ओ मखाना

 

ओ मखाना


अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषणात बिहारमध्ये मखाना बोर्डाची स्थापना करण्याची घोषणा केली.  आता या अर्थसंकल्पावर किंवा मखाना बोर्डावर मी काही लिहिणार आहे, हे तुम्हाला वाटलं असेल तर नक्कीच नाही.  पण हा अर्थसंकल्प काळजीपूर्वक ऐकण-या माझ्या नव-यानं नेमका यातील मखाना हा शब्द पकडला.  गेल्या महिन्यात जे सामान भरलं होतं, त्यात मी मखान्याचे भलं मोठं पाकीट घेतलं होतं, आणि ते तसंच स्वयंपाकघरातील एका कोप-यात बसलं होतं.  मखाना बोर्ड स्थापन होणार म्हणून जेवढा आनंद बिहारमध्ये व्यक्त झाला असेल, त्यापेक्षा दुप्पट हळहळ माझ्या नव-यानं त्या पाकिटाकडे बघून व्यक्त केली.  अरेरे...हे अजून असंच आहे.  याचं काय होणार आहे की नाही,  अशी वाक्य येऊ लागल्यावर मी सजग झाले.  मखान्यापासून अनेक पदार्थ तयार होतात.  पण सध्या एका मोठ्या प्रवासाची तयारी चालू होती.  दहा-बारा दिवसांच्या प्रवासात कोणते पदार्थ सोबत असावेत याची माझी तयारी सुरु होती.  त्यात हा मखाना मध्येच आला.  शेवटी नव-याला पडलेली मखान्याची काळजी आणि माझा प्रवासतला खाऊ या दोघांची कुंडली जुळवली.  त्यातून एक पदार्थ तयार झाला,  त्याचा अनुभव या ब्लॉगमध्ये शेअर करत आहे. 


बिस्किट हा माझ्या नव-याचा विकपॉईंट.  सकाळचा अगदी साग्रसंगीत नाष्टा झाला तरी, एखादं बिस्किट तोंडात टाकल्याशिवाय त्याचा नाष्टा पूर्ण होत नाही.  पण डायटिंग नावाचा शब्द आमच्या घरात आला आणि मी पहिला वार या बिस्किटांवरच केला.  बिस्किटांशिवाय नाष्टा पूर्ण होत नाही, हे नव-यानं प्रांजळपणे कबूल केल्यावर मग यावर उपाय काय, म्हणून मी शोध सुरु केला.  त्यातूनच मग आमच्या घरात गव्हाची बिस्कीटं सुरु झाली.  खपली गव्हाचे पिठ, तूप, ब्राऊन शुगर, ओटस् आणि एखाद चमचा आळशी आणि तीळ अशा मिश्रणातून होणारी ही बिस्किटं घरी बनवू लागले.  अगदी पहिल्याच फेरीत या बिस्किटांचं आणि माझं गणित पक्कं झालं.  विशेष म्हणजे, नवरा आणि लेकानंही या बिस्किटांना शंभर टक्के गुण दिले.  एकदा हात बसल्यावर मी यातच अनेक प्रकार करायला सुरुवात केली.  या बिस्किटांमध्ये कधी चण्याचे पिठ, तर कधी खोब-याचा वापर सुरु झाला.  यात चॉकलेटचा वापर केला.  कधी संत्र्याची साल किसून टाकली.  त-हेत-हेचे प्रयोग झाले.  हे सर्वच प्रयोग सफल आणि संपूर्ण झाले. 

यामध्येच मखाना घरी यायला लागला.  सुरुवातीला या मखान्याबाबत माझ्या मनात अनेक प्रश्न होते.  मुळात मखाना काय असतो याचीही माहिती नव्हती.  कधी कोणी माता वैष्णवदेवीच्या दर्शनाला गेलं की तिथला प्रसाद घरी यायचा.  त्यात हा मखाना हमखास असायचा.  तेवढाच मखान्याचा वापर


मला माहित होता.  पण मखाना घालून होणा-या खाद्यपदार्थांचा माझ्याकडे अभाव होता.  अर्थात नुसत्या मखान्याची चवही मला फारशी आवडली नव्हती.  या सर्वात अगदी पहिल्यांदा घरात आलेला मखाना हा तसाच राहिला होता.  नतंर त्याच्यासंदर्भातील जी जी माहिती मिळेल, ती वाचून काढली.  सुक्यामेव्यात या मखान्याचा समावेश होतो, हे समजल्यावर मात्र मखान्याचा मी वापर सुरु केला.  सुरुवातीला अगदी सोप्पं म्हणजे, मखान्याचा चिवडा होऊ लागला.  मखाने पोह्यासारखे चांगले भाजून घ्यायचे.  त्यातला एखादा मखान दाबून बघायचा.  तो कुरुकुरु आवाज करत तुटला की समजायचे मखाना चांगला भाजला.  मग या भाजलेल्या मखान्याला चिवड्याच्या झणझणीत फोडणीत टाकायचे.  हा मखान्याचा चिवडा सुरुवातीला चार दिवसात संपायचा.  मग हे दिवस वाढले.  पुढे पंधरा दिवस झाले तरी मखान्याच्या चिवड्याची बरणी भरलेली राहू लागली, तेव्हा आता यापासून दुसरा पदार्थ करायची वेळ आली आहे, हे समजलं.  मग मखाने नेहमीच्या मुगाच्या लाडवांमध्ये वापरायला सुरुवात केली.  साधारण पाव किलो मखाने चांगले भाजून थंड झाल्यावर मिक्सरचा वापर करत बारीक करायचे.  अगदी बारीक रव्यासारखी पावडर होते.  ही पावडर लाडवात जाऊ लागली.  पण याशिवाय मखान्याचे काय करता येईल, हा माझा शोध काही थांबेना. 

त्यातूनच मखाना आप्पे होऊ लागले.  आप्पे करतांना तांदळाचा वापर न करता, डाळीच्या मिश्रणात मखाना पावडर टाकायला सुरुवात केली.  हा पहिला प्रयोग 50-50 असा झाला.  म्हणजे आप्पे चांगले झाले पण चवीत थोडे मागे पडले.  मग पुढच्यावेळी या मखाना आप्प्यात अगदी बारीक चिरलेला कांदा,


मिरची, कोथिंबीर, गाजर किंवा बिट याचा वापर करायला सुरुवात केली.  चविला अगदी थोडं आलंही घातलं.  ओली हळद मिळण्याच्या सिझनमध्ये या ओल्या हळदीचाही वापर केला.  हे मिश्रण मात्र 100 टक्के चवीचं झालं.  यातूनच मग मखाना डोसाही होऊ लागला.  सकाळी फार घाई झाली तेव्हा मखान्याची खिरही नाष्ट्याच्या पदार्थात सामील झाली.  यासाठी अगदी मोठ्या वाटीभर मखाना तूप न घालता भाजून घ्यायचा.  अशानं मखान्यामध्ये असलेली थोडीफार वाळूही बाजुला होते.   मखाना भाजल्यावर त्यात तूप, दूध, साखर आणि वेलची टाकून एक उकळी काढायची.  उकळी आल्यावर गॅस बंद करुन दोन मिनिट तरी या मखाना खिर केलेल्या भांड्यावर झाकण ठेवायचे.  दोन मिनिटातच दुधामध्ये हे मखाने सामावून जातात.  हा नाष्टा पोटभर आणि पौष्टिकतेनं परिपूर्णही होतो. 

यामुळेच मखाना आता मोठ्या पाकिटातून आमच्या घरात येऊ लागला आहे.  त्यातीलच एक मखान्याचे पाकिट महिन्याचा मध्यंतर आला तरी तसेच राहिल्याचे पाहून माझ्या नव-याची बोलणी सुरु झाली.  त्यात या बजेटमधील घोषणेची भर पडली.  आता या मखान्याचे काय करावे असा प्रश्न पडला असतांना बिस्किटांची रिकामी बरणी खुणावू लागली.  माझी  हक्काची रेसिपी करायला घेतली.  पण यातही दरवेळीप्रमाणे प्रयोग केला.  एक वाटी तूप आणि एक वाटी बारीक साखर घेत, याला चांगलं फेटायला सुरुवात केली.  बिस्किट करतांना ही पहिलीच स्टेप महत्त्वाची असते.  साखर आणि तुपाचं हे मिश्रण अगदी पांढ-या रंगाचं आणि हलकं होईपर्यंत फेटायचं.  त्याचा आकार दुप्पट होतो.  इथेच बिस्किटं छान, खुसखुशीत होणार याची खात्री मिळते. मग यात एक वाटी नाचणीचं पिठ टाकलं.  सोबत चांगले पाव किलो मखाना घेतले.  न भाजलेले हे मखाना मिक्सरमध्ये बारीक केले.  एक वाटी ही


मखान्याची पावडरही या तूप आणि साखरेच्या मिश्रणात घातली.  थोडी चॉकलेट पावडर आणि एक चमचा बेकींग पावडर.  बस्स यानंतर सगळं मिश्रण चांगलं मळून घ्यायचं.  मी शक्यतो गॅसवरच ही बिस्किटं करते.  मोठ्या ताटलीवर हलकेच तुपाचा हात लावून छोटी छोटी बिस्किटं करुन ठेवली.  या बिस्किटांच्या ताटाला मोठ्या टोपात ठेऊन वर झाकणं ठेवलं.  अर्धा तासांनी बिस्किट तयार झाल्याची वर्दी देत एक सुगंध घरभर पसरला.  त्यासारशी बिस्कीटांची चव बघण्यासाठी नवरोबाची घाई सुरु झाली.  पहिला गरम बिस्किटाचा घास घेतला आणि हातांनी फर्स्ट क्लास अशी त्यानं खूण केली.  नाचणीचं पिठ आणि थोडी कोको पावडर वापरल्यामुळे बिस्किटं चॉकलेटी रंगाची झाली होती.  चवही चॉकलेटसारखीच लागत होती.  यात मखाना आहे, हे नव-याला सांगितल्यावर त्यानंही दाद दिली.  मी मात्र चव बघण्यासाठी बिस्कीटं थंड होण्याची वाट बघितली.  सायंकाळच्या कॉफीसोबत हे नाचणी आणि मखाना बिस्किट सोबतीला घेतलं.  त्याचा पहिला घास घेतला आणि मीच माझी पाठ थोप़टून घेतली.  त्या चवीसोबतची कॉफी म्हणजे, सोनेपे सुहागा...

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. Wow Health and tasty snacks dear 😍👍

    ReplyDelete
  2. खुपच छान सई बिस्किटं खायला नक्कीच आवडणार कारण वर्णनच तु अतिशय खुमासदार पणे केले आहे तुझी वर्णनात्मक लिहिण्याची कला अशीच फुलत राहो छान छान
    वाचायला मिळो
    अभिनंदन शुभेच्छा

    ReplyDelete
  3. मस्त सई.. नविन रेसीपी मिळाली..

    ReplyDelete
  4. अमृता देशमुख8 February 2025 at 14:43

    खूपच छान माहिती मखाण्याची . त्याचे विविध पदार्थही छानच. असेच लिहित रहा. आम्हाला घडवत रहा.

    ReplyDelete
  5. khup chhan lekh

    ReplyDelete
  6. मखाणा शुगर असलेल्या पेशंटला चांगला.मखाणे गाईच्या तुपात परतावे कुरकुरीत होईपर्यंत नंतर मीठ मिरपूड आणि जिरेपूड घालून ठेवावे गार झाल्यावर (पंखा न लावता) काचेच्या बरणीत किंवा प्लॅस्टिकच्या बरणीत भरून ठेवावे झाकण घट्ट असावे रोज सकाळी एक मुठ खाल्ल्यास शुगर कंट्रोल मधे रहाते पाणी भरपूर प्यावे तसेच मखाणे भाजून मिक्सर मध्ये बारीक पावडर करावी दूधात साखर मिसळून खावे आपण सांगितले त्यात या दोन रेसिपी आम्ही उपवासाला पण मखाणा खातो

    ReplyDelete
  7. खूप छान माहिती मिळाली.ब

    ReplyDelete
  8. मस्त बिस्कीट नक्की करणार. माखण्याचा छान उपयोग👍👌

    ReplyDelete
  9. एकदम मस्त खुसखुशीत , खुमासदार लेखन सई 👌

    ReplyDelete

Post a Comment