बाप रडतो तेव्हा...

 

बाप रडतो तेव्हा...


कल्याणमध्ये एका शाळकरी मुलानं आत्महत्या केल्याची बातमी एका वॉटसअप ग्रुपवर आली.  आत्महत्या केलेल्या मुलाचे वय फक्त १३.  वाचून मन विषण्ण झाले.  त्याचवेळी एका बापाची आठवण झाली.  गेल्या नऊ महिन्यापासून मी त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवण्याचे धाडस करु शकले नाही.  त्यांच्या मुलानंही अशीच आत्महत्या केली.  अभ्यासाचा ताण आला की काय पण त्यानं  गळफास जवळ केला.  मुलगा गेला, पण बाकी कुटुंब त्यांच्या पश्चात कसं जगत आहे, हे मी बघत आहे.  त्यांच्या मुलाच्या आत्महत्येची बातमीही अशीच सोशल मिडियाच्या मार्फत समजली.  मला मोठा धक्का बसला.  कारण त्या घटनेच्या एक दिवस आधी मी त्या मुलाला भेटले होते. वडिलांच्या दुकानात हा मुलगा वडिलांना मदत करायला पुढे होता.  पण त्या चोवीस तासात असं काय झालं की त्यानं थेट आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला, हे कोडं मला सुटलं नाही, तर त्याच्या पालकांची काय परिस्थिती असेल.  पण या घटनेनंतर मी त्या वडिलांच्या पुढे जाणं टाळलं होतं.  ब-याचवेळा ते समोर आले, पण त्यांच्या डोळ्यात अपराधीपणाची भावना दिसली आणि मी शहारले.  पुढे हे धाडस कधीही केलं नाही.  जेव्हा ही बातमी समोर आली, तेव्हा माझ्या नजरेसमोर ते बाबा आले.  त्यांच्याबरोबर बोललं पाहिजे हे जाणवलं, आणि भेटायला गेले.

 

दुपारची वेळ असल्यामुळे त्यांच्या दुकानात फार गर्दी नव्हती.  एकटे


दुकानदार म्हणजेच ते बाबा बसले होते.  कॅलक्युलेटरवर कसला तरी हिशोब करत होते.  माझी चाहूल लागल्यावर त्यांनी नजर वर केली,  आणि हताशपणे हसले. त्यांनी विचारलं कशा आहात वहिनी.   माझ्या तोंडात, मजेत, छान हे शब्द आले, पण त्यांना रोखलं.  फक्त हसून त्यांच्याकडे बघितलं. काय चाललंय, मी विचारलं.  काही नाही.  तुम्ही ब-याच दिवसानंतर आलात,  बरं वाटलं.  एवढ्या संवादानंतर बराचवेळ शांतता झाली.  दोघांनाही पुढे काय बोलावं ते सुचेना.  दोघांचाही गळा भरुन आलेला.  बराचवेळ तसाच गेल्यावर मी विचारलं,  बरे आहात ना दादा.  वहिनी कशा आहेत.  त्यानं मान वर केली.  डोळे भरले होते.   हातातला कॅल्युलेटर दाखवत म्हणाले, हिशोब करतोय.  पोरगं जाऊन नऊ महिने झाले.  काय चुकलं त्याचा हिशोबच लागत नाही हो....तोच करतोय.  त्यांची मान खाली गेली.  लोकं म्हणतात, आम्ही अभ्यासासाठी जबरदस्ती केली.  पण शप्पथ घेऊन सांगतो, त्याला काय, आमच्या दुस-या पोरालाही अभ्यासावरुन कधी बोललो नाही.  अहो माझंच शिक्षण नववीपर्यंत.  मी काय बोलणार पोरांना.  दोघंबी पोरं क्लासला जातात.  त्यांना सांगितलं, अजून काय शिकायचं असेल ते सांगा.  गाणं, चित्रकला, कराटे, काय हवं ते करा म्हणायचो.  आवडीनं करा सांगायचो.  हा काय त्रास झाला.  रोज कितीबी उशीर झाला तरी आम्ही एकत्र जेवायचो.  त्याला शाळेतलं सगळं विचारायचो.  शिक बाबा, असं सांगायचो.  ती काय माझी चुकी. 

एका पहाटेला बायकोच्या किंकाळीनं जाग आली.  मला वाटलं ती पडली.  पण तिनं बोट दाखवलेल्या जागी पाहिलं आणि मी पडलो.  माझी बोबडीच वळली.  माझ्या लेकरानं स्वतःला पंख्याला लटकवून घेतलं होतं. 


अभ्यासाची दोन पोरांची वेगळी खोली.  एक अभ्यास संपला म्हणून माझ्या शेजारी येऊन झोपला.  त्याची जागा त्याच्या आईच्या बाजुला.  तो आलाच नाही.  नंतर काय काय झालं ते काय सांगू.  कोण सांगत होतं, आम्ही अभ्यासासाठी मागे लागलो होतो.  कोण अजून काय सांगतो.  पोलिस आले, चौकशी झाली,  आम्ही काय सांगणार...तो का गेला.  त्यानं काय लपवलं.  एवढ्याश्या मनात काय दुःख होतं ते बोललाच नाही.  आम्ही दोघंही कामाच्या व्यापात.  कुठे कमी पडायला नको, म्हणून सकाळपासून रात्रीपर्यंत मेहनत करतो.  आमची तक्रार नाही.  पोरांसाठीच करतो ना.  मग.  पण तो गेला.  गेला तो असा गेला.  तेव्हापासून तो पंखा लावला नाही.  त्याची आई तर त्यादिवशीच मेल्यात जमा झालीय.  किती रडली याचा हिशोब नाही.  दातखिळी बसली कितीतरीवेळा.  आणि मी.  मी बाप ना.  बाप रडतो नसतो म्हणतात.  पण वहिनी....जाम रडलो.  बाथरुममध्ये जायचो आणि रडायचो.  आत्ताही रडतो.  एकच प्रश्न, माझा लेक माझ्याशी बोलला का नाही.  त्याची आई अजून त्याचं अंथरुण लावते.  तिची उशी रडून रडून ओली होते.  मी काय बोलत नाय.  आमचा धाकटा.  तो तर वयापेक्षा मोठा झाला.  तो त्या अभ्यासाच्या खोलीत जात नाही.  आईसोबतच असतो.  ती स्वयंपाकखोलीत गेली तर हा तिथे.  ती कपडे लावायला गॅलरीत गेली की हा तिथे.  मग दोघं सगळं आवरुन दुकानात येतात.  रात्री उशारा पर्यंत तिघंपण इथेच असतो.  सर्व शांत झालं की आम्ही निघतो.  तुम्ही जसं मला बघून टाळता ना, तसंच काही करतात.  पूर्वीची ओळखीची माणसं दूरून जातात.  तुम्हाला काय बोलावं हा प्रश्न पडतो, आणि मला तुम्हाला कसं तोंड द्यावं असा प्रश्न पडतो.  अहो, दुकानात पूर्वी पोरं किती यायची.  त्याची दोस्तमंडळी.  पण ती पण आता येत नाय.  वाईट वाटतं हो.  आम्ही उभं रहाण्याचा प्रयत्न करतोय.  जाणवतं, तुम्ही आम्हाला टाळता कशाला ते.  त्याची आठवण नको म्हणून.  आम्हाला उगाच त्रास नको म्हणून ना.  पण वहिनी, कोणी कायबी करुदे, त्याची आठवण काय जाणार नाय.  त्याच्या आईनं त्याची प्रत्येक वस्तू जशी होती तशीच ठेवलीय.  शाळेचे कपडेपण.  दर शनिवारी धुते आणि इस्त्री करते.  मी कसं तिला आडवणार.  मी पण तोंडात पहिला घास घेतांना त्या पंख्याकडे बघतो.  तिथे चढण्यापूर्वी तो माझ्याकडे बघत असेल म्हणून आशेनं बघतो.  पण नाही.  वहिनी....का केलं असेल हो त्यानं.  का गेला असा सोडून.  आमचं काय चुकलं हे आता

कसं कळणार.  तुम्ही तरी सांगा. 

बाप कधी रडत नाही,  असं सांगतात.  पण हे प्रश्न विचारुन तो बाप माझ्यापुढे घाय मोकलून रडू लागला.  माझ्याकडे कुठे होतं त्याचं उत्तर.  शांत व्हा, शांत व्हा....सांगत फक्त त्याचं सांत्वन मी करु शकले.  तेवढ्यात त्याचा धाकटा लेक धावत आला.  रडणारा बाप बघून तो काय समजायचा ते समजला.  बाबा...आई आहे,  लवकर...हे म्हणताच, त्या बापानं रुमाल काढला.  डोळे पुसले.  बाटलीतून पाणी घेतलं. ते तोंडावर मारुन चेहरा पुसला.  तोपर्यंत तो लहाना, दुकानाच्या बाहेर उभा राहिला.  आईला बोलण्यात अडकवून ठेवत होता.  मग या बापानं त्याच्या नावानं हाक मारली.  दोघंही दुकानात आले.  आईनं डबा ठेवला.  धाकट्यानं कोपरा पकडला आणि अभ्यास करु लागला.  बाप पुन्हा त्या कॅलक्युलेटरमध्ये घुसला.  माझी त्या आईला तोंड द्यायची हिंम्मत झाली नाही.  मी हळूच त्या बाबांना, येते म्हणत निघाले. 

मनात एकच प्रश्न.  एवढेचे जीव का असा टोकाचा निर्णय घेतात.  बाबांनो, तुमच्या मागे सर्व जग आहे.  आणि त्या जगात तुमचे आईबाबा.  तुम्ही जाता आणि आई बाबा जिवंतपणी स्वतःला गाडून घेतात....तुमच्या न संपणा-या आठवणीमध्ये....चिमण्यांनो...बोला...रागवा....फारकाय जोरानं भांडा...पण टोकाचा निर्णय घेऊ नका...

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

 

Comments

  1. निशब्द:...

    ReplyDelete
  2. 👍👍👌👌

    ReplyDelete
  3. शब्दातीत भावनांचा उद्रेक... त्यावर कोणताही अभिप्राय नकोच!
    सौ. मृदुला राजे

    ReplyDelete
  4. अतिशय संवेदन शील

    ReplyDelete
  5. महेश टिल्लू22 August 2024 at 01:12

    असे प्रसंग कुणाच्याही वाटेला येऊ नयेत ,अनेक जन्म विसरणे अशक्य.

    ReplyDelete
  6. khup chhan lekh

    ReplyDelete

Post a Comment