एक दिवस हिरवाईचा
थांब, हात बाजुला कर. असं नाजूक साजूकपणे खाल्लंस तर चव लागणार नाही....म्हणत त्या काकूंनी मोठा डाव भरुन हिरवं गरगट्टं भाकरीवर टाकलं आणि वरुन चमचाभर तूप. आता खा आरामात, म्हणेस्तोवर मी त्या गरगट्टंसोबत भाकरीचा एक घास तोंडात घेतलाही होता. ती चव अफाट होती. गरगट्टं हा शब्द बोलायला जेवढा अवघड. पण त्याची चव ही कधीही विसरता न येण्यासारखीच होती. चार दिवसासाठी आलेल्या लेकाला कुठेतरी फिरायला न्यावे म्हणून मी अगदी गोव्यापासून, महाबळेश्वर, नाशिक पर्यंतचे प्लॅन तयार केले होते. पण आमची गाडी नाहीच...या शब्दावर अडून राहिली. फार गर्दी असेल तिथे नकोच, त्यापेक्षा घरीच राहू म्हणून तो हटून बसला. अशावेळी मला माझ्या एका जुन्या मित्राची आठवण झाली. त्यांनी शहापूरच्या खर्डी भागात छोटेसे शेत विकत घेऊन फार्म हाऊस बांधले आहे. ब-याचवेळा आम्हाला येण्याचा आग्रह केला पण मुहूर्त सापडत नव्हता. आता लेकाला तिथे जाऊया का, म्हणून विचारलं, तेव्हाही तिथे गर्दी नको, अशी त्याची एकच अट होती. मी मित्राला फोन केला, तेव्हा तो सुट्टीसाठी हिमाचलमध्ये गेलेला. त्याला कोण आनंद झाला. शेत फुललंय म्हणाला. जा नक्की म्हणून आग्रह केला. शेताची राखण करण्यासाठी एक जोडपं आहे, त्या काकू जेवणही छान करतात, त्यांना कळवतो म्हणाला आणि मी तयारीला लागले. सकाळी लवकर जायचे आणि रात्री परत यायचे या अटीवर लेकही
तयार झाला आणि माझ्या खाद्यपदार्थांच्या पुस्तकासाठी एक फक्कड पदार्थ मिळाला.
सकाळी साडेआठच्या सुमारास या फार्महाऊस वजा शेतावर आम्ही पोहचलो. एवढ्या सकाळी कोणी निघतं का, म्हणून कुरबूर
करणारा माझा लेक तो परिसर बघूनच शांत झाला.
शेताच्या कोप-यावर एक छोटंस घर दिसत होतं.
गाडी बघून एक साठी ओलंडलेले गृहस्थ समोर आले, त्यांनी नाव विचारलं आणि फाटक
उघडून आम्हाला आत घेतलं. रात्रीच फोन आला
होता. आम्ही केव्हाची वाट बघतोय. विहिरीवर चला, हातपाय धुवून घ्या आणि पहिलं
नाष्टा करुया म्हणून त्यांनी आम्हाला थेट विहिरवर नेलं. मोटार चालू केली आणि पाणी धो धो वाहू
लागलं. नाही म्हणायला शहरापेक्षा तिथे
थंडी जास्तच जाणवत होती. त्यात शेतावर
असलेल्या झाडीनं अधिक गार होतं. त्यात हे
थंड पाणी. पण त्या पाण्याचा प्रवाह चालू
झाला आणि आम्ही तिघंही थंडी विसरुन त्यात मिसळून गेलो. औट घटकेच्या प्रवासातला थकवा दूर झाला आणि
आम्ही त्या घराकडे चालू लागलो. दूरुनच
चुलीच्या धुरात मिसळलेला दुधाचा वास येत होता.
आम्ही त्या चुलीपर्यंत गेलो तर डोक्यावरचा पदर सावरत एक साठीची महिला पुढे आली. कधीचं दूध ठेवलंय, पण पावण्यांचा पत्ताच
नाही. आटून चाललंय बसा पटापट, नाष्टा करु
आधी म्हणत त्या काकूंनी आमचा जो ताबा घेतला तो सायंकाळी निघेपर्यंत त्यांनी
आम्हाला सोडलंच नाही.
फार्म हाऊस वजा शेतावर सगळ्या सुविधा होत्या. छोटासा गोठाही होता. त्यात दोन गायी. एरवी त्यांचे दूध शेताच्या मालकाच्या घरी जात असे, पण आता तो मालकच फिरायला गेलेला. त्यामुळे त्या काकू रोज दूध आटवून त्याचा खवा करुन ठेवत होत्या. आम्ही गेलो तेव्हा तसेच दुध आटवायला ठेवले होते. सकाळच्या नाष्ट्यासाठी त्यांनी थालीपिठाची तयारी केली होती. शेतातच कांद्याची पात होती. त्या कांद्याच्या पातीमध्ये आमच्यादेखत
त्यांनी थालीपिठाचं पिठ मळलं आणि थालिपीठं टाकायला सुरुवात केली. मिरची हवी का बाळा तुला, म्हणून मध्येच लेकाला प्रश्न केला. त्यानं हो म्हटलं, आणि त्या म्हणाल्या, जा तिकडं विहिरीकडं, तिथे हाय बघ मिरचीचं झाड, तुला हवी तेवढी तोडून आण. पहिल्यांदा लेक गडबडला. अशी कधी वेळच आलेली नाही ना. पण नंतर सावरला आणि पळत सुटला. चार मोठ्या मिरच्या घेऊन येतांना मी त्याला पहिलं आणि आजचा बेत सफल झाल्याची जाणीव झाली. तोपर्यंत त्या काकांनी लोणी भरलेला एक टोप आणून ठेवला होता. पहिलं थालीपीठ आजीनं लेकाला दिलं आणि त्यावर लोण्याचा मोठा गोळा घातला. त्या रिकाम्या तव्यावर तसंच लोणी टाकून त्यानं आणलेल्या मिरच्या टाकल्या आणि परतल्या. त्याचा ठसला लागला तरी लेकानं आनंदी चेह-यानं थालीपिठाची डीश पुढे करत सर्व मिरच्या आपल्या ताब्यात घेतल्या. आमच्यासाठीही थालीपिठ आणि लोणी असा नाष्टा देत त्या काका काकूंनीही थालीपिठ खात शेताची माहिती देण्यास सुरुवात केली. गेली पाच वर्ष हे दोघंही इथे रहात होते. शेतामध्ये भातपिकासोबत अनेक फळांची झाडं त्यांनी लावली होती. फुलांचा एक ताटवाही तयार केला होता. शिवाय अनेक भाज्याही शेतात होत असत. आमचा नाष्टा झाला आणि मग त्या काकूंनी जेवणाला काय करु म्हणून विचारले. शेतात वालाच्या शेंगा आहेत, पण अजून दाणा तयार नाही. चण्यांचा वाफा तयार आहे, चालेल का तुम्हाला म्हणून आम्हाला विचारलं आणि आम्हीही आनंदानं हो म्हटलं. शेत बघायला जातांना त्यांनी हातात दोन छोट्या टोपल्या दिल्या.
मग त्या विदेशातल्या भाजी पिकवणा-या व्हिडिओमध्ये असतो ना तसा सिन सुरु झाला. काकूंनी थेट त्या चण्याच्या वाफ्याकडे नेलं. त्यातून चणे कशे तोडायचे हे सांगितले. मग चणे तोडून झाल्यावर, कांदा जिथे लावला होता, त्या वाफ्याकडे गेलो. तिथून लेकाला दोन मोठे कांदे उपटायला सांगितले. मग टोमॅटो, अगदी बडीशेपचं रोपटंही होतं. त्याच्यावरचे बडीशेपचे कोंब काकूंनी तोडून त्या टोपलीत टाकले. कोथिंबीर चांगली झाली होती, ती घेतली. मग थोडाफार फेरफटका मारुन झाल्यावर पुन्हा घराकडे परत आलो. तिथे चुलीवर ते दुध मोठ्या कढईत आटत आलेलं. आजीनं ती कढई फक्त निखारे होते, त्या चुलीवर चढवली आणि कामाला लागल्या. मी चणे सोलून देते, असं म्हटलं तर त्या म्हणाल्या थांब जरा. तुला दाखवते. मग एक मोठ्या चाळणीत त्यांनी ते चणे टाकले आणि त्यावर अगदी मोठे निखारे ठेवून दिले. काद्यांची पात वेगळी करुन कांदा, लसूण, आलं, टोमॅटो आणि नारळाची एक वाटी त्यांनी चुलीमध्ये टाकली. लेकाला पुन्हा मिरच्या आणण्यासाठी पळवले. त्या मिरच्याही चुलीत गेल्या. मग सर्व भाजलेले पदार्थ एकएक करत त्या काकूंनी वाटायला घेतले. आमच्यासमोर ते भाजलेले चणे सोलायला ठेवले आणि त्या वाटण करायला लागल्या. पाट्यावर या वाटणाचा मोठा गोळा तयार झाला तोपर्यंत आम्ही चणे सोलले होते. ते असेच रश्यात जाणार असा माझा अंदाज होता, पण काकूंनी त्यांनाही पाट्यावर घेतले. याला गरगट्टं म्हणतात...म्हणून त्या माहिती देऊ लागल्या. सर्व वाटून झाल्यावर त्यांनी मोठी कढई चुलीवर ठेवली आणि वाटीभर तेल टाकून कडीपत्याची फोडणी दिली. जिरं, राई टाकून हळद टाकली आणि हे वाटण टाकलं. वाटणाचा रंग हिरवाच झाला होता. ते ढवळतांना त्यांनी पुन्हा लेकाला शेतात पाठवलं, कोथिंबीर आणि कांद्याची पात अजून लागणार होती. त्यांनी एकीकडे भाक-या थापायला घेतल्या. त्या गिरगट्टाचा घमघमाट सुटायला लागला तेव्हा काकूंनी काकांना...तेवढी, चार बोर आणा ओ पिकलेली, म्हणत हाक मारली. काकाही लगेच चारच्या ऐवजी दहा-बारा बोरं घेऊन आले. काकूंनी ती धुवून त्या गिरगट्टमध्ये टाकली. मस्त चव येते बघ, म्हणत त्यांनी बडिशेपाचे तुरेही त्या रश्यात टाकले. लेकानं कोथिंबीर आणि कांदा आणला. मग परत काका, लेक आणि नव-याला घेऊन शेतावर गेले. टोमॅटो आणि चांगले पिकलेले पेरु घेऊन ते आले आणि माझी कळी आणखी खुलली. टोमॅटो, कांद्याची कोशिंबीर आणि पेरुच्या अख्य्या फोडी. एव्हाना काकांनी त्या आटलेल्या दुधात कपभर साखर आणि चार वेलदोडे कूटून टाकले.
भात हवा का पोरी, म्हणून काकूंनी विचारलं, आणि आम्ही एकसाथ नाही
म्हणालो, आणि पंगत बसली. शेतावर काम करणारे दोघंही आम्हाला सामील झाले. काकूंनी भाक-या वाढल्या, कोशिंबीर, पेरुच्या फोडी आणि पुन्हा लोण्याच गोळा आला. ते गरगट्ट कधी चाखून बघते असं झालं होतं. मी भाकरीच्या बाजुला ते वाढून घेत असतांना काकू पुढे झाल्या. असं नाही, भाकरीवरच घे. म्हणत त्यांनी तो गरगट्ट भरलेला मोठा डाव माझ्या भाकरीवर आडवा केला, तुपाची धार त्या टाकत असतांनाच मी गरगट्टं आणि भाकरीचा तुकडा तोंडात टाकलाही होता. चव अशी की त्याचे वर्णन करताच येणार नाही. सर्व जिन्नस अगदी ताजे ताजे. मी हलकेच लेकाकडे बघितले. तो त्या भाकरी, गरगट्टं आणि तुपाच्या गोळ्यात गुंफला गेला होता. आजूबाजुला काय आहे, आपण कुठे आहोत, याचे भान सोडून तो ती भाकरी आणि गरगट्टं ओरपून खात होता. तो फक्कड मेनू झाल्यावर काकांनी आटलेल्या दुधाचे कप भरले. खरेतर पोट अगदी गच्च झाले होते, पण तो दुधाचा सुगंध मोहात पाडत होता. दुपारचा हा मेनू झाल्यावर मस्त लोळत पडावे असे मनात आले. पण काका काकू भलते उत्साही. आता चला, बाकीचं शेत बघूया, म्हणत त्यांनी आणखी दोन टोपल्या सोबत घेतल्या आणि आम्हाला सोबत चलण्याची खूण केली. शेताचा हा फेरफटका मारत असतांना दोघंही झाडा-पानांची माहिती सांगत होते. शेताच्या बांधावर असलेल्या झाडांवर पक्षांची घरटी होती. त्या पक्षांची माहिती त्यांनी दिली. गुंजांचे झाड होते. त्या गुंजा गोळा केल्या. मग फुलांच्या ताटव्याकडे आलो, तिथे गोंडा आणि शेवंती बहरली होती. कधीनाही ती हिरव्या रंगाची अबोलीही दिसली. हवी तेवढी काढ म्हणून काकूंनी परवानगी दिली तरी अगदी नावाला चार फुलं खुडली. एव्हाना घड्याळात पाच वाजले आणि आता परत निघालं पाहिजे, याची जाणीव होऊ लागली. चला, हा शब्द काढताच काका काकू एकदम ओरडले. चला, काय रहायचंय तुम्हाला. त्यांना समजवतांना आणखी अर्धा तास गेला. शेवटी काकू पुन्हा टोपली घेऊन शेताकडे गेल्या. टोमॅटो,
वालाच्या थोड्या शेंगा, चणे आणि चण्याचा पाला, कांदे, असं काढून ते माझ्या हातात दिलं. लेकाला मिरच्या आवडतात म्हणून त्यालाच त्या तोडायला पाठवल्या. हव्या तेवढ्या काढ रे, म्हणून मागून प्रेमानं सांगितलं. तेवढ्यात काक पेरु, बोरं घेऊन आले. आटलेलं दूध घेऊन जा. बाटलीत भरुन देते, म्हणून दोघंही आग्रह करु लागले. पण आता बस्स झालं. एक दिवस छानसा घालवायचा होता. तो इतका छान गेला, की सांगताही येणार नाही, म्हणत त्या दोघांनाही नमस्कार केला. पुन्हा येऊ तेव्हा एक दिवस राह्यलाच येऊ असा त्यांना शब्द देत निरोप घेतला, आणि गाडीत बसलो.
घरी परत येतांना फार काही बोललोच नाही. एक वेगळा दिवस झाला होता. सूर्यास्त बघत बघत शहरात गाडीनं कधी प्रवेश
केला हे समजले नाही. ती गर्दी पार करत घर गाठलं
आणि पहिला त्या काका-काकूंना फोन केला.
घरी पोहचलो, म्हणून त्यांना
सांगतांना एक प्रेमाचे नाते जोडले गेल्याची जाणीव झाली. दुस-या दिवशी काकूंसारखे गरगट्टं कर म्हणून
लेकानं आग्रह केला. अगदी तसेच होणार
नव्हते याची जाणीव होती. गॅस आणि मिक्सरचा
वापर करत केलेल्या या गरगट्टंचा पहिला घास घेतला आणि जाणवलं, काही गोष्टी या
ब्रॅण्डेडच असतात....त्यांची कॉपी शक्यच नसते...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
वाचूनच तोंडाला पाणी सुटले,सुंदर शब्दचित्रं!!
ReplyDeleteSuper Duper vedio 👍👍👍
ReplyDeleteजसं चुलीवरचं गरगट्ट ब्रँडेड आहे, तसेच आपल्या लेखातून एक दिवसाच्या शेती ट्रीपच वर्णन केलेले लिखाण देखील ब्रॅण्डेडच आहे.
ReplyDeleteआदरणीय सई जी नमस्कार
ReplyDeleteआज आपण आमचा सगळ्यात आवडता विषय छेडला
आम्ही आपल्याला कित्येक वर्षापासून गावी येण्याचे निमंत्रण देत आहोत..
आमचा गिरणा पट्टा अतिशय सुजलाम सुफलाम बहुतांश शेतकऱ्यांच्या फळबागाच आहेत आमच्याकडे लिंबू हा अतिशय चांगला उत्पादित होतो
गिरणा पट्टा जसा सुजलाम सुफलाम आहे त्याच्याच आशीर्वादाने शेतकरी ही धनधान्य संपन्न आहेत.
मुख्य पीक लिंबू फळबाग असल्यामुळे त्यात आम्ही काही वेगळे फळही घेतो त्यात डाळिंब असतात केळी असतात चिकू पेरू असतात घरच्यासाठी हिरव्या भाज्या सर्व प्रकारच्या छोट्या छोट्या वाफ्यांमध्ये लावलेल्या असतात आपण एकदा पूर्ण परिवारासह आपल्या मित्र-मैत्रिणींसह भेट द्या
आपली अतिशय सुंदर सोय होईल फक्त एक अनुभव घ्या 47/ 48 डिग्री सेल्सिअस तापमान भर उन्हाळ्यात लिंबूच्या बागेत आपल्याला किती प्रसन्न थंड आणि किती छान सुवास येतो याचा एकदा अनुभव घ्या!!
जगातले सर्व पर्यटन क्षेत्र विसरून जाल त्याचसोबत गाई म्हशी शेतात फिरण्यासाठी घोडा आमच्या पाटलांमध्ये एक म्हण आहे पाहुण्यांना शेत दाखवायला नेलं म्हणजे हात वर करतात आणि सांगतात हे टोक ते टोक क्षेत्र आहे...
आमच्याकडे एकरी कधीच विषय सांगत नाही
शहरी भागाकडे धावपळीचे जीवन जगणारे माझ्या प्रत्येक सहकारी आणि मित्रांना विनंती आहे की आपल्या परिवारासह काही दिवस निसर्गाच्या सानिध्यात या ती ओली माती तो सुगंध ते नदीचा खळखळणारे पाणी पाटाचं पाणी आणि मातीचा सुगंध एकदा अनुभव घ्या ताजे दूध ताजे फळ आणि त्या मोकळ्या प्रदूषणमुक्त वातावरणाचा आनंद घ्या
धन्यवाद
दादा पाटील
धुळे
खूप छान गरगट खूप छान.
ReplyDeleteKhup chhan lekh
ReplyDelete