आजींच्या गप्पा आणि श्रावण
कसली चिकचिक करतेस...ही भाजी म्हणजे सोनं आहे, तुमच्या त्या डायट आणि काय त्या डिटोक्स क काय चं सगळं सूत्र या भाजीत सामावलं आहे. माझ्या समोर एक गौरवर्णांच्या आजी उभ्या होत्या. त्यांच्या केसांवरुन आणि त्यांनी घातलेल्या नऊवारी साडीवरुनच त्या आजी वाटत होत्या. बाकी त्यांचा आवाज खणखणीत होता. मी माझ्या नेहमीच्या भाजीवालीसोबत गप्पा मारत उभी होते. हातात शेवग्याच्यापानांची भाजी होती. पण तितक्यात आलेल्या या आजींनी या गप्पा थांबवल्या. मला प्रेमाचा दम भरणा-या या आजींना थांबवून माझ्या भाजीवालीनं माझी ओळख त्यांना सांगितली. आजी, या पण तुमच्यासारख्याच आहेत. नेहमी पालेभाज्या नेतात माझ्याकडून. हे म्हटल्यावर आजींचा आवाज खाली आला. हो का...मला वाटलं की तू पण नाक मुरडतेस की काय. माझी नात आहे, तिला समजावून थकले. ही भाजी खा...चांगली असते, पण ऐकेल तर शप्पथ. कुठल्याश्या बाटलीत गरम पाणी भरते. त्यात काय काय टाकते आणि ते पित रहाते, म्हणते, यातून बॉडी डिटोक्स होते...बरोबर ना...डिटोक्स...की डिटॉक्स ते तिलाच माहित. तिची आई थकली तिला समजावून. पण मी नाही थकलेय. मी हट्टानं पालेभाज्या नेते आणि तिला खाऊ घालते. श्रावण महिना का उगा आलाय. निट पाळला तर वर्षभरासाठी शरीर चांगलं राहिल. तू पाळतेस की नाही. आजीनं हा प्रश्न मला एवढ्या ढसक्यात विचारला की त्यांना उत्तर देण्याऐवजी मी जोरात हसू लागले. पुढचा तासभर तरी या आजींबरोबर गप्पा झाल्या आणि लाडक्या श्रावण महिन्यात आणखी एक चवदार मैत्रिण मिळाली.
पांढरी शुभ्र आणि गुलाबी रंगाचे काठ असलेली नऊवारी साडी चापूनचोपून नेसलेल्या या आजी माझ्या त्याच क्षणी चांगल्या मैत्रिण झाल्या. आमच्या भाजीवाल्याताईकडून शेवग्याच्या पानाची भाजी, भाजीचं अळू, दोडकी आणि गोल दुधी आमच्या दोघींच्याही पिशवीत विराजमान झाले. आमच्या दोघींचा रस्ता एकच. या वाटेवर आजींनी त्यांच्या नजरेतला सात्विक श्रावण मला सांगितला. आजींना दोन नातवंड. एक नात आणि एक नातू. अजून स्वयंपाकघरावर त्यांच्याच ताब्यात. सूनही हौशी. आजींच्या म्हणण्यानुसार आमच्या घरात जगातले सर्व प्रकारचे पदार्थ होतात. पण श्रावणात फक्त पारंपारिक बेत असतो. अगदी कांदा, लसूण वगळून जेवण. आजींनी बोलता बोलता त्याचे फायदे सांगितले. शिवाय श्रावणातली सायंकाळी सातच्या जेवायचा दंडक कसा पाळला आहे, हे सांगितलं. पण अलिकडे नव्या पिढीच्या वेळांचं गणित काही जमत नाही. नातू आणि नात ब-याचवेळा उशीर येतात. त्यांचे क्लास आणि इतर व्यापांमुळे त्यांना रात्री उशीर होतो. शिवाय श्रावणातल्या भाज्या बघून ही मंडळी कुरकूर करतात, त्यामुळे आजींचा प्रेमाचा ओरडा त्यांना खावा लागतो.
आजी मला हे सर्व सांगतांना श्रावणातल्या भाज्यांचे महत्त्वही सांगत होत्या. सोमवारी हमखास अळू होतं आमच्याकडे. नातीसाठी मी त्यात काय असतं हे वाचून घेतलंय. त्यात आर्यन असतं. शेंगदाणे, मक्याची कणसं घातली की अधिक पौष्टीक होतं ना. दर शुक्रवारी हमखास चण्याच्या डाळीच्या पुरणाचे दिवे होतात. त्यात गुळ असतो, हाही अंगाला चांगलाच की. शनिवारी मिश्र डाळीचे वडे होतात. त्यातून सर्व डाळी पोटात जातात. याशिवाय श्रावणातल्या भाज्या काय कमी पौष्ठिक असतात का. दुधी, घेवडा, भोपळा या भाज्यांचा सपाटा. त्यात भोपळ्याचे घारगे आणि ओल्या नारळ्याच्या करंजा दर दोन दिवसांनी होतात. माठाच्या दिंड्यांची भाजी होते. श्रीकृष्ण
जयंतीच्या दिवशी हमखास शेवग्याच्या पानांची भाजी आणि मिश्र डाळीचे भाजणीचे थालीपिठ होते. सोबत सुंठीची पंजिरी. आजी हे सर्व सांगत असतांना चांगल्याच रंगल्या होत्या. मध्येच थांबून म्हणाल्या, तेवढं मात्र माझ्या नातवंडांना आवडतं हो...श्रीकृष्ण जन्माला रात्री बारा वाजता आमच्याकडे पंगती बसतात. माझ्या हातचे थालीपिठं आवडतात त्यांना, त्यावर लोण्याचा गोळा आणि सोबतीला ही शेवग्याच्या पानांची भाजी. सर्व जेवणावळ झाली की मुठभर पंजिरी. मी आजींना हळूच सांगितलं की पंजिरीमध्ये अलिकडे खोब-याची पावडर कमी करुन मखाण्याची पावडर घालायला सुरुवात केली आहे. चव फारशी बदलत नाही. पण अधिक पौष्ठिक होते, असं त्यांना जरा घाबरत सांगितलं. पण त्या खूष झाल्या. मी पण यावेळी करेन असं सांगून पुन्हा सर्व सूत्र आपल्याकडे घेतली.
पुढची जवळपास पंधरा मिनिटं आजी या श्रावण महिन्याच्या आहाराबद्दल आणि त्यात बनवण्यात येणा-या खास पदार्थांबद्दल सांगत होत्या. नागपंचमीला होणा-या उकडपदार्थांच्या रेसिपी सांगून झाल्या. मग लापशी, शिंगाड्याचे लाडू, लाह्यांचा चिवडा, उकडीचे मोदक, पुरणांचे उंडे, आळूवड्या, खिरीचे प्रकार, काकडीच्या कोशिंबीरीचे प्रकार असे नाना प्रकार आजींनी मला सांगितले. हे सर्व सांगत असतांना मी आजींना त्यांचे वय विचारले. तेव्हा आत्ताच नातवंडांनी आणि सुनेनं हौशेनं पंचाहत्तरी केल्याची माहिती मिळाली. मी या वयातही एवढ्या उत्सहाचे गुपित विचारले. तर म्हणाल्या, ऋतुनुसार आहार करते. माझ्या आई, आजीनं जे सांगितलं आहे, ती आहाराची पथ्य पाळते, आणि आनंदी रहाते. आजींचा उत्साह कमी होत नव्हता. चालतांना रस्त्यातील ट्रॅफीक, गाड्यांचे आवाज याकडे दुर्लक्ष करीत त्या बरोबर चालत होत्या. त्यांच्या हातात माझ्या हातात होती, तेवढ्याच वजनाची पिशवी होती. मी एकदा ती
पकडते म्हणून सांगितलं, तर हातांनीच नको म्हणाल्या. मला उचलतं तेवढीच मी खरेदी करत त्यांचे बोलणे पुन्हा चालू झाले होतं.
आजी बोलत होत्या आणि मी ऐकत होते. बोलता बोलता त्यांच्या घराखाली आम्ही कधी येऊ नको राहिलो हे कळलंच नाही. हातीतील पिशवी जड झाली होती, म्हणून आजीने ती दुसऱ्या हातात घेतली. तितक्यात मागून आजी, आजी करत एक मुलगी धावत आली आणि त्यांच्या गळ्यात पडली. ती आजींची नात होती. तिने आल्या आल्या आजीच्या हातातली पिशवी हिसकावून घेतली. किती वेळा सांगितलं तुला भाजी बिजी आणायला जाऊ नकोस म्हणून. सगळी ही हिरवी भाजी आणतेस आणि आम्हाला खायला घालतेस. नातीनं हसत हसत आजीचे गाल ओढले. बघितलंस किती खट्याळ आहे ते, हिला कितीही रागावले तरी काही फरक पडत नाही. आजींनी मला घरी येण्याचा आग्रह केला. पण खूप वेळ झाला होता.
आकाशात काळे ढगही भरुन आलेले. तेव्हा आजींची माफी मागून पुन्हा कधीतरी नक्की येते असे आश्वासन दिले. आजी आणि नातींनी गणपतीला यायचा आग्रह केला. आजी खूप छान सजवते आमच्या गौरींना. भरपूर भाज्या करते. गौरीचा मोठा थाट असतो आमच्याकडे, नक्की या, म्हणून नातीनं आग्रह धरला. आजी आणि त्यांच्या गोड नातीला गौरीला येते म्हणून सांगितले, तसे मला टाटा करत त्या त्यांच्या बिल्डींगमध्ये शिरल्या. मी तिथेच थोडावेळ घुटमळले. पाठमो-या आजींकडे बघत होते. या पिढीच्या अनुभवावरच आपली कुटुंबव्यवस्था भक्कमपणे उभी असल्याची जाणीव झाली.
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
कित्ती सुंदर लिहिलस सई अगदी mazi आई आठवलि ,अशीच लिहित रहा
ReplyDeleteKhupach mast lekh
ReplyDeleteखूप छान लेख... ललिता छेडा
ReplyDeleteShilpa
ReplyDeleteखूप छान माहिती मिळाली.
ReplyDeleteChan lihilaya Sai..
ReplyDeleteसमाजात राहत असताना भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून, घटनेतून , अनुभवातून खूप शिकता येते.पुस्टकतून मिळालेले ज्ञान पैसे कमविण्यासाठी उपयोगी पडते मात्र अनुभवाचे ज्ञान कायम स्वतःच्या व दुसऱ्यांच्या उपयोगी येते.
ReplyDeleteखुपच सुंदर लेख . वाचून मनाला ऊभारी येते . आपण पण पुढच्या पिढीसाठी असं केलं पाहिजे असा उत्साह येतो .
ReplyDelete