पितळेच्या भांड्यांचे युग
हे काय...आधी होत घरात ते विकलं चिंचोक्यांच्या दरानं....आता त्या पैशात चमचा तरी येतोय काय बघ तांब्याचा...आम्ही सांगत होतो तेव्हा नाही समजलं....असं ठसक्यात बोललेलं वाक्य ऐकू आलं आणि मी माझ्या हातातील पितळेचा टोप खाली ठेवला. ठाण्याच्या एका भांड्यांच्या दुकानात आम्ही गेलो होतो. नव-याचा आग्रह, घरातील जेवणाची भांडी पितळेची हवी, म्हणून ती भांडी मिळतात, त्या दुकानात गेलो होतो. दुकान भांड्यांनी काठोकाठ भरलेलं. सोबत त्यांच्या खरेदीसाठी गर्दीही तेवढीच झालेली. त्याच गर्दीत एका टेबलावर आजी बसल्या होत्या, हातात पितळेचा टोप होता, तो गरगर फिरवत त्यावर हात फिरवत आपल्या समोर उभ्या असलेल्या महिलेला त्या जाब विचारत होत्या. त्या बाईच्या हातातही एक टोप होता, त्या दोघींच्या मध्ये एक तरुण मुलगी लुडबूड करीत होती. त्या आजींची ती नात होती बहुधा, आजी तिला काही काही सांगत होत्या. त्याचवेळी आजींच्या बाजुला जागा झाली, आणि त्या विक्रेत्यानं आम्हाला तिथे बोलावलं. आता त्या आजींच्या सोबत गप्पा मारायची संधी मला मिळाली होती, आणि ती मी अजिबात वाया घालवणार नव्हते.
नवरात्रीच्या दिवसात ठाण्याला देवीचे दर्शन करायला गेले. तिथे जाण्याचे
आणखी एक कारण म्हणजे, भांड्यांची खरदी. घरात भांड्यांनी माळा भरलाय. अगदी पंचवीस वर्षापूर्वी लग्नाच्या आहेरात मिळालेली भांडीही अजून तशीच आहेत. पण तरीही नवीन भांडी घ्यायची होती. आणि हा आग्रह माझा नाही, तर माझ्या नव-याचा होता. स्वयपांक करण्यात माझा जसा हातखंडा तसा स्वयंपाक घरात कुठली भांडी वापरावीत यासाठी त्याचा अभ्यास जोरदार आहे. गेल्या काही वर्षापासून याच अभ्यासातून त्यांनी घरातील सर्व अॅल्यूमिनियमची भांडी मोडीत काढायला लावली. त्यानंतर घरात स्टेनलेस स्टीलची लकाकी आली. अगदी घरातले खाऊचे प्लॅस्टिकचे डबे गेले. दळनाचे डबेही बदलले. सगळीकडे स्टेनलेस स्टील आले. जेवण करण्यासाठीची सगळी भांडी कॉपर बेस असलेली स्टीलची आली. आता तो टप्पा पार झाल्यावर त्याला नवा शोध लागला आणि गाडी पितळेच्या भांड्यांकडे वळली. घरात नेहमीचा स्वयंपाक या पितळेच्या भांड्यात व्हायला पाहिजे, असा त्याचा आग्रह सुरु झाला. याच भांड्यांच्या खरेदीसाठी ठाणे गाठले होते. नवरात्रीमध्ये देवीचे दर्शन झाले आणि त्या देवीच्या मंदिरासमोरील भांड्यांच्या गल्लीतील मोठ्या दुकानात आम्ही आलो, तिथलाच हा संवाद. त्या आजींबरोबर बोलायला मी पुढे झाले पण त्यांचा माझ्याआधी नव-यानं ताबा घेतला.
आजी, त्यांची सून आणि नातही अशाच पितळेच्या भांड्यांच्या खरेदीसाठी आलेल्या. आजींच्या घरी आधी हे पितळेचे बरेच टोप होते. पण ते फार जड, शिवाय त्यांची स्वच्छता हा मोठा विषय. नव्या स्वयंपाकघरात या टोपांना जागाच मिळत नव्हती. पितळेच्या टोपांची सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, त्यांची कलई. ठराविक काळानंतर या टोपांना कलई करावी लागते. हे कलईवाले कुठे गायब झाले. मग ते टोप तसेच पडून राहिले. असेच पडून
कशाला ठेवायचे, जागा अडते, त्यांच्याऐवजी नवी भांडी घेऊया. इंडक्शनमध्येही ही नवीच भांडी लागतात की, मग काय, हो ना हो करता जुने टोप मोडीत निघाले. मोडीत म्हणजे कच-याच्या भावातच विकले गेले. त्याच्या आलेल्या पैशात अजून भर घालत सपाट तळाचे चकाकत्या स्टिलचे टोप घरात आले. वजनानं जरा कमी, आकार आकर्षक आणि घासायला फार त्रास न देणारे. या स्टिलच्या चकाकीपुढे पितळ अधिक पिवळं झालं आणि सर्व घर त्या चकाकीखाली आलं.
दुकानात त्या आजी असंच काहीसं बोलत होत्या. जुनी, अगदी जड जड पितळेची भांडी चण्या-फुटाण्याच्या दरात विकल्याचं दुःख त्यांना अधिक होतं. मध्येच त्या सुनेला बोल लावीत होत्या. तर मध्येच मी पण सांगितलं हो, ती जड भांडी उचलायला त्रास होऊ लागला. मग ती विकायला काढली. तेव्हा किती पैसे हातात आले, आणि आत्ता बघा, त्या पैशात साधा पेलापण येणार नाही. आजी अजूनही हातांनी ती पितळेची भांडी तपासून बघत होत्या. आजी आणि त्यांच्या सुनेनं चार पितळेचे टोप आणि त्यावरची झाकणं घेतली. आमच्याही घरात दोन टोप आले. आम्ही आजींकडूनच त्याची पारख करुन दिली. आजींनी मग टोपांवर असलेल्या ठोक्यांचे महत्त्व सांगितले. अगदी मंद आचेवर पदार्थ छान तयार होतो, तो या टोपात कधी करपत नाही, ही जादू या ठोक्यांमुळे होते हे सांगितलं. त्यानंतरचा आणखी एक साजेसा सोहळा म्हणजे, त्या भांड्यांवर नाव घालणे, इथे आजीनं सुनेला तुझं नाव टाक म्हणून आग्रह धरला. तिनं नकार दिला तेव्हा आजीनं स्वतःहून सुनेचं नाव कागदावर लिहून दिलं. बरं ही पितळेची भांडी विकत घेतली की झालं असं नाही, त्यांचा मुख्य प्रश्न येतो, तो त्यांना कलई लावतात तेव्हा. पण दुकानदार शहाणा झाला होता. त्या दुकानात कलई लावायची असेल तेव्हा फोन करायचा, मग तो दुकानदार असे दहा फोन आले की त्या सर्वजणींना भांडी घेऊन यायचा एक दिवस ठरवून देतो. म्हणजे, कलईचा प्रश्नही मार्गी निघाला होता.
पितळेची भांडी वजनानं भारी, त्या आजी, त्यांची सून आणि नात असा
तिघींमध्ये मग त्या टोपांची वाटणी झाली. खरंतर
नातीनंच सगळं ओझं न कुरकुर करता पकडलं. आईनं
झाकणांची पिशवी पकडली. तरीही आजी पुढे
होत्या, राहूदे दे माझ्या हातात. नाही जड
होत फार...असं म्हणून ती पिशवी त्यांनी त्यांच्या हातात ओढूनच घेतली. आम्ही एकमेकांना नमस्कार करत निरोप घेतला. आजीनं जाताजाता अजून एक संदेश दिला. त्या टोपांना आधी देवापुढे ठेव, पुजा कर आणि मग
काहीतरी कर. पहिला पदार्थ गोडाचा कर
हो...म्हणून आजींनी टाटा केला. त्यांच्या
चेह-यावर अनोखा आनंद होता. आपली हरवलेली आवडती
वस्तू आपसूक समोर आल्यावर जसा आनंद असतो, तसाच आनंद त्यांच्या चेह-यावर होता. बाजारात गर्दी होती, त्या गर्दीतही आजी झपाझप
चालत होत्या. कारण त्यांच्या हातात तशीच
हरवलेली वस्तू होती. ती सापडल्याचा आणि
आता ती कामय जवळ राहणार असल्याचा आनंद त्या साजरा करणार होत्या...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
खूपच छान !!
ReplyDeleteखुप छान लेख आहे.
ReplyDelete