सुरण एक...पदार्थ अनेक

 

सुरण एक...पदार्थ अनेक


घरातील कुंड्या आवर म्हणून नव-याची मागे लागलेली भुणभूण वाढत चालली होती.  शेवटी एक दिवस सर्व कामांना विराम देत, गॅलरीतल्या कुंड्या खाली करायला घेतल्या.  दोन खिडक्यामध्ये असलेल्या चार कुंड्या. दोन तेलाच्या डब्याच्या केलेल्या कुंड्या आणि एक मोठा टब...एवढं साफ करायला कितीसा वेळ लागणार.  कोथिंबीर लावण्यासाठी मोठ्या टबचा चांगला वापर झाला होता.  म्हणून त्याला टाकायला जीवावर आलं होतं.  गेल्या चार वर्षापासून हा मोठा टब म्हणजे, माझी छोटीशी बागच झाली होती.  त्यात बटाटे, मिरच्या, पुदिना, कोथिंबीर, पालेबिरडं असे अनेक प्रयोग मी यशस्वी केले आहेत.  कधीतरी त्यात सुरणाचा मोड आलेला तुकडाही रोवून ठेवला होता.  त्याचीही मोठी पान फुटायची.  पण आता टब काढावा लागणार होता.  खट्टू झालेल्या मनानं टबमधली माती काढायला घेतली.  माती बाहेर काढतांना त्यामध्ये लपलेला खजिना हाती लागला.  सुरुवातीला मला मोठा विटेचा तुकडा आहे असं वाटलं.  पण सुरण आहे, हे समजल्यावर मला कोण आनंद झाला.  माझ्या ओरडण्याच्या आवाजानं नवरा धावत आला, नेहमीप्रमाणे धडपडलीस का...हे त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधी मी त्याच्यासमोर, तो छोटूसा सुरणाचा कांदा धरला.  पुढचे दोन दिवस मग त्या सुरणाच्या कांद्याचे कोडकौतुकात करण्यात गेले.  अगदी छोटा पण आम्हा दोघांसाठी पुरेसा होता.  तो सापडल्यावर लगेच त्याला छान धूवून पुसून स्व्छ करुन ठेवला होता.  पण त्याला कपण्याचे धाडस काही माझ्याकडून होत नव्हते.  शेवटी नवरा बोलला, आता त्याला पुन्हा कुंडीत ठेऊन दे.  हा सल्ला कम टोमणा होता, त्याच्या बोलण्यातील आशय जाणून मग शेवटी सुरणाच्या पाककृती सुरु झाल्या.


घरचा सुरण म्हणून खूप लाड केलेल्या त्या सुरणाचे जड मनानं तीन भाग केले.  एका भागाची पहिल्या दिवशी भाजी केली.  सुरणाची भाजी कशी करायची याच्या कितीतरी रेसिपी आहेत.  अगदी पावलापावलावर यात बदल होतो आणि रुचकरपणा वाढत जातो.  मी जी सुरणाची भाजी करते, त्यात या सगळ्यांची भेसळ आहे.   आमच्या आलिबाग, रेवदंडा भागात बहुधा या भाजीला ओल्या खोब-याचं वाटण असतं.  नाशिकला ही भाजी मी शेंगदाणा आणि तिळाचं वाटण लावलेली खाल्ली आहे.  मी आता शेंगदाणा, तिळ, खोबरं, लसूण, आलं, आणि जिरं यांना भाजून एक वाटण करुन घेते.  सुरणाचे चांगले छोटे चौकोनी तुकडे करुन घेतले.  हे तुकडे आधी शिजवून घेतले.  शिजतांनाच त्याच्यात एक-दोन आमसूलंही टाकली.  घरचा म्हणून की काय, पण या सुरणाच्या फोडी कापल्यावर हाताला खाज आली नाही.  फोडी शिजल्यावर मग फोडणीची तयारी.  या भाजीत मी कांदा घालत नाही.  तेल तापल्यावर कडीपत्यासह फोडणीसे जिन्नस आणि मग त्यात हळद आणि तिखट.  चांगल्या दोन-तीन तिखटाच्या फोडणीच्या शिंका आल्या की त्यावर हे सुरणचे तुकडे टाकून परतून घ्यायचे.  या शिजलेल्या तुकड्यांना यामुळे कुरुकुरीपणा येतो.  दोन मिनीटांनी त्यावर तयार वाटण टाकून पुन्हा परतायचे.  सुरणाच्या फोडी तुटणार नाहीत, अशी काळजी घेत ही ढवळाढवळ करायची.  मग जेवढा रस्सा हवा तेवढं गरम पाणी टाकून एक उकळी काढायची.  गॅस बंद करण्याआधी थोडासा गुळ आणि भरपूर कोथिंबीर पेरायची.  गरम गरम नाचणीच्या भाक-यांसोबत ही भाजी पहिल्या दिवशी झाली.  

दुस-या दिवशी पुन्हा हे सुरण पुराण.  आज भाजी नको, म्हणून नव-यानं


आधीच सांगून ठेवलं.  त्यामुळे सगळा सुरणाचा तुकडा शिजवून घेतला.  थंड झाल्यावर त्याला मळून घेतलं.  त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर, चण्याचं थोडं भाजलेलं पिठ, मिठ आणि थोडी जिरा पावडर टाकत या सर्व मिश्रणाचे गोळे केले.  फ्रायरमध्ये हे गोळे बिना तेलाचे भाजून घेतले.  हे सर्व होईपर्यंत तांदूळ अर्धातास भिजवून ठेवले होते.  बिर्याणीसाठी जसे तांदूळ आधी शिजवून घेतो, तसे शिजवून घेतले.  बिर्याणीची सुरुवात करण्याआधी तेलामध्ये लांब चिरलेला कांदा चागला भाजून घेतला आणि त्याला वेगळं केलं.  आता त्या तेलात अख्खा गरम मसाला टाकला वरुन आलं, लसूण, मिरची, पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली.  ती छान भाजल्यावर टोमॅटो आणि कांदा पेस्ट.  याला चांगलं तेल सुटल्यावर दोन चमचे फेटलेलं दही आणि हळद.  हे मिश्रण एकजीव झाल्यावर आपले सुरणाचे कोफ्ते त्यात टाकायचे.  या सर्वाला एक उकळी आल्यावर त्यावर तयार झालेल्या भाताचा एक थर,  मी बहुधा बिर्याणी तयार करतांना भातावर अगदी थोडा तरी बिट किसून टाकते.  त्यामुळे भाताला छान लाल रंग येतो.  या बिटावर मग तळलेला कांदा आणि एखाद चमचा तुप.  छान झाकण लावून हे बिर्याणीचं भाडं तव्यावर ठेवायचं.  मंद गॅसवर साधारण दहा मिनिट ठेवल्यावर सुरणाच्या कोफ्त्यांची बिर्याणी तयार.  या बिर्याणीसोबत दही आणि काकडीची कोशिंबीर.  नवरा खुष.  अर्थात मी सुद्धा.  एरवी डायटिंग या नावाखाली ताटात अगदी मोजून भात खाणारे आम्ही दोघं बिर्याणी असल्यावर मात्र आडवा हात मारतो.  त्यात या घरच्या सुरणाचे कोफ्तेही छान, मऊसूत झालेले.  अवघ्या बिर्याणीला या सुरणाची चव आलेली.  आता मला तिस-या भागाकडे वळायचे होते. 

तिस-या दिवसासाठी सुरणाचा अगदी छोटा भाग होता.  याचे काय करणार...हा प्रश्नच नव्हता.  कारण सुरणाच्या कापा झाल्या नाहीत, तर तो सुरण काय कामाचा.  जो सुरण वाचला होता, त्याच्या दोन मोठ्या फोडी केल्या.  त्या आमसूल टाकलेल्या पाण्यात ब-यापैकी शिजवून घेतल्या.  मग त्याला तिखट, मिठ, हळद, थोडी आलं, लसूण पेस्ट आणि कोथिंबीर लावून पंधरा मिनिटं बाजुला ठेवायचं.  पंधरा मिनीटांनी या मुरलेल्या या सुरणाच्या कापांना रवा आणि चण्याचे पिठ चांगले लावून तेलात भाजायला ठेवायचे.  ऐरवीही सुरणाच्या कापा आमच्या घरात आठवड्यातून किमान दोनवेळा


होतात.  माझ्या लेकाचा अख्खा श्रावण महिना याच सुरणाच्या कापांच्या सोबत निघतो.  आता घरच्या सुरणाच्या या कापा ताटात होत्या.  त्याही आधीच्या दोन प्रकारांसारख्या चवदार होत्या. 

तीन दिवस चाललेल्या या सुरण प्रकरणाचे सर्व श्रेय अर्थातच नव-यानं स्वतःकडे घेतलं.  मी सांगितलेस म्हणून तू कुंड्या साफ करायला घेतल्यास, म्हणून तो सुरण तुला मिळाला,  आणि तो मिळाला म्हणून सुरणाचे पदार्थ झाले.  एवढे सगळे म्हणून...म्हणून त्यानं स्वतःची पाठ थोपटून घेतली.  त्याचे हे म्हणून ऐकत असतांना मी मात्र मनात एक पक्क केलं होतं.  या सुरणाला ज्यांनी सांभळालं होतं, त्या टबला अजिबात घराच्या बाहेर काढायचं नाही.  त्याच्यात आता काय पेराचयं, पालकाचं बी की कोथिंबीरीसाठी धणे टाकायचे हा विचार मी त्या सुरणाच्या कापा खातांना करु लागले....

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. Wonderful knowledge 👍

    ReplyDelete
  2. सुरणपुराण बेस्ट. आरोग्यासाठीही खूप चांगला असतो सुरण. इंदूरला सुरणासारख्या कंदाचा एक चाट आयटी मिळतो. खाल्ला आहेस ना. मस्त असतो तो पण.. माझा अत्यंत आवडता प्रकार म्हणजे सुरणाचे काप. सुरणाची उपासाची तूप जिऱ्याची फोडणी घालून भाजी ही मस्त लागते पोटभरीची एकदम.
    माझ्याकडे कुंडीतही सुरण आहे. काढायला हवा त्याला

    ReplyDelete
  3. Khup chhan lekh

    ReplyDelete
  4. khup chhan lekh

    ReplyDelete
  5. सुरण मला देखील खूप आवडते...तू नेहमीप्रमाणे मस्त पुराणातल सुरण पुराणात टेस्टी केलंस.ललिता छेडा

    ReplyDelete
  6. सुरण पुराण खूपच सुंदर, चविष्ट, खुसखुशीत, खुमासदार! वाचून सुरणाचे पदार्थ खाण्याची इच्छा होणार नाही, तो अरसिक! पण मला खाण्यापेक्षा सुरणाची कुंडीत लागवड करायची तीव्र इच्छा झाली आहे हा लेख वाचून! मस्तच लेख!!
    सौ.मृदुला राजे

    ReplyDelete

Post a Comment