कारल्याची छोटी बहिण
लेक चार दिवसासाठी येणार म्हटल्यावर पहिल्यांदा पिशवी हातात घेतली आणि बाजार गाठला. फारफारतर आठवडा राहीन असा त्याचा निरोप आल्यावर एवढा हुरुप तर येणारच. अशात पावसाच्या सरीही सुसह्य वाटत होत्या. पण बाजारात असलेल्या भाज्या पाहून कधीनव्हे ती काळजी वाटू लागली. अवघा बाजार पावसाळी भाज्यांनी भरलेला. यातलं काही केलं, तर त्याचा चेहरा कसा होईल, हा विचार आला आणि हातातल्या, खुरपी, कुर्डू, टाकळ्यासारख्या भाज्या खाली ठेवल्या. शेवटी मटार, कोबी, गाजर, मशरुम, मोठ्या मिरच्या, टोमॅटो या भाजांनी पिशवी भरली. अडल्या नडल्याला साथ देणारे बटाटे भरभरुन घेतले. वड्यांच्या अळूची भरपूर पानं घेतली. हातात जड झालेल्या भाजीच्या पिशव्या सावरत असतांनाच एका भाजीवर नजर पडली. अरे व्वा म्हणत त्या भाजीकडे झेपावलेच. लेकाचा विचार मनात आला. पण तो यायला अजून दोन दिवस होते. त्या दोन दिवसात हिच भाजी करुया म्हणून त्या भाजीच्या वाट्याचा भाव विचारला. ती भाजीवाली पार गावातली....पण तिला माहित होतं, ती विकत होती ती भाजी सोन्याचा भाव असलेली आणि तरीही सर्वाधिक मागणी असलेली होती. त्यामुळे तिनं ताढ्यात सांगितलेले ऐंशीही मला कमीच वाटले. मग माझी परीक्षा घ्यायची म्हणून तिनं दोन वाट्यांचे दिडशे सांगितले. तिच्या या उदार ऑफरनं मी सुखावले. तिच्यापुढे भाज्यांनी भरलेल्या पिशवीला खुली करत दोन वाटे टाकायला सांगितले. या मौसमातील पहिल्या कंटोळीची भाजी मिळाल्याच्या आनंदात त्या भाजीवालीला पैसे दिले.
कंटोळी, कंटुरर्ली, काटरी...अशा अनेक नावांनी ही भाजी ओळखली जाते. चवीला अगदी कारल्याची लहान बहिण शोभेल असा तिचा थाट असतो. पण खरं सांगू का ही भाजी जेवढी गुणाची, तेवढी कटकटीची...लहानपणी आईनं जबरदस्तीनं ही भाजी खाऊ घातली. तेव्हा आईला ही भाजी करतांना एवढे कष्ट करावे लागतात याची जाणीव नव्हती. पुढे स्वंयपाकघराची सूत्र माझ्या हाती आल्यावर या भाजीतील गुणधर्माची माहिती कळली. मग कंटोळी आपल्याला खायलाच हवी याचा साक्षात्कार झाला. ठाण्याच्या बाजारामध्ये या कंटोळ्यांची जणू शाळाच भरते. अर्थात तेव्हाही त्यांचा दर चढाच असाचया. एकदा ऑफीसला जातानाच ही कंटोळी विकत घेतली. छोटी काटेदार फळं. किंमत बघून एक वाटा घेतला. संध्याकाळी घरी आल्यावर तशीच पिशवी फ्रिजमध्ये ठेऊन दिली. दुस-या दिवशी सकाळी डब्यासाठी कंटोळ्याची भाजी करायला घेतली आणि वेळेचं सगळं गणिक बिघडलं. कारण ही छोटी फळं काही केल्या हातात येईनात. ती स्वच्छ करेपर्यंतच सगळा वेळ निघून गेला. मग त्यांना कापायचं आणि त्यातल्या बिया काढायच्या. अजिबात नाही. डब्यासाठीची ही भाजीच नाही, म्हणत तशीच अर्धवट कापलेली भाजी फ्रिजमध्ये ठेऊन दिली. त्यादिवशी डब्याला सुट्टी मिळाली. संध्याकाळी आल्यावर पुन्हा त्या भाजीकडे मोर्चा वळवला.
भाजी साफ करुन घेतली. कंटोळी थोडी कडू असतात, त्यामुळे त्यांना बारीक चिरुन तेलावर आधी परतावे लागते. मी ही स्टेप स्कीप करीत, थेट फोडणी घातली. कारण भाजी साफ करेपर्यंत खूप वेळ झाला होता. तो वेळ वाचण्यासाठी एक स्टेप वगळली आणि सर्व भाजी फसली. कडवट चवीची ही भाजी टाकून देण्याची हिम्मत मात्र झाली नाही. पाण्याबरोबर भाजी गिळतांना आईची आठवण निघाली.
पहिल्यांदा कंटोळी फसल्यावर पुन्हा ती घेण्याचं धाडस झालं नाही. पण मध्येच एकदा पुन्हा आईच्या हातची कंटोळी
खाता आली. यावेळी खातांना ती अभ्यासलीच
जास्त. मग या कंटोळीसाठी सोप्पे सोप्पे
उपाय शोधायला सुरुवात केली. कंटोळी साफ
करणे हे मोठे कसब आणि वेळखाऊ काम असते. मग
याच कंटाळवाण्या कामाला आधी करायला सुरुवात केली.
एकदाच दोन-तीन वाटे कंटोळी आणायची. स्वच्छ धुवून, साफ करुन हवाबंद डब्यात
फ्रिजमध्ये भरुन ठेवायची. जेव्हा भाजी
करायची असेल तेव्हा एका वेळेची कंटोळी कापून घ्यायची आणि तेलावर परतायची. मग कांदा, लसूण, चणाडाळ, मिरचीच्या फोडणीत
त्यांना टाकायचे. वरुन भरपूर खोबरं पेरलं
की भाजी तयार व्हायची.
एकदा चणाडाळ भिजवायची राहिली, तेव्हा वरुन चणापिठ भुरभुरुन भाजी तयार केली. ती नेहमीच्या भाजीपेक्षा छान लागली. मग तशी भाजी व्हायला लागली. एकवेळी कंटोळी जरा मोठ्या आकाराची मिळाली. मग भरवा कंटोळी करण्याचा प्रयत्न केला. भिजवलेली चणाडाळ, आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरसह वाटून घेतली. तेलावर कांदा परतून त्यात वाटलेली डाळ टाकली. अगदी पाच मिनिटं परतल्यावर गॅस बंद. मग त्यात बडीशेप पावडर, मिठ, थोडं तिखट आणि चाट मसाला टाकून मळून घेतले. इकडे त्या कंटोळ्यांचे दोन भाग करुन त्यांना वाफवून घेतले. मग या कंटोळ्यांमध्ये हा चणाडाळीचा मसाला भरला. पहिल्यांदा अशी भाजी केली तेव्हा ही भरलेली कंटोळी फक्त तेलावर परतली होती. नंतर एकदा हात बसल्यावर भरल्या कंटोळ्याची फोडणीही त-हेत-हेची व्हायला सुरुवात झाली. आलं, लसूण, कडीपत्ता आणि भरपूर कांदा ही तर नेहमीचीच फोडणी. त्यात कधी टोमॅटो जातो. भर पावसात एकदा कंटोळीसोबत कैरी मिळाली होती. असा कैरीच्या
फोडीही या भरल्या कंटोळ्यासोबत सुरेख लागल्या. त्यामुळे कंटोळ्याचा कटवटापणा जरा कमी झाला. एकदा नारळाचं दूधही या फोडणीत टाकलं होतं. पण खरं सांगू अशा भरलेल्या कंटोळ्यांवर फक्त वरुन कडीपत्ता आणि लसणाची फोडणी टाकली तरी ही भारी लागतात.
कंटोळी आता सुरु झाली की पार नवरात्र होईपर्यंत सोबतीला असतात. आपल्या शरीरासाठी जशी ही कंटोळी महत्त्वाची असतात, तशी आदिवासी पाड्यावर रहाणा-या महिलांच्या आर्थिक गणितासाठी ती महत्त्वाची असतात. कारण कंटोळी ही रानातच येतात. या महिला कंटोळी तोडण्यासाठी रानोमाळ फिरतात आणि ती शहरात विकायला आणतात. अशाप्रकारच्या रानभाज्या घ्यायच्या असतील तर त्या या आदिवासी महिलांकडूनच घ्यायच्या, असा मी माझा दंडक टाकला आहे. शिवाय पैशांची घासघीस करायची नाही. ती सांगेल ती रक्कम हातात द्यायची आणि भाजी घ्यायची. एकतर ही भाजी
सौ सुनार की एक लोहार की, या धाटणीतील. त्याचे आरोग्यासाठी किती फायदे आहेत याची मोजदाद नाही. पण या भाज्या ज्या महिला विकायला आणतात त्या महिलांना त्यातील आरोग्यापेक्षा त्यापासून मिळणा-या पैशांचे जास्त महत्त्व असते. त्यांचे कुटुंबच या पैशावर अवलंबून असते. म्हणून जरा महाग वाटली तरी कंटोळी आवर्जून घ्या....तिही याच महिलांकडून...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Khup chhan lekh
ReplyDeleteकंटोलीची भाजी छान लागते पण साफ करायला खरंच कंटाळा येतो.
ReplyDeleteभरली कंटोली रेसिपी आवडली.
आणायला हवी.
Mazi pn fav bhaji
ReplyDeleteKhup Chan lekh
ReplyDeleteखुप छान लेख
ReplyDeleteलेख भाजीपेक्षा जास्त रुचकर आहे. 👍👍
ReplyDeleteसौ. मृदुला राजे
खुप मस्त, तोंडाला पाणी सुटलं लेख वाचून
ReplyDeleteलेख खुप छान आहे .
ReplyDeleteकंटोळी भाजीच्या नावात कंटाळा हा शब्द दडलेला असल्यामुळे भाजी करण्यास कंटाळा येत असावा.पण सई मॅडम आपला लेख वाचून बऱ्याच जणांना भाजी खायला पाहिजे असे वाटत असेल.कारण लेखामध्ये भाजीचे उत्तम रसभरीत वर्णन केले आहे. प्रत्येकाने कंटोळी सारख्या रानभाज्या आवर्जून खायला पाहिजे.लेख नेहमीप्रमाणे खूपच छान.👍
ReplyDeleteमला खूप आवडते..पावसाळ्यात करते एकदा आवरजून चणा डाळ कांदा आणि खोबर घालून.पण साफ करायचा कंटाळा येतो खरा..
ReplyDeleteपण तू छान लिहेले आहेस.
ReplyDeleteपहिले तर ही भाजीच आम्हांला माहीत नाही, पण लेख वाचताना जणू काही खाण्याचा आस्वाद मिळत होता इतक्या सुंदर पद्धतीने लिखाण झाले आहे.
ReplyDeleteखूपच छान लेख, आम्ही कटुले म्हणतो याला
ReplyDeleteछान लागते ही भाजी खुप !!