फणस..गरे आणि आठळ्या
पावसाळ्यात काही फळं मिळत नाहीत, किंवा ती मिळाली तर त्यांची चव उतरलेली असते. असंच एक फळ म्हणजे फणस. पण माझ्या एका मैत्रिणीकडे नेमका पावसात तयार होणार कापा फणस आहे. या फणसाचा आम्ही सर्वजणी चहूबाजुनं उपयोग करतो. चहूबाजुनं म्हणजे, हा फणस लागल्यापासून सर्वांची त्याच्यावर नजर असते. अगदी कोवळा असतांना भाजीसाठी त्याची वाटणी होते. मग थोडे गरे लागल्यावर या कच्च्या ग-यांची भाजीही होते. मग सर्वजणं शांत बसतात आणि फणस पिकण्याची वाट पाहू लागतात. बहुधा वटपौर्णिमा झाल्यावरच हा फणस उतरवला जातो आणि त्याची वाटणी सुरु होते. यावेळीही तशीच वाटणी झाली. फणसाचा आकार चांगलाच मोठा, त्यात कापा फणस कापायला अधिक कठीण. म्हणून माझा दरवेळचा वाटा अर्ध्या फणसाचा असतो. तो अर्धा फणस यावेळीही माझ्या हातात पडला आणि जिभेवर त्याची चव पसरली. ग-यांचा हलका सुगंध, ते अगदी तयार झाल्याची साक्ष देत होते. पण माझं मन अधिक एका गोष्टीकडे बघून सुखावलं, ते म्हणजे, त्या ग-यांमधली आठळी.
गायीचे दूध, दुधाची साय, सायीचे दही, दह्याचे ताक आणि ताकावरचे लोणी....असेच काहीसे फणसाचे असते. भर पावसाळ्यात हातात पडलेला हा फणस ताब्यात घेत आम्ही सर्व मैत्रिणींनी एकमेकींनी नेहमीचा निरोप दिला. आठळ्या ठेवा हं...तुम्हाला नको असतील तर मला द्या. अर्थातच माझ्याच मैत्रिणी त्या. यापैकी कोणीही फणसाची एकही आठळी वाया जाऊ देणार नव्हती. कारण या फणसाच्या ग-यासारखीच गोडी त्याच्या आठळ्यांनाही आहे. एरवी आमच्याकडे फणसाच्या आठळ्या फक्त मी उकडून किंवा भाजी करुन खाते, नव-याला त्याची गोडी नाही. पण या फणसाच्या आठळ्यांमध्ये साखरच जास्त. त्यामुळे नावाला का होईना नवरा या आठळ्यांची भाजी पानाला लावून घेतो.
मुळात हाच काय, पण दुसरा कुठलाही फणस किंवा गरे घरी आल्यावर त्याची एकही आठळी मी वाया जाऊ देत नाही. स्वच्छ धुवून पंख्याखाली सुकवल्या तरी या आठळ्या अवघ्या पावसाळ्यात पुरेशा पडतात. रेवंदडा आणि गागोदे या गावात रहात असतांना या आठळ्यांसोबत पावसाळा काढला आहे. इथे एकदा पाऊस सुरु झाला की तो थांबायचे नाव घेत नाही. तेव्हा आई घरात चूल पेटवायची. त्या चुलीच्या निखा-यांवर आठळ्या टाकल्या जायच्या. भाजल्या की सालं काढून सरळ पोटात जायच्या. त्या गरमागरम आठळ्यांनी
पावसाळ्याची थंडी दूर व्हायची. सुदैवानं तेव्हा आठळ्यांनी काही त्रास होतो, पोटात दुखतं किंवा गॅस होतो, अशा समजुती कानीही आल्या नव्हत्या. तेव्हा श्रावणात या आठळ्यांची फक्त जिरं पेरून केलेली भाजी पुरेशी पडायची. पावसाचा थंडावा पसरला की जिभेला झणझणीत पदार्थांची ओढ लागते. अशावेळी आठळ्यांची रस्सा भाजी आणि भाकरी असा बेत व्हायचा. कधी तरी त्यात सुकी मच्छी टाकून सामिश जेवणाची मेजवानी व्हायची. श्रावणात आणि अधिक महिन्यात जेव्हा उपवासांचा सुकाळ असायचा तेव्हा याच आठळ्या सोबतीला यायच्या.
मात्र नंतर या आठळ्यांकडे कानाडोळा होऊ लागला. मुळात फणसाचे गरेच चांगले मिळेनात. अख्खा फणस घेतला तर तो दोघांना संपणार कसा, हा पहिला प्रश्न पडायचा. त्यामुळे सुरुवातीला गाडीवर मिळतात ते फणसाचे गरे घेतले. पण आकारानं मोठ्या असलेल्या या फणसाच्या ग-यांची चव काही पचनी पडली नाही. त्याच्या आठळ्याही फार चवदार नव्हत्या. अशावेळी मैत्रिणी कामी आल्या. एका मैत्रिणीच्या गावी फणसाची बागच. तिच्याकडे उन्हाळ्याचे तीन महिने फणसच फणस. फणसाच्या ग-यांनी भरलेला तिचा डबा महिन्यातून दोन वेळा तरी येणार. त्यामुळे त्याच्या आठळ्या चांगल्याच
जमा होतात. शिवाय वडपौर्णिमेच्या निमित्तानं का होईना, घरात अख्खा फणस आणायची हौस मी पूर्ण करुन घेते. त्याच्याही ग-याबरोबर आठळ्यांवर अधिक नजर असते. फक्त प्रश्न होता तो त्यापासून करणा-या पदार्थांचा. कारण नवरा जरा या आठळ्यांपासून दूर तसाच लेकही. आत्ताआत्तापर्यंत फक्त मीच या आठळ्या उकडून खाऊन संपवत होते. मात्र आठळ्यांपासून होणा-या काही वेगळ्या पदार्थांची माहिती मला मिळाली. ते पदार्थ केल्यापासून या आठळ्यांना आमच्याही घरात मागणी वाढली आहे.
एकतर अगदी सोप्पा. पण थोडा तेलाचा वापर जास्त असणारा. आठळ्या कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या. मग आपण पावभाजीसाठी जो लाकडाचा रगडा वापरतो, त्यांनी त्या ठेचायच्या. त्यांची साल बाजुला करुन तव्यावर त्या परतून घ्यायच्या. थोडं तेल जास्त लागतं. खरपूस व्हायला आल्या की त्यावरच तिखट टाकायचं. गॅस बंद केल्यावर मग चाट मसाला आणि काळं मिठ पेरायचं. पावसाळ्यात या कुरकुरीत आठळ्यांवर थोडा कांदा, टोमँटो, पुदिना आणि खजुराची चटणी, शेव भुरभुरलेली डीश लेकापुढे ठेवली होती. दोन मिनिटात सपाट करत त्यानं बेसचा क्रिप्स चांगला झाल्याची पावती दिली. त्या आठळ्या होत्या, हे मात्र मी त्याला सांगितलं नाही. अशाच या शिजलेल्या आठळ्या सालं काठून घ्यायच्या. त्याच्यावर असलेली लाल, चॉकलेटी रंगाची सालही काठायची. मग त्यांना वाटून घ्यायचे. मी जेव्हा हा
पदार्था बघितला तेव्हा त्या महिलेनं पाट्यावर आठळ्या वाटल्या होत्या. हे वाटून झालं, की त्यात बारीक कांदा, अननसाचे बारीक तुकडे, अवाकॅडोचा गर, हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे, मिठ, लिंबाचा रस आणि चवीला मिठ टाकून एक रगडा तयार केला. मी जिथे बघितलं त्यांनी नाचोज बरोबर हे सारण ठेवलं होतं. वर त्यात ऑलिव्ह ऑईलही टाकलं होतं. पण मी यासर्वांवर हलकीशी जि-याची फोडणी टाकली आणि फाफडा आणि खाक-यांसोबत खायला दिलं होतं. यात आठळ्या आहेत, याचा शोध माझ्या नव-यालाही लावता आला नव्हता, एवढी त्याची चव भन्नाट झाली होती.
आठळ्या या अशाच असतात. त्या दुस-या कशाबरोबरही मिळून जातात आणि पदार्थाला मिळवून आणतात. कारण आठळ्यांची भाजी करायची म्हटली तरी, त्याला सोबत म्हणून वांग, शेवग्याच्या शेंगा, मासे, सुकी मच्छी, चणा डाळ असं काहीही चालतं. ती भाजी चवदार होतेच. पण या आठळ्यांबाबतीत गैरसमजूतीच अधिक. अनेकदा आठळ्यांमुळे पोटदुखी होते, किंवा गॅस पकडतो, असे मानले जाते. अर्थात ते तुम्ही त्या किती खात आहात, यावर आधारीत आहे, असे तरी मला वाटते. कारण कोकणात तर अख्खा पावसाळा या फणसाच्या आठळ्यांचा आधारानं काठला जातो. काही ठिकाणी तर आठळ्यांना माती लावून एका माठात ठेवले जाते. कोकणातला पाऊस आठ-आठ दिवसांचे बस्तान बांधूनच येतो. अशावेळी याच आठळ्या जिभेचे आणि पोटाचे चोचले पुरवतात. अगदी माठ भरुन नाही, पण एका
डबा भरेल एवढ्या आठळ्या माझ्याकडेही झाल्या होत्या. नेमकं त्या डब्यात भरत असतांना नवरा ऑफीसमधून आला. आल्याआल्या त्याची नजर त्या आठळ्यांवर पडली. आणि स्वारी एकदम खूष झाली. मी आश्चर्यानंच त्याच्याकडे बघितलं, तर त्यानं आठळ्यांच्या औषधी गुणधर्मावरील एक लेख वाचला होता. त्यामध्ये म्हणे, भरपूर कॅल्शियम, फॉस्फरस, लोह असतं. बीपी कंट्रोल रहातो, फारकाय वजनही कमी करायला याचा वापर होतो. तो भरभरून आठळ्यांचं कौतुक करत होता. माझ्यासमोर आमच्या कोकणातील काटक आणि चवळीच्या शेंगेसारखी माणसं उभी राहिली. उगाच नाही आम्ही दुधापेक्षा त्याच्या सायीला अधिक जपतो....
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Maza sarvaat aavadate fruit fanas aahay tya ver itaka sunder lekh lihala mastch
ReplyDeleteदूध खूपच गोड, त्यावरची साय जास्तच गोड! तसाच फणस! काप्या असो की बरक्या, त्याचा सुगंध घरभर दरवळत राहतो आणि चव ओठांवर रेंगाळत राहते, तोपर्यंत आठळ्या खायलाही फुरसत नसते, पण नंतर त्यावरची ही साय, किंवा सायीचे दही,लोणी, तूप, जे काही बनवाल, ते अप्रतिम सुंदर ! लेख सुद्धा तितकाच गोड आणि क्रिस्पी! मनापासून आवडला. 👍👍❤️
ReplyDelete.... सौ.मृदुला राजे
आठळ्याच वर्णन वाचतांना जणुकाही ती भाजी खातच आहोत असच वाटत होते.एकदम सुरेख
ReplyDeleteफणसाच्या गऱ्यांचा मनमोहक फोटो पाहील्यावर,गरे खाण्याचा मोह आवरता.येत नाही.मला रसाळ फणसाचे गरे खुपच आवडतात.लहानपणी गावी असताना असताना आम्ही अठळ्याची भाजी आवडीने खायचो.सुखा जवला टाकुन अठळ्याची भाजी चवदार.होते.आपल्या छान लेखाने जुन्र्या आठवणीना उजाळा दिला.खुप छान,अभिनंदन!!
ReplyDeleteKhup chhan lekh
ReplyDeleteफणासावरचा लेख अप्रतिम. कोकणी माणूस फणासासरका अशी म्हण आहेच.मात्र मला स्वतःला फणसाचा वास सहन होत नाही,आज पर्यंत मी एकही गर खाल्ला नाही.
ReplyDeleteआठळ्याची डिश खूप छान.खूप छान माहिती मिळाली.
ReplyDeleteMala phanas farsa avdat nahi....
ReplyDeletePan Mazi aai karte ti athalyanchi ambat god amti matra phar avdte... Agadi orpun tyacha aswad me ghete
.. tuzya recipes pan pudhlya varshi nakki try karnar.