…तो एक डेस्क

 

तो एक डेस्क


सुलभा आजारी असल्याचा निरोप मिळाला होता, पण पावसामुळे तिला भेटायला जायचा कंटाळा केला.  एक दिवस सहज दुपारी तिला फोन केला, तब्बेतीची चौकशी केली.  तेव्हा कळलं बाई हॉस्पिटलमध्ये आहेत.  बाहेर धो-धो पाऊस पडत होता.  त्याच्याकडे दुर्लक्ष करीत सरळ त्या हॉस्पिटलची वाट धरली.  पावसाचा परिणाम हॉस्पिटलमध्येही होता.  फारशी कुणाची वर्दळ नव्हती.  मी चौकशी करुन सुलभाच्या रुममध्ये गेले.  बाई एकट्याच होत्या.  म्हणून की काय मला बघताच मोकळं हसली.  कशाला धावत आलीस, पाऊस बघ किती आहे.  मी जाऊदे म्हटलं.  आणि तिची चौकशी सुरु केली.  आठवडाभर काविळीची लक्षणं दिसत होती.  पोटात अन्न जात नव्हतं.  औषधं चालू केली.  पण आराम नव्हता.  अशातच दोन दिवसापूर्वी रात्री अचानक पोटात दुखायला लागलं.  म्हणून तिच्या नव-यानं तिला हॉस्पिटलमध्ये आणलं.  हॉस्पिटलमध्ये येईपर्यंत पोटातलं दुखणं वाढलं होतं.  तिला लगेच अँडमिट करुन घेतलं.  सुरुवातीला तिच्या नव-याची, दिनेशची एकच तारांबळ उडाली.  पण हॉस्पिटलमध्ये एक विशेष डेस्क आहे.  त्या डेस्कनं सगळी व्यवस्था पाहिली. तिच्या मुलांचेही तिथेच फोन येत असल्याचे मला कळले.  मग माझी उत्सुकता आणखी वाढली.  हे डेस्क म्हणजे काय भानगड आहे, हे मी तिला विचारणार इतक्यात तिचा नवराही आला.  डेस्कवर अजितचा, त्यांच्या मोठ्या मुलाचा फोन आल्याचं त्यांनी सांगितलं.  मग मात्र माझी उत्सुकता शांत बसेना.  हे डेस्क म्हणजे काय आहे, म्हणून मी लगेच सुलभाच्या नव-याला विचारलं.  सुलभा आणि तिच्या नव-यानं माझ्या या प्रश्नासरशी एकमेकांकडे बघितलं आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. 


डेस्क म्हणजे, विशेष व्यवस्था होती.  हॉस्पिटलनं स्वतःच्या सोयीसाठी आणि येणा-या विशिष्ट रुग्णांच्या सोयीसाठी सुरु केलेली एक व्यवस्था आहे.  हे विशिष्ट रुग्ण म्हणजे, ज्यांची मुलं दुस-या देशात किंवा आई वडिलांपासून लांब रहात आहेत ते.  अलिकडे अशा रुग्णांची संख्या हॉस्पिटलमध्ये जास्त वाढली आहे.  बरेचसे पालक येतात तेव्हा ते एकटेच असतात.  कधीतरी सोबतीला नातेवाईक किंवा शेजारी, मित्रपरिवार असतो.  पण ते काही कायम रुग्णासोबत थांबू शकत नाहीत.  काहीवेळा तर हॉस्पिटलमध्ये आलेला रुग्ण हा एकटाच रहात असतो.  अशावेळी काय करावे हा पहिला प्रश्न हॉस्पिटल प्रशासनासमोर येत होता.  त्यामुळेच अशा डेस्कची सुरुवात करण्यात आली.  हॉस्पिटलमधून रुग्णावर उपचार करण्यात येतात, मात्र पैशांची तरतूदही आवश्यक असते.  अशावेळी या डेस्कची मदत होते.  रुग्णांकडून त्यांच्या मुलांचे नंबर घेतले जातात.  ते कुठल्या देशात आहेत, तिथल्या वेळेनुसार त्यांना फोन करुन त्यांना संपर्क करण्यात येतो.  त्यांना आपल्या आई किंवा वडिलांच्या तब्बेतीची रोजची माहिती दिली जाते.  समजा त्या मुलांना आपल्या आई- वडिलांची तब्बेत कशी आहे, याची चौकशी डॉक्टरांकडे करायची असेल, त्यांच्याशी बोलायचे असेल तर संबंधित डॉक्टरांबरोबर बोलणे करुन दिले जाते.  रुग्णाला ज्या गोष्टी हव्या आहेत, त्या त्याच्या बेडपर्यंत आणून दिल्या जातात.  अगदी बाहेरुन औषधं आणायची असतील तर तिही सोय केली जाते.  शिवाय रुग्णासोबत असलेल्या व्यक्तीसाठीही सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात.  डिस्चार्जची वेळ झाली की, सर्व कागदपत्र तयार करुन फाईल हातात दिली जाते.  घरपोच गाडीची सोयही केली जाते.  औषधं कशी घ्यायची याची माहिती दिली जाते.  फार गरज असले तर हॉस्पिटलमधील सिस्टर या रुग्णांच्या घरी जाऊन नंतर

तपासणीही करतात आणि औषधं योग्य आहेत, की नाही याची माहिती करुन घेतात

सुलभाचे पती, दिनेश मला ही सर्व माहिती देत होते.  तेही सुलभासोबत दोन दिवस हॉस्पिटलमध्ये रहात होते.  दोघांसाठी स्वतंत्र रुम होती.  सुलभाचे पथ्याचे जेवण आणि त्यांच्यासाठीचे जेवणही इथेच देण्यात येत होते.  ते हे सांगत असतांनाच साडेचार वाजले होते.  चहासाठी दरवाजा ठोठवण्यात आला.  सिस्टर आल्या.  सुलभाच्या काही तपासण्या झाल्या आणि तिला तांदळाची पेज देण्यात आली.  दिनेशनं एक चहा आणि एका कॉफीची ऑर्डर दिली. सोबत बिस्कीटांचा पुडा मागितला.  ती सिस्टर गेल्यावर रुममध्ये शांतता पसरली.  सुलभाची दोन्हीही मुलं देशाबाहेर होती.  एक अमेरिका तर धाकटा ऑस्ट्रेलियाला.  दोघंही वर्षातून एकदा एकाकडे जात असत.  महिना, दोन महिने राहून परत आपल्या देशात, आपल्या घरात. 

जेव्हा जेव्हा सुलभा मला भेटते, तेव्हा तिचं पहिलं वाक्य हेच असतं की, बाई तब्बेतीची काळजी घ्यायला हवी.  तुला काय होतंय, असं म्हटलं की ती सांगायची, अगं झालं तर करायला कोण आहे.  मुलं तिकडे...इथे आम्हाला काय झालं तर धावपळ कोण करणार. बाकी सुलभा आणि तिचा नवरा हे आनंदी दांम्पत्य.  पण आजकालच्या सिनिअर पिढीतला हा एक नवा आजार मी बघितला आहे.  अनेक परिचितांची मुले शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी अन्य देशात किंवा दूरच्या ठिकाणी आहेत.  एकटं रहाणा-या या पालकांनी मुलांचा हा दुरावा स्विकारला असतो.  पण आजारपणात मात्र त्यांची अवस्था बिकट होते.  आपण आजारी पडल्यावर आपल्या मुलांची मदत मिळणार नाही.  सर्व धावपण आपल्याला करायची आहे,  अशावेळी गंभीर समस्या झाली तर काय करायचे, असा नको तो विचार त्यांच्या मनात रुंजी घालत असतो.  अशा सर्वांसाठीच ही डेस्कची सुविधा होती.  सुलभाची दोन्ही मुलं दिवसातून दोनवेळा तरी त्या डेस्कवर चौकशी करुन आईच्या तब्बेतीचे रिपार्ट ऐकत होती.  फक्त आईचीच नाही तर वडिलांचीही काळजी घ्या, अशी दोघांनीही त्या डेस्कवर विनंती केली होती.  डॉक्टरांबरोबर बोलणे झाले होते.  सुलभाची आता संपूर्ण शारीरिक तपासणी झाली होती.  सोबत दिनेशचीही मुलांच्या आग्रहाखातर संपूर्ण तपासणी होणार होती.  यशावकाश आमचा चहा-


कॉफी येईपर्यंत सुलभाची पेज पिऊन झाली होती. 

सुलभाचा चेहरा मात्र मलूलच होता.  मी निघतांना सुलभाचा हात पकडला, तिला सांगितलं, काही गोष्टी स्विकारायच्या असतात.  आणि पुढे जायचं असतं.  आज तुझा लेक बाहेर आहे, उद्या कदाचित माझाही असेल.  पण असं झालं म्हणजे मुलं आपल्याला विसरली का.  समजा मुलं इथेच असती आणि त्यांना नोकरीतून किंवा व्यवसायातून सुट्टी घेताच आली नसती तर....अशा अनेक शक्यता आहेत.  मुलांचे आणि आपले पटलेच नाही तर....त्यांच्या बायकोबरोबर आपले भांडण झाले तर...नातवंड मस्तीखोर असतील तर...या तर ची टरटर संपत नसते. त्यामुळेच एखादाही तर मनात नको.  तुझे अमित आणि अजित दोघंही गुणी आहेत.  त्यांना तुझी काळजी आहे.  बरी हो आणि महिन्याभरानं जाऊन ये त्यांच्याकडे.  बघ कसे गळ्यात पडतील तुझ्या...उगाच हा नाही...तो नाही, म्हणून त्रागा करण्यापेक्षा आपल्याला योग्य उपचार मिळत आहेत, याचा आनंद मान आणि बरी हो...मी तिला हा उपदेश देत असतांना पुन्हा जोराचा पाऊस आला.  त्याच्या आवाजासरशी आम्ही दोघीही घाबरण्याऐवजी हसलो.  सुलभा माझा हात अधिक घट्ट पकडून म्हणाली, आता थांब आणखी.  ओ, त्या डेस्कला फोन करा...कॉफी पाठवा म्हणा...आम्हाला गप्पा मारायच्या आहेत...मग काय या मोकळेपणाच्या आनंदात अजून तासभर गप्पा झाल्याच की...

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

Comments

  1. khup chhan lekh

    ReplyDelete
  2. Kanth datun ala vachtana🥹

    ReplyDelete
  3. माझेही डोळे भरून आले
    परदेशा त राहणाऱ्या मुलांच्या भारतातल्या पालकांची ही कॉमन समस्या आहे. आपणच एकमेकांना मदत करायला हवी

    ReplyDelete
  4. Khup mast lekh

    ReplyDelete
  5. १००% बरोबर आहे,कारण माझाही मुलगा कॅनडाला आहे.विदेशात मुलं असलेले सर्वच पालक समदुःखी आहोत.

    ReplyDelete

Post a Comment