हाता तोंडाशी आलेला....
काय फॅमिली आहे रे, तुझ्याशी तरी ते गृहस्थ बोलले का. माझ्याबरोबर त्या बाई काहीच बोलल्या नाहीत. सर्व प्रवासात गप्प बसल्या होत्या. ठाण्याला उतरल्यावरही काहीही न बोलता उतरल्या. काय म्हणावे याला....मी ट्रेनमधून उतरताच माझ्या नव-याला पकडलं, आणि सगळी टेप सुरु केली होती. पण नव-यानं माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत लेकाला फोन लावला. सोबतच्या मुलानं जेवण केलं का, म्हणून तो विचारत होता. त्याची काळजी घे. त्याला तुझा फोन नंबर देऊन ठेव. काहीही मदत लागली तर फोन करायला सांग त्याला. अशा सूचना नवरा लेकाला देत होता. मी आश्चर्य चकीत होऊन त्या दोघांचा संवाद ऐकत होते. चार दिवसांसाठी लेक आला होता. त्याला सोडायला आम्ही मुंबई सेंट्रलला गेलो. त्याच्या सीटजवळ पोहचलो तर तिथे आधीच एक कुटुंब बसलं होतं. मुलगा आणि त्याचे आई-वडिल. आईनं त्या मुलाचा हात घट्ट आपल्या हातात पकडला होता. ते बघून मी समजून गेले, हा बहुधा पहिल्यांदा बाहेर जात असणार. मला, माझा लेकाचे पहिले वर्ष आठवले. आता आम्ही सरावलो होतो, म्हणून तिथेच बाजुला बसून राहिलो. त्या मुलाच्या वडिलांचे लक्ष आमच्याकडे गेल्यावर त्यांनी विचारले, तुम्ही कुठपर्यंत जाणार आहात. नव-यानं लेकाकडे बोट दाखवून सांगितले. हा जातोय. आम्ही त्याला सोडायला आलोय. ते ऐकल्यावर त्या गृहस्थानं लेकाचा ताबा घेतला. त्यांच्या मुलाची माहिती सांगितली. तो पहिल्यांदा एकटा प्रवास करणार होता, त्याची काळजी घ्यायची विनंती केली. दोन्ही मुलं एकाच स्थानकात उतरणार होती. माझ्या लेकानं सांगितलं काहीही काळजी करु नका. दोघांची कॉलेजही एकाच मार्गावर होती. त्यामुळे उतरल्यावर आम्ही एकच गाडी करु. तुमच्या मुलाला आधी सोडतो आणि मी पुढे होतो अशी हमी त्या गृहस्थाला दिली. त्याबरोबर त्यांच्या चेह-यावर हसू पसरले. ते गृहस्थ, माझा लेक आणि नवरा गप्पा मारु लागले. पण माझं सर्व लक्ष त्या महिलेकडे होतं. ती सर्व वेळ आपल्या मुलाचा हात घट्ट पकडून होती. काहीही करु नकोस, फक्त अभ्यास कर. मैत्री करतांना मुलांचा आधी स्वभाव बघ. अशा सूचना दहावेळा देत होती. थोड्यावेळानं गाडी सुटणार म्हणून आम्ही खाली उतरलो. अगदी एक मिनीट राहिलेलं असतांना ते जोडपंही खाली उतरलं. आईचा डोळ्याचा पदर हटत नव्हता. गप्पामधून कळलं होतं, ते ठाण्याचे होते. मुलांची गाडी गेल्यावर आम्ही परतीची गाडी पकडायला एकच पकडली. स्टेशन गाठलं. आम्ही दोघी लेडीज डब्यात तर मुलांचे बाबा पुरुषांच्या डब्यात चढले. आम्ही दोघी बाजुबाजुला बसलो होतो. पण त्या बाईनं एक शब्दही तोंडातून काढला नव्हता. मी बोलायचा प्रयत्न केला, पण ती डोळे मिटून बसली. ठाणे आलं तसं काहीही न बोलता उठली आणि उतरलीही. मी मात्र मनात दोन शब्द बोलायला काय झाले, म्हणत बसले. डोंबिवलीत उतरल्या उतरल्या नव-याला हेच सांगायला गेले, तर त्यानं मुलाला फोन लावत सोबतच्या मुलाची सर्व
काळजी घेण्याचा सूचना केल्या होत्या. मी नव-याला खुणेनंच काय झालं, म्हणून विचारलं. स्टेशनचा जिना उतरत असतांना नवरा त्या जोडप्याची गोष्ट सांगत होता. त्याचवेळी पावसाची जोराची सर आली. त्या पावसाच्या आवाजातही ही गोष्ट ऐकतांना अंगावर भीतीचा शहारा आला होता.
या जोडप्याला दोन मुलं होती. दोन्ही मुलांमध्ये दोन वर्षाचं अंतर. मोठा मुलगा खूप हुशार. दहावीला त्याला ९९ टक्के गुण होते. त्याचा दहावीचा निकाल लागला आणि त्याचे कौतुक करायला स्थानिक राजकीय नेते घरी आले. त्याचा फोटो मोठ्या बॅनरवर लावण्यात आला. या मुलाला हुरुप आला. इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षांची तो तयारी करत होता. पण डोक्यात कुठेतरी त्या बॅनरवरील फोटोचं खुळ बसलं होतं. क्लासला येता जाता नेमकं त्या नेत्याचं कार्यलय वाटेत लागायचं. तिथे ओळखी झाल्या. मग कुठे दही हंडी तर कुठे नवरात्रीचा दांडीयाला जायला लागला. आई वडील मध्यमवर्गीय. तुझा अभ्यास सांभाळ, म्हणून ओरडा बसत होता. पण त्याकडे दुर्लक्ष होत होतं. आपल्याला सर्व ओळखतात, हा भ्रम वाढू लागला आणि कार्यालयातील चकराही. मग कुठली तरी तरुणांची आघाडी निघाली. त्यात याला घेतलं. मगकाय पुन्हा मोठे बॅनर लागले. त्यात फोटो. बारावीचा अभ्यास चालू असतांना आई वडिलांना कल्पना आली, की या मुलाचे अभ्यासातले लक्ष पार उडाले आहे. इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षांचा अभ्यास त्याला झेपत नव्हता. आईनं खूप समजावलं, रडून झालं. वडीलांनी सांगितलं, इंजिनिअरिंग नको, पण शिक्षण पूर्ण कर. मग हवं तर पूर्ण वेळ कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता हो. दहावीला ९९ टक्के मिळवणा-या या मुलाला बारीवीचा अभ्यास झेपेना असा क्लासचाही रिपोर्ट आला. पालक हताश झाले. कशीतरी बारावीची परीक्षा पार पडली. मग मुलगा काही घरात राहीना. आज काय तर या कार्यालयात, मग मोर्चा, मग आणखी काहीतरी. युवाकार्यकर्ता म्हणून ओळख मिळायला लागली. बारावीचा निकाल कधी लागणार याची तारीख जाहीर झाली त्याच दिवशी संध्याकाळी चार मुलं धावत घरी आली. मुलाचा अपघात झाला म्हणून सांगू लागली. आई आणि धाकटा लेक धावत सुटले. कुणाच्यातरी बाईकवरुन निघालेला लेक डिव्हाइडवर बाईक आपटल्यामुळे हवेत उडाला. हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत त्याचा जीवही गेला. आईनं चेहराही बघितला नाही. रक्ताळलेली चादर बघितली आणि ती धाडकन
कोसळली.
नंतर कधी कोण आलं, कोण गेलं, याचं त्या बाईला सोयरं सुतक राहिलंच नाही. ती ज्या जागेवर बसली तिथेच बसून राहिली. नंतर कधीतरी राजकीय मंडळी घरी आली. मुलाचे गुणगान करु लागली. तो गेल्यानं मोठी हानी झाल्याचं सांगितलं. हाता तोंडाशी आलेला मुलगा गेल्यामुळे दुःख व्यक्त करुन ही मंडळी गेली. त्याचा धाकटा भाऊ दहावीला होता. त्यालाही तेवढेच गुण मिळाले. पण त्याचं कौतुक मोठ्या मुलाच्या मृत्युच्या दुःखात हरवून गेलं. तोही समजुतदार होता. आईची अवस्था यंत्रासारखी झाली. ती रोजची सर्व कामं करायची. पण मशिनसारखी. फार कमी बोलायची. धाकटा जेव्हा त्याच क्लासला जाऊ लागला तेव्हा मात्र तिनं त्याचे पाय धरले. तो गडबडून गेला. आई, म्हणून ओरडला. बाबाही धावले. ती पुन्हा धाय मोकलून रडायला लागली. कुठेही जाऊ नकोस रे....आपल्याला काहीही नको...दादा गेला तेव्हा लोकं सांगतात हाता तोंडाशी आलेला पोरगा गेला. अरे हातातोंडाशी येण्याआधी मी नऊ महिने त्याला या पोटात सांभाळला रे...बाबा तू समजून घे...फक्त अभ्यासावर लक्ष दे...बाकी काहीही नाही...धाकटाही रडू लागला आणि बाबाही....थोडा वेळानं तिघंही शांत झाले. धाकट्यानं दादाचा हार घातलेला फोटो हातात घेतला आणि म्हणाला, आई, दादाची शपथ घेऊन सांगतो, मी कुठेही जाणार नाही. फक्त अभ्यास करेन. पुन्हा धायमोकलून रडणे आणि रडणे. तोच धाकटा आम्हाला भेटला होता. माझ्या नव-याला पुरुषांच्या डब्यात बसून ही सर्व हकीगत त्या गृहस्थांनी सांगितली होती. हळूच मोठ्या मुलाचा फोटो पाकीटातून काढून दाखवला. डोळ्यातून अश्रू येत होते. म्हणाले, हा खूप हुशार होता, पण आमचं कुठेतरी चुकलं, आणि त्याला गमावून बसलो. नेत्यांचं काय जातं वो...पण आपलं घर जातं....आमचं घर आता घर नाही. त्याचं घरपण मोठ्याबरोबर निघून गेलं. आता हा
धाकटा शिकून आल्यावर जरा हवा बदलते का बघूया.
देवा, पावसाची सर जाईल म्हणून
आम्ही दोघंही अडोशाला उभे होतो. नवरा
सांगत होता आणि माझ्या डोळ्यातली आसवांची रांग थांबत नव्हती. ती बाई राहून राहून समोर येत होती. मी काय समजले तिला. तिच्यावर तर आभाळ कोसळलं होतं, आणि त्यातून ती
कधी बाहेर येईल हे तिलाही ठाऊक नव्हतं. हाता
तोंडाशी आलेला मुलगा गेला...हे पटकन बोलून जातो.
पण त्या आईचं काय होतं असेल, हे मी बघितलं होतं. नऊ महिने पोटात वाढवलेलं बाळ, असं अचानक सोडून
जातं ना, तेव्हा ती आई सुद्धा मरतेच...फक्त तिचं शरीर जिवंत रहातं....बाकी सर्व तर
त्या मुलासोबत असतं.
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
khup chhan lekh
ReplyDeleteअरे बापरे.कथा भावपूर्ण आहे.
ReplyDeleteShokantikach mhanaychi..
ReplyDeleteअसा दुःखद प्रसंग कुणाच्याही वाट्याला येऊ नये हिच ईश्वरचरणी विनम्र प्रार्थना🙏🙏🙏🙏
ReplyDeleteनिशब्द:
ReplyDeleteअशा परिस्थितीत कुठल्याही प्रतिक्रिया देणंच अशक्य..
दादा पाटील
धुळे
तुमच्या लेखणीची ताकद आहे तिने हा सर्व प्रसंग अगदी डोळ्यासमोर आणला. हल्ली दहा दिवसांचे गणपती,मग साखर चौथ चे गणपती मग नवरात्र येणार.अशा मंडळात मुलं आयाष्यातील महत्वाचा वेळ वाया घालवतात.निरुपयोगी लेझिम आणि ढोल वादनाची प्रॅक्टिस करत महिना वाया घालवतात.तोच वेळ अभ्यासात किंवा स्पर्धा परीक्षा यामध्ये सत्कारणी लागला तर आयश्याचे सोने होइल.खरे तर पालकांनी आधी बोध घ्यायला हवा.मग मुलांना सांगावे.या कथे प्रमाणे आजूबाजूला असेच घडत आहे. आपला पाल्य काय करतो याची खबरदारी आपणच घ्यावी.
ReplyDelete