बस्ता....

 

बस्ता....


वासंतीच्या घराची बेल मारली आणि आतले आवाज ऐकून चपापले.  घरात मोठमोठ्यानं बोलण्याचे आवाज ऐकू येत होते.  वासंतीचे सासू सासरे गावाला परत जाणर होते, त्यामुळे त्यांना भेटायला आम्ही दोघंही आलो होतो.  पण ते आवाज ऐकून आम्ही परत जाण्याचा निर्णय घेतला.  दरवाजा उघडण्याच्या आत निघूया, म्हणून वळलो, तितक्यात दरवाजा उघडला, तोही वासंतीनेच.  तू आहेस, ये.  घरात गोंधळ सुरु आहे, जरा आई बाबांना समजव ना...म्हणत वासंती अगदी हळू आवाजात बोलली आणि माझा हात धरुन थेट घरात घेऊन गेली.  वासंतीचं घर मोठं.  नुकतंच तिच्या लेकाचं लग्न झालेलं.  त्यामुळे छान सजवलेल्या त्या हॉलमध्ये तिचे सासू सासरे, नवरा आणि लेक आणि सून बसली होती.  आजी आजोबांच्या सामानाच्या बॅंगा बाजुलाच ठेवल्या होत्या.  त्यांच्या चेह-यावरचा तणाव पाहता, आम्ही दोघंही गोंधळून गेलो होतो.  सहज आलो, आजींना भेटायला. असं म्हणून निघू का, म्हणून मी वासंतीला खूण केली.  तेव्हा वासंतीचे सासरे पुढे आले, म्हणाले, पोरी काही वाद नाही.  फक्त एका प्रश्नावर आम्ही अडून राहिलोत.  जन्म गावात झाला आणि आयुष्यही गावात गेलंय.  त्यामुळे सगळी मतं जुनाट आहेत. तू बस...तुला काय वाटतं ते तू सांग.  म्हणत त्या आजोबांनी मला सरळ त्यांच्या घरगुती वादाच्या रिंगणात ओढलं.

 


वासंती माझी खूप चांगली मैत्रिण.  तिच्या लेकाचं नुकतच लग्न झालं.  या लग्नासाठी तिचे सासू सासरे आठवड्याभरासाठी आलेले.  दोघंही ऐंशीच्या घरातले.  पण पाठिचा कणा ताठ.  आजोबा याचे सगळे श्रेय गावच्या हवेला देतात.  गावी मोठी शेती.  आजोबा आजही सकाळी ग्लासभर दूध आणि बाजरीची भाकरी खाऊन शेतावर जातात.  दुपारी-रात्री जेवणातही भाकरी आणि शेतातील ताजी भाजी.  गावात असो वा शहरात, अगदी कुठेही फिरायला गेलं तरी आजोबांचा एकच पोशाख.  पांढरा शुभ्र सदरा, पांढरा लेंगा आणि पांढरी टोपी.  आजीही आजोबांसारखाच आहार घेणा-या.  पण आजींच्या नऊवारी साड्या बघून त्यांच्या हौशी स्वभावाची कल्पना सहज व्हायची.  रुंद जरकाठाच्या साड्यांवर तसाच मॅचिंग ब्लाऊज.  केसांचा अंबाडा.  त्यावर एखादं फूल किंवा गजरा.  डोक्यावर पदर. कपाळावर रुपयाएवढं कुंकू. गळ्यात मोठ्या काळ्यामण्यांचं मंगळसूत्र आणि सण, समारंभाला चपलाहार.  वासंतीचे हे सासू सासरे आले की मी हमखास तिच्या घरी जाते.  एकतर दोघंही गपिष्ठ.  गावच्या छान गमंत जमंत सांगणारे.  आजी येतांना भरपूर भाजी घेऊन येतातच, शिवाय त्या करायच्या नवनव्या पद्धतीही सांगतात.  वर्षातून दोन वेळा हे दोघं लेकाकडे आणि सूनेकडे रहायला येतात.  तेही अगदी चार दिवसांसाठी आणि बळजबरीनं.  त्यांना रहा हो, आणखी चार दिवस, म्हणून आग्रह केला की शेतातल्या सोन्याच्या गोष्टी सांगत रहातात.  इथे तुम्ही काय भाज्या खाता...आम्ही तिथं अशी शेतातली भाजी काढतो, आणि लगेच करुन खातो,  त्याची चव म्हणजे चवच.  या भाज्यांना चव नाही बघ.  हे त्यांचं अगदी ठेवणीतलं वाक्य.  पण यावेळी आजी-आजोबा ठरवून आठवडाभरासाठी आलेले.  त्यांच्या मोठ्या नातवाचं लग्न होतं.  लग्न झालं, पूजा झाली आता आजी आजोबा गावी निघाले होते.  कालपरावा त्यांच्या घरात पूजा झाली, तेव्हा वातावरण आनंदी होतं.  पण आज अजानक काय झालं, हा प्रश्न मला पडला होता. 

हॉलमध्ये गंभीर वातावरण पसलेले.  आमची दोघांची होणारी चुळबुळ बघून वासंतीच्या लेकानं, अजितनं सुरुवात केली.  काही नाही मावशी.  आजोबांना थोडे कपडे गावी नेण्याचा आग्रह केला, त्यावरुन ते नाराज झाले.  मला पुन्हा प्रश्न पडला.  कसले कपडे, आणि त्यावरुन रागवण्यासारखं काय आहे.  आता


आजी पुढे झाल्या.  त्यांची नेहमीची सवय...बोलण्याआधी पदर निट करणार...तसा पदर सावरत त्या बोलल्या,  अग हे लग्नाचे कपडे आम्ही गावी कशाला नेऊन ठेऊ.  मान्य आहे, घर मोठं आहे.  कपाटं आहेत.  पण मी म्हणते, लग्नात असे कपडे घ्यावे की, ज्यांचा नंतर उपयोग होईल.  आता लग्नात सुनेनं ते घातलेलं, लेंगे आम्ही गावी न्या म्हणतात.  तिथे ते तसेच पडून रहाणार, त्यापेक्षा वापरा म्हणून आम्ही सांगतो.  तर आमचं काय चुकलं, तूच सांग.  मला अजूनही काय गोंधळ चालला आहे, ते कळंत नव्हतं.  मी हळूच वासंतीकडे बघत मदत मागितली.  मग ती पुढे आली आणि बस्ता फाडणे या आपल्या पारंपारिक शब्दाची फोड ख-या अर्थांनं कळली. 

वासंतीच्या लेकाचं लग्न अगदी थाटात झालेलं.  वासंतीनं त्यासाठी भरपूर खरेदी केलेली.  सुनेला हवे तसे कपडे घेतलेले.  लेकानं आणि सुनेनं त्यांच्या पसंतीचे कपडे घेतले होते.  त्यात सुनेनं रिसेप्शनसाठी मोठा घेरदार घागरा-चोली घेतलेली.  त्याचा घेर तिला कमी वाटला की काय, तिनं त्याला अधिकचा केन केन लावून तो घागरा फुगीर करुन घेतला होता.  रिसेप्शनला ती जेव्हा त्या घाग-यात स्टेजवर आली, तेव्हा एखाद्या राजकुमारीसारखी वाटली.  मात्र नंतर त्यात तिची होणारी अडचण आम्हाला दिसू लागली.  अगदी जेवायला बसतांनाही तिचा मोठा गोंधळ उडाला.  लग्न समारंभ झाल्यावर गाडीत बसतांना तिचा गोंधळ झाला तो वेगळाच.  सासरी गृहप्रवेश झाल्यावर या नव्या सुनेनं पहिलं काम केलं, ते लेहंगा काढून साधी साडी नेसली.  सूनेची रिसेप्शेनला ही गडबड झाली असतांना वासंतीच्या लेकानंही लग्न लावतांना शाही थाटाचा पोशाख केला होता.  डोक्यावरच्या पगडीपासून ते पायातल्या मोजडीपर्यंत सर्वात शाही थाट होता.  आता त्याच दोन पोशाखावरुन वाद सुरु झाले होते.  सूनेच्या लेहग्यांची किंमत साठ हजाराच्या आसपास होती.  आणि लेकाचा पोशाख तीस हजारापर्यंत पोहचला होता.  पण या दोन्ही पोशाखांना घालून या नव्या जोड्याची हौस फिटली होती.  आता त्यांचा इथे काय उपयोग.  शिवाय या दोन्ही पोशाखांनी त्यांच्या कपाटातील मोठा कप्पा ताब्यात घेतला होता.  त्यामुळे नव्या सुनेची गैरसोय होत होती.  म्हणून नातवानं त्यावर उपाय काढला.  गावचं घर मोठं आहे.  प्रत्येकाची रुम आहे.  त्यात कपाटंही आहेत.  मग त्यातच हे कपडे ठेवायला आजी आजोबांकडे सोपवूया म्हणून दोघांनी ठरवलं.  एरवी नातवाचे कौतुक करणा-या आजोबांनी नातवाचा हा निर्णय ऐकला आणि पहिल्यांदाच त्याचा कान पकडला.  या कपड्यांबाबत त्यांनी आक्षेप घेतला नव्हता.  पण इतके महागडे कपडे जर पुन्हा वापरायचेच नाहीत तर घ्यायचे कशाला.  हा त्यांचा प्रश्न होता.  आजोबा त्यांच्या गावरान भाषेत त्यांचं म्हणणं सांगत होते, अग हिनं काय ते फगारणं घातलं होतं, त्यात तिला देवकालापण बसता आलं नाही.  तरणी पोर खुर्चीवर बसली आणि मी म्हाता-यानं खाली बसून पुजा केली. तू सांग बरं, आपला सरळ शालू घातला असता तर अशी शोभा झाली असती का...त्यांच्या या बोलांनी माझ्यासमोर त्या फुगलेल्या घाग-यामधली ती नववधू पुन्हा दिसली.  आता ती समोरच बसली होती, आणि आजोबांच्या बोलण्यानं अधिक खजिल झाली होती.  आजोबा मात्र सुरुच होते.  आमच्या बायकोला लग्नात शालू घेतलाय, तो अजून हाय....पांढ-या मलमलमध्ये बांधलाय.  अजून गावच्या लग्नात ती घालते.  एवढ्या वर्षांत गावतली किती लग्न या शालूवर तिनं केलीत.  आजोबांच्या या कौतुकावर आजीनं पुन्हा आपला पदर


निट केला, आणि सूत्र आपल्या हातात घेतली.  आम्ही काय तिला अडवत नाही.  तिला हवं ते तिनं घालावं.  आमच्या सूनेवर आम्ही बंधन नाही ठेवलं, तर नातसूनेवर कसं ठेऊ.  तिचा एकटीचाही दोष नाही.  लग्नाचे कपडे घ्या म्हणून सांगितलं आणि हे दोघं एकटेच गेले.  घेऊन काय आले, हे लाखभराचे कपडे.  तेही एकदाच अंगाला लावले.  आता ते ठेवायलाही जागा नाही, मी म्हणते असे कपडे घ्यायचेच कशाला.  आम्ही गावाला नेऊन काय कारणार त्यांचं.  तिथंही अडचणच होणार ना...आमच्यावेळी बस्ता फाडायचा म्हणजे एक सोहळाच होता.   अशा लाखभरात अख्या गावाला साड्या झाल्या असत्या.  चार जाणत्या बायका बरोबर असायच्या.  कपड्याची पोत बघायचो.   एकदाच नाही चांगली शंभरवेळा साडी घालता येईल का, हे बायका बघायच्या,  मगच घ्यायच्या.  आणि आता एवढ्या महाग कपड्यांना अंगाला एकदाच लावायचं....मी आजींच्या बोलण्यातली तळमळ जाणत होते.  पण हळूच वासंती आणि तिच्या नव्या सुनेवर नजर टाकली.  वासंती चुळबुळत होती.  तिला एक नवीन नातं सुरु करायंच होतं,  ती सून आता रडवेली झालेली तिला दिसत होती.   वासंतीनं मला खुण केली.  पण माझीची जणू वाचा गेलेली.  पण यावेळी नव-यानं बाजु सांभाळली.  तो पुढे झाला.  आजी मोठी चूकच झाली दोघांची.  पण ही पहिलीच चूक आहे.  त्यांना कुठे अनुभव आहे, संसाराचा, आता आला की बघा बरोबर पैसे वाचवत खरेदी करतील.  वासंतीचा गप्प बसलेला नवराही मग पुढे झाला.  त्यांनी वडिलांना समजावयाला सुरुवात केली.  मग नातू आजी आजोबांच्या गळ्यात पडला.   आजी आजोबांचा राग म्हणजे, आळवावरचं पाणी.  ते पटकन पडून गेलं आणि आळूचं पानं कोरडं राहिलं.  तसंच दृष्य समोर होतं.  ती नवी सून आजीच्या पदराशी खेळू लागली आणि वासंती आणि मी हुश्श केलं.  तोच क्षण साधत आम्ही दोघांनीही त्यांचा निरोप घेतला. 

वासंतीच्या घराबाहेर पडलो आणि नवरा सुरु झाला.  तुझं फगारणं कुठे आहे.  मला हिच अपेक्षा होती.  एका समारंभाला घेतलेला लेहंगा तसाच एका बॅगेत आहे.  त्याऐवजी....एवढा शब्द नव-याच्या तोंडातून बाहेर पडला आणि माझा पारा चढला.  बस्स...आता काही बोलायचे नाही...मी घालणार आहे तो पुन्हा...पण हे म्हणताच मला तो शब्द पुन्हा आठवला...अरे देवा...काय शब्द मनात बसला म्हणून मीच हसायला लागले...मग नवरा कशाला मागे रहातो....

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

 

 

 

Comments

  1. Lovely post dear ☺️👍🌈

    ReplyDelete
  2. अगदी खरं आहे खूप छान लेख आहे.

    ReplyDelete

Post a Comment