माहेरवाशीण....

 

माहेरवाशीण....


माझ्या घरी गौरीची पुजा आहे.  थोडा वेळ काढ आणि घरी ये.  गौरीला आणि ताईला भेट.  मला आणि तिलाही बरं वाटेल.  गौरी पूजनाच्या दिवशी एवढाच मेसेज अपर्णानं शेअर केला.  या पाच दिवसात कोण धावपळ होते ते विचारु नका.  त्यात या सोशल मिडियाला जरा दूरच ठेवावं लागतं.  तसंच माझंही झालं होतं.  त्यामुळे अपर्णाचा, माझ्या एका मैत्रिणीचा आलेला हा साधासा मेसेज मी वाचला तेव्हा रात्रीचे अकरा वाजून गेले होते.  अपर्णाला मी येऊ शकत नाही, म्हणून मेसेज टाकायला सुरुवात केली आणि तिचा चेहरा समोर आला.  गरजेला कधीही हाक मारली तर तिची ना नसते, हसतमुख आणि लोभस.  अशा प्रिय मैत्रिणीचे आमंत्रण कसे टाळणार म्हणून घड्याळ बाजुला ठेवले आणि तिच्या घरचा रस्ता पकडला.  एवढ्या वर्षाच्या मैत्रित अपर्णाकडे गौरी येतात, याची माहिती नव्हती.  पुढच्यावर्षी गौरी-गणपतीच्या नेहमीच्या घरात अपर्णाचे नावही टाकायला हवे असा विचार करत तिच्या घरी पोहचलो,  तेव्हा बरोबर रात्रीचे साडेअकरा वाजलेले.  एवढ्या रात्रीही तिच्या घराची बेल वाजवायची गरज पडली नाही.  दरवाजे सताड उघडे होते आणि घर हास्यरसात बुडून गेलं होतं.  आम्हाला दोघांना बघताच अपर्णा धावत आली आणि गळ्यात पडली. मला माहित होतं, कितीही उशीर झाला तरी तू येणार.  बघ माझ्याकडे बाबांची गौरी आलीय.  तिच्या घराच्या एका कोप-याचं रुपडं बदललं होतं.  अपर्णानं फुलांची छान सजावट केली होती.  त्यात गौरीला पुजण्यात आलं होतं.  दागिन्यांनी सजलेली, पाना फुलांतील प्रसन्न गौरीला बघून मलाही छान वाटलं.  तरी मनातला प्रश्न काही जात नव्हता, अशी अचानक हिच्याकडे गौरी आली कशी.  पण पुजा केल्यावर अपर्णाबरोबर बोलतांना हळूच या प्रश्नाचे उत्तर मिळाले आणि माहेर या सोनेरी शब्दांमध्ये असलेल्या प्रेमाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. 


अपर्णाचे माहेर महाडचे.  तिचे आईवडील तिथे रहात होते.  अपर्णाला मोठी बहिण आहे, सविता नावाची.  तिचेही लग्न झालेले,  ती थेट पालघरला रहाते.  दोघी बहिणी दोन टोकाला.  त्यामुळे बहुधा भेट व्हायची नाही.  पण गौरी-गणपतीला आईकडे नेहमी दोघी जात असत.  मोठ्या बहिणीकडे दिड दिवसाचा गणपती. तो झाल्यावर या दोघी महाडला जात.  मग या दोघींचे आणि घरी आलेल्या गौरीचे माहेरपण आई मोठ्या आनंदात करायची.   दोघी बहिणी आपल्या मैत्रिणींना भेटायच्या.  गौरी घरी आल्यावर जागरणं व्हायची.  मग गणेश विसर्जनानंतर आईला दोघीही आवराआवर करु लागायच्या. हा आठवडा या दोघींसाठी आणि त्यांच्या आईवडिलांसाठी खास असायचा.  पण कोरोनाच्या पहिल्याच साथीत अपर्णाचे वडिल वारले.  त्यानंतर अवघ्या चार महिन्यात अपर्णाची आईही कोरोनाच्या साथीत गेली.  दोघींना हा मोठा धक्का होता.  तेव्हाची परिस्थिती भयानक होती.  या दोन्ही मुलींपैकी कोणीही आईवडिलांच्या अंत्यसंस्कारालाही जाऊ शकल्या नाहीत.  दोघीही खूप रडल्या.  आपल्या आई वडिलांना काय वाटले असेल, हा विचार त्यांच्या मनातून जात नव्हता.  आईबाबांनी कोणाला कधी दुखावले नाही, मग त्यांच्या वाटेला असे मरण का आले, हा अपर्णाचा नेहमीचा प्रश्न होता.  यामुळेच की काय दोघीही बहिणींनी गाव सोडलंच.  घरची गवर तीन वर्ष बसलीच नाही. पण काही गोष्टींना वेळ हेच औषध असते.  या दोघींनाही हिच मात्रा लागू पडली.  आईबाबा गेल्यापासून त्या दोघीही गावच्या घरात फार गेल्या नाहीत.  अगदी नावाला आवराआवर करुन एक-दोन दिवस राहून परत येत असत.  घराच्या स्वच्छतेची जबाबदारी एका ओळखीच्या महिलेकडे देऊन दोघीही मोकळ्या झाल्या.  अपर्णाला कधीमधी मी सुद्धा विचारलं होतं, मुलांना घेऊन दोन दिवस गावी का जात नाहीस, जरा बरं वाटेल.  त्यावर तिचं उत्तर एकच असायचं,  नको,  आईबाबा नाहीत ग.  तिथे गेल्यावर त्यांच्या शेवटच्या दिवसात आम्ही साथ देऊ शकलो

नाहीत, हे शल्य काही मनातून जात नाही.  आता तिथे नकोच.  पण हा प्रश्न या दोघी बहिणी एकमेकींनाही विचारत होत्या.  गावी जाणे बंद केल्यानं दोघींचेही माहेरपण संपले होते.  संसारात रमलेल्या या दोघी बहिणींना त्याची जाणीव व्हायला लागली.  अशात काही कामासाठी दोघीही एक दिवसासाठी गावच्या घरी गेल्या.  घरपट्टी भरायची होती, शिवाय अन्यही कामं होती.  ती कामं दोघींनी भराभर केली.  घरात कामाला असलेल्या बाईनं स्वयंपाक केला.  जेवायला बसल्यावर त्या बाईनं विचारलं, तुमच्याकडे गवरबाय बसायची ना.  तो पेटारा तसाच पडला आहे.  तुम्ही दोघी आला आहात तर तो पेटारा साफ करा, किंवा मला उघडून तरी द्या.  गौरीच्या साड्या, पडदे साफ करुन ठेवते.  गौरीचा विषय आल्यावर दोघींच्याही डोळ्यासमोर आई उभी राहिली.  आई, माझ्या तिन माहेरवाशीणी म्हणून या गौरीसह या दोघींचीही आरती ओवाळयची.  दोघींच्याही डोळ्यात पाणी आलं.  जेवल्यानंतर पेटारा उघडला आणि दोघी हरखून गेल्या.  आईनं मोठ्या पेटा-यात गौरीचं सगळं सामान निट लावून ठेवलं होतं.  गौरीच्या साड्या, तिचे दागिने, ते गौरीच्या मागे लावण्यात येणारे पडदे,  अगदी सुतळींची गुंडेही.  समया, निरांजने, आरतीची ताटं मोठा खजिना मिळाल्यासारखा या दोघींना आनंद झाला.  दोघींनीही आपल्या घरी आज आईच्या घरी रहात असल्याचा निरोप दिला आणि त्या पेटा-यातील एक-एक वस्तू काढायला सुरुवात केली.  प्रत्येक वस्तूवर हात फिरवला की आईच्या स्पर्शाची जाणीव व्हायला लागली.  त्या रात्री दोघीही बहिणी खूप रडल्या.  आपल्याकडून काय चूक झाली याची त्यांना जाणीव झाली.  त्यानंतर अगदी एक महिन्यात गणपती बाप्पा येणार होते.  एवढ्या कमी वेळात गावच्या घरात गौरीची स्थापना करता येणार नाही, म्हणून मोठ्या बहिणीनं तो पेटारा तसाच आपल्या गाडीवर ठेवला.  त्या वर्षी तिच्याघरी गौरीची पुजा करण्यात आली.  तेव्हा अपर्णा मोठ्या बहिणीकडे हक्कानं रहायला गेली.  तिचं माहेरपण ताईनं केलं.  यावर्षी ही गौर महाडच्या घरी पुजण्यात येणार होती.  पण मग अपर्णा लाडानं  रुसून बसली.  माझ्या घरीपण माहेरची गौर येऊदे, म्हणून ताईकडे हट्ट धरला आणि यावर्षी तिच्याकडे गौरीची पुजा झाली.  तिच्याकडे गौरी आली म्हणून तिची ताई

माहेरपणाला आलीय.  आता पुढच्या वर्षीपासून या दोघी बहिणी गौरीसाठी गावी जाणार आणि आईबाबांच्या घरी तिची स्थापना करणार आहेत.  दरम्यान दोघींनीही माहेरच्या घराची नव्यानं डागडुजी करुन घेतली आहे.  आवश्यक सुविधा करुन घेत आहेत.  पुढच्यावर्षापासून दोघीही आपल्या कुटुंबासह माहेरच्या घरी गौरीसाठी जाणार आहेत.  अपर्णानं हे सर्व सांगत तिच्या ताईची आणि कुटुंबाची ओळख करुन दिली.  तिच्या ताईच्या चेह-यावरही आनंद होता. म्हणाली,  सगळ्यांना माझी ओळख माहेरवाशीण म्हणून करुन देतेय,  केवढं बरं वाटतं हा शब्द कानावार आल्यावर.  यासारखं सुख कशात नाही.  मग दोघीही बहिणी गौरीची पुजा, नैवेद्य असं सगळं सांगत होत्या.  एव्हाना रात्रीचे साडेबारा वाजले होते.  त्या दोघींच्या आनंदी चेह-यावर आगळे तेज आले होते.  गौरीचे जागरण सुरु होते, दोघीही गौरीमय झालेल्या.  आम्हालाही आणखी थोडं थांबायचा आग्रह करीत होत्या.  पण त्यांनीच एक शब्द पुढे केला होता, माहेरपण.  माझ्याही माहेरी आई, वहिनी वाट बघत होत्या.  एवढ्या रात्री शक्य नाही, पण दुस-या दिवशी शक्य तेवढ्या लवकर मलाही माहेरी जायची ओढ लागली आणि गौरीला पुन्हा एकदा नमस्कार करुन त्या दोघी बहिणींचा निरोप घेतला.  कसला भारी शब्द आहे, माहेरपण,  नुसता उल्लेख जरी झाला तरी मन सुखावलं होतं.  रात्रीचे किती वाजले आहेत, दिवसभर किती दगदग झाली आहे, हे सर्व हिशोब मागे पडले, आणि मन सुखाच्या झुल्यावर झुलू लागले. 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

Comments

  1. गौरी गणपती मुळे दोघा बहिणींमधील प्रेमाचा ओलावा आणखीन वाढेल. यालाच म्हणतात धर्म आणि संस्कार.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खरं....आपले संस्कार, परंपरा आणि आई वडिलांची शिकवण ही सर्वात मोठी शिदोरी आहे...ती जपायलाच हवी.

      Delete
  2. एखाद्या सु़दर कथेसारख लिहील़ आहेस... माहेर हा सोनेरी शब्द आवडलं... ललिता छेडा

    ReplyDelete
    Replies
    1. गौरीदेवी आहे ती....तिच्यावर लिहितांना सर्व आपसूक साधून येतं.

      Delete
  3. खूप छान.भावपूर्ण कथा आहे.

    ReplyDelete
  4. खूप छान.भावपूर्ण कथा आहे

    ReplyDelete

Post a Comment