राजे....

 

राजे.....


ए....तू स्वतःला काय समजतोस....तूझ्या....तुला माहीत आहे का मी कोण आहे....भे.....इथे ठेचीन तुला...तुझ्या...आई....अशी भ ची बाराखडी भर रस्त्यात चालू होती.  मंगळवारी नव-याला डॉक्टरकडे घेऊन गेले होते.  रात्री साडेनऊच्या सुमारास क्लिनीकमधून बाहेर पडलो, तर धो-धो पाऊस सुरु झाला.  डोंबिवलीच्या रस्त्यांची अवस्था आणि पावसाचा जोर पाहून सर्व साधनं असतांनाही पाऊस थांबेपर्यंत अडोशाला उभं राहण्याचा निर्णय घेतला.  तेव्हाच पावसाच्या आवाजाला चिरत येणारी ही भ...ची बाराखडी कानावर पडली.  आमच्याच बाजुला पावसापासून वाचणारी काही मंडळी उभी होती.  ही बाराखडी कानावर पडल्यावर ते चार्ज झाले.  चल, चल, पुढे उभं राहू...काहीतरी लफडं सुरु झालं,  म्हणत अधिक सोयीस्कर जागी ते गेले.  मी समोर बघितलं, तर पंचवीशीतला तरुण पिसाळल्यासारखा ओरडत होता.  त्याच्या गाडीला धक्का लागला होता बहुधा.  ज्या गाडीचा धक्का लागला ती एका वयोवृद्धाची होती.  ते एका बाजुला उभे होतें.  त्यांच्यावर तो भाऊ अजूनही भ...च्याच भाषेत बोलत होता.  हातवारे चालू होते. माझ्या अंगावर शहारा आला.  ते वयोवृद्ध हताशपणे आणि काहीशा घाबरलेल्या नजरेनं त्या तरुणाकडे बघत होते.  पण त्याचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता.  बरं त्याची भाषा आणि त्याचा आरडाओरडा एवढा भयाण होता की, आसपास उभ्या असलेल्या एकाचीही त्याला अडवण्याचीही हिम्मत होत नव्हती.  मी नव-याकडे आशादायक नजरेनं बघितलं.  तो म्हणाला अजिबात नाही.  तुला त्रास होत असेल तर आपण निघूया.  त्या भ....च्या बाराखडीपेक्षा पावसाचा मारा बरा, म्हणत आम्ही अक्षरशः पळवाट शोधली.  माझी नजर त्या वयोवृद्धावरुन हटत नव्हती.  त्यांच्याजवळ जाऊन निदान त्यांचा हात हातात तरी धरुन उभं रहावं असं वाटत होतं.  पण त्या तरुणाची भाषाच काही त्याची बोलण्याची शैली पाहून मी सुद्धा मनापासून हादरले होते. 


आम्ही निघालो आणि काही क्षणात पाऊस आला तसा थांबला.  एक मोकळा श्वास घेतला आणि लक्षात आलं जो रस्ता आम्ही पकडला होता, तो पुढे बंद होता.  पुन्हा गाडी वळवण्याचा टास्क करेपर्यंत मागून मोठ्या आवाजात धडधड करत एक गाडी आली.  त्यावर तोच तरुण होता.  त्याचीही नजर बंद असलेल्या रस्त्यावर घेतली.  त्यानं एक आईवरुन सणसणीत शिवी घातली आणि तोही गाडी वळवायला लागला.  आम्ही वास्तविक त्याच्या आधी आलो होतो,  आणि गाडी वळवत होतो.  पण त्या तरुणाला बघून नवरा गाडी बंद करुन उभा राहिला.  तो आला तसाच धडधड आवाज करत जोरात बोलत निघून गेला.  त्याच्या पाठमो-या छबीकडे बघत असतांना माझी नजर त्याच्या गाडीवरील नंबरप्लेटवर  गेली आणि एकच तिडीक मस्तकात गेली.  त्या गाडीच्या नंबरप्लेटवर राजे.. लिहून महाराजांची छबी काढली होती.  राजे...छत्रपती शिवाजी महाराज.  या अशा तरुणाच्या गाडीवर.  माझ्या डोक्यात पुन्हा एकदा तिडीक गेली.  तो तरुण पार पुढे गेल्यावर आम्ही गाडी चालू केली आणि पुन्हा तोच रस्ता पकडला.  ते वयोवृद्ध आणि त्या तरुणाच्या गाडीची धडक झाली होती, त्याच रस्तावरुन पुन्हा जाण्याची वेळ आली.  तिथे ते वयोवृद्ध आपल्या पडलेल्या गाडीजवळ होते.  आसपास गर्दी गोळा झाली होती.  पण मदतीला कोणीही पुढे नव्हते.  आम्हीपण गाडी थांबवली.  त्या व्यक्तीचे हात बहुधा थरथरत होते.  तशाच हातांनी त्यांनी गाडीचे हॅन्डल पकडले आणि गाडी चालू केली.  जिथे गाडी उभी होती, तो रस्ता  खड्ड्यांनी पार भरला होता.  पावसाचे पाणी त्यात साठले होते.  एव्हाना रात्रीचे दहा वाजत आलेले.  त्या काळोखात त्यांना गाडीचा हेडलाईट चालू केला आणि हळूवार गाडी पुढे नेली.  मी आजुबाजूंच्या लोकांचे चेहरे बघितले, त्यांच्या चेह-यावर आमच्या चेह-यावर होती, तशीच वेदना होती.  ते आजोबा त्या ठिकाणी आले तेव्हाच नेमका पाऊस सुरु झाला होता, त्यांच्याजवळ रेनकोट नव्हता.  त्यामुळे घाईघाईनं

त्यांनी गाडी उभी केली आणि दुकानाच्या अडोशाला उभे राहिले होते.  पण त्यांनी गाडी उभी केली, तिथेच मोठा खड्डा होता.  त्यात पाणीही साठलेले, आजोबांची गाडी त्यामुळे कलली  ती नेमकी त्या तरुणाच्या त्या धडधड आवाज येणा-या गाडीवर.  त्याच्या गाडीला खरचटलंही नसावं.  पण माझ्या गाडीवर तुमची गाडी पडलीच कशी, निट उभी केली का नाही,  गाडी चालवता येत नाही मग चालवतो कशाला रे म्हाता-या,  म्हणत हा तरणा त्यांच्यावर चालून गेला होता.  आणि मग ती भ....ची बाराखडी. आजोबांना मनसोक्त बोलून तो पुढेही झाला.  पण त्याआगोदर त्यांनी आजोबांची गाडी पार खाली पाडली होती.  तो गेल्यावर अनेकजण गाडी उचलायला पुढे आले.  पण त्या आजोबांनी सर्वांना थांबवलं.  त्यांच्या मनावर किती जखम झाली असेल, हे त्यांचं त्यानांच माहीत.  आपल्या नातवाच्या वयाचा पोरगा नको नको त्या शिव्या देऊन टेचात निघून गेला होता, त्यावेळी कोणीही त्याला साधं अडवलंही नाही,  आता गाडी उचलायला त्यांची मदत कशाला, म्हणत आजोबांनी हे सर्व मदतीचे हात नाकारले होते.  ते निघून गेल्यावर त्या आजोबांबद्दल चर्चा चालू होती, त्यातून ही माहिती मिळाली.  त्यातून तो तरुण पुन्हा परत आला तेव्हा याच रस्तावरुन गेला आणि जातानाही त्याच्या खजान्यातील शिव्यांचा ठेवा आजोबांवर चढ्या स्वरात मोकळा करुन गेला होता.  यानंतर आजोबांना मदतीला आलेल्या सर्वांचीच मदत नाकारली.  त्यांचा हा करारीपणा आजुबाजुच्या गर्दीला चांगलाच लागला, तसाच आम्हा दोघांनाही लागला होता.  रस्त्यावरचे खड्डे चुकवत आम्हीही आमचा मार्ग पकडला.  मात्र नजरेसमोरुन ती नेमप्लेट आणि त्याच्यावरचे महाराज काही जात नव्हते.

आज कितीतरी गाड्यांवर राजे, जाणता राजा, महाराज, छत्रपती, माझा राजा, माझा शिवबा लिहिलेले असते.  पण राजांच्या विचारांचे काय.  त्याचा कधीतरी विचार होणार आहे का.  फक्त माझा शिवबा किंवा आमचा राजा म्हटलं की राजांचे राजेपण आपण जपतो का, याचा विचार व्हायलाच हवा.  आमच्या भागातून अशीच धडधड आवाजातील एक गाडी नेहमी जाते.  रात्री


बारानंतर या गाडीवाल्याच्या अंगात येते आणि तो भन्नाट वेगानं गाडी घेऊन जातो.  मग त्याच्या या आवाजानं आसपासची कुत्री जागी होतात आणि त्यांचा गोंधळ चालू होतो.  ही गाडी गेल्यावर डोक्यात एक तिडीक येते, आणि कधीतरी हा गाडीवाला भेटला तर एक धपाटा तरी त्याला मारावा अशी इच्छाही मनात येते.  एकदिवस सकाळी या मस्तवालाचे दर्शन झाले.  तेही अर्थात पाठमोरं.  धाडधाड असा ओळखीचा आवाज आला म्हणून मागे पाहिलं, तर तो भन्नाट वेगात माझ्यासमोरुन निघूनही गेला.  त्याचीही नेमप्लेट बघितली,  त्यावर जाणता राजा असं ठसठशीतपणे लिहिलेलं.  मी डोक्याला हात मारुन घेतला.  महाराजांचा अजून किती अपमान करणार ही मंडळी.  राजांचा अपमान फक्त त्यांच्या पुतळ्याला हानी पोहचली की होतो असे नाही.  महाराजांचे फोटो लावून बेताल वागणा-या अशा मस्तवालांकडून कितीतरी वेळा महाराजांचा अपमान झाला आहे, त्याचा हिशोब नाही.  आता रात्री बारा नंतर त्या गाडीची धडधड कानी पडली की नेहमी महाराजांचीच आठवण येते,  आज महाराज असते तर....त्यांनी या मस्तवालाला पकडून काय शिक्षा दिली असती, हा विचार मनात येतो....उगाच नाही महाराजांना जाणता राजा म्हणतात...त्यांच्या जाणतेपणातील एक कण जरी अशांनी घेतला तरी ही मंडळी सुतासारखी सरळ होतील, हे नक्की.

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. असे प्रसंग मी शिवजयंती मिरवणुकीत पाहिले आहेत.मी कामावर जाण्यासाठी स्टॉप वर असताना मिरणुकितील काही मुले हातात भगवे झेंडे घेऊन दारूच्या दुकानात आली आणि पाहिजे ते घेऊन गेली.केवळ महाराजांचे नाव घ्यायचे बाकी विचारांशी काही संबंध नाही.मोटरसायकल रॅली काढायची कर्कश आवाजात ढोल वाजवत विचित्र अंग विक्षेप करत नाचायचे अशी शिवजयंती साजरी करण्यात धन्यता मानली जाते आहे.

    ReplyDelete

Post a Comment