भारताच्या नंदनवनात शिक्षणाचे संस्कार रुजवणारी नंदिनी
गेल्या काही वर्षापासून माझ्या आसपास एक नाव सदैव ऐकत होते, ते म्हणजे हम. या हमला जोडून आणखी एक नाव होतं, ते म्हणजे, नंदिनी पित्रे. हम, म्हणजे, जम्मू आणि काश्मिरमधील मुलांसाठी काम करणारी संस्था. नंदिनी पित्रे या संस्थेच्या संस्थापक सदस्या आहेत. जम्मू-काश्मिरच्या मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी ही संस्था प्रामुख्यानं काम करते. या मुलांना आपलेपणाची जाणीव व्हावी यासाठी नंदिनी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या कार्यांची महती मी ऐकून होते. हम च्या मदतीसाठी अनेक कार्यक्रम होतात. त्यापैकी काही कार्यक्रमांना मलाही उपस्थित रहाता आले. अशा प्रत्येकवेळी माझी हम आणि नंदिनी पित्रे या दोघांबाबतची उत्सुकता वाढत होती. मुळात आपल्या महाराष्ट्रातून उठून एक महिला जेव्हा काश्मिरसारख्या ठिकाणी जाऊन काम करते, तेव्हा तिला अनुभव कसा येतो, हा माझा प्रश्न होता. कुठलीही संस्था उभारणं ही सोप्पी गोष्ट असते. पण संस्था उभारतांना ज्या सिद्धांतांची
पायाभरणी केली जाते, ती पायाभरणी अधिक मजबूत करण्याचे काम त्या संस्थेच्या सदस्यांचे असते. ब-याचवेळा त्या सिद्धांतानाच दूर लोटत संस्था वेगळ्याच मार्गावर जाऊन पोहचते. मात्र हम ही नावाप्रमाणेच ठाम आहे. नंदिनीसोबतच या संस्थेतील प्रत्येक सदस्य आपल्या उद्दीष्टांबाबत ठाम आहेत, त्यामुळेच अल्पकाळातच हमतर्फे जम्मू मध्ये भरीव कार्य करण्यात आले आहे. नंदिनीला भेटून तिच्या या कार्याची मी माहिती घेतली. तेव्हा जम्मू-काश्मिरमय झालेल्या नंदिनीचा परिचय झाला.
नंदिनी पित्रे म्हणजे, नंदिनी जोशी. सासर आणि माहेरही डोंबिवलीच.
डोंबिवलीच्या सर्वार्थानं संपन्न घरातील हे व्यक्तिमत्व. सर्वार्थानं म्हणजे, संस्कृती, शिक्षण आणि संस्कार या तिघांचाही मिलाफ या कुटुंबात आहे. लहानपणापासून काकू, शशिकला जोशी यांच्यामुळे राष्ट्रीय सेविका समितीच्या कार्यांची माहिती होती. पुढे लग्न झाल्यावर पती, जयंत पित्रे हे ही संघाचे कार्यकर्ते. त्यांच्यासोबत त्यांचा मित्रपरिवरही संघाच्या कार्यात हिरीरीनं सहभागी होणारा. हा मित्रपरिवार म्हणजे एक कुटुंबच. प्रत्येकांनं आपलं एक उद्दीष्ठ ठेवलेलं. वयाची पन्नाशी उलटल्यावर या मंडळींनी आपल्याला देशासाठी काय करता येईल याचा विचार सुरु केला. यातीलच एक म्हणजे. मनोज नशिराबादकर. नशिराबादकर यांनी वयाच्या ५३ व्या वर्षी निवृत्ती घेत, काश्मिरमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. पण नेमकं काय करावं हा प्रश्न होता. नशिराबादकर यासाठी दोन वर्ष जम्मू काश्मिरच्या खेडोपाड्यात फिरले. तेव्हा तेथील शिक्षण पद्धतीचं वास्तव त्यांच्यासमोर उघड झालं. दहशतवाद्याच्या फे-यात सापडलेल्या या भारताच्या नंदनवनात एकेकाळी देवी शारदेची पुजा व्हायची. मात्र आता इथे साध्या शाळाही नव्हत्या. ज्या काही शाळा होत्या, त्या फक्त नवाच्या शाळा होत्या. काहींच्या भींती गायब होत्या, तर काहींमध्ये कुठलंही साहित्य नव्हतं. काही शाळांमध्ये दहशतवाद्यांच्या भीतीनं विद्यार्थीच नव्हते. ही सर्व परिस्थिती पाहिल्यावर मनोज नशिराबादकर यांनी नंदिनी पित्रे आणि त्यांच्या सहकार्यांना या सर्वांनी माहिती दिली. इथेच हम चॅरिटेबल ट्रस्टची बिजे रोवली गेली. जम्मू काश्मिरमध्ये शिक्षणाच्या जेवढ्या शक्य होतील, तेवढ्या सुविधा उपलब्ध करुन द्यायच्या. त्यासाठी आर्थिक मदत आणि मानवी सहकार्याची साथ देण्याचा निश्चय
करण्यात आला. २०१९ मध्ये हमची स्थापना झाली.
जम्मूमध्ये भारतीय शिक्षा समिती काम करीत आहे. त्यांच्या ३७ शाळा या भागात आहेत. या शाळांमध्ये काम करण्यास सुरुवात झाली. नंदिनी सांगते, पहिल्यांदा गेल्यावर,भारतसे आये
है, असं ऐकायला आलं. त्याकडे दुर्लक्ष
करीत या मंडळींनी आपल्या मुल्यांवर काम करण्यास सुरुवात केली. आता ही परिस्थिती
पार बदलली आहे. नंदिनी सांगते, आता हे
विद्यार्थी आमची आतुरतेनं वाट बघतात. पण
हा टप्पा असा सहजासहजी पार पाडता आला नाही.
त्यासाठी नंदिनी आणि तिच्या सहकार्यांनी केलेली मेहनत महत्त्वाची आहे. सुरुवातीला किश्तवाडा येथील एक शाळा हमला
मिळाली. किश्तवाडा हा सर्व डोंगराळ
भाग. त्यात ही शाळा अगदी डोंगराच्या
टोकावर. शाळा फक्त नावाची. फक्त एका बाजुला भिंत. बाजुच्या भिंतींचा पत्ताच नाही. पण येथील गावक-यांची ही शाळा सुरु होण्याची खूप
इच्छा होती. त्यामुळे हमनं या शाळेची
बांधणी करण्याचा निर्णय घेतला. नंदिनीनं
त्यासाठी वर्गणी गोळा करायला सुरुवात केली.
हम ही संस्था नवीन. काश्मिरसारख्या
ठिकाणी खरोखरच ही संस्था काम करेल का, आपले पैसे वाया जातील की सत्कारणी लागतील,
याचा विचार न करता, नंदिनी पित्रे या नावाखाली वर्गणी गोळा झाली. नंदिनी म्हणते, डोंबिवलीच्या नागरिकांनी १५ लाखांचे अमुल्य दान
केले. त्यांचे उपकार थोर आहेत. या पैशातून
किश्तवाडा येथे दोन मजली शाळा आता उभी राहिली आहे. यासाठी या गावानंही हमला साथ दिली. गावातील प्रत्यकानं शाळेसाठी श्रमदान केलं.
या पहिल्या यशानंतर हमच्या सदस्यांचाही उत्साह वाढला. दरम्यान कोरोना
नावाच्या महामारीचा त्यांनाही सामना करावा लागला. पण यातूनही काही वाट काढत हमचे कार्य नंदिनीने सुरु ठेवले. त्यातूनच भारतीय विद्या मंदिर, हिरानगर येथे स्वातंत्रवीर सावरकर यांच्या नावानं लायब्ररी उभी राहिली. सहा शाळांमध्ये प्रयोगशाळा उभ्या राहिल्या. जम्मू मधील शाळांची गरज काय आहे, हे जाणून हमचं कार्य सुरु आहे. नंदिनी सांगते, यासाठी देणगीदारांची मोलाची साथ सोबत आहे. प्रयोगशाळा उभारण्यासाठी विद्यानिकेतन शाळा, ओंकार शाळा, टिळकनगर गणेश मंडळ यांच्यासह अन्य नागरिकांनीही खूप मदत केली. फक्त प्रयोगशाळा उभारणे, हे बोलायला सोप्प असलं तरी तिथे जाऊन ते काम करणं खूप अवघड आहे. एकतर जम्मू काश्मिरमधील परिस्थिती. त्यात तेथील शाळांमध्ये असलेल्या शिक्षकांनाही यासंदर्भात प्रशिक्षण देण्याची गरज होती. कुठलाही उपक्रम हाती घेतला तर तो पूर्णत्वास कसा न्यायचा याचं गणित नंदिनीचे पक्के असते. त्यामुळेच हमनं जेव्हा प्रयोगशाळांचा प्रकल्प हाती घेतला, तेव्हा हमनं या शाळांमधील शिक्षकांना यासंदर्भात प्रशिक्षण दिले. यासाठी काही जाणकारांना त्या शाळांत नेण्यात आले. हे काम म्हणजे तारेवरची कसरत असते. जम्मू काश्मिरमध्ये हे सर्व काम करतांना कधी भीती वाटली नाही का, हे विचारल्यावर नंदिनी सांगते, आमचं उद्दीष्ट ठाम होतं. त्यामुळे हमच्या कार्यकर्त्यांना कधीही त्रास झाला नसल्याचे ती सांगते.
शिक्षणासोबत हम जम्मू काश्मिरमधील विद्यार्थ्यांना संस्कृतीचा परिचय करुन देण्याचेही काम करते. यासाठी या विद्यार्थ्यांना आपल्या सण समारंभाच्या वेळी आवर्जून आणले जाते. ही मुले इथे कुटुंबात रहातात. सण, उत्सवामध्ये सहभागी होतात. या कुटुंबात मुलांना जी प्रेमाची शिदोरी मिळते, त्याला ते कधीही विसरत नाहीत. काहीवेळा नंदिनी आणि तिच्या सहकारी जम्मूच्या शाळांमध्ये लेझिम पथक घेऊनही गेल्या आहेत. लेझिम तेथील मुलांना शिकवून त्यांनी अनेक कार्यक्रमही तिथे केले आहेत. याशिवाय जम्मूच्या खेड्यामधील अनेक महिला स्वयंरोजगार केंद्रावर जातात. या महिलांना भेटून त्यांच्या काय गरजा आहेत, हे जाणण्याचाही प्रयत्न नंदिनी करते. यातूनच तिनं चलो जम्मू काश्मिर ही सहल सुरु केली आहे. दर वर्षी ऑक्टोबर आणि एप्रिल महिन्यात हमचे प्रकल्प दाखवण्यासाठी सहलींचे आयोजन नंदिनी करते. हमचे काम चालू आहे, अशा शाळांना भेटी दिल्या जातात. महिला स्वयंरोजगार केंद्र दाखवली जातात. काश्मिरी संस्कृतीची माहिती करुन दिली जाते. शिवाय शहिद कुटुंबाचींही आवर्जून भेट घडवून आणली जाते. नंदिनी सांगते, एखाद्या शहिद जवानाच्या कुटुंबाची भेट घेणं हे सुरुवातीला अतिशय अवघड वाटलं. आपण इथे आरामात जगत असतांना जवान मात्र आपल्या या
स्वातंत्र्यासाठी आयुष्य अर्पण करीत आहेत. अशा जवानांच्या कुटुंबाना भटून त्यांचे दुःख कसे जाणून घ्यायचे हा प्रश्न नंदिनीसमोर होता. पण नंदिनी सांगते, पहिल्यांदा अशा शहिद जवानांच्या घरात गेल्यावर तिथल्या आजीनं, हम नही लढेंगे तो कौन लढेगा, म्हणत माझं स्वागत केलं. वडिल शहिद झाले तरी त्यांची मुलंही आर्मीमध्ये जात आहेत. हे देशप्रेम घरात बसून किंवा टिव्हीवरील बातम्या बघून समजून घेता येणार नाही. त्यासाठी शहिद जवानांच्या घरी जाणं गरजेचं आहे, याची याणीव नंदिनीला झाली.
आता नंदिनी हमच्या पुढच्या योजनांवर काम करीत आहे. विद्यार्थ्यांची सीमावर्ती भागातून बाईक रॅली,
फिरती विज्ञान शाळा, मेडिकल कॅम्प अशा त्या योजना आहेत. या सर्वांसाठी आर्थिक मदत हवीच आहे, पण
सहका-यांचीही साथ तिला हवी आहे. आजकाल
रिटायर्ड झाल्यावर काय, असा प्रश्न विचारला जातो.
अशा व्यक्तिंनी आपली पाच वर्ष जरी हमला दिली तरी खूप मोठं सहकार्य आहे, असं
आवाहन नंदिनी करते. आम्ही जवळपास तीन तास
तरी या विषयावर बोलत होतो. नंदिनीचे कौतुक
म्हणजे, या दरम्यान तिनं मला अवघ्या जम्मू काश्मिरचा परिचय करुन दिला. अगदी खेड्यापाड्यंची नावंही तोंडपाठ. उगाच पाठांतर केल्यासारखे काही नाही. प्रत्यक्ष जाऊन अभ्यास केल्यावर जी खोली असते,
ती तिच्या बोलण्यात आहे. पर्यायानं तिच
खोली तिच्या कार्यातही आहे. त्यामुळे एका
संपन्न घरातील नंदिनी आपल्या या संपन्न वलयाला बाजुला सारत हम साठी पडेल ते काम
करायला पुढे असते.
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
छान, समर्पक write up
ReplyDeleteExcellent Nandini....God Bless you
DeleteKhup chan...
ReplyDeleteछान माहिती करून दिली.आपण हम वगैरे ऐकलेलं असत पण आपल्या गावातील एक व्यक्तीचा त्यात पुढाकार आहे आपल्याडोंबिवलीतील काही शाळांनी केलेली मदत हे या लेखामुळे कळते खर्च नंदिनीताईंचे काम प्रेरणादायी आहे.
ReplyDeleteहम साथ साथ है
ReplyDeleteMast
ReplyDeleteहम साथ साथ हैं👍
ReplyDeleteवा खूप कौतुकास्पद आहे सगळं ,किती छान आणी महान देश कार्य करत आहेत तुम्ही ,देशाची तरुण भावी पिढी घडवत आहात . वन्दे मातरम
ReplyDeletekhup chhan lekh
ReplyDeleteखुप छान आहे.
ReplyDeleteखरय खूप छान पद्धतीने शिक्षण रूजविण्याचे काम होत आहे we feel proud सर्व भगीनींचे आणि नंदिनी मॅडम चे अभिनंदन आणि पुढील सर्व योजनांसाठी शुभेच्छा
ReplyDeleteखूपच great काम आहे.नंदिनी लां खूप खूप शुभेच्छा.
ReplyDeleteYou and your team are doing great work. Commendable! We appreciate your efforts and love towards nation. Best wishes ❤️
ReplyDeleteनंदिनी पित्रे या खरोखरच एक तपस्वी आहेत.काश्मीर सारख्या ठिकाणी जाऊन काम उभारणे शिवधनुष्य उचलण्या एवढे अवघड आहे.सलाम त्यांच्या या महान कार्याला ....
ReplyDeleteवा, खूपच सुंदर आणि माहितीपुर्ण लेख आहे. डोंबिवलीतील नंदिनी हे सामाजिक कार्य करते आहे हे कळल्यावर एक डोंबिवलीकर म्हणून मला खूपच अभिमान वाटला. नंदिनी, तुझी निस्वार्थ सेवा आणि योगदान हे खरंच प्रेरणादायी आहे. तुझ्या पुढील सर्व कार्यांसाठी मी तुला मनापासून शुभेच्छा देतो.
ReplyDeleteॲड. शशांक देशपांडे . डोंबिवली .