काशीच्या घाटांची मोहिनी

 




प्रत्येकाची एक स्पेशल बकेट लिस्ट असते.  माझीही आहे.  त्या लिस्टमध्ये गिरनार, नर्मदा परिक्रमा, वाराणसी, उत्तराखंड अशी क्रमवारी आहे.  गेल्यावर्षी गिरनार पर्वतावरील गुरुस्थानाला बघण्याचे स्वप्न पूर्ण झाले.  मग मी मागे लागले ते वाराणसी या शहराच्या.  नव-यानं माझ्या स्वप्नाला खतपाणी घातलं.  वाराणसीला जाणार तर अयोध्या का नको, सोबत मथुरा आणि वृंदावनही होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी दिला. मग दोघांनीही एक पद्धतशीर टूर प्लॅन केली.  ही जवळपास पाच महिन्यांपूर्वीची गोष्ट.  वाराणसी, अयोध्या, मथुरा आणि वृंदावन हा क्रम ठरला आणि आम्ही हॉटेल बुकींगसाठी फोन करायला सुरुवात केली.  पहिला धडा मिळाला तो वाराणसीतूनच.  वाराणसीमध्य़े फेब्रुवारीमध्ये हॉटेलचे दर दुप्पटीनं वाढणार आहेत, याची माहिती आम्हाला पाच महिन्यापूर्वीच देण्यात आली.  आम्ही जिथे-जिथे फोन केले, त्या ठाकाणी एकच शब्द वारंवार ऐकवण्यात येत होता, तो म्हणजे, महाकुंभ.  प्रयागराज येथे जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात महाकुंभ होणार आहे, त्या महाकुंभसाठी आलेले बहुतांश भाविक वाराणसीला येणार.  त्यामुळे हॉटेल दरात वाढ होईल, अशी माहिती या हॉटेल चालकांकडून आम्हाला समजली.  अशावेळी आम्ही सुरुवातीला हा दौरा रद्द करुन फेब्रुवारीनंतर या भागाला भेट देण्याच्या पर्यायावर विचार सुरु केला.  मात्र नंतर महाकुंभची व्याप्ती कळली.  144 वर्षानंतर येणा-या या योगावर आलेली बरीच माहिती वाचनात आली.  मग पहिल्यांदा गर्दीपासून दूर जाणारा माझा नवरा तयार झाला.  वाराणसी येथे चार दिवसांचा मुक्काम होता.  त्यात कमी नको, म्हणून अजून एक दिवस वाढवला आणि त्यादिवशी प्रयागराज महाकुंभमध्ये जाण्याचे निश्चित केले.  मणिकर्णिका घाटावरील एक हॉटेल बुक केले.  आम्ही जसजशी प्रवासाची तयारी सुरु केली, तशी महाकुंभची भव्यता जाणवायला लागली.  अगदी विमानात पाऊल टाकल्यावरही हर हर महादेव हा जयघोष ऐकू आला.  तेव्हाच जाणीव झाली, की पुढचे दहा दिवस हे आयुष्यातील एक बहुमोल दिवस ठरणार आहेत. 

विमान वाराणसी विमानतळावर दाखल झालं, तेव्हाच वाराणसी आणि प्रयागराज या शहरांची अध्यात्मिक ताकद काय आहे, याची जाणीव व्हायला लागली.  वाराणसी विमानतळावर भारतीयांपेक्षा विदेशी पर्यटकांची संख्या जास्त होती.  सामान ताब्यात मिळेपर्यंत मी तेथील साड्यांच्या शोरुममध्ये डोकवून आले.  तिथेही दोन परदेशी महिला साडी घेण्यात गुंतल्या होत्या.  या शोरुममध्ये गेल्या काही दिवसापासून डे-नाईट शिपमध्ये काम सुरु असल्याची माहिती मिळाली.  मग वाराणसी येथे जाण्यासाठी गाडी पकडली.  या गाडीच्या चालकानं वाराणसी शहराची माहिती सांगायला सुरुवात केली.  सुरुवात अर्थातच अलिकडच्या काळात झालेल्या सुविधांनी झाली.  8-10 वर्षापूर्वी या भागात बिकट परिस्थिती होती, असे सांगत तो म्हणाला, लाईट कैसे होती है, ये तो भुलही गये थे.  पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.  चोवीस तास वीज पुरवठा असतो.  जरा वीज पुरवठा बंद झाला तर  विद्युत कार्यालयात फोन जातात.  अगदी अर्धा तासात पुन्हा विद्युत प्रवाह सुरुळीत होतो.  हे सांगतांना त्याच्या चेह-यावरील आनंद मी बघत होते.  आयुष्यात लाईट, रस्ते, पाणी अशा सुविधा पूर्णपणे मिळतील ही आशाच त्यांनी सोडली होती.  पण गेल्या आठ वर्षात या शहराचा झालेला कायापालट त्यांना एखाद्या स्वप्नासारखा वाटतोय.  वाराणसी शहराच्या बदलाची ही माहिती सांगत असतांना आम्हाला मात्र पहिला धक्का बसला.  वाराणसीमध्ये भाविकांची तुफान गर्दी झाली होती.  त्यामुळे शहराच्या


सीमा बंद केल्यासारखी परिस्थिती होती.  परिणामी एकही मोठी गाडी शहराच्या मध्यभागी जाऊ शकत नव्हती.  आम्ही दोन माणसं आणि पाच बॅगा.  या बॅगा सांभाळत वाहन चालकानं आम्हाला रिक्षा करुन दिली आणि वाराणसी शहरात आमचा प्रवेश झाला.  इथे पुन्हा दुसरा धक्का बसला.  आम्ही जे हॉटेल बुक केले होते, ते पार मणिकर्णिका घाटावर होते.  तिथे कुठलंही वाहन जात नव्हतं.  त्यामुळे आमची पायपीट वाढणार होती.  नव-यानं हॉटेल मालकाला फोन केला, तेव्हा त्यांनी डरो मत, हम है,  असं सांगत त्यांचा एक माणूस पाठवला.  त्या व्यक्तीनं सफाईदारपणे आमचं सामान ताब्यात घेतलं, आणि गर्दीला बाजुला काढत तो झपाझप चालू लागला.  तोंडात पानाचा तोबरा असलेले हे गृहस्थ अशा गर्दीतच आम्हाला वारणसीमधील गल्ल्यांचे महत्त्व सांगत होते.  वाराणसीमधील नागरिकांचा हा स्वभाव नंतर मला प्रत्येकवेळी पहायला मिळाला. 

हॉटेलमध्ये स्थिरस्थावर होईपर्यंत आम्हाला वाराणसीमध्ये असलेल्या गर्दीची कल्पना आली होती.  अशावेळी काय करायचे हा पहिला प्रश्न होता.  रुमवर आराम करण्यापेक्षा थोडं चालून येऊया म्हणून नव-यानं सूचना केली,  आणि ती मी लगेच मान्य केली.  आम्ही जिथे थांबलो होतो, त्या हॉटेलच्या भागात अगदी चिंचोळे रस्ते होते.  एक माणूस जाऊ शकेल आणि एक माणूस येऊ शकेल अशा या गल्लांमध्ये तुफान गर्दी झालेली.  ती गर्दी बघून शहरात जाण्यापेक्षा घाटांवर फिरण्याचा निर्णय घेतला.  अगदी दहा पाऊलावर रत्नेश्वर महादेवाचे मंदिर होते.  तिथून गंगेचा भव्य घाट दिसत होता.  या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झालेली.  एकीकडे लाकडाचे मोठे ढिग, तर दुसरीकडे अंतिम विधी करण्यासाठी रांगते लावलेले मृतदेह.  पहिल्यांदा हे दृष्य बघितल्यावर अंगावर काटा आला.  पण  पुढच्या चार दिवसात मणिकर्णिका घाटावरील धगधगती चिता पाहून मन स्थिर झाले. 


काशीचे घाट आणि त्यांच्यासमोरील भव्य गंगा नदी यांची व्यापकता किती आहे, याची जाणीव या चार दिवसात झाली.  या घाटांवर काय होत नाही.  या घाटांवर फाईव्ह स्टार हॉटेल आहेत, तशीच अगदी साध्या किटलीत चहा विकणारेही आहेत.  घाटांवरील मंदिरांमध्ये अहोरात्र असणारा भंडारा आम्ही बघितला.  तर याच घाटांवर बसून ध्यान करणारे परदेशी नागरिकही बघता आले.  पहिल्यादिवशी धावत हा घाटांचा दौरा केल्यावर आम्ही दोघांनीही एक खुणगाठ बांधली, ती म्हणजे, हे घाट बघण्यासाठी निवांत वेळ काढला पाहिजे, मग पुढचे तीन दिवस, किंबहुना रात्री या घाटांवर भटकंती केली.  यातून आलेला अनुभव हा आम्हा दोघांनाही वेगळी शांतता देऊन केला.  वाराणसी मध्ये एकूण 84 घाट आहेत, हे घाट सुरुवातीला बोटीतून बघितले.  घाटांमध्ये दशाश्वमेध घाट, अस्सी घाट, मणिकर्णिका घाट हे प्रसिद्ध आहेत.  येथे भाविकांची तोबा गर्दी होती.  त्यातही मणिकर्णिका आणि हरिश्चंद्र घाटांवर अत्यंसंस्कार चालू असतात,  त्यामुळे येथे गुढ अशी शांतता असते.  पण याशिवाय अन्य घाटही तेवढीच आत्मशांती देणारे आहेत.  या सर्व घाटांवर आम्ही रात्री दिड-दोन वाजेपर्यंत फिरत होतो.  पार शेवटचा नमो घाट तर एक पर्वणीच आहे.  लहान मुलांना खेळण्यासाठी भरपूर साधने, मोठ्यांना फोटो काढण्यासाठी अनेक फोटो पॉईट.  शिवाय खाऊचे अनेक काऊंटर.  त्यामुळे या नमो घाटावर पर्यटकांची मोठी गर्दी होती.  हा घाट फिरुन आम्ही पुन्हा परतीच्या प्रवसासाठी लागलो.  एका शांत अशा घाटावर निवांत बसून गंगा नदिचा प्रवाह बघत असतांनाच एका स्थानिक गृहस्थांबरोबर परिचय झाला.  आशिष नावाचे हे गृहस्थ रोज गंगा नदिला बघण्याचे आणि तिच्या शांत रुपात समावून घेण्याचा आनंद घेतात.  आशिष बराचवेळ वाराणसीच्या वैशिष्टांबाबत माहिती देत होते.  तासभर गप्पा मारल्यावर आम्ही त्यांचा निरोप घेतला.  तेव्हा हळूच त्यांनी त्यांचा नंबर लिहून घ्या, म्हणून आम्हाला आग्रह केला.  ते स्वतः काशी विश्वनाथ मंदिरातील कॅमेरामन होते.  मंदिरात दर्शन घेण्यासाठी याल तेव्हा मला फोन करा, मी तुम्हाला थेट मंदिरात घेईन, रांगेत थांबू नका, असा त्यांनी आग्रह केला.  तासभराच्या गप्पांमध्य़े आपण कोण आहोत, याचा एकदाही उल्लेख या गृहस्थानं केला नव्हता.  आपल्यापेक्षा बाबा कितीतरी मोठ्ठा आहे.  त्यांच्यापुढे मी काहीच नाही, म्हणत त्यांनी आमचा निरोप घेतला.  आमच्या चार दिवसांच्या मुक्कामात अशी साधीभोळी माणसं खूप भेटली. 

एका बाजुला कललेले रत्नेश्वर महादेव मंदिरातही अनुभवही असाच संपन्न


करणारा.  हे मंदिर वास्तुकलेतील एक अजुबा म्हणून ओळखले जाते. या मंदिरात एक मोठा ग्रुप आला होता.  त्यांचे गुरुजी पुजा करत होते,  सोबत भंडाराही चालू होता.  खिचडी आणि जिलेबी.  हा भंडारा घेण्यासाठी परदेशी नागरिकही रांगेत उभे होते.  भंडा-याच्या प्रसाद हाती घेऊन पायरीवर बसत ही मंडळी त्याचा आस्वाद घेत होती.  या घाटावर सर्वात जास्त संख्या होती ती या परदेशी नागरिकांचीच.  त्यातील काही जणांबरोबर संवाद साधला, तेव्हा त्यांनी दिलेल्या उत्तरांनी आश्चर्य तर वाटलंच, पण आपल्या देशाचा अभिमान अधिक वाटला.  यातील बरेच परदेशी वर्षातील ठराविक महिने या काशीमध्ये येऊन रहातात.  यातून काय मिळतं, या माझ्या प्रश्नावर त्यांनी लगेच उत्तर दिले, मानसिक शांती.  आमच्याकडे भरपूर पैसा आहे, पण शांतता नाही.  ती या काशीत मिळते, हे त्यांचे वाक्य ऐकून आम्ही समोरच्या गंगा नदिला आणि काशी विश्वेश्वराला नमस्कार केला. 


याच घाटांवर हजारो नागा साधूंनी गर्दी केली होती.  महाशिवरात्र आणि नंतर साज-या होणा-या मसान होळीसाठी ही मंडळी इथे आली होती.  आम्ही ज्या साधूंबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला, ते नेमके मराठी निघाले.  त्र्यंबकेश्वरमध्ये त्यांचा मठ आहे.  या साधूबाबांनी मग महाकुंभ ते त्यांचा आखाडा अशी सगळी माहिती दिला.  आश्चर्य म्हणजे, या सर्वच साधूंच्या सोबतही परदेशी तरुण मोठ्या संख्येनं होते.  ध्यानधारणा कशी करावी, याचे धडे ही मंडळी घेत होती.  यातील अनेक उच्चविद्याविभूषीतच होते.  पण अनेक हिंदी भजनं सफाईदारपणे म्हणत होती.  या घाटांच्या भटकंती सोबत जवळपास सर्वच काशी फिरुन झालं.  महाकुंभमेळ्यातील बहुतेक भाविक वाराणसीमध्ये येत असल्यानं सर्वच शहर तुडूंब झालेलं.  त्यात वाराणसीमधील गल्ल्या या संशोधनाचा विषय.  कुठल्या गल्लीतून, कुठे जावं हे गुगलला विचारलं तरी गुगल चक्कर येऊन पडेल, असे हे गल्ली बोळ.   दिवसभर काय रात्रीही हे बोळ आटणा-या दुधाचा घमघमाट या बोळांमध्ये असतो.  दुकानदार अभिमानानं म्हणाले,  चालीस दिनसे चुल्हा बंद नही हुआ है....या बोळांसारखी गुंतागुंतीची वाराणसीची माणसं मात्र नाहीत.  ही मंडळी सदैव मदतीला तयार असतात.  फक्त तोंडात पानाचा तोबरा घेऊन बोलणा-या या वाराणसीकरांची भाषा समजून घेण्याची हातोटी तुमच्याकडे हवी.  आम्हालाही सुरुवातीला थोडा त्रास झाला.  पण नंतर जशी वाराणसीतील लोकांबरोबर दोस्ती वाढली, तशी त्यांची ही भाषा समजायला लागली.  रात्री अकरा वाजता कालभैरव मंदिरात जाण्यासाठी आम्ही निघालो, तेव्हा चंदनलाल नावाचे गृहस्थ भेटले.  दुधाचा व्यवसाय आहे त्यांचा.  रात्री कोणाकडे दुध पोहचून ते निघालेले.  अर्थात तोंडात पान भरलेले.  आम्ही त्यांना भैरवबाबाकी गली कौनसी...असं विचारल्यावर,  मेरे पिछे आना....पोहंचा देता हूं...म्हणत ते चालू लागले.  सोबत त्यांचा फोनही चालू होता.  कोलकत्यावरुन लेकीचा फोन होता.  ती बाबा चार दिन तो रहने के लिये आयो म्हणून विनवित होती.  पण चंदनलाल, पक्के वाराणसीचे.  ते म्हणाले, बेटा वो मत कहो...ये गल्ली और बाबा के अलावा, मैं कही रह नही पाऊंगा...मग आमच्याबरोबरही बोलतांना त्यांनी हेच सांगितले.   चार दिवसांच्या आमच्या वाराणसीमधील मुक्कामात दोनवेळा तरी संपूर्ण घाटांवर पायपीट केली.  अर्थात त्यांनीही मन भरले नाही.  शेवटी निघण्याच्या दिवशी पहाटे चारला या घाटांचा नजरा बघितला.  पहाटे चारच्या थंडीच्या कडाक्यातही महादेवाचे भक्त गंगा नदिमध्ये मनमुराद पोहत होते.  तसेच ओल्यातानं येऊन रत्नेश्वर महादेवाचा आशीर्वाद घेत होते.  या चार दिवसात ओळखीचा झालेला चहावाला आम्हाला बघून पुढे आला.  नव-यासाठी चहाचा कप त्यांनी पुढे केल्यावर आम्ही त्याला आता निघत असल्याचे सांगून पैसे देऊ केले.  त्याला नकार देत, अगले बार आईयेगा तब देना, देखो उधार है...आना जरुर... म्हणत हसत त्यानं आम्हाला निरोप दिला.  

अर्थातच या घाटांची मोहिनीच अशी आहे की, आमचा पाय निघत नव्हता. महाशिवरात्र जवळ येत असल्यानं काशीमधील भाविकांची गर्दी वाडत होती.  घाटांकडे जाणा-या सर्व बोळांमध्ये अहोरात्र माणसांचा ओघ होता. एकिकडे मंदिरात हर हर महादेवचा जयघोष सुरु झाला की या बोळांमधील भाविकही याच जयघोषात हरखून जात होते.  तर दुसरीकडे मणिकर्णिका घाटावरील वाद्यांचा आवाज वाढला होता.  अशातच या घाटांवरील मंदिरांना आणि गंगा नदिला नमस्कार केला.  मनोमन पुन्हा या घाटांवर येण्याची संधी मिळावी, अशी इच्छा त्या गंगा मातेला करत जड मनानं घाट आणि वाराणसी शहराचा निरोप घेतला. 

 

 

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

Comments

  1. खूप छान माहिती दिली आहे. अस वाटत आपणच फिरत आहोत.

    ReplyDelete
  2. कुलकर्णी शुभदा1 March 2025 at 14:29

    सई खूप सुरेख वर्णन !२००९ मध्ये पाहिलेल्या वाराणसीचे घाट आठवले .आता तर खुपच सुधारणा झाल्या असणार!

    ReplyDelete
  3. खूपच छान वर्णन केले आहे.

    ReplyDelete
  4. परदेशी लोकांना जे जाणवतं ते आपल्याला जाणवत नाही, कळत नाही आणि आपण ते जाणून घ्यायची इच्छाही करत नाही. याउलट आपण त्याला नावे ठेवतो हे सर्वात मोठे दुर्भाग्य आहे भारतीयांचं.

    महा कुंभ ही अनुभवण्याची गोष्ट होती जी तू केलीस पुनर्प्राप्तीचा आनंद..

    ReplyDelete
  5. छान लिहिले 👍🌹

    ReplyDelete
  6. Just beautiful ❤️

    ReplyDelete

Post a Comment