काकू, तुमच्यासारख्या तुम्हीच...

 काकू, तुमच्यासारख्या तुम्हीच...


आपल्या आयुष्यात काही माणसं अवचितपणे येतात.  आपल्याला ती आयुष्यभराचे प्रेम भरभरुन देतात.  आपुलकी देतात, वात्सल्य देतात.  आयुष्याकडे बघण्याचा आणि ते जगण्याचा सकारात्मक दृष्टोकोन देतात.  भक्कम पाठिंबा देतात.  तू हो पुढे, मी आहे, तुझ्यासोबत... अशा शब्दात धीर देतात आणि आयुष्यातील कठीण प्रसगांत आपल्या अस्वस्थ मनाला छाया देतात.  अशीच एक व्यक्ती माझ्या आयुष्यात आली, ती म्हणजे, उषा सावंत.  वय वर्ष फक्त 73.  कारण वयापेक्षा सावंत काकूंचे मन अधिक तरुण. काकूंना दोन मुलं.  एक मुलगा, हर्षद आणि मुलगी शर्मिली, म्हणजेच राणी.  दोघंही अमेरिकेत स्थाईक.   दोघंही मोठ्या पदावर काम करणारी.  काकू सहा महिने भारतात तर सहा महिने मुलांकडे रहाणा-या.  आमच्या सोसायटीत त्या आल्या तेव्हा लिफ्टमध्ये त्यांची आणि माझी भेट झाली.  आम्हा दोघींनाही गप्पा मारायला आवडतात.  त्यामुळे लगेच मैत्री झाली.  काकू सध्या डोंबिवलीत त्यांच्या बहिणीकडे आलेल्या.   करोनानंतर जवळपास दोन वर्षांनी त्यांची ही भारतभेट होती.  आल्याआल्या त्या आठवणीनं भेटायला आल्या.  काकू, माझ्या ब्लॉगच्या वाचक.  प्रत्येक ब्लॉग वाचणार आणि त्यावर सविस्तर प्रतिक्रीया देणार.  भेटल्यावर काकूंनी पहिल्यांदा ब्लॉगचे आणि मग पुस्तकाचे भरभरुन कौतुक केले.  अगदी धावती भेट दिली, नंतर बोलायला येते म्हणून माझा निरोप घेतला.  जाताजाता पुढच्या आठवड्यात येते, असं सांगून गेल्या.  पण रविवारी त्यांच्या मोबाईलमधून एक मेसेज आला आणि आम्हा दोघांनाही जबर धक्का बसला.  मेसेज काकूंच्या मुलाचा, हर्षदचा होता. 


काकूंना काही त्रास झाला, हॉस्पिटलमध्ये दाखल केले.  चार दिवसातच त्यांचा मृत्यू झाला होता.  हा मेसेज वाचल्यावर आम्ही दोघंही कोलमडलोच.  असं कसं झालं.  काकूंची दोन्ही मुलं अमेरिकेतून आली होती.  त्या दोघांचीही भेट घेतली.  या दोघांच्याही चेह-यवरची वेदना पाहून काळीज हेलावलं.  कारण सावंत काकू यांचं सर्व जीवनच त्यांच्या मुलांसाठी आणि नातवंडासाठी होतं.  फक्त स्वतःच्या मुलांचा नाही, तर आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला चांगलं शिक्षण मिळावं, प्रत्येकाची प्रगती व्हावी म्हणून त्या सतत धडपडत असत.  त्यांच्या मुलांबरोबर बोलल्यावर काकूंच्या आयुष्यातले अनेक घटनाक्रम समोर आले.

सावंत काकूंचा आयुष्य म्हणजे एकटी महिला काय करु शकते, याचं उत्तर आहे.  त्यांची मुलगी शर्मिली, म्हणजेच राणी, पाच वर्षाची असतांना त्यांच्या पतीचा अपघातात मृत्यू झाला.  त्यावेळी काकू तीन महिन्याच्या गरोदर होत्या.  1982 सालातील ही गोष्ट.  तेव्हा काकूंना अनेकांनी अबॉर्शन करण्याचा सल्ला दिला.  दोन मुलांना तू एकटी बाई कशी सांभाळणार, हा प्रश्न विचारला.  बहुधा याच प्रश्नांनी काकूंना बळ दिलं.  त्यांनी हे सर्व धुडकावून लावत आपल्या मुलाला जन्म दिला.  बीआरसीमध्ये त्या कामाला होत्या.  सांताक्रूझला त्या रहात असत.  काकू एवढ्या धीराच्या की, बाळंतपणात अगदी शेवटच्या दिवसापर्यंत त्या कामाला गेल्या.  बाळतपणाच्या कळा येऊ लागल्या तेव्हा त्या एकट्या आपल्या मुलीचा हात धरुन हॉस्पिटमध्ये चालत गेल्या.  एका महिलेला किती खंबीर व्हावं लागतं, याचं हे उदाहरण आहे.  मुलाच्या जन्मानंतर काकू अधिक जिद्दी झाल्या.  त्यांची ही


जिद्द मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी होती.  राणी आणि हर्षद या मुलांना सर्वोत्तम शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी त्यांची धडपड चालू झाली.  त्यांच्या बहिणी त्यांच्या मदतीला पुढे आल्या.  काकू सकाळी साडेआठवाजता मुलांचा सर्व स्वयंपाक करुन बाहेर पडत असत.  संध्याकाळी साडेसातला त्या घरी येत.  तोपर्यंत या मुलांना त्यांच्या बहिणी आणि शेजारी सांभाळत असत.  या सर्वांबरोबर काकूंचे आयुष्यभराचे प्रेमाचे नाते जोडले गेले.  मुलांनी फक्त अभ्यास करावा, बाकी सर्व मी सांभाळेन असं त्यांचं सांगणं असायचं.  या सर्वात कधीही त्यांनी चिडचिड केली नाही की आयुष्याबद्दल रडगाणं गायलं नाही.   मोठी मुलगी राणी हिला मेडिकल करायचे होते.  पण अगदी थोड्या मार्कांनी तिचा प्रवेश हुकला.  पण त्यात रडत बसतील तर त्या काकू कसल्या.  त्यांनी मुलीला डॉक्टर नाही तर फार्मासिस्ट हो...म्हणत नाशिकच्या कॉलेजमध्ये दाखल केले.  नंतर तिला पुण्याच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला.  राणी मुळातच प्रतिभावान.  अभ्यासात हुशार असलेल्या या लेकीला आपल्या आईच्या कष्टाची जाणीव होती.  त्यामुळे हॉस्टेलला रहातांना आईवर पैशाचा जास्त भार नको, म्हणून राणी रात्रीच्या जेवणात काटकसर करत असे.  पण या सर्वात राणीची तब्बेत बिघडली.  तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.  काकूंना हे समजल्यावर त्या पुण्याला दाखल झाल्या.  आपल्या मुलीची तब्बेत बिघडली म्हणून त्या घाबरल्या नाहीत, की मुलीला ओरडल्या नाहीत. हॉस्पिटलमध्ये राहून त्यांनी राणीची काळजी घेतली आणि यापुढे तब्बेतीच्या बाबतीत कुठलिही हयगय करायची नाही, असा प्रेमाचा सल्ला दिला.  मुलांच्या शैक्षणिक खर्चात कुठलिही कपात त्यांनी केली नाही.  यासाठी आपल्या पीएफच्या पैशाकडेही त्यांनी बघितले नाही.  राणीने पुढे मुंबईतून मास्टर्स केले.  तिला पीएचडी करायला अमेरिकेला जायचे होते.  तेव्हा आपल्या मुलीला स्कॉलरशिप मिळावी म्हणून त्या अनेक संस्थाकडे गेल्या.  2000 साली राणी अमेरिकेला पीएचडीसाठी रवाना झाली.  तिथे तिचा परिचय हरिष परिहार यांच्याबरोबर झाला.  तेही पीएचडीचे विद्यार्थी.  या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.  दोन वर्षानंतर भारतात परत

आल्यावर राणीनं ही गोष्ट पहिल्यांदा आपल्या आईला सांगितली.  सावंत काकूंच्या स्वभावाचा आणखी एक पैलू होता
, तो म्हणजे, कुठलिही गोष्ट त्या समजून घेत आणि त्यावर व्यक्त होतांना कुठेही आरडाओरडा नाही की वाईट शब्दांचा वापर नाही.  अगदी व्यावहारिक मते.  आपल्या मुलीचे सर्व म्हणणे त्यांनी ऐकले.  परप्रांतीय मुलाबरोबर आपल्या मुलीच्या लग्नाला त्यांनी होकार दिलाच शिवाय अगदी पाच दिवसाच्या कालावधीत राणीचे लग्नही लावून दिले.  आता हिच राणी अमेरिकेत एका  मेडिकल डिव्हाईस कंपनीमध्ये उच्चपदस्थ अधिकारी आहे.  तिचे पती हरिष परिहारही असेच उच्चपदस्थ अधिकारी असून या जोडप्याला ओमी आणि इशा ही दोन गुणी मुलं आहेत.  राणी अमेरिकेत स्थिरावल्यावर तिनं आपल्या धाकट्या भावाला, हर्षदलाही पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत बोलावून घेतले.  2004 साली हर्षद अमेरिकेला रवाना झाला.  हर्षदनं अमेरिकेत व्यवस्थापन शाखेतील पदवी घेतली.  राणी आणि हर्षद या काकूंच्या मुलांना एकाच वर्षी पीएचडी आणि एमबीए या पदव्यांनी गौरवण्यात आले.  या समारंभाला सावंत काकू हजर होत्या.  काकू नेहमी हा आपल्या आयुष्यातला सुवर्ण क्षण असल्याचे सांगत असत.  2010 मध्ये हर्षदचेही लग्न झाले.   सध्या हर्षद, त्याची पत्नी सोनी आणि देवांश, सोहा या दोन मुलांसह अमेरिकेत रहात आहे.  काकूंचा त्यांच्या मुलांवर जेवढा जीव तशीच नातवंडावर प्रचंड माया.  यामुळेच त्या 2004 पासून 2016 पर्यंत आपल्या मुलांकडे सहा महिने आणि भारतात सहा महिने असा प्रवास करीत होत्या.   त्यानंतर मात्र बहुतांश वेळ नातवंडांच्या मायेमुळे त्या अमेरिकेतच रहात होत्या. 

बरं या सावंत काकू आमच्या आयुष्यात कश्या आल्या, त्याचाही मजेदार किस्सा आहे.   काही वर्षापूर्वी आमच्या सोसायटीच्या लिफ्टबाहेर मी उभी होते.  सोबत दोन मोठ्या पिशव्या.  लिफ्ट आली त्यात पिशव्या आधी ठेवून मी आत गेले, दरवाजा लावत असतांना ओ...प्लीज...प्लीज...म्हणत एक महिला धावत आली.  आल्याआल्या त्यांनी पहिल्यांदा सॉरी म्हटलं, मग थॅक्स...मी त्यांच्याकडे पाहिलं, उंची थोडी लहान, पंजाबी ड्रेस घातलेला, हातात एक साधी कापडाची पिशवी आणि हसरा चेहरा.  मी त्यांना कधी आमच्या सोसायटमध्ये पाहिलं नव्हतं.  त्यांनी सांगितलं मी नुकतीच रहायला आलेय. 


मी नमस्कार केला आणि माझं नाव सांगितलं.  अगदी काही सेकदांच्या या संवादातच माझा फ्लोअर आला.  माझ्या सोबत दोन मोठ्या पिशव्या होत्या.  त्या एक-एक करुन बाहेर काढू लागले तर त्या महिला मदतीला पुढे आल्या.  मग मी त्यांना घरी येण्याचा आग्रह केला.  अगदी पाच मिनीट थांबेन हं, म्हणत त्या घरी आल्या.  पण त्या पाच मिनीटांची कधी पन्नास मिनिटं झाली हे आम्हा दोघींनाही समजलं नाही.  या पहिल्याच भेटीत सावंत काकूंच्या व्यक्तिमत्वानं आणि विचारानं मी प्रभावित झाले होते.  तेव्हा त्या सहा महिने अमेरिकेत आणि सहा महिने भारतात रहात असत.  मी अशा अनेकांना पाहिलं आहे, जे अगदी महिनाभर अमेरिकेत राहून आले तर जणू आपला जन्मच त्या देशात झाला आहे, अशा थाटात आपल्या जन्मभूमीला नावं ठेवतात.  पण सावंत काकूंची बातच काही और होती.  अगदी साधी कापडाची पिशवी घेऊन बाजारहाट करणारी ही बाई शेजारुन गेली तरी ती काही महिने अमेरिकेत रहाते, हे सांगूनही खरं वाटायचं नाही.  चेह-यावर कायम स्मितहास्य, मनात सकारात्मक विचार आणि ओठांवर स्वामी समर्थांचे नाव. नियोजन काय असावं आणि कसं करावं हे त्यांच्याकडूनच शिकावं.  भारतात आल्यावर कधी काय करायचं, कुठल्या देवस्थानला जायचं.  काय वस्तू खरेदी करायच्या.  कुठले पदार्थ कधी करायचे,  त्यांचे पॅकींग कसे करायचे याची सर्व यादी काकूंची तयार असायची.  त्यानुसार त्या आपल्या सर्व दौ-याचे नियोजन करायच्या.  बरं डोंबिवली ते अमेरिका हा दौरा ही बाई भल्या मोठ्या बॅंगासह एकटी करायची.  

दुस-याचं भरभरुन कौतुक करण्याची त्यांची वृत्ती.  आमच्या घरी आल्या की पहिलं लेकाला भेटायच्या.  त्याला भरपूर अभ्यास कर आणि मोठा हो असा आशीर्वाद द्यायच्या.  पुढचे शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला ये, मी आहे, काही काळजी करु नकोस, असा प्रेमाचा सल्लाही असायचा.  मला आठवतं, लेकाच्या जेईचा निकाल लागला तेव्हा पहिला अभिनंदनाचा फोन सावंत काकूंनीच अमेरिकेहून केला होता.  आमच्या सोसायटीशेजारी एक आश्रम आहे,  तेथील


मुलांना त्या मोकळ्या वेळेत मराठीचे धडे द्यायला जात.  हे त्यांनी मला अगदी सहज बोलतांना सांगितलं.  तेव्हा मी त्यांना धन्य आहात काकू, असं म्हटलं.   त्यावर काकूंचा तोच विनम्रपणा, अहो, वेळ आहे म्हणून जाते, बाकी काही खास काम नाही मी करत, हे उत्तर.  काकूंची सिद्धिविनायकावर खूप श्रद्धा.  दर संकष्टीला त्या भल्यापहाटे उठून मोदक करायच्या आणि पहिली ट्रेन पकडून सिद्धिविनायकाला जायच्या.  मग सकाळी अगदी सात वाजता घरी हजर व्हायच्या आणि हातावर मोदक द्यायच्या.  दुस-याला भरभरुन देण्याची त्यांची वृत्ती.  अमेरिकेहून येतांना आपल्या सर्व परिचितांसाठी त्या काही ना काही घेऊन येणार.  त्या वस्तू वाटत मग सर्वांच्या घरी जाणार.  सतत कुठल्या ना कुठल्या कामात स्वतःला गुंतवून घेणा-या  सावंत काकूंचे घर म्हणजे आरसा.  कधीही त्यांच्या घरी जा. प्रत्येक वस्तू टापटीपपणे मांडलेली.  लख्ख.  अगदी आपला चेहरा दिसेल इतकी स्वच्छ.

काकू अमेरिकेला परत गेल्या की मग त्यांचे फोन चालू व्हायचे.  मुलाचे, सुनेचे, लेकीचे, जावयाचे आणि नातवंडांचे प्रचंड कौतुक त्यांना.  सुनेनं केलेली देवपुजा किती सुरेख आहे, हे दाखवणार.  लेकीची लेक कशी गितेचे श्लोक म्हणते हे दाखवणार.  राणी आणि हर्षद या मुलांनीही आपल्या आईला जगभर फिरवलं.  त्याचं कोण कौतुक.  फोटो काढून घ्यायची हौस.  मग ते फोटो शेअर करत आपण कुठे आहोत, तो परिसर कसा आहे याची माहिती देणार.  आरोग्याबाबत काकू अत्यंत जागरुक होत्या.  रोज सूर्यनमस्कार घालणार.  चालण्याची जबरदस्त हौस त्यांना होती.  या हौसेतूनच त्यांनी आपल्या मुलांपेक्षा अधिक मित्र-मैत्रिणींचा परिवार अमेरिकेत जोडला.  आयुष्य कसे जगावे ते या सावंत काकूंनी शिकवलं.  आयुष्यातला प्रत्येक दिवस वेगळा असला तरी तो आनंदानं जगला पाहिजे, हे त्यांचे सूत्र होते.  काकूंनी हे सूत्र आयुष्यभर जपले.  आपल्या पतीचे अकाली निधन झाले, म्हणून त्या कधी हताश झाल्या नाहीत.  की देवानं माझ्याच वाट्याला हे दुःख का दिलं म्हणून


रडत बसल्या नाहीत.  देवाला दोष देण्यापेक्षा त्या नेहमी देवाचे आभार मानायच्या.  देवाची भक्ती ही त्यांची ताकद होती.  अगदी आयुष्याच्या शेवटच्या दिवसातही त्या तशाच होत्या.  त्यामुळेच त्यांची ही एक्झीट धक्कादायक ठरली.  खरंतर काकूंचीच मला मुलाखत घ्यायची होती.  त्यांना बोलतं करायचं होतं आणि नवरात्रीला त्यांच्यावरचा लेख प्रकाशित करायचा होता.  पण काकू अचानक गेल्या आणि त्यांची मुलाखत राहिली.  राणी आणि हर्षदनं आईबद्दल भरभरुन माहिती सांगितली.  त्यावरच हा ब्लॉग लिहिला आहे.  अर्थात काकू असत्या तर या ब्लॉगबद्दल त्यांची पहिली प्रतिक्रिया त्यांच्या साध्या आणि सरळ स्वभावासारखी असती.  काय हो,  काय माझं हे कौतुक, इतकी काही मी मोठी नाही.....अर्थातच काकू तुम्ही मोठ्या होतात आणि रहाणार आहात.  अनेकांची तुम्ही प्रेरणा आहात.  तुमची सकारात्मक दृष्टी आणि शांत, सुस्वभावी स्वभाव हा कायम आमच्यासर्वासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

  

Comments

  1. व्यक्ती परीचय छान

    ReplyDelete
  2. असे व्यक्तिमत्व आता विरळ होऊ लागले आहे. भावपूर्ण श्रद्धांजली

    ReplyDelete
  3. khup chhan lekh

    ReplyDelete
  4. एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा अतिशय सुंदर शब्दात परिचय करून देणारा उत्तम लेख लिहिला आहेत. "जो आवडतो सर्वांना, तोचि आवडे देवाला "... म्हणूनच सावंत काकूंना देवाघरचे आमंत्रण लवकर आले असणार! त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🌹
    प्रेषक... सौ.मृदुला राजे

    ReplyDelete
    Replies
    1. मृदुलाताई....सावंत काकूंसारख्या व्यक्ती कायम स्मरणात रहातात....तुम्ही दिलेल्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद

      Delete
  5. Thanks so much for this article. Very well written. I am sure Aai would have loved to read this article and like your all other articles, she would have praised you. Keep up the good work!!

    ReplyDelete
    Replies
    1. राणी नमस्कार....काकू या कायम आमच्या सर्वांच्या आदरणीय स्थानी रहातील....

      Delete
  6. Sonal Chalke Sawant30 September 2024 at 17:12

    वाचताना आई डोळ्या समोर आहे असं वाटल.. खूप छान आणि मुद्देसूद वर्णन केला आहे. Tya nehmi tumchye articles and 4 liners mala dhakhavaichya and khup kautuk karaichya .. lekhan kasa karava te tumchyakadun shikava asa bolaichya .. Thank you so much for this article.

    ReplyDelete
  7. काकू या अशाच होत्या....त्या नेहमी सर्वांचे भरभरुन कौतुक करायच्या....कधीही स्वतःचा मीपणा त्यांनी केला नाही...अगदी साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी...

    ReplyDelete

Post a Comment