विंदा नावाचं विद्यापीठ

 

 

 विंदा नावाचं विद्यापीठ


डोंबिवलीमध्ये पंचवीस वर्षापूर्वी आले तेव्हा काही खास व्यक्तिमत्त्वाची माझ्यावर कायमची छाप पडली.  तेव्हा दै. गांवकरीच्या ठाणे येथील कार्यालयाचे कामकाज मी सांभाळत होते.  त्यात दर रविवारी माझा, आम्ही डोंबिवलीकर नावाचा एक कॉलम प्रसिद्ध होत असे.  डोंबिवलीमध्ये समाजकार्यांत सहभाग असलेल्या मान्यवरांचा या कॉलममध्ये परिचय करुन देत असे.  तेव्हाच एका व्यक्तिमत्वाबद्दल मला माहिती मिळाली.  महिलांसाठी  मोठं काम आहे,  धडाडीच्या कार्यकर्त्या आहेत, त्यांचा तुझ्या कॉलममध्ये नक्की समावेश कर, म्हणून मला सांगण्यात आले.  मातृमंदिर या महिलांसाठीच्या संस्थेचं त्या काम करतात, अशी माहिती मिळाली.  त्याच मातृमंदिरमध्ये मी त्यांना भेटायला गेले.  केसांचा बॉयकट, सहावार साडी, सिव्हलेस ब्लाऊज, त्यावर साडीपीन, चेह-यावर प्रचंड आत्मविश्वास असलेल्या या महिलेला बघून मला थोडं दडपण आलं.  पण आमची बातचीत सुरु झाली, आणि दडपण कुठल्याकुठे पळून गेलं.  मंत्रमुग्ध करणारा आवाज, कुणालाही


आपल्या जवळ खेचून घेईल, अशी प्रेमळ भाषा...त्या पहिल्या भेटीतच मला जाणवलं, डॉ. विंदा विद्याधर भुस्कुटे हे सर्वात आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे.  त्यावेळी मुलाखतीसाठी झालेली भेट ही नंतर आधारयुक्त मैत्रीमध्ये बदलली.   काही कार्यक्रमात विंदा मॅडम भेटायच्या, गप्पा व्हायच्या,  त्यांच्या नवनव्या कार्याची माहिती मिळायची आणि त्यांच्या कतृत्वाचा नव्यानं परिचय व्हायचा.  विंदाताईंचा परिचय होऊन आता पंचवीस वर्ष होऊन गेलीत,  पण त्या पहिल्या भेटीतल्या विंदा भुस्कुटेच आपण पुन्हा बघतो आहोत, हेच जाणवतं.  वयाच्या सत्तरीकडे प्रवास करत असलेलं हे डॅशिंग व्यक्तिमत्व चिरतरुण आहे.  कितीतरी आयाम या व्यक्तिमत्वाला आहेत. महिलांच्या प्रश्नासाठी काम करतांना त्या सर्वस्व झोकून देतात.  मैत्रिणींच्या गोतावळ्यात त्या असल्या की उत्साहाचे जणू झाडच होतात.  तरुणपिढीच्या गराड्यात असल्या की त्यांच्या चेह-यावर कोण आनंद असतो ते विचारु नका....आणि समोर जर बालगोपाळ असतील तर विंदाताई लगेच आजीच्या भुमिकेत जातात,  वात्सल्याचा भाव त्यांच्या चेह-यावर येणार आणि मग आजी नातवंडांचा संवाद किती वेळ रंगणार त्याला सीमा नाही. 

डॉ. विंदा विद्याधर भुस्कुटे यांचा नव्यानं परिचय मी करुन घेण्याचा प्रयत्न केला.  त्याला कारणही तसंच आहे.  2 ऑक्टोबरला विंदाताईंचा वाढदिवस साजरा झाला.  वयाच्या सत्तरीकडे वाटचाल करत असलेल्या विंदा भुस्कुटे यांच्यासाठी वाढदिवसाची तारीख म्हणजे, उत्सवाचा दिवस.  वाढदिवसाला आपल्या वयाच्या आकड्यामध्ये एक वर्षाची भर पडते.  पण विंदा भुस्कुटे यांच्या वयाच्या आकड्यामध्ये या दिवशी निश्चितच वजाबाकी होते.   कारण त्यांच्या कामाचा आवाका पाहिला तर तरुण खजिल होतील,  एवढा उत्साह त्यांच्याकडे आहे.  याच बद्दल मी विंदाताईंकडून जाणून घेतलं.  वयाची साठी

जवळ आली की वयापेक्षा मनानं निवृत्ती ओढवून घेणारी एक पिढी आहे.  आता काय साठी आली,  पाय दुखतात,  पाठ दुखतेय, थकवा येतोय...अशी


एक कारणांची यादी तयार असते.   पण विंदा मॅडमना भेटलं की जाणवतं वय हा शब्द बाजुला ठेवला की आयुष्याचा आनंद घेत, इतरांनाही आनंदी कसं ठेवता येतं.  

विंदा या मुळच्या औरंगाबदच्या कुलकर्णी कुटुंबातल्या.  अगदी सामान्य कुटुंब.  चार भावंडातल्या या थोरल्या लेकीला शिक्षणाची पहिल्यापासून गोडी होती.  पण घरची परिस्थिती बेताची.   तेव्हा शाळेची फी किती होती, अगदी पाच रुपये.  आता हा आकडा साधासा वाटत असला तरी विंदा यांना तोही मोठा होता.  पण सवलतीच्या अर्जानं ही फी बारा आणे झाली आणि विंदाला शाळेची द्वारे खुली झाली.  विंदा पहिल्यापासून धडाडीच्या स्वभावाच्या.   त्यांचा वक्तृत्वगुण ही दैवी देणगी.  शाळेतून या गुणाला अधिक झळाळी मिळाली.  पुढे स्काऊट-गाईडमुळे त्यांच्या व्यक्तिमत्वातील आणखी एक पैलू असलेला नेतृत्व गुण विकसीत झाला.  विंदा यांनी वडिल मधुकर कुलकर्णी यांच्याकडून समाजसेवेचा वारसा घेतला तर आई
मालतीकडून गाण्याचे अंग घेतले. 
1975 मध्ये विंदा कुलकर्णी या सौ. विंदा विद्याधर भुस्कुटे म्हणून डोंबिवलीत आल्या.  भुस्कुटे कुटुंब हे समाजसेवेत अग्रणी कुटुंब.  प्रगल्भ विचार असलेल्या या कुटुंबात विंदा यांना प्रवेश मिळाला तो एका अटीवरच.  ती म्हणजे, त्या त्यांचे सर्व शिक्षण पूर्ण करणार.  विंदा यांच्या संपूर्ण आयुष्यावर त्यांच्या सासूबाईंच्या विचारांचा खूप प्रभाव आहे.  सिंधुताई भुस्कुटे या त्यांच्या सासूबाई.  त्या नगरसेविका होत्या.  हैदराबाद मुक्तिसंग्रामातील त्या पहिल्या महिला सत्याग्रही.  विंदा यांचे आजेसासरे, विनायक महादेव भुस्कुटे हे मुळशी सत्याग्रहाचे मूळप्रवर्तक.  अशा भुस्कुटे घराण्यात विंदा आल्यावर त्यांच्याही व्यक्तिमत्वाला नवीन ओळख मिळायला सुरुवात झाली.  त्यांनी लग्नानंतर कला शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतले.  यासाठी मराठी, क्रीडा हे विषय होते.  त्यानंतर बीपीएड, एमपीएड झाले.  मराठी लेखिका कांदबरी आणि


स्त्रीवाद-1970 ते 2000 याविषयावर पीएचडीही केली.   हा सर्व शैक्षणिक प्रवास होत असतांना समाजसेवेचा त्यांना सासूबाईंकडून मिळालेला वारसाही त्यांनी जोपासला होता.  त्यांच्या सासूबाईंनी 1960 मध्ये स्थापन केलेल्या मातृमंदिरचे नियोजन त्या बघत आहेत.  संयुक्त महिला मंडळच्या माध्यमातून  गरजू महिलांना आसरा देऊन, त्यांना स्वावलंबी करण्याचे काम त्या करीत आहेत.  कोकणामधून आलेल्या आदिवासी मुलींसाठी निवारा उपलब्ध नव्हता, तो निवारा आणि त्यासह रोजगाराच्या संधी याचा मेळ घालत या मातृमंदिरची स्थापना करण्यात आली.  आता याच मातृमंदिरमध्ये डोंबिवलीतील महिलांसाठीचे एकमेव वस्तीगृह आहे.  येथे येणा-या महिलांना अत्यंत अल्प दरात सुरक्षित निवारा मिळतो,  त्यांचे मोफत काऊन्सिलींग करण्यात येते,  शिवाय वैद्यकीय सुविधा आणि गरज असले तर वकिली सल्लाही मोफत देण्यात येतो.  सोबतच या महिलांना रोजगाराची संधीही देण्यात येते. येथेच एक खेळणीघरही सुरु आहे.  शिवाय  ऑटीझमच्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग चालू आहेत.  या मातृमंदिरातील मुलींची विंदा या आपल्या मुलींप्रमाणे काळजी घेतात, यासाठी करोना काळातील अनुभव पुरेसा आहे.  लॉकडाऊन जाहीर झालं तेव्हा मातृमंदिरमध्ये 23 मुली होत्या.  लॉकडाऊनची घोषणा झाल्यावर विंदा मॅडम या मुलींबरोबर बोलल्या.  त्यावेळी त्यातील फक्त पाच मुलींनी आपल्या घरी जाण्यास होकार दिला.  बाकी 18 मुली मातृमंदिरातच राहिल्या.  या सर्वांना विंदामॅडमवर विश्वास होता.  त्यांनी तो सार्थ ठरवत या मुलींचा सांभाळ केला.  फक्त सांभाळ केला असे नाही तर त्यातील तीन मुलींची लग्नही लावून दिली.  गेल्या जवळपास 50 वर्षापासून विंदा भुस्कुटे हे शिक्षण क्षेत्रातील मोठं नाव आहे.  आठ वर्षे केरळ समाजाच्या, मॉडेल इंग्लिश शाळेत शिक्षिका म्हणून त्यांनी काम केले.  नंतर मॉडेल महाविद्यालय त्या प्राध्यापक होत्या.  आता आर्य गुरूकुल शाळेच्या त्या कम्पाईन्स हेड  म्हणून काम पाहत आहेत.  तर सेंट मेरी शाळेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ म्हणून काम पाहत आहेत.  याशिवाय विंदा भुस्कुटे या स्वतः उत्तम समुपदेशकत आहेत आणि रेकी हिल, निसर्गोपचार डॉक्टरही आहेत.  यासाठी आवश्यक ते शिक्षण त्यांनी घेतले आहे.  सतत कुठल्या ना कुठल्या विषयांचा अभ्यास आणि त्याची परीक्षा हा त्यांचा आवडता उपक्रम आहे.  बरं या सर्वातून वेळ काढत त्या महिलांचे प्रश्न

सोडवण्यासाठी सदैव तत्पर असतात.  किती महिलांचे  संसार त्यांनी उभे करुन दिलेत याची गणतीच नाही.  संसार उभा करतांना त्या बाईला, मानसिक स्वास्थासोबत आर्थिक स्वातंत्रही त्या मिळवून देतात.  डोंबिवली महिला महासंघाच्या त्या संस्थापक अध्यक्षा आहेत.  त्या मार्फत अनेक शाळांमधून त्यांची पॉस्को संदर्भात व्याख्याने होतात.  या सर्वातून वेळ मिळालच तर रिकाम्या बसतील या विंदा कुठल्या.  त्या स्वेटरही छान बनवतात.  आपल्या हातानं तयार केलेली 70 हून अधिक स्वेटर त्यांनी वाटली आहेत.  या सर्वात वेळ राहिल्यावर गाणं म्हणण्याचा उत्साहही त्यांच्याकडे आहे. 

मी अनेकवेळा विंदा यांना एखादी समस्या सोडवतांना पाहिले आहे.  पहिल्यांदा आपल्या समोर बसलेल्या महिलेचे सर्व म्हणणे शांतपणे ऐकूण घेणार, मग अगदी हळूवारपणे त्यावर एक-एक मार्ग सुचवणार.  अगदी पोलीस स्टेशन असो वा त्या महिलेच्या घरात जाऊन तिथे समजुतीच्या चार गोष्टी सांगणे असो.  कुठेही आरडाओरडा नाही की धमक्या नाही.  अगदी मुद्याचं बोलणं.  बरं मीच हे केलं, म्हणून मोठेपणाही नाही.  आपल्या पुढची पिढी तयार झाली पाहिजे यावर अधिक भर.  त्यामुळे तुम्ही करा, मी आहेच असा पाठिंबा त्यांचा कायम असतो. 

हे सर्व काम म्हणजे, बोलीभाषेत लष्कराच्या भाक-या भाजण्यासारखे आहे.  एवढं करुन या बाईला घरदार आहे की नाही, हा साधा प्रश्न पडला असेल.  विंदा आणि विद्याधर या दाम्पत्याला दोन मुलं आहेत.  विक्रांत आणि मृणाल.  मुलगा विक्रांत हा लंडनमध्ये ब्रिटीश पेट्रोलियममध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहे.  त्यांची सून भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल म्हणून कार्यरत होती.  शुभदा नाईक.  सर्विस पूर्ण झाल्यावर सिंगापूरला तिनं काही वर्ष काम केलं.  तिथे ड्रायव्हरलेस कारच्या निर्मितीमध्ये तिचा हातभाग होता.  आता


शुभदा लंडनमध्ये प्रिझन ऑफीसर आहे.  विंदा यांची लेक मृणाल ऑस्ट्रेलियामध्ये आहे.  तिथे एका सेमी गर्व्हमेंटतर्फे चालवण्यात येणा-या समाजसेवी संस्थेत ती काम करते.  यात समाजातील गरजूंना मदत करण्यात येते.  या कार्याबद्दल तिचा गौरवही करण्यात आला आहे.  विंदाताई हा तिनं आपल्या आईचा गुण घेतल्याचे कौतुकानं सांगतात.  त्यांचे जावईही याच समाजसेवी संस्थेत कार्यरत आहेत.  एकूण दोन्ही मुलं कतृत्वान आहेत.  आता आणखी एका महत्त्वाच्या व्यक्तिमत्वाची ओळख.  विद्याधर भुस्कुटे, विंदा भुस्कुटे यांचे पती.  विद्याधर भुस्कुटे खरं तर स्वतंत्र लिखाणाचा विषय होईल, एवढे व्यापक व्यक्तिमत्व.  समाजसेवेचा वारसा जपणारे विद्याधर नोकरीतून नावाला निवृत्त झाले आणि एका वेगळ्याच वेडानं पछाडले.  हे वेड म्हणजे, भारतभ्रमणाचे.  श्रीनगर ते कन्याकुमारी ही पदयात्रा केली.  त्यांचे  भ्रमणगाथा एका विद्याधराची, एक झापटलेला अशी पुस्तके प्रसिद्ध झाली.  त्यानंतर त्यांना जबरदस्त ब्रेन स्ट्रोक झाला.  यात विद्याधर स्वतःची ओळख विसरले.  आपली पत्नी विंदा हिलाही ते विसरले.  आपला नवरा आपल्याला ओळखत नाही, हा कुठल्याही पत्नीला मोठा धक्का आहे.  पण विंदा या जिद्दी.  कुठलिही गोष्ट त्या सहज स्विकारतात आणि त्यातून पार पडण्यासाठी कामाला लागतात.   तसेच त्यांनी हे आजारपण घेतले.  आपल्या पतीला प्रत्येकवेळी, विद्याधर, मी विंदा, तुझी बायको अशी ओळख सांगताना त्यांच्या मनाची किती घालमेल झाली असेल.  पण यावर मात करत त्या खंबीरपणे विद्याधर यांच्या मागे उभ्या राहिल्या.  आपल्या चेह-यावर त्यांनी कधी ही वेदना येऊ दिली नाही.  विद्याधर या आजारपणातून बाहेर आले आणि पुन्हा भारतभ्रमणाची तयारी करु लागले.  तेव्हा विंदाताईंनी त्यांच्याकडून आधी एक पुस्तक लिहून घेतले.  ते म्हणजे, रिबर्थ ऑफ ब्रेन...सोळा पावलांचा प्रवास.  मग तिस-या भारतभ्रमण पदयात्रेत विद्याधर यांनी पोरबंदर ते कन्याकुमारी.  कन्याकुमारी ते पश्चिम बंगाल, शांतीनिकेतन असा समुद्रकिनारा पालथा घातला.  या अनुभवावर त्यांचे किनारा तुला पामराला हे पुस्तक प्रसिद्ध झाले.  या सर्व भारतभ्रमण दरम्यान विद्याधर यांच्यामागे विंदा यांचा किती मोठा पाठिंबा होता, याची जाणीव होते.  ब्रेनस्ट्रोक झालेला नवरा भारतभ्रमण करत काही महिने फिरणार हे ऐकल्यावर कुठलिही पत्नी खरंतर पहिल्यांदा नकारघंटा वाजवेल.  अकांडतांडव करेल.  पण विंदा यांच्याकडे सकारात्मक विचारांचा खजिना आहे.  त्याच सकारात्मकतेतूनच त्यांनी विद्याधर यांचे तिसरे भारतभ्रमणही यशस्वी केले.   आता हेच विद्याधर नावाचे वादळ नव्या आव्हानाला तोंड देत असतांना विंदा एखाद्या भक्कम भिंतीसारख्या त्यांच्या मागे आहेत. 

दिवसाचे विंदाताई किती तास काम करतात हा प्रश्न कधी विचारण्याचे धाडस मी केले नाही.  कारण शाळा, नंतर व्याख्याने, महिला मंडलाचे कार्यक्रम, साहित्यसेवा या सर्वात त्या व्यस्त असतात.  आता ही जी ओळख त्यांची करुन दिली आहेत, त्यातीलही अनेक मुद्दे राहिले आहेत, एवढं व्यापक त्यांचं काम आहे.  ही सतत व्यस्त रहाण्याची सवयच विंदाताईंची ताकद आहे.  जितकं तुम्ही चांगलं काम कराल तेवढं तुम्हाला यश मिळेल, हा साधासा पण


अर्थपूर्ण मंत्र त्या जपतात.  आपल्या चांगल्या कामाची नोंद कुठेना कुठे होत जाते.  तेच आशीर्वाद तुमच्या खात्यात जमा होतात, त्यातील उर्जा ही मग कायम पाठिशी उभी रहाते, हे त्यांचे अनुभवी बोल आहेत.  आपलं ज्या घरामध्ये लग्न झालं, त्या घराची सामाजिक बांधिलकी पुढे चालवणं ही जबाबदारी नाही, तर ते आपलं प्रथम कर्तव्य असल्याचे त्या मानतात.  या सर्वामुळेच विंदाताईंना मी विद्यापीठ मानते.  ज्ञानाचे, समाजसेवेचे....दातृत्वाचे आणि मातृत्वाचेही.  आईचा पदर डोक्यावर असला तर साधंसं उन काय पण अख्खं वाळवंट कधी पार होतं हे कळत नाही, तसाच हा विंदाताईंचा आधार आहे.

 

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

Comments

  1. Mastach.... aamhala marathi shikavayla hotya model college la.....

    ReplyDelete
  2. Rajeshree kulkarni5 October 2024 at 16:13

    Kuoop मस्त, खरच एक मुक्त विद्यापीठ ,
    प्रेमळ ,प्रसन्न, व प्रत्येकाने एकदा तरी भेट घ्यावी.

    ReplyDelete
  3. सई बने लिखीत 'विंदा नावाचे विद्यापीठ' ब्लोग वाचला . विंदा यांनी समाजकार्यात धडाडीने घेतलेले पाऊल ...याचे यथार्थ चित्रण बने यांच्या लेखात दिसले ,मी जवळून विंदा यांना अनुभवले आहे 🙏

    ReplyDelete
  4. खुप च छान , वाचताना च मन भारावून जाते .वृंदा ताईंना शतशः प्रणाम

    ReplyDelete
  5. खूपच छान व्यक्तिचित्रंण विंदाताईंचं !!

    ReplyDelete
  6. बिंदा जशी आहेस तशीच तुझं व्यक्तिचित्र रंगवले आमची मैत्रीण म्हणून आम्हाला तुझा खूप अभिमान आहे

    ReplyDelete
  7. khup chhan lekh

    ReplyDelete
  8. विंदा मॅडम यांचे व्यक्तिमत्त्व लेखनातून छान प्रतिबिंबीत केले आहे.उत्तम लेख

    ReplyDelete
  9. किती वेगवेगळी स्फूर्ति रायक चरित्रांची ओळख करून देतेस सई तू

    ReplyDelete
  10. विंदा वहिनी तुमच्या कार्याला आणि तुमच्या उत्साहाला माझे शतशः नमन असं तुमची प्रगती होत राहो आणि असेच तुमच्या हातून चांगले चांगले काम होत राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना

    ReplyDelete

Post a Comment