मुलगी शिकली...आणि...
तुम्हीच सांगा ताई, अजून काय कारायचं. पण पोर कशाला ऐकतेय. कोण नावं नको ठेवायला, म्हणे. त्या कोणा कोणासाठी किती खर्च झाला हे विचारु नका. माझ्या हातात जेवणाचं ताट होतं. दोन पु-या, भाजी, थोडा पुलाव आणि वाटीभर कोशिंबीर. एका बारशाला गेले होते. रात्रीचे नऊ वाजून गेलेले. बहुतांशी पाहुण्यांची जेवणं होत आलेली, आम्ही जरा उशीरा आलेलो. पहिल्यांदा बाळाला आणि त्याच्या आईला भेटून भेटवस्तू दिल्या. ओळखीच्या सर्वांबरोबर गप्पा झाल्या. मग जेवण चालू होतं, त्या भागाकडे गेलो. बारशाला अगदी लग्नासारखा थाट होता. सॅलेड, दोन स्टार्टर, पापड, दोन भाज्या, पुलाव, पु-या, गुलाबजामून, गरग-गरम जिलेबी आणि दोन प्रकारचे आईसक्रीम. आम्ही अगदी मोजके पदार्थ ताटात घेतले आणि एक कोपरा पकडला. थोडावेळानं त्या मुलीच्या बाबांनी आम्हाला बघितलं. गप्पा मारायला ते पुढे आले. पहिल्यांदा ख्यालीखुशाली झाली. आम्ही दोघंही बोललो, बारशाचा थाट जोरात आहे. त्यावर ते बाबा खिन्नपणे हसले. बाजुच्या रिकाम्या खुर्चीवर बसले. म्हणाले, दादा खरं सांगतो, माझ्या मनात साधं बारसं करायचं होतं. आमच्या बिल्डींगच्या टेरेसवर. संध्याकाळी नाष्टा आणि सरबत, एवढंच माझं बजेट होतं. पण लेक ऐकतेय होय. बाबा असं कसं चालेल....आमच्या सासरचे काय म्हणतील. मग बायकोलाही कोण काय बोलेल, याची काळजी वाटू लागली. या कोण, कोणासाठी मी एफडी मोडली. वाईट याचं नाही की मी एफडी मोडली. शेवटी ठेवून काय करायचंय. सर्व पोरांचच आहे. पण ज्या लेकीला मी शिकवलं. हवे ते क्लास लावले. सांगेल तसे कपडे घेऊन दिले. तिनं आता बापाला हातभार लावायला पाहिजे की नाही, की त्या पूर्वापार चालत आलेल्या समजुतीनुसार बाळतंपणाचा सर्व खर्च बापानं करायचा. आणि जर खर्च बापानं करायचा तर त्याच्या मतानुसार आणि खिशानुसार नको का....सांगा बरं तुम्ही. माझीच लेक मला समजून घेईना, काय सांगू तुम्हाला.
माझ्यासमोर गुगली टाकून काका हसत बसले. मी त्यांच्या हस-या चेह-याकडे बघितलं, एक दुःख त्यात दडलं होतं. काकांना दोन मुलं. मुलगी मोठी आणि धाकटा मुलगा. मुलीनं बीकॉम करुन मग एमबीए केलेलं. मुलगा आत्ता इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला. काकांनी मुलगा की मुलगी असा भेद कधीही केला नव्हता. उलट त्यांचा जीव लेकीवरच जास्त. तिनं एमबीए होईपर्यंत कुठलिही नोकरी केली नव्हती. काका तर तिला आणखी शिकण्यासाठी परदेशात जा म्हणूनही मागे लागले होते. पण कॅम्पस इन्टरव्हूमध्ये तिला चांगली नोकरी लागली. नोकरी लागल्यानंतर अवघ्या एका वर्षात लग्न. आणि त्यानंतर दोन वर्षांनी बाळ. या मुलीच्या लग्नालाही आम्ही गेलो होतो. काकांनी खूप थाटात लग्न केलं होतं. ती सांगेल तसं....हे त्यांचं ब्रीद वाक्य होतं. तिचाही पगार चांगलाच होता. पण काका अभिमानानं सांगायचे, आम्ही सांगितलंय तिला, तुझा एकही पैसा घरात नको. सगळं तुझे तू खर्च कर...त्यामुळे कपडे, दागिने, मेकअप सामान अशा गोष्टीवरच मुलीनं पैसे खर्च केले होते. लग्नानंतर तर मुलीच्या पगाराचा हिशोब बापाकडे नसतोच. काका आता सर्व सांगत असतांना हा भूतकाळ हलकेच माझ्यासमोरुन गेला.
लेकीच्या थाटासाठी कधिच काहीही कमी पडू न देणारे काका आता कुरकूर करत होते. त्यांची पैशाची अपेक्षा नव्हती. पण लेकीनं आपल्याला समजून घेतलं नाही, याचं दुःख अधिक होतं. पण मला विचाराल तर मुलीमध्ये या विचारांची मुळं काकानीच रुजवली होती. तू तुझे पैसे वापर, आम्हाला त्यातला एक पैसाही नको....असं लेकीला का सांगावं. ती सासरी जाणार म्हणून. परक्याचे धन...वगैरे शब्दांपासून जोपर्यंत आपण आपली सुटका करुन घेत नाही, तोपर्यंत या अशा तक्रारी करतच रहाव्या लागणार. माझ्या परिचित अशी अनेक कुटुंब आहेत, ज्यांच्या घरातील लेकीनी आपल्या लग्नाचा
आणि पुढे बाळंतपणाचा खर्चही स्वतः केलेला. हल्ली तर अनेक मुली जिथे कामाला असतात, तिथेच त्यांची विमा पॉलिसी होते, त्यातून बाळंतपणाचे पैसे मिळतात. राहता राहिला खर्च बारशाचा, तो खर्च करायलाही या मुली समर्थ असतात. आपल्या आईवडिलांनी फक्त सोबत रहावं, बाकी सर्व आम्ही बघतो, म्हणून ठाणपणे सांगणा-या अनेक मुली माझ्या नजरेत आहेत. फरक फक्त एवढाच आहे, की या कुटुंबानीही मुलींना मुलांसारखंच वाढवलं आहे. म्हणजेच घराच्या खर्चाचा सगळा टाळेबंध त्यांनाही सांगितला आहे. आपल्या घरात किती पैसे येतात, ते कसे खर्च होतात. शिक्षणासाठी किती शैक्षणिक कर्ज घेतले आहे, ते कसे फेडले, याचे हिशोब त्या मुलींनाही माहित असतात. आपल्या वडिलांच्या ठेवी किती आहेत, त्यांच्या आयुष्यासाठी काय आर्थिक तरतुदी आहेत, याची माहिती या मुलींना असते. आपल्या वडिलांनी शिक्षण आणि संस्काराचा वारसा दिला आहे, त्यातून आपण आपले खर्च आरामात भागवू शकतो, याची जाणीव त्यांना असते. शिवाय संस्काराच्या जोरावर आपल्या सासरीही आई-वडिलांसाठी आपली कर्तव्य योग्यपणे त्या समजून देतात. शेवटी तुम्ही जे पेरता, तेच उगवणार. माझ्यासमोर बसलेले काका, सर्वांबरोबर हसून बोलत होते, स्वागत करत होते. पण मनात कुठेतरी पुढच्या सर्व खर्चाचा हिशोब करीत होते. लेक अजून दिड-दोन महिने रहाणार होती. मुलगा पुढच्या पदवीसाठी परीक्षा देत आहे, त्यातच कुटुंबाचे अन्य खर्च....काकांचा हिशोब बहुधा मनात चालू असणार. तितक्यात त्यांची लेक आली. आमच्या हातातल्या ताटाकडे बघत म्हणाली, हे काय, तुम्ही काहीच नाही घेतलंत आत्या. जिलेबी घ्या, गरम गरम आहे, आणि गुलाबजामून ड्रायफ्रूट स्पेशल आहे. आईस्क्रीमही बघ...माझ्या पसंतीचं आहे...बाबा नको म्हणत होते. पण मी हट्ट धरला. उगाच कोणी नाव ठेवायला नको. आमच्याकडे जरा सगळ्यांनी ऐसपैस खाण्याची सवय आहे ग...लेक मोकळेपणे गप्पा मारत होती. मग अन्य पाहुण्यांबरोबर बोलायला ती निघून गेली. आम्ही दोघांनीही ताटात फारकाही वाढून घेतलं नव्हतच. फक्त काकांच्या विचारांनी हाता-
पोटाचा वेग मंदावला होता. पण काकांची लेक आली, आणि तिचा बेफिकीरपणा बघून दोन घास बळेबळे तोंटात टाकले, आणि जेवण आटपलं. निघतांना काकूंनी हळद-कुंकू लावत एक बॅग आणि मिठाईचा पुडा हातात दिला. आता हे काय, तर रिटर्न गिफ्ट म्हणे. हे काय नवीन, म्हणून काकूंना मी विचारलं, तर म्हणाल्या, राणीच म्हणाली, कोणालाही रिकाम्या हातानं पाठवायचं नाही, बरं दिसत नाही ते, म्हणून या भेटवस्तू. मी डोक्याला हात लावला. मिठाईचा पुडा तिथेच ठेवला. आपल्याला झेपेल तेवढच आपण करावं, उगाच नव्या परंपरा कशाला वाढून ठेवायच्या. परंपरा या नेहमी चांगल्या असतात. फक्त आपण त्यांचा कसा अर्थ लावतो, यावर त्यांचे महत्त्व असते. कुठल्याही परंपरा, चालीरिती या आपला खिसा खाली करुन समारंभ साजरे करा, असे सांगत नाहीत. दिखावूपणा हा आपल्या संस्कृतीचा भाग नाहीच शिवाय मुलगा-मुलगी हा भेदही आपल्या संस्कारात नाही, हे जोपर्यंत आपण स्विकारत नाही, तोपर्यंत असे दिखावू कार्यक्रम होतच रहाणार.
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
ङोळ्यात अंजन घालणारा लेख आहे. हल्ली समारंभाना खर्च करून खोटा दिखाऊपणा आणतात ते चूकच आहे. जास्तीत जास्त मंडळींनी वाचला पाहिजे... ललिता छेडा
ReplyDeleteलेख अगदी छान लिहिला आहे
ReplyDeleteयोग्य वेळी ही समज आलीच पाहिजे
नाहीतर नुसत्या शिक्षणाचा आणि नोकरी च उपयोग तो काय
Khup chan lekh
ReplyDeleteअगदी खरं आहे.
ReplyDeleteमुलांनी, विशेषतः मुलींनी , आपल्या आईवडिलांना समजून घेतले नाही आणि स्वतःची हौसमौज सासरच्या लोकांच्या पदराआड दडवून पूर्ण करायची ठरवली, तर आईवडील, त्यांचे संस्कार, त्यांनी दिलेले शिक्षण, ह्या सर्व गोष्टी कवडीमोल ठरतात! देखाव्याचे सण-समारंभ पार पाडणा-या व्यक्ती, कुटुंबे, ह्यांच्या डोळ्यात अंजन घालायलाच हवे.
ReplyDeleteखूप छान आणि विचारप्रवर्तक लेख आहे.
सौ.मृदुला राजे
मुलींना शिक्षण देऊन .पैसे मिळवण्या साठी सक्षम केलेलं असताना. मुलीचं हे वागणं निराशा जनक आहे
ReplyDelete.मुलींनी विचार करावा असाच लेख..
काळा प्रमाणे बदलायला हवे हे खरे आहे, आजचं युग आधुनिक आहे.मुले आणि मुली अगदी Ph D पर्यंत शिकलेल्या आहेत.परंतु आपल्या आई वडील यांनी अतिशय खडतर आणि गरिबीतून प्रवास करत, स्वतः काही मौजमजा न करता मुलांना उच्च शिक्षण दिलेले असते.ते दिवस तरी हल्लीच्या मुलांनी विसरता कामा नयेत. एवढीच अपेक्षा आहे....
ReplyDelete