शॉर्टकटच्या जाळ्यातील पालक
गेल्या दोन आठवड्यापासून अशा काही पालकांच्या संपर्कात आहे, ज्यांच्या मुलांची पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. बारावीनंतर असलेल्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी या मुलांनी प्रेवश परीक्षा दिली आहे. त्यानंतर महत्त्वाचा टप्पा आता सुरु होत आहे, तो म्हणजे, प्रवेश प्रक्रियेचा. याच टप्प्यावर पालकांना आपल्या मुलांनी केलेल्या ख-या अभ्यासाचा आरसा समोर उभा रहातो. त्यात जी प्रतिमा उभी रहाते, ती पाहून हताश झालेले पालक मग डोक्याला हात लावून बसतात. असेच निराश झालेले पालक सध्या माझ्या संपर्कात आहेत. वर्षभर अभ्यासात त्याचं लक्ष नव्हतं, पण परीक्षेच्या आधी दोन महिने त्यानं मन लावून अभ्यास केला, पण आयत्यावेळी पेपर पॅर्टनच बदलाल....हे त्यांचं मुलांच्या शॉर्टकटला पाठिंबा देणारं वाक्य ऐकून मग मी डोक्याला हात लावत आहे.
परीक्षा आणि शॉर्टकट या दोन शब्दांनी गेल्या दोन आठवड्यापासून भंडावून सोडलं आहे. बारावीनंतरच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर होत आहेत. या परीक्षांचा निकाल लागल्यावर होणा-या प्रवेश प्रक्रियांच्या माहितीसाठी अनेक विद्यार्थी आणि पालक माझ्या संपर्कात आहेत. त्यातील
काही पालकांचे अज्ञान ऐकून हसावे की रडावे हा प्रश्न पडत आहे. मुळात एका परीक्षेने मुलांच्या गुणवत्तेची पारख होते, असे मी मानत नाही. पण जर आपल्या पाल्यानं ठराविक परीक्षा द्यावी असा निर्णय पालक घेत असतील तर त्या परीक्षेचा अभ्यास, त्याच्यासाठी घ्यावी लागणारी मेहनत आणि त्याचा निकाल लागल्यावरची पुढची प्रक्रिया याची तरी माहिती पालकांना असावी अशी अपेक्षा आहे. निदान सुशिक्षित या कॅटेगरीत येणा-या पालकांकडून तरी ही अपेक्षा ठेवायला हवी.
गेल्या आठवड्यापासून असेच काही पालक आणि त्यांचे मुलांच्या चुकांना पाठिंबा देणारे संवाद पाठलाग करीत आहेत. मुळात कुठल्याही क्षेत्रातील प्रवेश परीक्षा या एक-दोन महिन्यांच्या अभ्यासानं सहज पार करता येतील अशा नसतात. त्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते. हा प्रवेश, ठराविक अभ्यासक्रमासाठी असो वा क्रिकेट, फुटबॉल अशा खेळांसाठी असो. कुठल्याही क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी मेहनत ही हवीच, हे सूत्र पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. मुलांपेक्षा ते पालकांनी अधिक ठेवावं, आता असं वाटू लागलंय. कारण मुलांचा संबंधित परीक्षेचा निकाल लागल्यावर वास्तवाची जाणीव या पालकांना होते. आणि मग एक-एक कारणं द्यायला सुरुवात होते. त्यातील कॉमन कारण म्हणजे, थोडा उशीराच अभ्यास सुरु केला. पण दोन महिने सतत अभ्यास करत होता. रात्री उशिरा पर्यंत जागायचा. पेपरपण चांगले गेले.
पण नेमका त्यानं ज्याचा अभ्यास केला, तोच चाप्टर आला नाही. मुळात कुठल्याही प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रम हा दोन महिन्यात कव्हर होईल असा नसतोच. अपवादात्मक विद्यार्थी दोन महिन्यात तो अभ्यासक्रम पूर्णही करतात. पण त्यांची अध्ययन क्षमता निश्चितच उत्तम असते. ही बाब इथे पालक विसरुन जातात. आपल्याच मुलांनी मारलेल्या शॉर्टकटचं पालकांनी समर्थन केल्यावर ही मुलंही मागे रहात नाहीत. त्यांचीही अशी शॉर्टटनचे समर्थन करणारी कारणं पुढे येऊ लागतात. या सर्वात एक प्रश्न मुख्य असतो, आम्हाला हवं ते कॉलेज कसं मिळेल. याचं उत्तर माझ्याकडे नसतं. कारण ते कॉलेज अगदी टॉपर असतं. तिथे प्रवेश घेण्यासाठी ९९ टक्केही कमीच असतात, मग जेमतेम पंचात्तरी गाठलेल्या विद्यार्थ्यांचा तिथे प्रवेश कसा होणार. ही सगळी प्रवेश प्रक्रिया ठराविक नियमानुसार चालते. त्या नियमांची तरी माहिती आहे का....तीही नाही.
या सर्व प्रवेश फे-यांची माहिती दिल्यावर मग पुढचा प्रश्न येतो, तो
पालकांच्या आणि मुलांच्या सहनशीलतेचा. तिथेही
थांबण्याची तयारी नसते. काही पालक जेव्हा
यातून सुटका करुन मुलांच्या प्रेमापोटी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घेऊ म्हणून
सांगतात, तेव्हा आणखी एक सणक डोक्यात जाते.
प्रवेश शुल्कापेक्षा पाच ते दहा पट अधिक पैसे भरायची या पालकांची तयारी
असते. असे कशाला करता, त्यापेक्षा अन्य शाखेत प्रवेश घ्या, असे
सांगितल्यावर हेच पालक सांगतात, नको, मुलाला वाईट वाटेल, ते निराश होईल. अशावेळी मनात विचार येतो, अरेबाबा यापेक्षा वर्षाचे दहा महिने टंगळमंगळ
करणा-या मुलाचा कान पकडून त्याला अभ्यासाला का नाही बसवले. फक्त दोन महिन्यात कुठलाही अभ्यासक्रम पूर्ण
झाला असता तर शाळा-महाविद्यालयांमध्ये वर्ष कशाला आपण वाया घालवली. दोन महिन्यात सगळं आटपलं असतं की. ही दोन महिन्यात अभ्यास केल्याचा दावा करणारी
शॉर्टकट बाळं जेव्हा अभ्यास करत होती तेव्हा तरी तुम्ही बघितलंत का हा प्रश्न
विचारला तरी पालक सैरभैर होतात. त्यात काय
बघायचं, तो मोठा झालाय, त्याला त्याचं कळलं पाहिजे. या सर्व गोंधळलेल्या आणि गोंधळात टाकणा-या
पालकांची मग पहिली शाळा मी घेत आहे.
आपण ज्या शाखेत मुलांना घालू इच्छितो, तेथील अभ्यासक्रमाचा कालावधी, त्या अभ्याक्रमाची व्याप्ती आपल्या मुलांना झेपणार आहे की नाही हे आधी पालकांनी समजून घ्यायची गरज असते. त्यातही कॉलेजची फी आणि तेथील वातावरण हाही महत्त्वाचा भाग असतो. कारण अद्याप शालेय वातावरणात वाढलेली मुलं अचानक पंख फुटल्यासारखी मोठ्या विद्यापीठात जातात. तेथील वातावरणाची त्यांच्यावर छाप पडते. तसाच मित्रपरिवार त्यांचा होतो, आणि त्यांच्या पुढच्या भविष्यात या सर्व गोष्टी परिणाम करुन जातात. अनेकवेळा कॉलेजच्या फी व्यतिरिक्तही खर्च असतात, जे पालकांना न परवडणारे असतात. त्यात मुलांच्या रहाण्या-खाण्याच्या खर्चाची भर पडणार असेल तर मुलांना पालकांवर पडणा-या आर्थिक बोजाची कल्पना द्यायला हवी, असे मी मानते. काही पालक ही गोष्ट सांगितल्यावर घाबरुन सांगतात, नको, त्याला उगाच टेन्शन येईल. जाणीव करुन देणं आणि टेन्शन घेणं, यात फरक आहे की नाही. मुळात पालकांनी हाच सर्व फरक जाणून घ्यायला हवा. आपल्या पाल्यांनी ठराविक परीक्षा द्यायला हवी, आणि विशिष्ट विद्यापिठात प्रवेश घ्यायला हवा, अशी इच्छा असेल तर त्या मुलांसोबत पालकांनीही तेवढीच मेहनत घ्यायला हवी. मुलाला अभ्यासक्रम झेपतो की नाही. त्याला तणाव जाणवतो का. त्याला अन्य कशात रुची आहे का...हे सर्व प्रश्न आधीच सुटले की मग या शॉर्टकटला फाटा दिला जातो. ही मुलं आपलं ध्येय नक्की केल्या दिवसापासून झपाटून अभ्यासाला लागलेली असतात. यासर्वात पालकांच्या इच्छेनं चालणारी मुलं चाचपडतांना बघितली की त्या मुलांपेक्षा पालकांची अधिक कीव येते. हे पालक ब-याचवेळा त्यांच्या करिअरच्या आणि नोकरीतील स्पर्धेची कारणं पुढे करतात. आम्ही त्याच्यासाठीच करतोय की, हे लेपनही असतं. पण ज्याच्यासाठी करत आहात, त्याच्यापर्यंत तुमची मेहनत पोहचत नसेल तर काय उपयोग. दोन-तीन वर्ष या सर्व स्पर्धेपासून दूर गेलं तर काय चंद्रावर जाण्याचा योग टळणार आहे का. मुलांना योग्य वेळी पालकांच्या समजुतदार सोबतीची गरज असते. ती त्यांना मिळाली की, ही पाखरं समर्थ असतात. त्यांच्या पंखात बळ असतेच. गुणाची मर्यादा त्यांना रोखू शकत नाही.
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
खूप छान विषय मांडला खरोखर अजूनही पालक जागे होत नाही
ReplyDeleteTrue
ReplyDeleteलेख खुप छान आहे.
ReplyDeleteखूप वास्तव सांगणारा लेख आहे. पण पालक जागे होत नाहीत हे पण तितकंच खरं आहे....
ReplyDeleteआजचे भयाण वास्तव आहे. शॉर्टकट ने परीक्षा पास होता येते,पण कायम टिकणारे ज्ञान मिळत नाही.अशा मुलांना काही प्रश्न विचारला तर उत्तर देता येत नाही,मार्क मात्र ९० चा वर असतात,असे मी खूप विद्यार्थी पाहिले आहेत.पालकांची,मुलांची मानसिकता जीवघेण्या स्पर्धेत पुढे कसे जाता येईल या विचाराने पाचाडलेली आहे.
ReplyDelete