प्राची नावाची अष्टभुजा

 

प्राची नावाची अष्टभुजा



डोंबिवलीत रहायला आल्यावर पहिल्यांदाच आमचे वार्डे गुरुजी डोंबिवलीत येणार असल्याचा निरोप आला.  कुणा गडक-यांच्या घरी पुजेच्या निमित्तानं गुरुजी येणार होते.  फडके रोडवर त्यांचा बंगला होता.  नवनाथांची पुजा तिथं होणार होती.  गुरुजींनी तुम्ही नक्की या,  यजमानांची काहीही हरकत नाही, असा निरोप दिला.  तरीही धाकधूक होती.  ओळख नसतांना असं कसं जायचं, याचं दडपण आलेलं.  पण त्या घरात गेल्यावर सगळं दडपण बाजुला झालं.  एक तडफदार महिला, पदर खोचून स्वंयपाकघरात उभी होती.  प्रसादाचं सर्व जेवण त्या स्वतःच करत होत्या.  गुरुजींसोबत किमान वीस माणसं तरी होती.  माझ्यासाऱखी हौशी-नवखी बीस-बावीस.  आणि त्या गडक-यांच्या घरातील माणसं.  एवढ्या सगळ्यांचा स्वयंपाक ती महिला सफाईदारपणे करत होती.  त्याच उत्साहानं त्यांनी आम्हा सर्वांना जेवायलाही वाढलं.  खरंतर काहीच ओळख नव्हती.  पण परकेपणाची भावना त्यांच्या वागण्यात नव्हतीच मुळी.  नंतर काही वर्षानी पुन्हा या महिलेला भेटले, ती डोंबिवलीकर मासिकाच्या कार्यालयात.  डोंबिवलीकर मासिकाचे कार्यकारी संपादक प्रभू कापसे यांचा वाढदिवस होता.  त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले, तेव्हा हिच महिला मोठे मोठे डबे घेऊन हजर होती.  प्रभूजींच्या वाढदिवसानिमित्त कुठल्यातरी वृद्धाश्रमाला भेट देण्याचा कार्यक्रम होता.  त्यासाठी त्यांनी खूप पदार्थ करुन आणले होते म्हणे.  माझी आणि त्यांची ओळख नव्हती, तरीही मला सोबत येण्याचा खूप आग्रह केला.  मी नाहीच म्हटल्यावर मग एक डिश काढून माझ्या हातात दिली.  त्यात त्यांनी केलेले पदार्थ वाढायला सुरुवात केली.  थोडं तरी खा,  असा आग्रह सुरु


झाला.  मला कळेना या मला कशाला आग्रह करीत होत्या.  नंतर चौकशी केल्यावर कळलं की या महिलेचं नाव आहे, प्राची गडकरी. डोंबिवलीकर कार्यालयात भेटलेली प्राची गडकरी कधी जिवश्च कंठश्च मैत्रीण झाली हे समजलंही नाही. 

प्राची म्हणजे लेखिका, कवयित्री, निवेदिका, कथाकार, व्याख्याता, स्त्री संत अभ्यासिका आणि साहित्य अभ्यासिका असं अष्टपैलू व्यक्तिमत्व.  पण या सर्वांपेक्षा तिची चांगली ओळख म्हणजे, माणसांना जपणारी आणि जोडणारी प्राची.  आज तिचा वाढदिवस.  साक्षात अन्नपूर्णा देवीच्या रुपात लाभलेल्या या गुरुरुपातील मैत्रिणीकडून जीवनातील अनेक धडे शिकता आले आहेत, आणि शिकतही आहे.  प्राची हे एक अफाट व्यक्तिमत्व.  तिची हुकुमत नाही, असं कुठलंही क्षेत्र नाही.  लिखाणापासून ते अभिनयापर्यंत.  कुठल्याही क्षेत्रात ती जेव्हा वावरते तेव्हा एक प्रचंड उर्जा तिच्या भोवती असते.  तिच्यासारखी तिच. प्राचीचं घर म्हणजे, समग्र विषयामधील वाचनशाळाच आहे.  स्वतः ती वेदांचा, उपनिषदांचा अभ्यास करते.  त्यावर व्याख्यान देते.  त्यामुळे अनेक वेद, उपनिषदे तिच्या घरात आहेत.  तिच्या घराच्या भिंती पुस्तकांनी आणि तिला मिळालेल्या पुरस्कारानं सजल्या आहेत.  गर्भश्रीमंत असलेली प्राची यालाच आपला खरा खजिना मानते.   संत साहित्याची अभ्यासक असणारी प्राची ही महाराष्ट्र शासनाच्या भक्ती संस्कृती समितीमध्ये आहे,  ही आम्हा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट.  26 जानेवारी रोजी दिल्लीच्या राजपथावर होणा-या संचलनात प्रीचीच्या लेखणीतून साकारलेल्या गाण्यावर महाराष्ट्राचा चित्ररथ अवतरला, तेव्हा या अभिमानात आभाळभर वाढ झाली.  याच चित्ररथाला जेव्हा द्वितीय पारितोषिक मिळाले, तेव्हा या अभिमानाला सोनेरी झळा प्राप्त झाली.  प्राची अगदी उपजत कवयित्री आहे.  डोंबिवलीतील काव्यरसिक मंडळाच्या संपर्कात ती 22 व्या वर्षी आली, आणि तिच्यातील कवियत्रीला व्यक्त होण्याची संधी मिळाली.   त्यात तिची वाचनाची आवड आणि अभ्यासू स्वभाव.  या सर्वांचा सांगड


म्हणजेच कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी ती लिलया पार पाडू लागली.  भाषेवर हुकूमत,  वेद, उपनिषदांचा अभ्यास यामुळे तिनं शासनाच्या कार्यक्रमांचेही सूत्रसंचालन टाळ्यांच्या गजरात केलं आहे.  महाराष्ट्राचे माजी राज्यपाल, भगतसिंग कोश्यारी यांनी कितीतरी वेळा तिची पाठ थोपटली आहे.  या सर्वात तिनं आकाशवणीवरही अनेक कविता वाचनाचे कार्यक्रम केले आहेत.  हे सर्व करत असतांना प्राची संत साहित्याच्या अभ्यासाकडे वळली आणि त्यातील बारकावे उलगडून सांगू लागली.  तिच्या ओघवत्या वाणीतून संत साहित्यामधील व्याख्यानाला गर्दी होऊ लागली, तेव्हा तिला जाणवू लागले की, स्त्री संत साहित्याचा प्रचार-प्रसार अधिक होणे गरजेचे आहे.  यातूनच तिनं सुरुवातीला संत मुक्ताबाईंच्या साहित्याचा अभ्यास सुरु केला. 'मी मुक्त, मुक्त, मुक्ताई'  हा कार्यक्रम सुरु झाला.  संत साहित्य हे व्यापक आहे, तरुण पिढीला याचे ज्ञान झाले पाहिजे, ही जाणीव झाल्यावर प्राचीनं अगदी 15-15 मिनिटांच्या एकांकीका लिहिल्या.  पंढरपूरच्या वारीमध्ये या सर्व एकांकिका सादर झाल्या आहेत.  मान्यवर अशा पृथ्वी थिएटरने सलग प्राचीच्या एकांकिका सादर करुन एक विक्रमच केला आहे. याशिवाय वारकरी संप्रदायातील जनाबाई, प्रेमाबाई, बयाबाई, भागुबाई, विठाबाई, सोयराबाई, निर्मलाबाई, गोदाबाई या स्त्री संतांवर लेख लिहून त्यांच्याबद्दल नवीन पिढीला माहिती करुन दिली आहे.  या सर्वांबद्दल प्राची आपल्या ओघवत्या वाणीतून किर्तन, प्रवाचनही करते. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर तिचे 550 हून अधिक कार्यक्रम झाले आहेत.  पंढरपूरच्या वारीचे नियोजन गेली काही वर्ष प्राची महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून करत आहे.  या वारीमध्ये तिनं लिहिलेल्या अनेक पथनाट्यांचे सादरीकरण झाले आहे.  दिवसभर वारक-

यांसोबत पंढरपूरची वाट धरणारी प्राची सायंकाळी हजारो वारक-यांसमोर कीर्तनाच्या रंगात रंगून जाते.  या सर्वांतून तुला काय मिळतं ग, असा प्रश्न विचारल्यावर ती तेवढ्याच सहजतेनं सांगते, विठोबाच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करता येतो ना.  हा तिचा साधा, सरळ स्वभाव वेळीवेळी आम्हाला नवीन धडा देऊन जातो. 

या संतसाहित्यासोबत  2018 पासून प्राची राम गणेश गडकरी यांच्यावर 'समग्र गडकरी दर्शन' हा कार्यक्रम करतेय.  महिला संत साहित्यावर 50 हून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत.  एकांकिका, कथा, नाटक आणि अनेक कविता ती लिहित असते.  या सर्वात सूत्रसंचालनाचे कार्यक्रमही आहेत.   हे सर्व साहित्य सांभाळतांना प्राचीचा मित्र-मैत्रिणींचा गोतावळा अफाट आहे.  या सर्व गोतावळ्यातील प्रत्येक मित्राची आणि मैत्रिणींची आवड-निवड काय याची यादी तिला तोंडपाठ आहे.  जगातील कुठलाच असा पदार्थ नाही, जो ती करु शकत नाही.  बरं हे पदार्थ ती अगदी चार-पाच जणांसाठी बनवते असंही नाही.  मॅडम थेट किलोच्या हिशोबानं बनवतात.  घड्याळ लावून मिनिटाला तेलपोळ्या...त्याही पाचशेच्या आसपास.  मोदक, तेही अंब्याच्या रसातले.  गुलकंदाचे  कानवले. यात तिचा हात कोणीही धरु शकणार नाही.  हे सर्व करणार आणि खुल्या मनानं खाऊही घालणार.  मैत्रिणींच्या घरी डबे पोहचवणार.  अगदी कोणी नवखा असेल आणि त्यानं मोदक मिळेल का म्हणून विचारलं तर त्यांच्याक़डेही मोदक, तेलपोळीचे डबे पोहचवणार.

मुळात याचं सर्व श्रेय प्राचीच्या पाककलेतील निपुणतेला असलं तरी माझ्यामते


हे श्रेय तिच्या स्वभावाचेही आहे.  कारण हातचं राखत काही करायची तिला सवयच नाही.  कुठलाही पदार्थ करतांना ती दिलखुलासपणे करते.  तिच्या याच स्वभावानं तिच्या हातून होणारा पदार्थही आपसूक सुग्रास होतो.  मला वैयक्तिक विचारलं तर प्राचीच्या हातचे सगळेच पदार्थ आवडतात.  पण त्यातही खास आहे, तो तिचा मसाले भात.  मसाले भात तयार करतांना बहुधा सुवासिक तांदूळ वापरला जातो.  पण प्राची नेहमीचा तांदूळ वापरते, पण तिच्या मसाले भाताला आगळा सुगंध येतो.  या भातातील जिन्नस अगदी तराजूत मोजल्याप्रमाणे प्रमाणबद्ध.  काहीही कमी नाही की वाढीव नाही.  पण चव,  चारदिवस तरी तुमच्या जिभेवर राहिल एवढी सुभान...

दत्तमहाराजांवर तिची खूप श्रद्धा आहे.  त्यांच्या अंगणात दत्त महाराजांचे स्वयंभू स्थानही आहे.  दरवर्षी तिथे दत्तजयंतीला मोठा उत्सव होतो.  साधारण तीन हजार भाविक जेवायला असतात.  या सर्वांची आवभगत प्राची आणि तिचे कुटुंबिय करतात.  या सर्वात, हे आपलं आहे, या मंदिराचे आपण मालक आहोत, ही जेवणाची व्यवस्था आम्ही केलीय...हा मी पणा या गडकरी कुटुंबाकडे कधीच नसतो.  पहाटेपासून या उत्सवात सहभागी झालेली प्राची रात्री बारापर्यंत त्याच उत्साहात भाविकांचे स्वागत करत असते.  तिच्या स्वभावातील आणखी एक पैलू म्हणजे, कसाही प्रसंग आला तरी हिच्या डोक्यावर बर्फाची लादी ठेवलेली असते.  तिच्यामते माणूस महत्त्वाचा.  आपल्या बोलांनी कोणालाही दुखवू नये.  जीवाभावाच्या माणसांना जपण्यासाठी काहीही करणा-या याच प्राचीनं माझ्या पन्नासाव्या वाढदिवसाचे सर्व नियोजन केलेलं.  खरं तर ती माझ्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाची प्रमुख पाहुणी.  नियमानुसार मी तिचं स्वागत करायला आधी कार्यक्रमस्थळी जाणं आवश्यक होतं.  पण यातही तिनं बाजी मारलेली.  अगदी नेटका झालेला पुस्तक प्रकाशन सोहळा यात प्राचीच्या नियोजनाचे श्रेय मोठे होते. 

अलिकडे ऐन दिवाळीत मी शब्दाला पक्की असणा-या प्राचीचं आणखी एक रुप बघितलं.  दिवाळीतील गाण्यांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचानाचे कार्यक्रम आधीच


तिच्या नावावर बुक झालेले.  पण ऐनवेळी काही आजारपणाचे निमित्त झाले.  अशावेळी कुठलेही कारण पुढे न करता  पहाटे उठून देवाची पूजा आणि पारंपारिक नैवेद्य. मग कार्यक्रम आणि मग हॉस्पिटलच्या फे-या ती करत होती.  संध्याकाळी कार्यक्रम असेल तर काहीवेळा ती थेट हॉस्पिटलमधून कार्यक्रम स्थळी दाखल व्हायची.  पण या सर्वात आपल्यावर असलेल्या ताणाची अजिबात समोरच्याला कल्पना येऊ दिली नाही.  जो कार्यक्रम हाती घेतला आहे, तो अधिकाधिक चांगला कसा होईल, समोर बसलेल्या मायबाप प्रेक्षकांना अधिक ज्ञान असे देता येईल, याचकडे तिचे लक्ष.  दिलेल्या शब्दासाठी झटणा-या प्राचीचा  सायंकाळी पाच वाजता सुरु झालेला कार्यक्रम रात्री साडेनऊपर्यंत खच्चून भरलेल्या प्रेक्षकागृहात झालेला मी पाहिला आहे.  आणि नकळत तिला हात जोडले आहेत. 

या सर्वात मी प्राचीकडून काय शिकले, हा प्रश्न मी मलाच कितीतरी वेळा विचारला आहे.  अर्थात त्याला उत्तर आहे, बरचं काही आणि बरचं काही शिकायचं आहे, हे आहे.  कधी स्वयंपाकघरात गेल्यावर कंटाळा हा शब्द आला की समोर प्राची उभी रहाते, मग झटकन मेनू सुचतो आणि हात चालू लागतो.  चार पाहुणे आल्यावर त्यांची सरबराई करतांना ती अन्नपूर्णेच्या रुपात समोर उभी रहाते.  स्वयंपाकघरात एखादा दिवस अगदी राबराब राबल्यावर विचार येतो, राहूदे सर्व. सकाळी आवरु. तेव्हाही ही प्राची  समोर उभी रहाते.  शंभर माणसांसाठी दहा-वीस पदार्थ बनवल्यावरही या बाईंचा ओटा अगदी काचेसारखा लख्ख असतो.  तो लख्ख ओटा आणि प्राचीचे बोल समोर पिंगा घालतात.  स्वयंपाकघरात अन्नपूर्णेचा वास असतो.  ते अगदी लख्ख ठेवा.  मग माझाही हात माझ्या ओट्यावर फिरु लागतो.   मी आणि वैदेही तिच्याबरोबर गप्पा मारतांना ती तिच्या खास मैत्रिणींबद्दल आवर्जून सांगते.  अशीच एक मैत्रिण


म्हणजे, पद्मश्री पद्मजा फेणाणी.  डोंबिवलीकरच्या एका कार्यक्रमसाठी पद्मजाताई आल्या असतांना या दोघी मैत्रिणी अगदी गळ्यात पडून गप्पा मारतांना बघितल्यावर या आमच्या मैत्रिणीची पोहच किती आहे, याची जाणीव नव्यानं झाली.  अशाप्रसंगातून आमच्या सोबत वावरतांना तिची सहजता आम्हाला बरच शिकवून जाते.  अर्थात या सर्व गुणांपेक्षा अधिक व्यापक प्राची गडकरी आहे.  ती एका गोड नातीची आजीही आहे.  आपल्या नातीच्या शाळेतील गॅदरींगमध्ये या बाई तेवढ्याच उत्सहानं सहभागी होतांना आम्ही पाहिलं आहे.  याला काय म्हणणार.  अष्टभुजाच....प्राची मैत्रिणी....वाढदिवसाच्या तुला लाखो, करोडो शुभेच्छा...वार्डे गुरुजी यांचं स्थान माझ्या ह्दयात दैवतासारखे आहे.  त्यांच्या आशीर्वादामुळेच ही गोड मैत्रिण मला लाभली हे माझं भाग्यच...

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

                                 

Comments

  1. खूप सुंदर लेख

    ReplyDelete
    Replies
    1. निशब्द सई प्राची ताई खरच अष्टभुजा आहेत.आपल्या प्रेमळ स्वभावाने व गोड बोलण्याने त्यांनी माझ्याशी बहिणीचं नातं निर्माण केल. त्यांच्या कडून खुप काही शिकायला पाहिजे. अप्रतिम छान लिहिलस 👌

      Delete
  2. खूप सुंदर, हुबेहूब वर्णन..

    ReplyDelete
  3. प्राची गडकरी ही अष्टभुजा देवी मलाही पावली आणि तिने माझ्या आयुष्यात हिरवळ निर्माण केली. आमच्या "स्मृती-गंध" समूहाच्या कार्यक्रमात आपण होऊन सहभागी झाली आणि "मी मुक्त, मुक्ताई" ची झलक सादर करत तिने रसिकांची मने जिंकली. इतक्याच परिचयातून तिने मला "काव्य रसिक मंडळ" हे साहित्याचे समृद्ध दालन खुले करून दिले. बृहन्महाराष्ट्रातील माझ्या सारख्या लेखिकेचा परिचय डोंबिवलीतील अनेक नामवंत साहित्यिकांशी होण्याची ही सुसंधी तिच्यामुळेच मिळाली. आणि आता पुढे "आम्ही सिद्ध लेखिका" सारख्या नावाजलेल्या संस्थेची सदस्य बनवून तिनेच मला ह्या क्षेत्रात सुस्थापित केले. मी प्राचीचे वैयक्तिक आभार मानते आणि तिच्या वाढदिवसानिमित्त तिले अनेक हार्दिक शुभेच्छा देते. जिच्या प्रत्येक यशाच्या पायरीवर चढताना आपलीच मान गर्वाने ताठ व्हावी, अशा ह्या सिद्धहस्त लेखिकेचा कीर्तीवेल गगनाला जाऊन पोहचावा, हीच मनापासून इच्छा आहे. प्राची, तुला मनःपूर्वक शुभेच्छा 🙏💐
    प्राचीचा अतिशय सुंदर परिचय करून दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद सई 🙏♥️
    प्रेषक.... सौ.मृदुला राजे

    ReplyDelete
  4. सौ प्राची ताई!!!
    आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ताईंची भेट झाली त्यांचं सुंदर सुमधुर बोलणे आणि अतिशय सखोल आपले विचार प्रगट करणे..
    सगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा अतिशय सुंदर रीतीने तयार करून तो कार्यक्रम त्यांनी यशस्वी केला
    मी सौ प्राची ताईंचे हे सर्व कला गुण पाहून आवक झालो!!
    ताईंची आणि माझी पहिलीच भेट पण या भेटीत ताईंचे व्यक्तिमत्व माझ्या मनात ठसून गेले..
    कार्यक्रम झाल्यावर नंतर मी धुळ्याला परत निघताना घाई खूप होती मात्र त्यांची एक मिनिट भेटायची आणि बोलायची इच्छा मी आवरु शकत नव्हतो.
    मी ताईंना क्षणभर भेटलो ताईंना धुळ्याला माझ्याकडे येण्याचे आमंत्रण दिले
    ताईने ते हसत हसत स्वीकारले!!
    पुन्हा एकदा डोंबिवलीत आल्यानंतर ताईंची नक्की भेट घेण्याची इच्छा माझी आहेच.
    सईजी आपण खूप सुंदर ताईंबाबत लिहिले.
    धन्यवाद
    दादा पाटील
    धुळे

    ReplyDelete
  5. प्राचीला मी पहिल्यांदा भेटले तेव्हा तिची एनर्जी बघून थक्क झाले.मनमोहक व्यक्तीमत्वाची प्राची नुसतीच साहित्यिक नाही तर प्रत्यक्ष अन्नपूर्णा आहे.
    प्रतिभा ताराबादकर

    ReplyDelete
  6. अतिशय सुंदर लेख,मनःपूर्वक अभिनंदन!!

    ReplyDelete
  7. जयंत बने7 December 2024 at 10:13

    खूप छान लेख आणि प्राची ताई ना वाडदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

    ReplyDelete
  8. प्राचीचं अनंतभुजा व्यक्तिमत्त्व समोर आलं.लेखनशैली सहज ओघवती.

    ReplyDelete
  9. महेश टिल्लू7 December 2024 at 10:59

    खूप छान व्यक्ती वर्णन. प्राची ताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खरोखर अशा व्यक्तींकडून प्रेरणा घेणं शिकायचे असते, आपल्यात चांगला बदल घडवायचा प्रयत्न नक्कीच करता येईल.आपण खूप वेळ वाया घालवतो. त्याचे उत्तम नियोजन करता येइल व नवीन कार्य ,काही सकारात्मक घडवू शकतो.सलाम त्यांच्या या कार्यकुशलतेला .

    ReplyDelete
  10. प्राचीच हुबेहूब वर्णन आहे..ग्रेट..दुसरा कुठला शब्द सुचत नाहीये..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..अजून यश लाभो हीच सदिच्छा...

    ReplyDelete
  11. प्राची ताई, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
    लेखातून शुभेच्छा मस्तच!

    ReplyDelete
  12. अष्टभुजा प्राची ताईंना सलाम.खूप छान लेख आहे.

    ReplyDelete

Post a Comment