मंत्रमुग्ध करणारे वृंदावन

 

मंत्रमुग्ध करणारे वृंदावन


वाराणसी-वृंदावन दौ-यातील शेवटचे चार दिवस कृष्णनगरी वृंदावनसाठी आम्ही राखीव ठेवले होते.  त्याआधी दोन दिवस प्रभूरामांची नगरी अयोध्या आणि श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा येथेही जायचे होते.  वाराणसीहून निघतांना मन थोडं नाराज होतं, पण अयोध्या, मथुरा आणि वृंदावन या पावन नगरीचे दर्शन घेण्याची ओढही होती.  अयोध्येतही तुफान गर्दी होती.  पण या गर्दीमध्येही प्रभू श्रीरामांचे दर्शन झाले आणि हनुमान गढीमधील हुनमानाचेही दर्शन झाले.  अयोध्येतील अन्य मंदिरांचे संध्याकाळी दर्शन घेऊन आम्ही मथुरेला जाण्यासाठी रात्री रेल्वेस्थानक गाठलं.  मथुरा, वृंदावनला जातांना विशेष अनुभव येतो, असं अनेकांनी सांगितलं होतं.  त्याची सुरुवात ही रेल्वे स्थानकापासूनच झाली. 

अयोध्येहून रात्री साडेअकराची ट्रेन मथुरेसाठी होती.  आम्ही साडेदहा वाजता हॉटेल सोडलं आणि वीस मिनिटात अयोध्या स्थानक गाठलं.  अयोध्या रेल्वेस्थानकाची भव्यता आणि तिथल्या सुखसोयी बघत आमची ट्रेन ज्या प्लॅलफॉर्मवर येणार होती, तिथे जाऊन उभं राहिलो.  ट्रेनची वेळ झाली. दहा मिनिट होऊन गेली. वीस मिनिटं झाली. चांगला तासभर झाला. पण ट्रेनचा पत्ता नाही, आणि कुठली घोषणाही नाही.  अयोध्या स्टेशन खरंच खूप सुंदर.


 वेटिंग रुमही स्वच्छ आणि छान. पण ते बघत किती वेळ थांबणार. जवळपास दीड वाजता ट्रेन आली आणि आम्ही चरफडत आमच्या सीटचा ताबा घेतला आणि झोपी गेलो.  सकाळी सात वाजता जाग आली ती चहा-कॉफी या आवाजाने.  ट्रेनचा स्टाफ चहा-कॉफीचे कॅन घेऊन फिरत होता, त्यापैकीच एकानं आम्हाला चहा-कॉफी घेणार का म्हणून विचारलं.  पण आमच्या मनात अजूनही रात्रीचा राग होता.  तो त्या चहावाल्यावर निघाला.  बेकार ट्रेन है ये, अयोध्यामें कितना लेट आई...अब आगेभी लेट होगा...हमारा पुरा शेड्यूल बिघाड दिया...म्हणत त्यानं दिलेले चहा-कॉफीचे कप हातात घेतले.  पण तो हसतच होता.  तसाच हसत म्हणाला, हा दीदी, थोडासा लेट हो गया, पर अच्छी बात सुनो तो...लडका हुआ है...मी चमकून वर बघितलं.  मग त्यांनी दिलेल्या माहितीनं माझा राग कुठल्याकुठे पळाला आणि त्या कृष्णाला नमस्कार केला.   गाडीमध्ये रात्री दहाच्या सुमारास एका बाईला प्रसूती वेदना सुरू झाल्या.  मग काय जवळच्याच एका स्थानकावर गाडी थांबवण्यात आली. तिथे ॲम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आली होती.  डॉक्टर आले.  सुखरुप प्रसुती झाली.  मुलगा झाला.  बाळ आणि बाळंतीण यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.  या गडबडीमध्ये गाडीला दोन-अडीच तासांचा उशीर झाला.  ही बातमी ऐकल्यावर आम्हाला कृष्णाच्या गावाला जातांना कृष्णाने गोड संकेत दिल्याची जाणीव झाली.  हात जोडले आणि त्या माणसाला सॉरी म्हणालो.  अर्थात या मैत्रीच्या बदल्यात अकरा वाजेपर्यंत त्यांनी आणलेल्या सर्वच पदार्थांचा आम्हाल आस्वाद घ्ययला लागला. 

मथुरेत पोहचलो आणि त्या भूमीला नमस्कार केला.  ज्या हॉटेलचं बुकींग केलं होतं, त्यांनी लगेच आमचा ताबा घेतला.  जेवण करा, थोडा आराम करा, आणि बरोबर अडीचच्या सुमारास बाहेर पडा, हे सांगत त्यानं एक कागद


आमच्या हातात दिला.  त्यामध्ये आम्ही कुठून मथुरा दर्शनला सुरुवात करायची.  कुठे रिक्षा करायची, रिक्षाचालकाला किती पैसे द्यायचे, चालत कुठे जायचं, कुठल्या मंदिरात किती वेळ थांबायचं...आदी सगळ्या सूचना सविस्तर होत्या.  त्यांनी आखून दिलेल्या मार्गानुसार कृष्ण जन्मभूमी फिरलो, सर्वात शेवटी मथुरा कृष्ण जन्मभूमी मध्ये गेलो. तो अभूतपूर्व अनुभव होता.  विशेषतः त्या जेलमध्ये फिरताना अंगावर रोमांच आले.   येथेच आपल्या देवाचा जन्म झाला, ही भावना वेगळी अनुभती देणारी होती.   


दुस-या दिवशी सकाळी मथुरेहून वृंदावनला अवघ्या अर्धातासात पोहचलो.  ही नगरीच वेगळी आहे.  पुढचे चार दिवस या नगरीनं जे समाधान दिलं, त्याचे मोल कधीही करता येणार नाही.  खरं सांगायचं तर या ब्रजभूमीच्या प्रेमातच पडायला झालं.  आम्ही ज्या रिक्षानं वृंदावनला गेलो, त्याच्या चालकानं प्रवासात वृंदावनची माहिती दिली.  तिथे जवळपास पाच हजाराहून अधिक मंदिरे आहेत.  या प्रत्येक मंदिरात राधाराणी आणि श्रीकृष्णाची एक कथा जोडलेली आहे.  कित्येक मंदिरे शेकडो वर्ष जुनी आहेत.  वृंदावन फिरतांना फक्त प्रसिद्ध मंदिरात जाऊ नका, अगदी लहान मंदिरात गेलात तरी तिथे तुम्हाला श्रीकृष्ण भेटतील, असं प्रेमानं सांगून त्यांनी आम्हाला हॉटेलच्या दारात सोडलं.  त्याची वाणी गोड होतीच, पण त्यांनी ज्या पद्धतीनं वृंदावनची महती सांगितली, त्यामुळे आम्ही दोघं भारावलो होतो.  त्याच नादात सामान सांभाळत हॉटेलमध्ये प्रवेश केला.  आमच्यापाठोपाठ हॉटेलचे दोन वॉचमन हातात काठ्या घेऊन आमच्या मागे धावत येऊन उभे राहिले. आम्हा दोघांनाही काही कळलं नाही.  पण हॉटेलचा स्टाफ पुढे आला, आणि वृंदावनमधील महत्त्वाचा नियम सांगितला.  तो म्हणजे, वृंदावन मध्ये फिरतांना कधीही चष्मा वापरायचा नाही.  कारण येथे माकडं, चष्मे काढून नेतात आणि ते परत मिळणवण्यासाठी त्यांना किमान 50-100 रुपयांची फ्रूटी द्यावी लागते.  आली


का पंचायत, म्हणून आम्ही दोघांनीही डोक्यावर हात मारला.  पण जे होतं, ते चांगल्यासाठीच.  नंतर चष्म्याशिवाय वृंदावन बघतांनाही त्यातील सुंदरता
टिपता आली.  कारण या कृष्णनगरीत डोळ्यांनी देव बघायचा नाही, तर त्याचा अनुभव घ्यायचा असतो, त्याच्या जयघोषात सामावून जात, त्याला नमन करायचे असते, याची जाणीव झाली.  आम्ही गेलो तेव्हा तिथल्या प्रसिद्ध फग होळीची सुरुवात होत होती.  ज्या-ज्या मंदिरात जात होतो, तिथे गुलाल आणि फुलांची बरसात होत होती.   देवाचा हा आशीर्वाद घेत, वृंदावनच्या प्रत्येक गल्लीबोळामध्ये फिरलो.  ज्या गल्लीत गेलो, तिथे श्रीकृष्णाचे मंदिर.  प्रत्येक मंदिराची एक कथा. अर्थात ती नगरीच तशी आहे.  या नगरीमध्ये आलेले काही अनुभव न विसरता येण्यासारखे आहेत.  त्यापैकी एक म्हणजे, प्रेमानंद महाराजांचे घेतलेले दर्शन.

वृंदावनमधील प्रेमानंद महाराजांचे चाहते करोडो आहेत. सोशल मिडियाच्या माध्यामातून आज घराघरात या महाराजांना पुजले जाते.  आम्हीही त्यापैकीच.  त्यामुळे वृंदावनला आल्यावर प्रेमानंद महाराजांचे दर्शन कसे घेता येईल, याची पहिली चौकशी केली होती.  हॉटेल मॅनेजरनं मग आम्हाला रिक्षा बुक करुन दिली.  रात्री बरोबर पाउणला तो रिक्षाचालक हजर झाला.  ब-यापैकी थंडी होती, त्यामुळे आम्ही त्याला पहिला प्रश्न विचाराला, एवढ्या थंडीत कोणी येईल का दर्शनाला.  तो हसला आणि म्हणाला, पाच मिनिट रुको, आपको दिखाता हूं....अर्थात पुढच्या पाच मिनिटात आम्ही प्रेमानंद महाराज ज्या रस्तानं जातात, त्याच्या बाजुच्या दुस-या रस्तावर आलो.  या रस्त्यावर असलेली भाविकांची गर्दी, प्रेमानंद महाराजांची लोकप्रियता सांगण्यासाठी पुरेशी होती.  एक वाजता, त्या रिक्षाचालकाने आम्हाला एका ठिकाणी सोडलं, आणि सरळ चालत जा...जिथे नंबर लागेल तिथ उभं रहा...असं सांगितलं.  रस्त्याच्या दोन्ही बाजुनं दो-या लावल्या होत्या आणि त्याच्यामागे अनेक भाविक उभं राहून राधा नामाचा जयघोष करत होते. अवघा रस्ता फुलांनी सजवला जात होता.  त्या फुलांच्या रांगोळ्यांच्या बाजुनं


आमच्यासारखे अनेक आपली जागा शोधत होते.  शेवटी काही अंतरानं आम्हाला उभं राहाण्यासाठी जागा मिळाली.  बरोबर अडीच वाजता प्रेमानंद महाराज आपल्या शिष्यांसह आमच्यासमोरुन गेले.  राधाराणीच्या नावाचा जयघोष सुरु होता, अवघ्या काही सेकंदाचे दर्शन.  पण तेही भारावून टाकल्यासारखे.  प्रेमानंद महाराज गेल्यावर दोरीमागे शिस्तिनं थांबलेले सर्व भाविक रस्तावर आले.  महाराज ज्या रस्तावरुन चालत गेले, तिथे डोकं टेकलं आणि तेथील फुलांच्या पाकळ्या हातात घेत मनोभावे नमस्कार केला.  असे करणारे एक-दोन नव्हते.  तिथे असलेला प्रत्येकजण असंच करत होता.  आपण भारतीय वेडे असतो ना...ते असेच...भक्तीचे..भावाचे हे वेडच असते....

वृंदावनचा अजून एक अनुभव म्हणजे, सद्गुरु ऋतेश्वर महाराजांच्या आनंदधाम आश्रमातील एक अनोखी संध्याकाळ.  ऋतेश्वर महाराजांच्या आनंदधाम आश्रमाबद्दल मी बरीच माहिती वाचली होती.  शिवाय सदगुरु ऋतेश्वर महाराजांची प्रवचनेही ऐकली होती.  त्यामुळे आमच्या वृंदावन डायरीमध्ये त्यांच्या आनंदधाम आश्रमाचाही समावेश होता.  सायंकाळी चारच्या सुमारास या आश्रमाचा पत्ता शोधत निघोलो,  एक-दोन वृंदावनवासी भेटले, त्यांना आश्रमाचा पत्ता विचारला.  त्यांनी पहिल्याच वाक्यात आमची विकेट उडवली.  यहा का हर घर आश्रम है बेटा...और हर बृजवासी महाराज...पर यहा का महाराजा एकही है...और महारानी भी एकही है...असं बोलून ते राधे..राधे म्हणत निघून गेले.  मग एक रिक्षा केली.  त्याला सदगुरु ऋतेश्वर


महाराजांचा फोटो दाखवला.  आश्रमाचा पत्ता सांगितला.  तोही तसचं काहीसं म्हणाला...ये भूमी लल्ला की है...यहा हर कोई महाराज है, म्हणत त्यांनी आम्हाला आनंदधामच्या दारात सोडलं.  नावनोंदणी झाली, आणि आम्ही फोन बाजुला ठेवत आश्रमात प्रवेश केला.  आमच्या अगोदर काश्मिरहून आलेला एक ग्रुप होता.  संपूर्ण आश्रमात मातीचे दिवे लावण्याचे काम चालू होते.  आम्हाला आधी सर्व आश्रम बघून घ्या, म्हणून तिथल्या एका सेवेक-यानं सांगितले.  संपूर्ण आश्रमात रेती पसरली होती.  पहिल्यांदा पायाला रेतीचा स्पर्श झाला तेव्हा अंगावर शहारे आले.  पण नंतर आश्रम बघता बघता भान हरपायला झाले.  संपूर्ण आश्रमात छोट्या छोट्या कुटी तयार करण्यात आलेल्या आहेत.  आश्रमाचे सेवेकरी आणि बाहेरून येणा-या भाविकांना येथे रहाण्याची सोय आहे.   सुंदर चित्रांनी सजवलेल्या या प्रत्येक कुटीपुढे तुळशी वृंदावन आणि छोटीशी फुलांची बाग, वेलीची कमान.  हे सर्व वातावरणात बघतांना एवढं हरपून गेलो होतो की, सुरुवातीला जाणवलेली ती वाळूची चरचर आता आपलीशी वाटू लागली.  एव्हाना सहा वाजत आलेले.  आम्हीही सर्वांबरोबर संपूर्ण आश्रमभर तेलाचे दिवे लावायला घेतले. आश्रम भर किती दिवे

लावले असतील याचा पत्ता नव्हता पण तेलाचे मोठे दोन डबे संपले होते.  तिथे संध्याकाळी लाईट लावण्यात येत नाहीत.  याच तेलाच्या दिव्यांच्या प्रकाशात आश्रम उजळून निघतो.  आश्रमात आरतीची तयारी सुरु झाली आणि सेवेक-यांनी त्या दिव्यांना प्रज्वलीत कऱण्यास सुरुवात केली.  त्याच मंगल वातावरणात आरती सुरु झाली.  तो सगळा जयजयकार...आणि ते वातावरण...आहाहा...या सगळ्या दृश्याचे वर्णन कधीही शब्दात करता येणार नाही.  सुरुवातीला मला वाटलं की माझ्याच डोळ्यातून आनंदाश्रू येत होते, पण आसपास सर्वांचीच अवस्था माझ्यासारखी होती.  आरती संपल्यावर मोठ्यानं जयघोष झाला.  तिथून बाहेर पडतांना ते भाव मनात साठवत निःशब्द झालो होतो. 

आमच्यासोबत तो काश्मिरचा ग्रुपही बाहेर आला.  एव्हाना आमची चांगली ओळख झालेली.  त्यातील एक हात पकडून म्हणाली, चलो दिदी, राधारानीने बुलाया है...तिथून जवळच प्रेमानंद महाराजांचे गुरु,  दादा गुरु यांचा आश्रम होता.  त्या आश्रमात आम्ही पोहचलो.  तिथे दादा महाराजांच्या उपस्थितीत सत्संग चालू होता.  भजन रंगलं होतं.  पण माझं लक्ष गेलं ते त्या आश्रमाच्याच बाहेर तयार होणा-या पुरी भाजीकडे.  सत्संगाला आलेल्या भाविकांसाठी भंडा-याची व्यवस्था होती.  पुरी, भाजी आणि शिरा, जिलेबी असा बेत होता.  त्या तेला-तुपाच्या घमघमाटात नामस्मरण कसं करणार...हा प्रश्न माझ्या मनात अगदी सुरुवातीला डोकावला.  पण तिथे चालू असलेल्या सत्संगामध्ये मन कधी एकरुप झालं हे कळलंही नाही...ज्या महिलेच्या बाजुला मी बसले होते, तिनं हळूच तिच्या हातातील पुस्तक माझ्याकडे सरकवलं.  मग वर्षानुवर्ष या सत्संगाला येत असल्याच्या भावात त्यात सामील झाले.  जवळपास पाऊण तास हा अविस्मरणिय अनुभव....डोळ्यात पुन्हा आनंदाश्रुंची दाटी आणि दादा गुरुंच्या पायाशी घातलेलं लोटांगण...रात्री तिथल्या त्या स्वर्गिय चवीच्या भंडा-याचा स्वाद घेतला आणि आम्ही सर्वजण निशब्दपणे बाहेर पडलो.   रात्रीचे आठ वाजून गेले होते.  आश्रमाबाहेर थोडी झाडी होती, त्यातून मोराचा केकारव ऐकू येत होता.  तिथून पुन्हा परिक्रमा मार्गवार आलो.  परिक्रमावासींसोबतच चालतच पुन्हा जमेल तेवढं वृंदावन पालथं


घातलं.  रात्री उशीरापर्यंत एका मंदिराच्या पायरीवर बसलो.  आमच्यासमोरुन अनेक परिक्रमावासी राधाकृष्ण नावाचा जप करत जात होते, अनेक अनवाणी होते,  कोणी लोटांगण घालत परिक्रमा करीत होते.  भाव तिथे भक्ती...आणि भक्तीला कसलीही अपेक्षा नसते.  याचे प्रत्यक्ष उदाहरण आम्ही बघत होतो.  कितीतरी जण फक्त राधे राधे म्हटल्यावर आमच्या मित्रमंडळींच्या परिवारात सामिल झाले.  हाच नामाचा महिमा मनात जपत रात्री उशीरा हॉटेल गाठलं आणि निघण्यासाठी तयारी सुरु केली. 


चार दिवसाच्या मुक्कामानंतर वृंदावनमधून पाय निघत नव्हता.  ट्रेनला बराच वेळ होता.  त्यामुळे हॉटेलमध्ये बसण्यापेक्षा मदन मोहन मंदिरात जाऊन या, सकाळी छान सोहळा असतो, असा सल्ला हॉटेल स्टाफ कडून मिळाला.  रिक्षानं निघालो आणि एका ठिकाणी मी जोरात ओरडत रिक्षा थांबवायला सांगितली.  आमच्या पुढे बृजवासी बाबा होते.  नव्वदी पार केलेले हे बाबा वृंदावनच्या रोज किमान दोन परिक्रमा करतात.  अवचितपणे समोर आलेल्या या बृजवासी बाबांना बघून मी जवळपास धावत्या रिक्षातून उडी मारली आणि



त्यांना नमस्कार केला.  आमच्याकडे बघत हसत हात जोडून बृजवासी बाबा तरुणाला लाजवेल अशा वेगात आपल्या नित्यसेवेत रुजू झाले.  मदन मोहन मंदिरात गेलो, तर तिथे होळीच्या रंगांची तयारी आणि भजन चालू होते.  त्या रंगात थोडावेळ स्वतःला हरवून घेतलं.  कृष्णनामाचा महिमा आणि हा रंग सोबत घेत आम्ही वृंदावनचा निरोप घेतला.  जेव्हा या कृष्णनगरीत दाखल झालो, तेव्हा हॉटेलच्या स्टाफनं सल्ला दिला होता, परिक्रमा मत करना...राधारानी को बोलके जाना अभी नही करेंगे, वापस बुलालो, तब करेंगे....आम्हीही भोळेपणानं तो सल्ला मानला आहे....आता कृष्ण रंगात रंगलेले आम्ही दोघं, राधे राधे...म्हणत या बोलवण्याची वाट बघत आहोत....

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. सुंदर वर्णन!! आम्ही पण कृष्णमय झालो !!

    ReplyDelete
    Replies
    1. फारच सुंदर शब्दांत वर्णन केले आहे. वाचताना मी कृष्णमय होऊन गेले. असं वाटलं की ताबडतोब वृंदावनात जाऊन हा अनुभव घ्यावा. राधे कृष्ण

      Delete
  2. परिक्रमा करण्यासाठी आपल्याला वृंदावनला जायचे आहे

    ReplyDelete
  3. खूप सुंदर वर्णन! वृंदावनात प्रत्यक्ष जाऊन आल्याचा आनंद मिळाला. मनःपूर्वक धन्यवाद 🙏🌹
    सौ. मृदुला राजे

    ReplyDelete
  4. खूप छान वाटले अयोध्या नगरी आणि वॄंदावनात गेलो आहे असे वाटते

    ReplyDelete
  5. भावभक्ती मय दर्शन वृंदावन मथुरेचं खूप छान

    ReplyDelete
  6. Very well explained

    ReplyDelete
  7. महेश टिल्लू20 March 2025 at 18:06

    आजपर्यंत वाचलेले सर्वात सुंदर प्रवासवर्णन.वाचताना मी खरेच वृंदावनात आलो आहे असेच वाटले.वृंदावनाची सुंदरता,भक्तिमय वातावरण स्वतः अनुभवत आहे असेच वाटत होते.आपण आपल्या लेखणीची ताकद दाखवून दिली.असेच छान लेख लिहित रहा.

    ReplyDelete

Post a Comment