कॅमे-याच्या पलीकडे...
भटकंती हा आमचा तिघांचाही आवडता छंद आहे. कुठेतरी जाऊया एवढं बोललं तरी, चला म्हणत बॅगा भरायला सुरुवात होते. अशीच एक झटपट ट्रिप प्लॅन झाली. इंदौर आणि उज्जैनची. मध्यप्रदेशमधील ही दोन्हीही शहरं आमची लाडकी. इंदौर तर जवळपास पाठ असल्यासारखं. त्यामुळे यावेळी महाकालच्या उज्जैन नगरमध्ये जरा दोन दिवस जास्त राहू असं, नक्की करत सर्व बुकींग केली. आठवड्याभरात सर्व तयारी झाली, आणि घरातून निघतांना एक गोष्ट नक्की केली. यावेळी ही शहरं कॅमे-यातून बघण्यापेक्षा डोळ्यांनी भरभरून बघून घ्यायची. त्यांच्याबद्दलची माहिती तेथील स्थानिकांकडून समजून घ्यायची.
इंदौरहून दिड तासाच्या अंतरावर असलेल्या धार जिल्ह्यात आमच्या कुलदेवीचे मंदिर आहे. इंदौरचे रस्ते हा एक स्वतंत्र लिखाणाचा विषय. त्यामुळे इंदौरला पोहचल्यावर लगेच गाडीनं धारपर्यंतचा प्रवास करायला कुठलाही कंटाळा येत नाही की काही त्रास होत नाही. धारच्या आसपास शेतजमिन भरपूर आहे. शिवाय काही मठही आहेत. हा भाग इंदौरपेक्षा थोडा अधिक थंड असतो. यावेळी आम्ही गेलो, तेव्हा थंडी ब-यापैकी होती. धारमध्ये सायंकाळी साडेसहा पर्यंत आम्ही होतो. येथे मोठा भाजीबाजार भरतो. रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी भरलेल्या या बाजारात नुसता फेरफटका मारणं ही पर्वणी असते. तासभर ही भटकंती केल्यावर मात्र माझी धावपळ सुरु झाली. इंदौरला रात्री नऊ वाजेपर्यंत तरी पोचायचं होतं. उगाच भाज्या बघत थांबले, म्हणून मी माझ्यावरच चिडत असतांना आमच्या गाडीचा ड्रायव्हर शांत होता. मला म्हणाला घडी लगाओ, बस देढ घंटा लगेगा, मुझपर विश्वास रखो. आणि त्यानं त्याचे बोल खरे केले. या सगळ्या प्रवासात त्याच्याकडून कळंलं, की या भागात कधी ट्रॅफीक जॅम होतच नाही. रस्ते चारपदरी आहेत. जड वाहनांसाठी वेगळ्या वाटा आहेत. त्यामुळे ऑफीसच्या वेळांमध्येही गर्दी नसतेच. सर्वत्र सिग्नलची व्यवस्था आहे, पण वाहतूक पोलीस फार नाहीत. कारण प्रत्येक नाक्यावर सीसीटिव्ही आहेत. कोणी जास्त वेगात गाडी चालवली, चुकीच्या पद्धतीनं ओव्हरटेक केलं, की बरोबर पाचशे रुपयांची पावती घरपोच येते. ड्रायव्हर ही माहिती देत असतानाच इंदौर आले, बरोबर दिड तासात. इंदौरमध्ये रात्री दीड-दोन पर्यंत भटकंती करत दुस-यादिवशी भल्या पहाटे उज्जैनला निघालो.
उज्जैनमध्ये महाकाल मंदिराच्या आसापास अनेक मंदिरं, मठ आहेत. पुरातन
मंदिरे आहेत. या सर्व मंदिरांमध्ये उज्जैनचे रिक्षावाले फिरवून आणतात. तीन ते चार तासात हे इंदौर दर्शन होते. आम्ही ही वाट टाळून स्वत्रंत्रपणे या सर्व ठिकाणांना भेटी देण्याचे ठरवले. त्यातील एक ठिकाण म्हणजे, संदिपानी आश्रम. गेल्यावेळी अगदी अर्धातासात हा आश्रम बघायला लागला आणि एक चुटपूट मनात होती. जिथे साक्षात श्रीकृष्णाचे शिक्षण झाले, ते पवित्र स्थान पंधरा मिनिटात बघितले. त्यामुळे यावेळी मोजून चार तास या आश्रमात घालवले. अगदी मोजके फोटो काढून कॅमेरा बॅगेत ठेवला. श्रीकृष्णाच्या जीवनावर आधीरित चित्रे, देखावे हे या आश्रमाचे वैशिष्टय. सगळा भाग शेणानं सारवलेला. अगदी छतावरही शेणाचं सारवण. त्यावर चुन्यापासून काढलेल्या कलाकृती. साधी पण लक्षवेधी सजावट. या सर्व चित्रांसमोर मोजक्या शब्दात असलेली माहिती. ही सर्व फेरफटका मारायला आम्हाला तीन तास लागले. गेल्या भेटीतील जी हूरहूर होती, ती दूर केली. याच संदिपानी आश्रमात भगवान शंकराचीही पुरातन मंदिरे आहेत. नंतरचा एक तास या मंदिराची माहिती जाणून घेण्यात गेला. संदिपानी आश्रमाचा प्रत्येक भाग सुंदर चित्रांनी सजवलेला आहे. अगदी मंदिराच्या छतावरही मनमोहक अशी चित्रे आहेत. पण यासाठी वेळ काढावा लागतो. इथून बाहेर पडलो, आणि कालभैरव मंदिरात दर्शनासाठी गेलो. इथे चक्क दिड तास रांगेत गेला. तुफान गर्दी. सुरुवातीला गर्दी बघून थोडी धास्ती वाटली. मग एक सुरेल जुगलबंदी ऐकत हा वेळ कसा गेला हे समजले नाही. याच गर्दीमध्ये काही वारकरी मंडळीही होती. आपल्या आसपास काय आहे, कोण आहे, याचे भानही त्यांना नव्हते. त्यांचे तालासुरात भजन चालू होतं. काहीवेळानं त्यांच्यासोबत सर्वच गर्दी त्या भजनात रंगून गेली. इथे प्रत्येकाची भाषा वेगळी. पण सुरांची भाषा एकच होती. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, म्हणत सर्वच विठ्ठल भजनात रंगले. त्यामुळे दिड तास कसा गेला याचा पत्ताच लागला नाही. इथून बाहेर पडलो तेव्हा सायंकाळचे साडेसहा वाजले होते. पण बाहेर मिट्ट काळोख झालेला. सोबत कडाक्याची थंडी. उज्जैन नगरामध्ये अनेक गल्लीबोळ आहेत. या गल्लीबोळातून फिरत मग रामघाटावर जाऊन पोहचलो. रामघाटावर
सायंकाळी क्षिप्रा नदीची आरती होती. आता या घाटावर किमान चार ठिकाणी अशा आरत्या होतात. तुम्हाला जिथे आवडेल तिथे बसून रहा. आरती सुरु झाली आणि एका जोडप्याची धावपळ सुरु झाली. दोघंही आपापले मोबाईल घेऊन उपस्थितांना आमचे शुटींग करा, म्हणून सांगू लागले. पण कोणीच तयार होईना, आम्हाला आरतीचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा आहे. तुमचं शुटींग तुम्हीत करा, म्हणून बहुतेकांनी ही विनंती नाकारली आणि सर्व आरतीमध्ये तल्लीन झाले.
रामघाटावरुन काळोखात ही क्षिप्रा नदी बघण्याचा अनुभव काही औरच असतो. नदीमध्ये असंख्य दिवे सोडले जातात. मंद वारा या दिव्यांना कुठपर्यंत नेतो, हे नुसतं बघत बसलं तरी मानसिक शांती लाभते. याच रामघाटाच्या एका टोकाला पारदेश्वर महादेवाचे मंदिर आहे. रात्री आठच्या सुमारास येथे आरती होते. ही आरती संपत असतांना आम्ही त्या मंदिरात गेलो. फारशी गर्दी नव्हती. पण जी होती, त्यात परदेशी नागरिकांचा अधिक भरणा होता. सर्व भारतीय पोशाखामध्ये आरतीमध्ये तल्लीन झाले होते. आरती झाल्यावर यापैकी काहींकडे सहज म्हणून चौकशी केली. त्यांच्याकडून समजलं की, दरवर्षी यातील काही मंडळी भारतात येतात. उज्जैनमध्ये वा अन्य तिर्थस्थळी आठवडाभर रहातात. कुठल्याही मोठ्या हॉटेलमध्ये न रहाता, आश्रमामध्ये रहातात. तिथेच होणारे जेवण जेवतात. दिवसभर उज्जैनमध्ये फिरतात. काही आश्रमांना भेटी देतात. ध्यानधारणा करतात. अगदी कुठे किर्तन, प्रवाचन चालू असेल तर तिथेही जाऊन बसतात. ते काय बोलतात हे समजत नाही, पण तिथे पॉझिटिव्ह एनर्जी भरपूर असते, हे सांगतात. संध्याकाळी मात्र रामघाटावर येऊन बसतात. कमालीची शांती मिळते. मग पारदेश्वर मंदिरातील आरतीला हजर होतात. साधारण आठवडाभर राहून मग ही मंडळी आपापल्या देशाला परत जातात. हे सर्व ते सांगत असतांना मी नेमका प्रश्न विचारला, यातून तुम्हाला काय मिळतं. त्यावर आलेलं उत्तर देखणं होतं.
देवाला सगळं समजतं. त्याच्याकडे कशाला मागायचं. आम्ही काही मागत नाही. फक्त नमस्कार करतो. परत आमच्या कामावर रुजू झालो की, की जो उत्साह होतो, तोच देवाचा आशीर्वाद मानतो. मी पुन्हा एकदा देवाला आणि त्या परदेशी नागरिकांना नमस्कार केला. पुढचे दोन दिवस अशीच शांतपणे उज्जैनची भटकंती केली. फार थोडा वेळ मोबाईल आणि कॅमेरा वापरला. मग जाणवलं की ही भटकंती काही वेगळीच असते. कॅमे-यातले फोटो नंतर क्वचित बघितले जातात. पण मनात, ह्दयात बसलेलं दृश्य कधीही पुसलं जात नाही. आत्ताही नजरेसमोर रामघाटावरील मंदपणे तेवणारे दिवे आहेत. मंदिरामधील गुलांबांचा मंद सुवास आसपास असल्याची जाणीव होते. गल्लोगल्ली असलेल्या मोठ्या दुधाच्या कढईमधील दुधाचा स्वाद जिभेवर येतो...पर्यटन हे असेच हवे...कॅमे-याच्या पलीकडे...ह्दयात कायम रहाणारे...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
👌👌
ReplyDeleteखूप छान वर्णन केले आहे.
ReplyDeleteखूप छान प्रवास वर्णन , वाचताना आपण प्रत्यक्ष अनुभवतोय असे वाटते. उज्जैन येथील खूप उपयुक्त माहिती मिळाली जी कधी ऐकली नव्हती.हे सर्व वाचून नक्की इंदूर आणि उज्जैन येथे जायला आवडेल
ReplyDelete