हिवाळी शास्त्राची सुरुवात
आज तरी होणार का...तुला जर जमतच नसेल तर मी बाहेरून विकत आणतो....चव बघायला काय जातंय...असा रोखठोक डायलॉग टाकून माझा नवरा निघून गेला....हा वाद सुरू होता, मेथीच्या लाडवांवरुन. डिसेंबर महिना सुरू झाल्यावर थंडी असो वा नसो, घरात मेथीचे लाडू झालेच पाहिजेत, हा आमच्या घरचा दंडक आहे. मात्र यावेळी डिसेंबर महिना संपत आला तरी मेथीच्या लाडवांचा पत्ता नव्हता. त्यामुळे नवऱ्याची गाडी वैतागलेली. यात भर म्हणून की काय, मी मेथीच्या लाडवांसाठीचे सगळं सामान घरात आणून अगदी ओट्यावर मांडून ठेवलं होतं. आज करू, उद्या करू, असं म्हणत आठवडा उलटून गेला तरी लाडू झाले नाहीत. त्यामुळे नवरा वैतागला आणि त्यानं त्याच्या भाल्यातील रामबाण काढून मला लगावला. डिसेंबर चा महिना यावेळी खूप दगदगीचा ठरला. दर दिवसाला एक लग्न. या सर्व गडबडीत हे लाडू लांबले आणि घरात कडवट वाद सुरू झाले. मग काय, हातातील सर्व कामं बाजुला केली. लाडू करायचे नियोजन केले. त्यादिवशी ही एका रिसेप्शनला जायचे होते. पण ते संध्याकाळी असल्यामुळे सकाळचा पूर्ण वेळ या लाडवांसाठी ठेवला. मेथीचा लाडू हा सर्वात सोपा सहज असा पदार्थ.
फक्त मेथीचा कडवटपणा जपायचा असतो एवढंच. एकदा का मेथीच्या दाण्यांचा लाडू झाला की त्याताला कडवटपणा संपतो. फक्त हे लाडू करताना अगदी थोडीशी काळजी घ्यावी लागते. मेथीचे ताळतंत्र कळलं की या मेथीचे गोड गुणधर्म पुढे येतात.
मेथीच्या लाडवांचे एक चांगले म्हणजे त्यात तुम्हाला काय हवंय आणि किती हवंय याचा नियम अजिबात नसतो. काजू, बदाम, खारीक, अक्रोड, वेलदोडे हे तुम्हाला हवंय तेवढं घाला. माझ्या बऱ्याच मैत्रिणी फक्त या काजू, बदाम, अक्रोड आणि खारकांसह मेथीचे लाडू करतात. अगदी त्यात गोडांबी, अळीव असं काहीही घालतच नाहीत. पण वर्षातून एकदाच होणाऱ्या या सोहळ्याला असं लिमिटेड ठेवायला मला आवडत नाही. त्यामुळे अगदी भरभरून जिन्नस मी या लाडवात टाकते. मेथी तर या लाडवांमधील राणीच. पण त्यासोबत सैन्यही बरंच असतं. काजू, बदाम, खारीक पावडर, अक्रोड, आळीव, आळशी, खसखस, गोडांबी, सुकं खोबरं, गुळ, तूप, मखाना, गव्हाचं पीठ, भोपळ्याच्या बिया, खरबुजाच्या बिया, सूर्यफूलाच्या बिया, डिंक, सुंठ पावडर, वेलदोडा पावडर आणि जेवढी मेथी तेवढेच दूध. मेथीचे लाडू करताना वेळेचं एक बंधन असतं, ते मेथीच्या दाण्यांची बारीक पावडर दुधात भिजवतांना सांभाळावं लागतं. साधारण सकाळी सात ते आठ च्या दरम्यान मेथी हलकी
गरम करून ती मिक्सर मधून पार बारीक करून घेतली. सुरुवातीला म्हटलं होतं ना की मेथीचे लाडू करायला एकदम सोप्पे असतात फक्त त्याचं एक छोटसं सूत्र पाळावं लागतं ते सूत्र इथे उपयोगी पडतं. मेथी हलकी गरम करायची असते, ती फार भाजली गेली तर कडवट होते हे एकदा लक्षात आलं की मग मेथीचे लाडू कधीही बिघडत नाहीत की कडूही होत नाहीत. अर्थात मी सुद्धा हे सूत्र अनुभवातून शिकले. हलकी गरम झालेली मेथी मिक्सरमध्ये अगदी पावडर सारखी झाली की एका मोठ्या भांड्यात तिला तेवढ्याच दुधामध्ये भिजवत ठेवायचं. याच दुधात साधारण चार चमचे तरी तूप घालायचे आणि चांगलं ढवळून तसंच एका बाजूला ठेवून द्यायचं. अगदी सुरुवातीला हे मिश्रण पातळं वाटतं, पण जेव्हा आपण लाडू करायला सुरुवात करतो तेव्हा याचा एक घट्टसर गोळा झालेला असतो. बऱ्याच मैत्रिणी मेथी फक्त दुधामध्ये किंवा तुपामध्ये भिजवतात. पण मी मात्र या दोघांचाही वापर करते. कारण जेव्हा आपण ही भिजवलेली मेथी भाजायला घेतो तेव्हा थोडा चिकट गोळा होते. पण या तूप असेल तर मात्र हा गोळा पटापट मोकळा होते, असा माझा अनुभव आहे. ही अशी भिजवलेली मेथी साधारण आठ तास तरी बाजूला ठेवावी. मी सुद्धा ती तशीच बाजुला करुन दुपारच्या जेवणाला लागले. दुपारची जेवणं झाली आणि मग बाकीचे सर्व जिन्नस काढून ते भाजायला घेतले. मी जेवढी मेथी घेते तेवढ्याच प्रमाणात हे बाकीचे जिन्नस घेते. फक्त मखाणे आणि गव्हाचे पीठ मात्र दुपटीने घेते.
हे सर्व जिन्नस भाजण्यापूर्वी अगदी छानसे सजवून ठेवले की लाडू करायचा उत्साह अधिक वाढतो. अशीच छान सजावट करून मी बरोबर दोनच्या ठोक्याला लाडू करायला सुरुवात केली. दोन गॅस वर दोन कढया चढवल्या आणि लाडवाच्या कामाला लागले. यातील कुठलेही जिन्नस भाजण्यासाठी मी तुपाचा वापर करत नाही. अपवाद फक्त गव्हाचे पीठ आणि मेथी आणि डिंक. यातील सर्वच जिन्नसांमध्ये थोडे बहुत तेलाचे प्रमाण असते त्यामुळे भाजतांना तूप नाही टाकले तरी चांगले भाजून निघते. मखाणे हा एक कोरडा जिन्नस आहे. पण मखाणे कोरडे भाजले तर आधीच छान लागतात. बऱ्याच वेळा मखाण्यामध्ये थोडीफार माती असते आणि त्याची कचकच लागू शकते. मखाणा कोरडा भाजला तर कढईच्या तळाला अगदी किंचितशी तरी माती निघतेच. म्हणून मखाणा भाजला की एकदा तरी कढई स्वच्छ पुसून घ्यावी लागते. सर्व जिन्नस भाजून झाले की चांगले थंड करून घ्यायचे आणि मगच मिक्सरमध्ये त्यांची पावडर करून घ्यायची. अर्थात हेही प्रत्येकाच्या पसंतीवर आहे. बरेच जण या चिन्हासाची भरड करतात. मी मात्र खसखसही एकदा मिक्सरमधून फिरवून घेते, त्यामुळे त्याचा स्वाद अधिक वाढतो. मग या सर्वानंतर वेळ येते ती तुपामध्ये भाजून घ्यायच्या जिन्नसांची. त्यात मी पहिला क्रमांक देते तो डिंकाला. कारण डिंक भाजायला चांगलं वाटीभर तरी तूप लागतं. डिंक भाजून छान फुलला की पुन्हा पाच दहा मिनिटं थांबून या डिंकाला मिक्सरमधून फिरवून घ्याचयं. त्यात बऱ्यापैकी तूप असल्यामुळे त्याची थोडी पातळशी पेस्ट होते. मग ही पेस्ट पुन्हा एकदा मंद आचेवर भाजून घ्यायची. अशामुळे
एखादा जरी डिंक फुलायचा राहिला असेल तर तो पुन्हा भाजला जातो आणि मग नंतर दातावर चिटकत नाही. नंतर नंबर असतो तो गव्हाच्या पिठाचा. गेल्या दोन वर्षापासून मी या मेथीच्या लाडवांमध्ये खपली गव्हाच्या पिठाचा वापर करते. या पिठामध्ये खुसखुशीतपणा जरा अधिकच असतो. त्यामुळे लाडवांची चवही अधिक चांगली होते. हे पीठ भाजतानांनही अगदी नावापुरते तूप वापरते. पीठ भाजतांना बिस्किटांचा वास यायला लागला की समजायचं ओके. मग या सगळ्या नंतर येते ती या लाडवांची राणी. अर्थातच मेथी. आठ तास तुपामध्ये आणि दुधामध्ये भिजून या मेथीचा पार घट्ट आणि चिकटसर गोळा झालेला असतो. गोळा फोडून तो मळून घेणे हा एक मोठा टास्क असतो. मी शक्यतो या गोळ्याचे छोटे छोटे तुकडे करून ते मिक्सरमधून फिरवून घेते. त्यामुळे ते अधिक मोकळे होतात आणि भाजताना फार त्रास होत नाही. मेथीच्या लाडवांमध्ये बाकी कुठल्याही जिन्नसाला भाजतांना तुपाचा वापर होत नाही. पण जेव्हा मेथी कढईत जाते, तेव्हा मात्र ती अगदी तुपामध्ये पार बुडवून ठेवावी लागते. जेवढी मेथी तेवढेच दूध आणि तेवढेच तूप हे लाडवांचे आणखी एक सूत्र. कढईमध्ये तूप आणि दुधात भिजवलेली मेथी गेली की मात्र आपलं काम थोडे बहुत हलकं होतं. कारण तूप सगळी सूत्र हातात घेतं. गरम झालेलं तूप कढईमध्ये फैलावल्यावर मेथी आणि दुधाच्या गोळ्याला ताब्यात घेतं. सुरुवातीला
तुपाचं प्रमाण जास्त झाले की काय अशी शंका येते पण जसं जसं हे मिश्रण भाजलं जातं तसं तसं ते तूप आपसूक या दोघांमध्ये सामावलं जातं. मग हलकासा मेथीचा सुगंध घरभर पसरतो. त्यामध्येच दुधाच्या खव्याचा वास मिसळतो, आणि मग मेथी तयार, अशी सूचना मिळते. ही सूचना मिळू लागली ही वेळ येते एका अजून मुख्य जिन्नसाची. तो म्हणजे गुळ. गुळाचे तुकडे करून घ्यायचे आणि सरळ कढईमध्ये ठेवून द्यायचे. हे तुकडे वितळायला लागले की गॅस बंद करायचा.
सगळं तयार झालं की मग ज्या जिन्नसांची पावडर करून घेतली आहे त्या
जिन्नसांच्या वर अगदी दोन-चार चमचे भरून सुंठाची पावडर टाकायची. सोबतीला वेलदोड्याची पावडरही. हे सगळं मिश्रण त्या मेथी मध्ये टाकून चांगलं
हाताने मळून घ्यायचं. मग त्यावर पातळ
झालेला गूळ टाकायचा. मग पुन्हा सर्व
मिश्रण एक करायचं. फक्त गुळ गरम आहे,
याची आठवण ठेवत हे काम करायचं, आणि लाडू वळायला घ्यायचे.
मी दुपारी दोन वाजता सुरू केलेलं हे काम संध्याकाळी सात वाजेपर्यंत पूर्ण
झालं. परातभर लाडू तयार झाले. शेवटी शेवटी लाडू वळताना थोडं मिश्रण कोरडं होत जातं. अशावेळी अगदी गरज भासली तर एखाद दोन चमचे तुपाचा वापर करायचा किंवा जरा अधिक दाब देऊन लाडू वळायचे. मीही तसेच तयार केले. लाडू डब्यात भरत असताना संध्याकाळी जिथे जायचं होतं त्यांचे चार फोन येऊन गेले. मग काय...एक डबा त्यांचाही तयार केला. एक लाडू शास्त्राप्रमाणे देवासमोर ठेवला. लाडू तयार होत असताना चकरा मारत असलेल्या नवऱ्यानं आणि लेकानं त्यावर लगेच झडपही घातली. लाडवाचा पहिला घास घेत दोघांनीही हातानं फर्स्टक्लास अशी खूण केली. सकाळच्या आमच्या दोघांच्या खटपटीला मेथीच्या लाडवानी गोड केलं होतं. दोघांनीही तूपण लाडू खा, म्हणून आग्रह धरला. पण लाडू केल्यामुळे की काय, लाडू लगेच खायची इच्छा झाली नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व काम झाल्यावर या मेथीच्या लाडवाच्या बरणीकडे वळले. एक लाडू आणि सोबत हळदीचे दूध. लाडवाचा पहिला घास घेतला आणि त्यातील सर्व जिन्नसांची यादी समोर उभी राहिली. अगदी सुंठेची पावडरही. मेथीचा हलकासा कडवटपणा....पण त्यावरही गुळाची गोड किनार. या लाडवांस हेच तर वैशिष्ट्य आहे, कितीही आणि कशाही प्रमाणात जिन्नस असले तरी प्रत्येक जिन्नसाची चव खुलून येते. त्यावर हळदीचं गरम गरम दूध. कितीही थंडी येऊ दे. थंडीचं हे शास्त्र पाळलं तर तिचा तीळभरही त्रास होत नाही हे मात्र नक्की.
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
Tempting..
ReplyDeleteस्वादिष्ट लेख 🫠
ReplyDeleteThank you for sharing such a nice article 😊
ReplyDeleteKhup mast
ReplyDeletekhup chhan lekh
ReplyDeleteवाचतांना लाडू तयार होताना दिसत होता... खूप छान 👍🌹
ReplyDelete