लळा लागला पाळणाघराचा
शैलाचा फोन आल्यावर मी काळजीत पडले होते. तिचा फोन अगदी साध्या कारणासाठी आलेला. तिच्याकडे हळदीकुंकू होतं. त्यासाठी आग्रहानं बोलावलं होतं. तिला फोनवरुन हो सांगितलं, पण माझ्यासमोर तिचा सोनू उभा राहिला. शैलाच्या घरात मोठा कुत्रा होता. तो तिचा सोनू. अगदी घरातील एका सदस्यासारखा. त्यामुळे त्याच्या गळ्यात साधा पट्टाही तिनं बांधला नव्हता. शैलाच्या घरच्यांना त्याच्या घरातील वावराचे काहीच वाटायये नाही. पण पंचाईत व्हायची ती माझ्यासारख्यांची. तिच्या घरातील बेल वाजवली की पहिली या सोनूची आरोळी ऐकू यायची. मग धडधड सुरु व्हायची. ब-याचवेळी शैला दार उघडतांना दरवाजाला चैन लावून कोण आलंय याचा अंदाज घ्यायची, मग माझ्यासारखे पाहुणे बघितले की पहिलं ती सोनूला आतल्या खोलीत बंद करुन ठेवायची. बरं हे सर्व त्या सोनूला पाठ झालेलं. त्यामुळे त्या दोघांचा बराचवेळ आतबाहेर असा खो-खो चालायचा. शेवटी कसेतरी शैला त्याला आतल्या खोलीत कोंडून पाहुण्यांना घरात घ्यायची. यात दहा-पंधरा मिनीटं बाहेर उभं रहाण्याची शिक्षा मात्र मिळायची. एकदा तर असाच आत कोंडलेल्या सोनूला शैलाच्या मुलानं चुकून बाहेर काढलं. झालं. तो सोनू एवढ्या जोरात भूंकत बाहेर आला की माझी पाचावर धारण बसली होती. त्यामुळे शैलाकडे जाण्याचा प्रसंग मी ब-याचवेळा टाळत असे. शैलालाही ते माहित असल्यामुळेच फोनवरुनच आम्ही गप्पा मारतो. मात्र आता शैलानं फोनवरुन बराच आग्रह केला आणि घरी बोलवलं. तिचं आमंत्रण आल्यावर माझ्यापुढे तो भलामोठा सोनू उभा राहिला.
शैलाच्या आग्रहाखातर तिच्या गेले. पहिल्या मजल्यावरच तिचं घर. पाय-या चढून तिच्या घरापुढे गेले तर पहिलं आश्चर्य समोर होतं. शैलाच्या घराचे दरवाजे सताड उघडे होते. दारात छान फुलांची रांगोळी काढली होती. घरातून गाण्याचा हळूवार आवाज येत होता. मी मात्र सतर्क होते. कधी कुठून तो सोनू येईल, याचा नेम नव्हता. मी त्याच्या आवाजाचा अंदाज घेत शैलाच्या घराची बेल वाजवली. पण आश्चर्य सोनूचा अगदी दूरवरुनही आवाज ऐकू आला नाही. शैलाच पुढे स्वागताला आली. ये-ये म्हणत माझं स्वागत केलं. आणखी दोन महिला तिच्या हॉलमध्ये बसल्या होत्या. पण सोनू काही दिवसत नव्हता, म्हणून माझी नजर आणि कान अधिक भिरभिरायला लागले. त्याच्या आवाजाचा अंदाज घेऊ लागले. पण सोनू बाबाचा काहीच पत्ता नव्हता. त्याचा साधा आवाजही ऐकू आला नाही, तसं मी शैलाला विचारलच, तुझा सोनू कुठे आहे. त्याचा आवाजपण नाही आला, घराचे सर्व दरवाजे उघडे आहेत, मग त्याला काय फिरायला पाठवलंस की काय. मला हळदीकुंकू लावतांना शैला जराशी थांबली. तुलापण सोनूची आठवण येतेय ना...मला तर त्याच्याशिवाय एक क्षणही रहात येत नाही. पण काय करणार. असं म्हणून तिचा चेहरा पडला. माझ्या मनात पुन्हा नको ते विचार...सोनूचं काही....ते विचार झटकत मी शैलाला जरा मोठ्या आवाजात विचारलं, काय झालं, सोनूला. माझ्या आवाजानं शैला भानावर आली. सोनूला काहीही झालं नाही. त्याला फक्त पाळणाघरात ठेवलं आहे. पाळणाघरात. कुत्र्याचे पाळणाघर...माझ्यासाठी हा नवीन शब्द प्रयोग होता. सोनूचे कुठले पाळणाघर. खरं की काय...मग शैला सांगू लागली. अलिकडेच तिलाही या पाळणाघराची माहिती मिळाली होती. शहरापासून जरा दूर जागा आहे, पण तिथे सोय चांगली आहे. तिला तिच्या एका मैत्रिणीनं या पाळणाघराची माहिती सांगितली. कुठे बाहेर जायचं असेल तर या
पाळणाघरात, घरात पाळलेल्या कुत्र्यांना, मांजरींना सांभाळण्यात येते.
मला हे सर्वच नवं होतं, म्हणून मी शैलाला सविस्तर माहिती विचारली. तेव्हा कळलं, एका फार्महाऊसमधील एका महिलेनं हे पाळणाघर चालू केलं आहे. तिथे काही दिवसांसाठी घरात पाळल्या जाणारे कुत्रे आणि मांजरांना सांभाळण्यात येते. अगदी तासाच्या दरावरही ही सोय उपलब्ध आहे. ब-याचवेळा ज्यांच्या घरात कुत्रा किंवा मांजर आहे, त्यांना घराबाहेर पडता येत नाही. बाहेर जायचं असेल तर या प्राण्यांनाही सोबत घेऊन जावे लागते. अशावेळी या दोघांचीही गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी या प्राण्यांच्या पाळणाघराचा मोठा उपयोग होतो. फार्महाऊसच्या एका कोप-यात स्वतंत्र असे मोठे पिंजरे केलेले आहेत. ठराविक वेळेत या प्राण्यांना फार्महाऊसच्या बागेत मोकळेही सोडले जाते. तिथे त्यांच्या खाण्यापिण्याचीही काळजी घेतली जाते. शिवाय घरात एकटे रहाणा-या या प्राण्यांना या पाळणाघरात अन्य मित्र मैत्रिणीही भेटतात. त्यामुळे घरापासून दूर झालेली ही मंडळी आनंदानं रहातात. शैलाचा सोनूही तिथेच सध्या होता. शैला त्याच्या आठवणीनं व्याकूळ झालेली दिसली. पण सोनूला त्या पाळणाघरात तू ठेवलं कशाला. आजच्या हळदीकुंकवासाठी का. मला उगाच माझ्यामुळे सोनू पाळणाघरात गेल्याचं दुःख वाटू लागलं. तेव्हाच कळलं, शैलाची धाकटी बहिण काही दिवसासाठी येणार होती. परदेशात रहात असलेल्या या बहिणीची धाकटी लेकही होती. सोनू शैलाच्या घरात सर्वत्र फिरत असतो, अशावेळी त्याचा काही त्रास या दोघींना नको, म्हणून बहिण असेपर्यंत शैलानं त्याला पाळणाघरात ठेवलं होतं. असं असलं तरी रोज सकाळ, संध्याकाळी फोन करुन शैला
सोनूची ख्याली खुशाली जाणून घेत होती.
माझ्यासोबत आणखीही दोन-तीन महिला हळदीकुंकवासाठी
आलेल्या. तिच्या सोसायटीमध्येच त्या रहात
होत्या. त्यांनीही सोनूच्या पाळणाघराची
कथा ऐकली. एरवी शैलाच्या घरात यायला
आपल्यला भीती वाटते, हेही त्यांनी मग घाबरत सांगितले. तुमचा सोनू एकदम अंगावर येतो असं त्या बोलून
गेल्या. पुन्हा शैला सोनूच्या आठवणीनं
काबरीबावरी झाली. अहो, तो काहीही करत नाही. त्याला उलट माणसं आवडताता, त्याला वाटतं तुम्ही
त्याला भेटायला आलात, असे सांगत असतानाच शैलाच्या डोळ्यात पाणी आलं. मग त्या बायका बरं बरं म्हणत बाहेर
पडल्या. शैला पुन्हा सोनूचं कौतुक सांगू
लागली. एवढ्या वर्षात तुला सोनूनं काही
केलं का. सोनू कोणालाही त्रास देत
नाही. आता तो नाही, तर घर नुसतं रिकामं
वाटतंय. पुढची काही मिनिटं ही सोनूची कौतुक
गाथा चालू होती. मी निघाल्यावर शैला आठवणीनं
म्हणाली, पंधरा दिवसांनी सोनू येईल, तू ये नक्की तेव्हा. मी हो म्हणत बाहेर पडले. माझ्या मनात विचार सुरु झाले. ज्यांनी कोणी ही प्राण्यांच्या पाळणाघराची कल्पना
काढली, त्याला नमस्कारच करायला हवा. यातून
शैलासारख्या अनेक प्राणीमित्रांसाठी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. अर्थात सोनू आल्यावर मी त्याला भेटायला जाणार
की नाही, याबाबत मात्र माझं उत्तर पक्कं होतं...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
khup chhan lekh
ReplyDeleteखूप छान लिहिले आहे,नवीन माहिती मिळाली. प्राण्यांच विश्व असते आपण कधी त्याचा विचार करीत नाही..
ReplyDeleteखूप छान कल्पना आहे.
ReplyDelete