संस्कृतीची कैची
माझ्या हातात लाडवांचा डबा होता, तो तसाच पकडून मी अर्धातास बसले होते. समोरच्या दोघींमधली जुगलबंदी निमुट ऐकत होते. ते एक शितयुद्धच होतं. एकदा सासू बोलायची, मग त्याला हळूच सून उत्तर द्यायची. पुन्हा सासू. मग सून. अर्धातास हे शितयुद्ध ऐकल्यावर मला समजलं की यातून काहीही साध्य होणार नाही. मुळात मी तिसरा पक्ष. माझं काहीही चालणार नाही, आणि माझ्या मतालाही काहीही किंमत नाही. मग फक्त ऐकून कशाला घ्यायचं, असा विचार करुन मी लाडवांचा डबा पुढे केला. तुमचं तुम्ही ठरवा, हे लाडू घ्या. आवडले आणि जागा असेल तर नक्की घेऊन जा. त्यासरशी दोघीही भानावर आल्या. अग थांब म्हणून मागे लागल्या. दोघींही अर्जव करु लागल्या. आणि मला आणखी तासभरासाठी बसवून घेतलं. पण त्या पहिल्या पाचमिनिटांत सर्व शांत होतं, पण त्यानंतर पुन्हा पहिले पाढे पचावन्न....दोघीही एकमेकींची बाजू सांगत कुरघोडी करु लागल्या. मीच बरोबर...हा दोघींचाही ठेका. शेवटी सासूची इमोशनल इनिंग आणि सुनेची आक्रमकता. या चक्राला कुठेही अंत नाही, याची जाणीव मला झाली, आणि आता उशीर होतोय, मी येते म्हणून त्या दोघींचा निरोप घेतला. सून गळ्यात पडली. काळजी घ्या, आईंवर लक्ष ठेवा. म्हणू लागली. तर सासूबाई पाठिमागून येत तिनं काय ठेका घेतलाय, माझा, तिला बरीच कामं असतात...म्हणून पुन्हा सुनेवर वार करुन गेल्या. शेवटी मी त्या घरातून निघाले. पण डोक्यात नको तेवढे प्रश्न घेऊनच.
माझ्या नाशिकच्या मित्रमैत्रिणी परिवारातील एक मैत्रिण लग्न होऊन आमच्याच भागात आली. बरोबर पंधरा वर्षापूर्वी शितल लग्न होऊन माझ्या बाजुला रहायला आल्याचा मला कोण आनंद झाला होता. शितलच्या सासरच्या मंडळींबरोबरही लगेच मैत्री झाली. पण अवघ्या महिनाभरातच शितल आणि तिच्या नवरा प्रकाश हे अमेरिकेत जाणार असल्याचं कळलं. प्रकाशला ऑफीसमधून प्रमोशनवर अमेरिकेला पाठवत होते. सोबत शितलही जाणार होती. स्वतः शितल, संगणक पदवीधर. त्यामुळे तिलाही तिथे नोकरीची संधी होती. दोघांची तयारी सुरु झाली, तेव्हा प्रकाशच्या आईनं पहिल्यांदा रोखलं होतं. प्रकाशचं लग्न होणार म्हणून त्याच्या वडिलांनी तीन रुम असलेला मोठा ब्लॉक खरेदी केला होता. शितलच्या आवडीप्रमाणे तो सजवून झाला होता. प्रकाशचे वडिल निवृत्त असले तरी त्यांना पेन्शन होती. नाशिकलाच त्यांची बरीच जमिन होती, तिथे एक घरही होते. खाऊन पिऊन सुखी अशी या घराची व्याख्या होती. त्यामुळे प्रकाशनं प्रमोशन न घेता इथेच रहावं, असं त्याच्या आईचं म्हणणं होतं. पण तेव्हा प्रकाश आणि त्याच्या वडिलांनी वेगळी भूमिका मांडली. आत्ताच लग्न झालं आहे, जग बघुदे, नंतर तो आपल्याजवळ परत येईलच, म्हणून वडिलांनी आपल्या बायकोची समजूत काढली. प्रकाशनंही अगदी पाच वर्षांनी मी परत येईन आई, म्हणून आईला आश्वासन दिले. शितलचा प्रश्नच नव्हता. तिला अमेरिकेला जायला मिळणार याचाच आनंद जास्त होता.
दोघंही अमेरिकेला गेले त्याला पंधरा वर्ष झाली तरी प्रकाश परत येण्याची पाच
वर्ष काही पूर्ण झाली नाहीत. वर्षभरात शितलला दिवस गेले. त्यावेळी तिचे आई बाबा आणि प्रकाशचे आई बाबा आळीपाळीनं बाळतंपणासाठी अमेरिकेत दाखल झाले. बाळाला घेऊन प्रकाश, शितल दोन वर्षांनी आपल्या घरी आले, तेही वीस दिवसांसाठी. आता या दोघांनाही, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोघांचा जन्म अमेरिकेतला, त्यामुळे तिकडची सिटीजनशीप. त्याचा त्यांना कोण अभिमान. इकडे आई बाबांनी प्रकाश परत येईल, ही आशा सोडली आहे. प्रकाशची आई याचा सर्व राग त्याच्या वडिलांवर काढते. तुम्हीच त्याला भरीस घातलंत, आता करा सर्व म्हणून तिची चिडचिड होते. दोघांनीही वयाची पंचात्तरी ओलांडली आहे. पहिल्यांदा अमेरिकेत जातांना त्यांनाही कौतुक वाटलं होतं. पण आत्ताशा तिथे जाणं तेही टाळतात. हवामान आम्हाला बाधतं असं कारण पुढे येतं. शिवाय ते तिथे त्यांच्या व्यापात असतात. आम्ही जाऊन कशाला अडचण हा प्रकाशच्या आईचा मुद्दा असतो. पण यामागे खरं कारण म्हणजे, त्यांची दोन्ही नातवंड आता पूरती अमेरिकन झाली आहेत. प्रकाशचा मुलगा चौदा वर्षाचा, आणि मुलगी बारा वर्षाची. त्या दोघांच्या वागण्यावरुन विशेषतः मुलीच्या कपड्यावरुन प्रकाशच्या आईची चिडचिड होते. त्यावरुन शितल आणि त्यांचे फोनवरुनही वाद होऊ लागले, तेव्हा प्रकाशनं उपाय म्हणून व्हिडिओ कॉलच बंद केले. मग प्रकाशची आई अधिक वैतागू लागली. गेल्या पाच वर्षापासून तिनं प्रकाशला रोकठोक विचारायला सुरुवात केली आहे, तुझी पाच वर्ष कधी संपणार. पण त्याच्याकडे आता उत्तर नाही. इथे दोघांच्या आजारपणात नातेवाईक आणि शेजारपाजार हाच आधार आहे. प्रकाशचे वडिल बायकोच्या बोलण्यानं हैराण झाले आहेत. मध्यंतरी प्रकाशच्या आईचे एक ऑपरेशन झाले, तेव्हा प्रकाशनं पाठवलेले पैसे दोघांनीही नाकारले. नुसते पैसे घेऊन काय करु. हा त्यांचा प्रश्न होता.
आता प्रकाशची आई, शितलच्या मागे लागली आहे. तिकडे आपले संस्कार होणार नाहीत, नातवंडांवर, त्यांना परत घेऊन ये. ही मागणी सुरु झाल्यापासून वर्षातून एकदा येणारी नातवंडं आता दोन वर्षानी वीस दिवसांसाठी आजीकडे डोकावून जातात. त्यातील दहा-बारा दिवस तर ते इंडिया एक्सप्लोअर करण्यासाठी जातात. मग बाकीच्या दिवसात शॉपिंग आणि त्यांची बांधाबांध. त्या आजीला संस्कार द्यायचे आहेत ते राहूनच जातात. प्रकाश आणि शितल यांनी बराचवेळ त्यांच्या आई-वडिलांना सांगितलं आहे की, आता आमची मुलं इथे परत येणार नाहीत. आम्ही येऊ, पण मुलांचं अशक्य आहे. त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे राहूदे. या सर्व वादांचे दळन त्यांच्या घरात चालूच असते. आत्ताशा शितलचे सासू सासरे वयाच्या ऐंशीकडे झुकत आहेत. या वयात येणा-या सर्व दुखण्यांनी त्यांना घेरलं आहे. शिवाय मानसिक तणाव आहे तो वेगळाच. सुरुवातीला शितल मला फोन करायची. आई-बाबांना समजावायला सांगायची. मी प्रयत्नही केला. तेव्हा मला दोघांच्या बाजू बरोबर दिसू लागल्या. खरं तर यात एक गोम आहे, ती म्हणजे, आपण जसे आहोत, तसे जगायला शिकलं पाहिजे. दुसरा काय करतो, त्याला सुधारायला गेलं, तर मात्र सगळीच खिचडी होऊन जाते. हा, दुसरा म्हणजे, आपला मुलगा असेल तरीही मनावर दगड ठेऊन त्याला त्याचा मार्ग मोकळा करावा लागतो. आई-वडिल हे ठराविक वयापर्यंत मुलांना मर्यादा घालू शकतात, नंतर या मर्यांदांच्या बाहेर मुलं गेली, की मात्र त्यांना त्यांचे निर्णय घेण्यापासून रोखलं, तर हे असं शितयुद्ध सुरु होतं. शितलला मी माझे विचार स्पष्टपणे सांगितले, आणि यापुढे या वादात मला कृपया घेऊ नका म्हणूनू विनंती केली. तेव्हापासून एक घर दूर झाले. कधीमध्ये आईबाबा भेटले तर नमस्कार होतो. अगदी काही असेल तर घरी जाणंही होतं. शितलचा कामासाठी येणारा फोन कमी झाला आहे. ती आली की भेटायला जाते. जो मला शक्य असेल तो खाऊ करुन तिला देते. पुन्हा नमस्कार. कारण ही शितयुद्ध कधीही संपणारी नसतात हे मी अनुभवातून शिकले आहे. यात जे जसं आहे, तसं आम्ही स्विकरतो, हा विजयी करणारा मुद्दा असतो. तो जोपर्यंत गवसत नाही तोपर्यंत हे शितयुद्ध चालूच रहातं...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Sunder lekh
ReplyDeleteLiked this one
ReplyDeleteChan lekh
ReplyDeletekhup chhan lekh
ReplyDeleteखुप छान..
Deleteअगदी खरं आहे.खूप छान लेख आहे.
ReplyDelete