व्रतस्थ शोभाताई

 

व्रतस्थ शोभाताई


काही व्यक्तिमत्व ही अशी असतात की त्यांना पाहिलं की शांतपणे तेवत असणा-या समईची आठवण येते.  नुकत्याच अशा एका व्यक्तिमत्वाची माझी गाठ पडली. आमच्या डोंबिवली महिला महासंघाच्या महासंघातर्फे नवदुर्गांचा सत्कार करण्यात आला. समाजामध्ये राहून काही वेगळं काम करणाऱ्या या महिला, कधीही प्रसिद्धीच्या आवरणाखाली वावरल्या नाहीत. आपण काय काम करतो हे जगाला सांगायला गेल्या नाही की, मी मोठी कार्यकर्ती आहे, म्हणून कुठल्याही समारंभात पुढे गेल्या नाहीत.  शांतपणे आपापले कार्य करत समईसारख्या तेवत रहाणा-या...समाजाने आपल्याला भरपूर काही दिलं आहे, त्याची परतफेड आपण केली पाहिजे या जाणीवेतून काम करणा-या या महिलांचा सत्कार करण्यात आला.  त्यातीलच एक व्यक्तिमत्व म्हणजे शोभा रामेश्वरराव अंबरकर.   वय वर्ष 71.  पण या वयाचा आणि त्यांच्या कार्याचा कुठलाही संबंध नाही.  आजही शोभाताई एखाद्या तरुणीला लाजवेल एवढ्या स्फूर्तीने काम करतात.  कार्यक्रमाच्या निमित्तानं  त्यांची भेट झाली आणि कळलं की, शोभाताईच्या कामाचा आवाका खूप मोठा आहे.  पण त्याचा कुठलाही बाऊ त्यांच्या वागण्यात नव्हता.  पहिल्या भेटीतच शोभाताईंच्या या साधेपणामुळे प्रभावित झाले आणि त्यांना भेटायला गेले. या भेटीत एका सोज्वळ व्यक्तिमत्त्वाची नव्याने ओळख झाली. 

 


शोभा रामेश्वरराव अंबरकर.  या मुळ दादरच्या.  शोभा तुकाराम महेंद्रकर हे त्यांचे माहेरचे नाव.  11 वी मध्ये शिक्षण घेत असतांना त्यांचे लग्न झाले आणि त्या डोंबिवलीकर झाल्या.  अंबरकर कुटुंब मोठं.  लग्नानंतर सुरुवातीची काही वर्ष या कुटुंबाच्या व्यवस्थापनात गेली.  शोभाताईंचे पती, रामेशेवरराव अंबरकर हे रेल्वेमध्ये मोठ्या पदावर होते.  आणीबाणी लागली आणि शोभाताईंच्या जीवनात एक संधी चालून आली.  रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिप करण्याची संधी आली.  त्यांच्या पतीनं फॉर्म भरुन दिला आणि शोभाताई रेल्वेमध्ये कामाला लागल्या.  1976 चा हा काळ.  पुढे मधु दंडवते रेल्वेचे मंत्री झाले आणि त्यांनी अप्रेंटिसशिप करणा-यांना रेल्वेमध्ये कायमस्वरुपी नोकरीचा प्रस्ताव दिला.  त्यात शोभाताई, रेल्वेमध्ये कायामस्वरुपी कामाला लागल्या.  तेव्हा पहिल्यांदा त्यांचा युनियन बरोबर संबंध आला.  त्या अध्येमध्ये युनियनच्या सभांना जाऊ लागल्या.  यासोबत वनवासी कल्याण आश्रमाची माहिती त्यांना मिळाली.  मुळात सतत व्यस्त रहाण्याची सवय होती.  त्यामुळे नोकरी, कुटुंब हे करत असतांनाही कुठल्यातरी संस्थेबरोबर जोडून काम करायची ओढ त्यांना होती.  वनवासी कल्याण आश्रमातून त्यांना ही संधी मिळाली.  आदिवासी भागीतील मुले या आश्रमात शिक्षणासाठी येत असत.  इथेच शोभाताईंना रंजनाताई करंदिकर भेटल्या.  शोभाताईंना समाजसेवेचा वसा रंजनाताईंकडून मिळाला.  मग आश्रमासाठी देणगी गोळा करणे, धान्य गोळा करणे, जनजागृतीचे काम करणे, आदिवासी भागात तयार होणा-या वस्तूंचे प्रदर्शन भरवणे, शाळा-महाविद्यालयातून एक-एक मुठ धान्य गोळा करुन त्याचे वितरण आदिवासी आश्रमशाळांमधून करणे, सामुहिक लग्न आदी कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले. कर्जत, कोटींबा येथील वनवासी आश्रमाच्या शाळेत त्या जाऊ लागल्या.

या कार्यातून शोभाताईंना समाजातील गरजांची माहिती होऊ लागली.  मध्य रेल्वे कर्मचारी संघ,  ही भारतीय मजदूर संघाची संलग्न संघटना याबरोबरही शोभाताई जोडल्या गेल्या.  मध्य रेल्वे कर्मचारी संघाचे त्रैमासिक अधिवेशन भोपाळला 1993 साली झाले.  गिताताई गोखले या सर्वांच्या प्रमुख होत्या.  तीन दिवसीय या अधिवेशनात जाण्याची संधी शोभाताईंन मिळाली.  त्या अधिवेशनाला दत्तोपंत ठेंगडी, भय्याजी जोशी यासारख्या विभुतींना अगदी जवळून पहाण्याची संधी शोभाताईंना मिळाली.  ही मोठी व्यक्तिमत्व अगदी


सामान्य माणसासारखी सर्वांसोबत वावरत होती.  जेवणाच्या रांगामध्ये उभी रहात होती.  कुणाबरोबरही संरक्षणाचे कवच नव्हते, की कार्यकर्त्यांचा घोळका नाही.  अशा व्यक्तीमत्वांना पाहून शोभाताई भारावून गेल्या.  समाजासाठी काम करावं, पण त्याचा कधी बाऊ करु नये, याची खुणगाठ त्यांनी बांधली आणि स्वतःला या मार्गात सामावून घेतलं.  भारतीय मजदूर संघाच्या कामात त्यांनी मोठ्याप्रमाणात सहभाग घ्यायला सुरुवात केली.  प्रत्येक बैठकीला त्या हजर असायच्या.  कार्यक्रमाची आखणी करण्यात त्यांचा सहभाग मोठा असायचा.  त्यातून त्या महाराष्ट्र प्रांत विभागाच्या प्रमुख झाल्या.  यात रेल्वेचे एकूण 16 झोन आणि वर्कशॉपचा सहभाग होता.   महिलांच्या मागण्या आणि त्यांच्या कामातील अडचणी वेगळ्या होत्या.  त्यांना समजून घेण्यासाठी शोभाताईंची ही निवड झाली होती.  हे काम म्हणजे जिकरीचे होते.  संघाच्या बैठकांमधून कर्मचा-यांसाठी असलेल्या सरकारी योजनांची माहिती दिली जायची.  अभ्यास शिबीरे व्हायची.  शोभाताई, या सर्व शिबीरांमध्ये हजर असायच्या.  अभ्यास करायच्या.  आणि या अभ्यासातून आपल्या सहकार्यांसाठी कसा फायदा करुन देता येईल, यासाठी तत्पर असायच्या.  या सर्वात शोभाताई, आपले कुटुंबही सांभाळत होत्या.  दोन मुलांच्या संगोपानाची जबाबदारी त्यांच्यावर होती.  2005 मध्ये त्यांनी रेल्वेमधील 26 वर्षांच्या नोकरीतून सेवानिवृत्ती घेतली.  त्यादरम्यान त्यांचे पती रामेश्वरराव आजारी झाले.  त्यांच्या सुश्रुतेमध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतले.  या दरम्यान त्यांना जिल्हा मजदूर संघाच्या कार्यात सहभागी व्हा म्हणून गळ घालण्यात आली.  यात एकूण 17 संघटना आहेत.  अगदी घर कामगार संघटनेपासून अन्य संघटनांचाही यात समावेश आहे.  पगारवाढ, वैयक्तिक पद उन्नती, नोकरीतील हिन वागणूक आदी अनेक समस्यांचा येथे विचार करायला लागतो.  मुळात ज्यांच्याकडे या समस्या येतात, त्यांची वृत्ती अभ्यासू लागते.  शिवाय समोरच्याला समजून घेणारी वृत्ती लागते.  शोभाताई, या सर्वांमध्ये अव्वल.  त्यामुळे त्यांनी जिल्हा मजदूर संघाच्या कार्यातही हिरारीनं भाग घेतला.  पुढे शोभाताईंचा दधिची देहदान मंडळाबरोबर परिचय झाला.  त्यांच्या कार्याने भारावलेल्या शोभताईची या मंडळाच्या कमिटीवर उपाध्यक्ष म्हणून निवड झाली.  या मंडळासाठीही त्यांनी देणग्या गोळा केल्या.  शिवाय गरजवंतांना किडनी प्रत्यारोपणासाठी अनुदानही मिळवून दिलं आहे.  याच मंडळातर्फे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणातही मदत केली आहे.  या सर्वांदरम्यान शोभाताईंचे पती, रामेश्वरराव यांचे निधन झाले.  त्यांचेही देहदान करण्यात आले.


कुटुंबातील हे दुःखाचे प्रसंग विसरुन शोभाताई आपल्या व्रतस्थ मार्गावर कायम आहेत.  आता त्या घरकाम करणाऱ्या महिलांच्या संघटनेचे काम करत आहेत.   घरेलू कामगार संघाची अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे.  महाराष्ट्र सरकारच्या योजनांचा लाभ या महिलांना मिळवून देण्यासाठी त्यांची धडपड असते.  जवळपास 700 महिला या संघात आहेत.  कोविडकाळात सरकारतर्फे आलेली मदत या महिलांना मिळवून देण्यात शोभाताईंचा मोठा वाटा होता.  घरेलू कामगार संघटनांमध्ये काम करतांना या महिलांसोबत विश्वासानं उभं रहाण्याची गरज असते.  अनेकवेळा जिथे या महिला काम करतात, तिथूनच त्यांच्यावर चोरीचा आळ घेतला जातो, अशावेळी पोलीसठाण्यात धाव घेऊन पोलीसांना विश्वासानं भूमिका समजून द्यावी लागते.  शोभाताई, ही सर्व दिव्य मोठ्या हिम्मतीनं करतात.  त्यामुळेच त्यांच्या संघातील महिलांचा शोभाताईंवर खूप विश्वास आहे.  या महिलांसाठी त्यांनी अनेक सहलीही आयोजित केल्या आहेत.  दिल्ली, वैष्णवदेवी, अयोध्या, प्रयागराज सारख्या ठिकाणी अगदी माफक दरात चांगल्या सुविधांसह त्या सहली आयोजित करतात.  महिलांचे प्रौढ शिक्षा वर्ग घेण्यातही त्यांचा पुढाकार आहे.  भारतीय मजदूर संघाच्या कामात असल्यामुळे त्यांना देशभर प्रवास करावा लागतो.  ऑल इंडिया भावसार क्षत्रिय महासभेच्या महाराष्ट्र राज्य शाखेची महिला परिषद सदस्य आहेत.

बरं एवढ्या सगळ्या कार्यात व्यस्त असतांनाही त्यांनी त्यांचे छंद जोपासले आहेत.  ज्योतिष शास्त्राचा त्यांचा गाढा अभ्यास आहे.  फारकाय कराटेही त्या शिकल्या आहेत.  नाट्यशिबिरात त्यांचा सहभाग असतो.  आणि नृत्याचे  वर्गही त्यांनी केले आहेत.  असे आभाळासारखे व्यापक काम करणा-या शोभाताईंचा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे, जनता सहकारी बँक कर्मचारी संघातर्फे, कांचनगौरी महिला सहकारी पतपेढी तर्फे सत्कार करण्यात आला आहे.  वय वर्ष फक्त 71 असलेल्या शोभाताई आजही सतत कामात व्यग्र असतात.  या मुलाखतीसाठी मी त्यांना फोन केला तेव्हा म्हणाल्या, मतदानाच्या दिवसापर्यंत नको. सर्वांना मतदान करण्यासाठी आवाहन करणार आहे आणि मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणार आहे.  आता यावर काय बोलणार...व्रतस्थ म्हणून त्यांना आणि त्यांच्या कार्याला नमस्कार. 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

Comments

  1. Replies
    1. खूपच छान . प्रेरणादाई व्यक्तीमत्व . घेण्यासारख आणि शिकण्यासारख खूप काही .

      Delete
  2. Khuupch aadarsh vyaktimatwa,sasneh namaskar Tai

    ReplyDelete
  3. khup chhan lekh

    ReplyDelete
  4. Very interesting Khup chan .. biography. Proud of you Aai.

    ReplyDelete
  5. खूपच सुंदर लेख आहे!

    ReplyDelete
  6. मानाचा मुजरा .🙏🙏💐💐

    ReplyDelete
  7. Utkrushta khupach chan kaki

    ReplyDelete
  8. Lokanche ashirvad ashech kayam tumchya sobat astil🌹

    ReplyDelete
  9. खूप छान असे कार्य करणाऱ्या माऊली ला साष्टांग दंडवत.

    ReplyDelete

Post a Comment