ती आणि तिचे कुटुंब....

 

ती आणि तिचे कुटुंब....




ठाण्यावरुन ट्रेन पकडणे हा एक टास्क असतो.  तोच टास्क करत होते.  सोबत खरेदी केलेल्या दोन सामानाच्या बॅगा सांभाळत गाडी पकडणार तोच मागून कोणीतरी जोरात माझी बॅग पकडली आणि मागे खेचले.  मी जवळपास धडपडत मागे आले आणि कोणी बॅग पकडली म्हणून रागात मागे बघितलं तर एक हसमुख चेहरा दिसला. मी त्या चेह-याला पाहून पाच-दहा वर्ष होऊन गेली असतील.  आता केस पिकलेले, चेह-यावर थोड्या सुरकुत्या आलेल्या पण त्या चेह-यावरचा आनंद तोच होता.  साठीच्या पुढे असलेल्या त्या बाईनं मला मागे खेचलं आणि जोरात मिठी मारली.  क्षणभर मी सुद्धा गोंधळले.  काय चालू आहे, हे आसपास कोणाला समजत नव्हते,  गाडीतून उतरलेल्या महिला आम्हाला बाजूला करुन त्यांच्या कामाला जात होत्या.  त्या बाईचा उत्साहाचा जोर जरा कमी झाला आणि मी तिच्या मिठीतून बाहेर आले.  कमलाताई...तुम्हीच आहात ना...कशा आहात, किती वर्षांनी भेटलो आपण.  इथे, ठाण्यात काय करता.  म्हणून मी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.  ताई, मी बरी आहे हो...तुम्ही कशा आहात.  तुम्हाला बघून बरं वाटलं.  मी बरी आहे, त्याला कारण तुम्हीच आहात.  एवढ्या वर्षांनी भेटलात.  चला घरी, वर्षाताईंनाही तुम्हाला बघून बरं वाटेल.  तुम्हाला असंच जाऊ दिलं तर त्या रागवतील माझ्यावर.  हे फक्त म्हणून कमलाताई थांबल्या नाहीत, तर मला पार खेचून नेऊ लागल्या.  माझ्या हातातील एक पिशवी त्यांनी घेतली आणि त्या भराभर चालू लागल्या.  मी त्यांच्या उत्साहाकडे बघू लागले आणि मला साधारण बारा वर्षापूर्वीच्या कमलाताई आठवल्या. 


मुलाच्या शाळेच्या दिवस होते ते.  लेकाची बस दुपारी अडीचच्या सुमारास यायची.  त्या वेळेच्या आसपास मी बसस्टॉपवर हजर असायचे. बस आली की लेकासोबत घर आणि मग पुढचे सगळे....या सर्वात काही दिवसांनी लक्षात आले की, बसस्टॉपवर एक महिला नेहमी कोप-यात बसलेली असायची. बसमधून येणा-या दोन मुलांना ती ताब्यात घ्यायची आणि निघून जायची.  तिचा कोपरा ठरलेला होता.  कोणाशीही चकार शब्द न बोलणारी ती महिला एकदिवस बसला उशीर झाला म्हणून कावरीबावरी झाली.  आम्हा काही पालकांना फोन करुन बसला आणखी पंधरा-वीस मिनिटांनी येणार असल्याची माहिती मिळाली होती.  ती बाई, आमच्या चेह-याकडे आशेनं बघत होती.  मग तिला तसं सांगितलं, तरीही तिच्या चेह-यावर काळजी होती.  काय झालं, म्हणून विचारल्यावर तिनं घाबरत एक कागद पुढे केला.  या नंबरवर जरा फोन लावून देता का.  म्हणून विचारले.  चौकशी केल्यावर कळलं, की ज्या दोन मुलांना ती घ्यायला यायची त्या दोन मुलांच्या पालकांचा तो नंबर होता.  हे पालक ठरलेल्या वेळेत घरी फोन करत असत, आत्ताही करणार होते, आणि फोन नाही उचलला तर त्यांनाही काळजी वाटणार होती.  मी त्यांनी दाखवलेल्या नंबरवर फोन करुन त्या महिलेच्या हातात दिला.  त्यांनी अगदी दबक्या आवाजात त्या पालकांना बस उशीरा येत असल्याचे सांगितले, जुजबी बोलून फोन माझ्या हातात दिला आणि थॅक्यू, थॅक्यू म्हणू लागल्या.  माझ्यासोबत असलेल्या आणखी दोन आया थोड्यावेळानं येईन, असं सांगून घरी गेल्या.  मी मात्र तिथेच घुटमळत राहिले.  त्या पंधरा मिनीटात माझी आणि कमलाताईंची पक्की ओळख झाली.  कमलाताई अगदी चार महिन्यापूर्वीच शहारात आल्या होत्या.  बीडमध्ये त्यांचं घर होतं.  नवरा कुठल्याशा मीलमध्ये कामगार होता.  कमला शेतावर काम करायच्या.  पण या सर्वात नव-याचा मारही सोबत होता.  कमलाला ही गोष्ट नेहमीची होती.  पण एक दिवस मोठी बहिण आलेली आणि तिच्यासमोरच कमलावर हात उचलला.  तिथेच जोरदार भांडण झालं.  कमलाच्या माहेरची परिस्थिती बेताची.  तिच्या आईनं हात वर केले.  आज ना उद्या नवरा सुधारेल म्हणून तिला तिथेच रहायला सांगितलं.  पण नंतर परिस्थिती अजून खराब झाली.  कमलाची सासू आणि सासरे सोबत रहायला आले.  अजून वादावादी सुरु झाली.  त्यात कमलाला बाळ नाही, म्हणून वादावादी वाढली.   शेवटी कमलानं पुन्हा मोठ्या बहिणीला बोलवून घेतलं.  यावेळी कमलाची ताई आली ती कमलाला सोबत घेऊनच निघाली. 

कमलाची ताई तिला थेट शहरात तिच्या घरी घेऊन आली.  ती तरी कुठे


श्रीमंत होती.  तिची चाळीत खोली होती. धुण्याभांड्याची काम ती करत होती.  कमला महिनाभर ताईसोबत होती,  नंतर ताईनं तिची सोय चाळीतल्या अगदी कोप-यातल्या खोलीत करुन दिली.  तिला खाकरा कारखान्यात काम दिलं, आणि हे मुलाला आणण्याचं काम मिळवून दिलं.  दरम्यान कमलानं फोन करुन नव-याची खुशाली घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यानं आता येऊ नकोस म्हणून सांगितलं.  कमला पार कोलमडली.  आईनं बहिणीला दोष दिला.  बहिणसुद्धा कमलाची माफी मागू लागली.  माझ्यामुळे तुझा संसार मोडला म्हणून तिची माफी मागत होती,  पण त्याचवेळी कमलानं तिला आपली पाठ दाखवली.  जखमांच्या वळांनी भरलेली आपल्या बहिणीची पाठ बघून ताईनं आपलं रडणं आवरलं,  कमलानं झालं ते बरं झालं म्हणत ताईला आता ती परत जाणार नसल्याचं सागितलं.  कमला बोलत असतांना थरथरत होती.  पण तिच्या डोळ्यातील निश्चय पाहून मी तेव्हा तिच्या पाठीवरुन नकळतपणे हात फिरवला.  आमची दोघींची पक्की ओळख तिथेच झाली.  सकाळी खाक-याच्या कारखान्यात त्या कामावर जात.  तिथून मुलांना शाळेतून आणायची कामं आणि सायंकाळी जेवणाची कामं त्यांना मिळाली.  या सर्वात माझ्या एका मैत्रिणीला तिच्या मुलींना बसस्टॉपवरुन आणण्यासाठी विश्वासू बाई हवी होती.  मी कमलाताईंचे नाव पुढे केले.  ही वेळ सायंकाळची होती.  तेवढे दोन तास कमलाताईंचे खाली होते. त्यामुळे त्यांनी त्या कामाला हो सांगितले. कमलाबाईंना हे नवीन काम अधिक सोयीचे ठरले.  पुढे येथेही सायंकाळचे जेवणाचे काम त्यांना मिळाले.  कमलाताई त्या मुलींच्या हक्काच्या मावशी झाल्या.  एकदा या माझ्या मैत्रिणीचे सासरे गावी आजारी झाले.  त्या दोघांनाही जाणे गरजेचे होते.  पण मुलींची बारावीची परीक्षा चालू होती.  अशावेळी मुलींची जबाबदारी कमलाताईंनी घेतली.  अगदी आठवडाभर मुलींना त्यांनी सांभाळले.  आठवडाभर हे घर त्यांच्या ताब्यात होते, पण एकडची काडी तिकडे झाली नाही.  या गोष्टीनं मैत्रिण भारावली.  तिनं मला मुद्दामहून फोन करून तोंड भरून कमलाताईंचे कौतुक केले. 

या सर्वात माझा आणि कमलाताईंचा मात्र संपर्क कमी झाला.  लेकाची शाळा संपली आणि माझा बसस्टॉप सुटला.  त्यातच माझ्या मैत्रिणीनं ठाण्याला घर केलं.  तिच्या दोन्ही मुली कॉलेज पार करुन नोकरीला लागल्या.  पण कमलाताईंना विसरल्या नाहीत.  कमालाबाईंना एक दिवस बोलावून चांगला पाहुणचार केला.  कमलाताई परत आल्या,  पण त्या पाठोपाठ या मुलींचा पुन्हा या म्हणून निरोप आला.  कमलाताई पुढच्या रविवारच्या सुट्टीत त्या घरी गेल्या तेव्हा सर्वांनी त्यांना आता इथेच रहा म्हणून आग्रह धरला.  त्यांना चोवीस तासाचे पैसे किती याचा हिशोब सांगितला.  एक स्वतंत्र खोली दिली.  या मैत्रिणीच्या मुलीचे लग्न होणार होते, दुसरी शिक्षणासाठी बाहेर जाणार होती.  अशात मैत्रिण आणि तिचे यजमान दोघंही निवृत्त होत होते.  त्यांच्याही आरोग्याच्या काही तक्रारी होत्या.  अशावेळी त्यांच्यासोबत कोणी विश्वासू असावे अशी मुलींची इच्छा होती.  त्यात कमलाताई फिट बसल्या.  कमलाताईंनी पंधरा दिवसांची मुदत मागितली.  घरी आल्यावर त्या ताईबरोबर बोलल्या.  एवढ्या सगळ्यात तिच त्यांच्यासाठी कुटुंब होती.  तिनं सांगितलं, माणसं बघ, चांगली असतील तर ठाण्यातच काय पण वाळवंटात पण सुखात रहाशील.  कमलाताईंनी आपली इथली सर्व कामं दुस-या बायकांना दिली आणि एक बॅग घेऊन ठाण्याचे घर गाठले. 

आता हेच त्यांचं घर झालंय.  मला त्या त्यांच्या घरी घेऊन गेल्या तेव्हा वर्षाला, माझ्या मैत्रिणीला कोण आनंद झाला.  मग भरपूर गप्पा झाल्या.  गप्पांचा विषय अर्थातच कमलाताई.  त्या या घरच्या ताई झालेल्या.  त्या ठाण्याला गेल्यावर वर्षाच्या मोठ्या मुलीचं लग्न झालं.  कमलाताई घरच्या लग्नासारख्या राबल्या.  आता या कुटुंबात त्यांचा शब्द मोठा होता.  वर्षा त्यांना फक्त मोठ्या बहिणीचा मान देत होती, असं नाही तर त्यांची तशी काळजीही घेत होती.  घरात सर्व कामं करायला आणखी एक मावशी येत होत्या.  त्यांना सूचना देण्याचे काम कमलाताईंचे.  कोरोनाकाळात तर या तिघांनी घरात खूप मजा केली.  वर्षा स्वतःसोबत त्यांचीही सर्व वैद्यकीय तपासणी करुन घेते.  त्यांच्या नावानं एका बॅंकेत अकाऊंट उघडलेय.  त्यात ठराविक पैसे ती टाकत असते.  कमलाताई मला भेटल्या तेव्हा त्यांच्या बहिणीच्या घरी गेल्या होत्या.  यातलेच काही पैसे त्या आता आपल्या बहिणीला देतात. 

माझ्यासमोर पोह्यांची डिश ठेवतांना कमलाताई भारावलेल्या आवाजात म्हणाल्या, मला हे घर तुम्ही दिलंत.  खूप उपकार आहेत माझ्यावर.  मी काही बोलणार एवढ्यात वर्षा म्हणाली,  ताई, तू कुठे चाललीस, इथेच ये, सोबत खाऊया.  तू बस मी करते कॉफी...कमलाताई डोळ्याला पदर लावत माझ्या बाजुला बसल्या.  त्यांच्या नवीन कुटुंबात त्या सुखी होत्या.  काहीवेळानं वर्षाचे मिस्टर आले.  त्यांच्या हातात दोन पिशव्या होत्या.  त्यांनी आल्याआल्या कमलाताईंना हाक मारली.  कमलाताई त्यांनी आणलेल्या वस्तू बाहेर काढू लागल्या.  वर्षाची धाकटी मुलगी येणार होती.  तिच्यासाठी कमलाताईंची तयारी सुरु होती. 

वर्षा आणि तिच्या मिस्टरांबरोबर गप्पा मारत मी निरोप घेत असतांना कमलाताई पुढे आल्या.  एक डबा माझ्या हातात सरकवला.  लाडू आहेत, म्हणून  मला पुन्हा मिठी मारली.  पुन्हा नक्की येईन, म्हणून मी त्या तिघांचा निरोप घेतला.  कमलाताईंकडे बघितले तर त्या डोळ्याला पदर लावत होत्या.  वर्षानं त्यांच्या खांद्यावर हात ठेवला होता.  एक नवीन कुटुंब तयार झालं होतं.  रक्ताच्या नात्यापेक्षा विश्वासाच्या नात्याचं....

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

  

Comments

  1. झकास कमला

    ReplyDelete
  2. जयंत बने22 December 2024 at 00:14

    खूप सुंदर लेख.

    ReplyDelete
  3. ह्रदयाला स्पर्श करणारी सुंदर कथा... शिल्पा, तुझ्यात चांगला कथा लेखक दडलेला आहे. एका झटक्यात वाचून झालं👍💐

    ReplyDelete
  4. खूप छान लेख आहे मन स्पर्शी लेख आहे.

    ReplyDelete
  5. आदरणीय सई जी नमस्कार
    आपण खूप छान पद्धतीने कमलताई च्या जीवनावर आधारीत वर्णन केलं..
    आपल्या विशाल हृदयात कमलाताईंनी स्थान मिळवलं त्यांच्या जीवनात सार्थक झालं शेवटी एकच सांगावसे वाटते
    कर भला तो हो भला
    धन्यवाद
    पाटील

    ReplyDelete

Post a Comment