ती...ती....बाई आहे
दस-याची खरेदी जोरात चालू होती. मी एका मैत्रिणीला पकडून बाजारात गेले होते. आम्ही दोघी मुद्दाम भर दुपारी बाहेर पडलो. थोडी गर्दी कमी असेल अशी आशा होती, पण आमच्यासारखाच अनेकांनी दुपारचा मुहूर्त काढलेला. मग काय, त्या गर्दीत सामावून आम्ही दोघीही खरेदीच्या मागे लागलो. गोंड्यांच्या फुलांनी बाजार फुलला होता. दारावरची तोरणं, देव्हा-याचा हार, गाडीचा हार...अशी सामानाची यादी होती. यादीप्रमाणे खरेदी करेपर्यंत कधी दोन तास गेले हे कळलंही नाही. दोन मैत्रिणी सोबत असल्याकी खरेदी सोबत खाऊगिरी जास्त होते. तशीच तयारी आमची सुरु झाली. दोघींकडे दोन-दोन सामानाच्या पिशव्या झाल्या होत्या. त्या सांभाळत आसपास हॉटेल कुठे आहे, त्याचा शोध सुरु केला. एक हॉटेल दिसलं, नेहमीचं नव्हतं. चल, चव बघूया म्हणून दोघीजणी त्या हॉटेलमध्ये गेलो. कॉफी, नाष्टा आरामात झालं, त्यात तासभर गेला. मग घरी जाण्यापूर्वी यादी तपासून झाली, तर मैत्रिणीच्या दोन वस्तू घ्यायच्या राहिल्या होत्या. आता पुन्हा तासभर त्यामागे जाणार होता. हॉटेलमधून बाहेर पडण्याआधी वॉशरुम वापरुया म्हणून आम्ही हॉटेलच्या मॅनेजरकडे त्याची चौकशी केली. त्यानं वॉशरुम कुठे आहेत, हे दाखवले. हॉटेलच्या बाहेरच्या जागेवर असलेले हे वॉशरुम थोडे अडगळीच्या जागेवर होते. त्यामुळे आम्ही दोघीही साशंक झालो. वॉशरुम जिथे होता, तिथूनच आणखी एक दरवाजा हॉटेलमधून बाहेर पडण्यासाठी होता. त्या
दरवाज्याजवळ एक महिला उभी होती, आम्ही दोघीही त्या वॉशरुमचा वापर करायचा की नाही, यावर विचार करत असतांना त्या बाईला बघितलं. तिनं बहुधा तो वॉशरुम वापरलं असावं म्हणून आम्ही तिच्याकडे चौकशी करायला गेलो, वॉशरुम निट आहे ना...एवढं वाक्यच बाहेर पडायची खोटी, मागून एक आवाज आला, ओ मॅडम...त्या बाई नाहीत...ती....ती...बाई आहे...क्षणभर काही समजेना...आम्ही दोघीही बावचळलो...गोंधळलो. दोघीही एकमेकींकडे बघत राहिलो. एकदा त्या बाईकडे आणि एकदा हॉटेलच्या स्टाफकडे बघत होतो. आमचा गोंधळ बघून एक वयोवृद्ध वेटर समोर आला. त्यांनी आम्हाला वॉशरुम कुठे आहे, हे पुन्हा सांगितले. तोपर्यंत ती महिला त्या दुस-या दाराच्या अगदी बाहेर जाऊन उभी राहिली. आम्ही दोघीही वॉशरुम विसरलो, आणि हॉटेलचे बिल द्यायला गेलो. बिल देतांना तो मॅनेजर म्हणाला, अरे मॅडम सॉरी...ती जरा वेगळी बाई आहे...काय करायचं...ऐकतच नाहीत या बायका...तुम्ही हॉटेलबद्दल मत वाईट करुन घेऊ नका...सॉरी...
आम्ही दोघीही त्या हॉटेलच्या बाहेर पडलो. असलेला सगळा उत्साह कुठल्या कुठे गेला होता. बाहेर पडतांना नकळत दोघींनी मागे वळून बघितलं. ती अजून तिथेच उभी होती. कुठेतरी शून्यात बघत होती. साडी घातली होती, पदर खांद्यावरुन खाली होता. आम्ही जेव्हा तिच्याकडे बघितलं तेव्हाच तिनंही आमच्याकडे बघितलं. तिच्या चेह-यावर हलकंसं हसू आलं, आणि तिनं पुन्हा आपली नजर फिरवली. ती अगदी शून्यात बघत होती. समोर बाजार भरला होता. सणाची खरेदी. सर्वांचीच खरेदीची धावपळ चालू होती. प्रत्येकाच्या हातात फुलांच्या, हारांच्या पिशव्या होत्या. आपट्याच्या पानांची जुडी पिशवीतून डोकावत होती. समोरच्या रस्त्यावर अगदी एका रांगेत झेंडूच्या फुलांच्या माळा विकणा-यांची गर्दी होती. प्रत्येकजण आपापल्या नादात होते. त्या सर्वांकडे ती बघत होती. पण तिची नजर त्या पलिकडे काहीतरी बघत होती. आम्ही दोघींनी पुन्हा एकदा तिच्याकडे बघितले आणि आमच्या मनातील अपराधी मनाची भावना जागी झाली. अगदी साधी घटना होती. वॉशरुमची चौकशी करायला काय गेलो, आणि मागून एका माणसांनं...किंवा माणसातल्या पुरुषानं, तिच्या बाईपणाची व्याख्याच बदलली
होती.
ती बाई होती....पण ती, ती....बाई होती. म्हणजे, सर्वसामान्यांमध्ये तिची गणना
नाही. ती...बाई...हा शब्द तोंडातून
काढतांना मला त्या माणसाचा चेहरा आठवला.
किळसवाणे भाव त्याच्या चेह-यावर होते.
ते भाव झेलत ती कुठलंही उत्तर न देता, गपचूप बाहेर जाऊन उभी राहिली
होती. तिच्यासाठी बहुधा ती रोजचीच घटना
होती. आपल्या, आपल्या कुटुंबाच्या गरजा
पूर्ण करण्यासाठी तिच्यासाठी शरीराचा व्यापार करायची वेळ आली होती. ती बाई होती....फक्त त्या वेळेसाठी...बाकी
तिच्या बाईपणावरच बाई नसल्याचा शिक्का मारला होता....कोणी...ज्यांनी तिच्या
बाईपणाचा फायदा घेतला होता त्यांनी.
आम्ही दोघी मैत्रिणींचा बाकीची खरेदी करायचा मूड पार गेला होता. त्या बाईला, आमच्यामुळे बोल पडले, हे शल्य मनाला लागलं होतं. तिच्यासाठी ते नेहमीचं असावं, पण आम्ही दोघीही चांगल्याच खजिल झालं होतो. त्याच हॉटेलच्या बाहेरुन रिक्षा केली. सामानाच्या पिशव्या आत ठेवल्या. रिक्षा नेमकी हॉटेलला फेरी मारुन परत तिथे उभी राहिली. सर्व रस्ता फुलून गेला होता. त्यामुळे ट्रॅफीक जाम झालं होतं. नेमकी ती महिला उभी होती, त्या
समोरच रिक्षा उभी राहिली. आम्ही पुन्हा तिच्याकडे बघितलं. तिनंही तेव्हा बघितलं. पण आता तिचे डोळे दगडासारखे झाले होते. मगाशी ती आमच्याशी काही सेकंद हसली तरी होती, पण आता तिचा अख्खा चेहराच दगड झाल्यासारखा होता. ती पुन्हा शुन्यात बघू लागली. तिच्यासाठी सणाची व्याख्या वेगळी होती. समोरचा बाजार भरलेला होता. पण तो तिच्यासाठी नव्हता. ट्रॅफीकमधून वाट काढत आमचा रिक्षावाला पुढे झाला. आम्ही दोघी मैत्रिणी एरवी किती बडबड करतो, ते आम्हालाच माहित. पण या घटनेनं बसलेला धक्का मोठा होता. आपण बहुधा आभासी जगात वावरतो. वास्तविक जगातील दाहकता ही अशी कधीतरी समोर आली की मग शब्द संपतात...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
खरंच दाहक वासत्व समोर आल
ReplyDeleteKhup chan 👍
ReplyDeleteसमाजात अजून किती दाहक वास्तव आहे. वेगळे काही
ReplyDeleteजीवनातले एक दाहक वास्तव छान शब्दबद्ध केले आहेत.
ReplyDeleteसौ. मृदुला राजे
khup chhan lekh
ReplyDeleteThis is the reality in our society,Eye opening article. We should extend our helping hands to such downtrodden people.
ReplyDeleteअगदी खरं आहे खूप छान लेख.
ReplyDelete