सरताज

 

सरताज


ताई, आठवडाभार कडीपत्ता मागू नका,  मिळणार नाही.  असं रोखठोक सांगणा-या त्या भाजीवाल्याकडे मी एक क्षण बघतच राहिले.  अहो फुकट नको, दहा रुपयांचा द्या, असं माझं उत्तर मी त्याला देत असतांनाच त्याचं त्याचं पुढचं वाक्य तयार होतं.  ताई, अहो दिवाळी आलीय.  दिवाळीत या कडीपत्त्यालाच चांगला भाव येतो.  याच्याशिवाय तुमचा चिवडा होणार नाही.  वीस-पंचवीस रुपयांत चार-पाच काड्या मिळतील, हवा की नको...म्हणून त्यानं माझ्यासमोर कडीपत्त्यांची एक छोटी जुडी धरली.  अडला हरी...म्हणून त्याला अधिकचे पैसे दिले आणि ती कडीपत्त्याच्या पानांची जुडी पिशवीत घातली.  एरवी, आलं, कोथिंबीर, मिरची सोबत कुठलिही किंमत न देता निमुटपणे येणा-या कडीपत्त्याला आता कोण मान आला होता.  दिवाळीत सर्वाधिक आवडीचा पदार्थ म्हणजे, चिवडाच.  मग तो पोह्यांचा करा, कुरमु-यांचा करा की त्या मोठ्या मक्यांच्या लाह्यांचा.  या सर्व चिवड्यांची चव परफेक्ट हवी तर त्याला मुठभर कडीपत्त्याच्या पानांची फोडणी पडावीच लागते.  मी माझ्या कडीपत्त्याच्या पानांकडे पुन्हा प्रेमानं बघितलं. या पानांमध्ये कसाबसा चिवडा होणार होता.  मग रोजच्या जेवणात काय घालायचं,  हा विचार आला आणि पुन्हा त्या विक्रेत्याकडे गेले.  निमुटपणे पंचवीस रुपये काढून त्याच्या हातात दिले.  तो हसला आणि त्यानं यावेळी जरा उदारपणे आणखी एक काडी कडीपत्त्याची वाढवली आणि मी जणू खजिना मिळालाय, या आनंदात मग बाजार फिरु लागले. 


कडीपत्ता घेतांना मी नेहमी भरभरुन खरेदी करते.  एकदा ते बघून एका महिलेनं, येवढ्या कडीपत्त्याचं काय करता असा प्रश्न विचारला होता.  चिवडा करणार का,  रोजच्या जेवणासाठी एवढा कडीपत्ता कशाला लागतो,  हा तिचा प्रश्न होता.  मिरची, कोथिंबीर, आलं या मसाल्यासोबत मिळतो, तेवढा पुरतो आम्हाला आठवडाभर,  मग तुम्ही कशात एवढा कडीपत्ता घातला, म्हणून तिनं माझी चौकशी सुरु केली होती.   तिला काय सांगायचं,   आमची चव जरा वेगळीच आहे.  एकवेळ मिरची नसेल तर चालेल, पण कडीपत्ता भरभरुन लागतो.  कारण आमच्या दिवसाची सुरुवातच या कडीपत्त्यापासून होते.  पहिल्यांदा कडीपत्ता घरी गेला, की त्याची पानं छान काडीपासून वेगळी करायची.  मग त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं.  एका कापडावर मग त्यांना आराम करायला ठेवायचं.  ही पानं छान कोरडी झाली, की नेहमीच्या बरणीत भरुन त्यांची रवानगी फ्रिजमध्ये करायची.  साधारण पंधरा दिवस तरी ही कडीपत्त्याची पानं अशीच हिरवीगार रहातात.  अर्थात तोपर्यंत ती राहिली तर.  कारण सकाळी उठल्यावर आधी फ्रिजमधील ती कडीपत्त्याची बरणी काढायची आणि पाच बोटांच्या चिमटीमध्ये येतील तेवढी पानं काढून तोंडात टाकायची.  मग योगा सुरु करेपर्यंतची सर्व कामं संपेपर्यंत हा कडीपत्त्याचा स्वाद तोंडात असतो.  साधारण दोन वर्षापासून ही कडीपत्याची गोडी लागली.  कुणीतरी केस छान काळेभोर रहाण्यासाठी सकाळी उठल्यावर कडीपत्ता खा, असा सल्ला दिला होता.  सुरुवातीला सकाळी सकाळी कडीपत्ता खायला कंटाळा यायचा.  पण नंतर ही चव आम्हा दोघांनाही आवडली.  अर्थातच ज्यासाठी हा उपाय सुरु

केला, ते केसही छान झाले आहेत. 

कडीपत्त्याच्या या गुणांची थोडीफार ओळख होतीच, त्यामुळे आमच्याकडे जेवणात कडीपत्ता वापरला जातो, तो कधी पानाच्या बाहेर काढताच येणार नाही, याची मी पुरेपूर काळजी घेते.  म्हणजेच फोडणीला कडीपत्त्याची पानं कधीही अख्खी टाकतच नाही.  ती पार बारीक करुन, भाजी, आमटी, पोहे, उपमा, सांबार अशी ज्या ज्या पदार्थांमध्ये कडीपत्याची फोडणी होते त्यात ही अगदी बारीक केलेली कडीपत्याची पानं टाकते.  एवढे बारीक तुकडे काढायची हिम्मत मात्र कोणी करत नाही.  माझी ही युक्ती लक्षात आल्यावर सुरुवातीला लेकानं नाक मुरडून झालं होतं, पण त्याकडे सोयीस्कररित्या मी दुर्लक्ष केलं, त्याचा परिणाम आता आमच्याकडे रोजच्या जेवणात मुठभर तरी कडीपत्ता असतोच आणि तो सर्व पोटातही जातो. 

बरं एवढ्यावरच त्या कडीपत्त्याचं राज्य असतं, असं नाही.  दोन-चार दिवसांनी होणा-या चटणीमध्ये या कडीपत्त्याची चलती असते.  काहीवेळा कडीपत्ता नको तेवढा मिळतो, मग त्या कडीपत्त्याच्या पानांची नुसती चटणी तयार होते.  नेहमीप्रमाणे कडीपत्त्याची पानं सुकवून झाली की तव्यावर किंवा कढईमध्ये अगदी थोड्या तेलावर परतून घ्यायची.  मग या कुरकुरीत झालेल्या कडीपत्त्यात चण्याच्या डाळ्या आणि काळीमिरी घालायची.  नावाला मिठ. झाली चटणी तयार.  काहीवेळा यात लसूण, सुकं खोबरं टाकता येते.  मी एकदाच हा प्रयोग केला होता.  मला त्यात कडीपत्त्यापेक्षा लसूण आणि खोब-याची चव अधिक लागली.  म्हणून  नुसती कडीपत्ता, डाळी आणि काळीमिरी या जिन्नसांमध्ये मी समाधानी असते. 


अजूनही एका खास कामासाठी आमच्याघरी भरपूर कडीपत्ता येतो, ते म्हणजे, माझं खास तेल.  गेल्या काही वर्षापासून हा तेलाचा प्रयोग चालू केला, आणि त्याचा खरोखर फायदा मला झाला.  नेहमीच्या खोबरेल तेलामध्ये भरपूर कडीपत्ता, छोटा कांदा, मेथीचे दाणे, जास्वंदीची फुले आणि कोरफड घालून चांगलं तेल तयार करते.  आवळ्याची सिझन असेल तर या तेलामध्ये आवळाही घालते.  हे तेल हळूवार गॅसवर तयार करायला ठेवायचे.  तेल तयार होत आले की, त्याचा मंद सुवास घरभर पसरतो.  हा सुगंध कडीपत्याचा असतो, असे तेल तयार झाले की ते गाळून एका काचेच्या बाटलीत भरुन ठेवायचे.  या तेलाच्या मसाजनं केसांना चांगला फायदा होतो.  पण हे तेल खूप घट्ट होते.  यामुळे सहजासहजी केस कोरडे होत नाहीत, हे लक्षात ठेवायला लागते.  एकूण काय माझ्या स्वयंपाक घरातील सरताज कोण असेल तर तो कडीपत्ताच आहे.  आत्ता ही दिवाळी झाली आणि थंडीची चाहूल लागली की या कडीपत्त्याचे पुन्हा राज्य येईल, मग सकाळ संध्याकाळ त्याच्या फोडण्यांचा सुगंध घरात ठाण मांडून राहील. 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

Comments

  1. मलाही भरपूर कडीपत्ता कोथिंबीर लागते एक वेळ लसूण नसेल तरी चालेल. आमच्याकडेही कोणी कडी पत्ता बाहेर काढून फेकत नाही. माझ्या घरातच कढीपत्ता लावलेला आहे त्यामुळे केव्हाही काढून फोडणीत घालता येतो

    ReplyDelete
  2. खूप छान विषय,मलाही जेवणातील बऱ्याच पदार्थांमध्ये कढीपत्ता घालायला आवडतो.त्यामुळे चवही सुंदर येते.

    ReplyDelete
  3. खूप छान

    ReplyDelete
  4. विषय चांगला आहे,कडपत्यासाठी बाजारात जायची काही गरज नाही,रोज ताजा कडीपत्ता आपल्या घराच्या अंग वर फोटो पाठवतोणात किवा कुंडोत कडीपत्याचे रोप लावा,रोज ताजा हवा तेवढा कडीपत्ता काढायचा आणि वापरायचा,आमच्या गावच्या घरीपाच/सहा फूट उंचीचे झाडच आहेहवा तेवडा कडीपत्ता वापरा. वसईत कुंडीत रो लावले आहे.कडीपत्ता विकत आणायला लागत नाही.उद्दा whatsapp

    ReplyDelete

Post a Comment