नाही. पण माणसांनं एखादा छंद जपला तर ही तक्रारींची
माळ कधी तयारच होत नाही. आज अनुराधाई याच
छंदांमध्ये रंगून गेल्या आहेत. छंदाच्या
भांडवलावर एक समाधानी आयुष्य कसे असते, याच्या अनुराधाताई आयडॉल आहेत.
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
अनुराधा ताईंचे खूप कौतुक. खरोखरच सतत कार्यमग्न असतात
ReplyDeleteअश्या ह्या अनुराधा ताई डोंबिवली ब्राह्मण सभेतही उपकार्याध्यक्ष यापदावर आहेत. त्या जश्या आनंदी आहेत तश्या उत्तम मदतगार पण आहेत .
Deleteसई बने यांनी अनुराधा फाटक यांचे योग्य व चपखल शब्दात वर्णन केलय. सगळ्यांनाच अभिमान वाटेल असेच कौतुकास्पद अनुराधा फाटक यांचे व्यक्तिमत्त्व आहे. सतत सकारात्मक विचार करून कायम कार्यरत रहाणे. हे त्यांचे ब्रीदवाक्य. त्यामुळेच येईल त्या परिस्थितीला त्या हसतमुखाने सामोऱ्या जाऊ शकतात. मला पण त्यांची नातेवाईक म्हणून खुप खुप अभिमान वाटतो. धन्यवाद.
Deleteखूप कौतुक सादर pranampranam
DeleteKhup mast lekh
ReplyDeleteछान व्यक्तिमत्त्व
ReplyDeleteखूपच छान लेख आणि व्यक्तिमत्त्व
ReplyDeleteनतमस्तक मॅडम
ReplyDeleteखूप छान अनुराधा ताईनं कडे बिघितले की ऊर्जा मिळते त्यांचे गोड हसणे समोरच्या व्यक्तीचे मन जिंकून घेते कथा सांगण्याची हातोटी तर विचारायला नको आपल्या समोर कथा उभी राहते
ReplyDeleteखूप छान. उत्साही व्यक्तिमत्त्व.
ReplyDeleteस्फूर्तीचा झरा.💥
सईताई, उत्तम लेख!
ReplyDeleteअनुराधाताईंचे कार्य कौतुकास्पद!
छंद जीवनाला आकार देणारे!
Very nice article younger generation should read and follow any such hobby. To be proud that I am related
ReplyDeleteखूप छान लेख आणि व्यक्तिमत्त्व
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteअनुराधाताईंचे यथार्थ वर्णन केले आहे.
ReplyDeleteनवीन पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी अत्यंत ज्येष्ठ व छंद जोपासत अरुणाताई यांची संपूर्ण माहिती दिल्याबद्दल दिल्याबद्दल
ReplyDeleteआम्ही जोशी कुटुंबियांसाठी त्या role model आहेत
ReplyDeleteWA नव्हते तेव्हा त्यांनी ,त्यांना अतिशय आवडलेली ,स्वाती सुरंगळीकर यांची कविता,त्यांनी मला साध्या फोनवर सांगून ,मला लिहून घ्यायला सांगितली
नवीन दालन उघडले 🙏
अनुराधा ताईंचे चपखल वर्णन.अनुराधाताई खरोखरंच आदर्शवत आहेत.
ReplyDeleteछान
अनु ताईंचे कार्य आणि आवड खूपच छान आहे. त्यांचे अभिनंदन. तुम्हीं ते लिहिल्यामुळे आम्हाला कळले, तुमचेही आभार.
ReplyDeleteसुरेख व्यक्ती चित्र
ReplyDeleteएखादया व्यक्तिरेखेचे परिपूर्ण आशयघन वर्णन केले आहे, वाचताना टी व्यक्ती आपल्या पुढे आहे असे वाटले,शालेय जीवनापासून ते या वयापर्यंतचा सर्व प्रवास मोजक्या शब्दात उलगडून दाखवलाय.
ReplyDeleteसतत उद्योगी राहणे हे उत्तम आरोग्याचे गमक आहे हे अधोरेखित होते.
खूपच छान. प्रेरणादायी
ReplyDeleteअप्रतीम लेख आहे.एखाद्या व्यक्तीच चित्र कस साकाराव याच उत्तम उदाहरण म्हणजे सई तुझा हा लेख आहे.मोजकेच चपखल शब्द पण तरिही खूप ऊंची असलेले.
ReplyDeleteअर्थात अनुराधा ताईही अशाच आहेत,गोड,प्रेमळ,निरागस,सर्वांना आपलस करण्यार्या.......इत्यादी
सख्ये सई सँलूट तुला😴👌💐💓❤
अनुराधा ताई,तुमचे कार्य व व्यक्तिमत्त्व आदर्श आहे! सर्वांना प्रेरणादायी आहे! अभिनंदन व शुभेच्छा!
ReplyDeleteखरंच प्रेरणादायी व्यक्तिमत्व.सई खूप छान माहिती.
ReplyDelete