ते आणि आपण
आता जरा बाहेरचं जग बघा...युरोप टूर करा...अमेरिका, लंडन फिरा...बघा काय प्रगती आहे ती...अशा आशयाचे अनेक फोन आमच्या वाराणसी आणि वृंदावन ट्रिप नंतर आले. अर्थात मी या न मागितलेल्या सल्ल्यानंतर डोक्याला हात लावून घेतला होता. आपला देश अफाट आहे. तेवढाच अद्भूत आहे. पर्यटनासाठी जातांना तेथील धार्मिक स्थळांवर जाऊन देवापुढे नतमस्तक होणे, हा उद्देश असतोच. पण त्यासोबत त्या ठिकाणचे निसर्ग सौदर्य बघणे, भाषिक विविधतेचा आनंद घेणे, तिथल्या खाद्यसंस्कृतीची माहिती करुन घेणे आणि शक्य तेवढा मित्र मैत्रिणींचा परिवार वाढवणे हा उद्देश नक्कीच असावा. आम्ही हाच दृष्टीकोण घेऊन प्रवास करतो. आत्तासा कुठे आपला देश बघायला सुरुवात केला आहे. तो जसजसा बघायला लागलो आहोत, तशी विदेशी जाण्याची लालसा कमी होत चालली आहे. उलट ज्या ठिकाणी गेलो, तिथल्या प्रेमात पडत चाललो आहोत. आता वाराणसी आणि वृंदावनच्या बाबतीतही तेच झालंय. येथे जो मित्र मैत्रिणींचा गोतावळा जमा केलाय त्यांनी निदान पावसाळ्यात या, वेगळा अनुभव येईल, असा आग्रह धरलाय. या दोन्ही ठिकाणी आलेला एक वेगळा अनुभव म्हणजे, येथे असणारी परदेशी पर्यटकांची मोठी संख्या. सर्व वयोगटातले परदेशी पर्यटक वाराणसी आणि वृंदावन येथे मोठ्या संख्येनं होते. त्यातही विशेष म्हणजे, ही सर्व मंडळी आपल्या भारतीय पेहरावात होती. वाराणसीमध्ये घाटांवर साधूंच्या सेवेत असलेले अनेक परदेशी तरुण पाहिले, तर वृंदावनमध्ये कृष्ण भक्तीमध्ये रममाण झालेली ही परदेशी मंडळी पहाता आली. यातील अनेकजण वर्षातून ठराविक काळासाठी भारतात येतात. आमच्याकडे सर्व आहे, फक्त इथे मिळते ती मनःशांती तिथे नाही, हे त्यांचे उत्तर ऐकल्यावर आसपास असलेल्या परदेशवेड्यांना कोपरापासून नमस्कार करावासा वाटला.
वाराणसीमध्ये गेल्यावर तुफान गर्दीनं आमचं जसं स्वागत केल, तसंच स्वागत केलं ते परदेशी पर्यटकांनी. आम्ही ज्या हॉटेलवर उतरलो होतो, ते अगदी मणिकर्णिका घाटावर. इथूनच परदेशी नागरिक वाराणसीच्या किती प्रेमात आहेत याची माहिती मिळायला सुरुवात झाली. या हॉटेलध्ये एक अमेरिकन महिला आणि एक न्यूझिलंडमधील महिला, महिनाभराच्या मुक्कामी होत्या. यातील एक दरवर्षी वाराणसीमध्ये येते. दरवर्षी याच हॉटेलमध्ये रहाते. इथल्याच एका आश्रमामध्ये योगाचा अभ्यास करते आणि सोबत ध्यान धारणा. वाराणसीमध्ये असलेल्या तुफान गर्दीबद्दल तिला विचारले , तर म्हणाली कल्पना नाही. कारण ती आणि तिच्यासारखे अनेक परदेशी नागरिक या गर्दीमध्ये क्वचित जातात, बहुतांश वेळ वाराणसीच्या घाटांवर किंवा त्यांच्या आश्रमात घालवतात. तिथे योग, ध्यान आणि काहीजणं तर हिंदू धर्मग्रंथांचा अभ्यासही करतात. ही मंडळी अगदी साध्या हॉटेलमध्ये महिनाभर मुक्काम करतात. तिथे टिव्ही, एसी आणि अन्य सुविधा त्यांना नकोशा असतात. शिवाय पूर्णपणे भारतीय पोशाखच नाही तर खाद्यसंस्कृतीही भारतीय स्विकारतात. घाटांवर फिरतांना अनेक परदेशी पाहुणे, नागा बाबांच्या सेवेत दिसले. अनेक तरुण घाटांवरील साधूंसोबत गप्पा मारत होते, काही तरुणी महिला साधूंच्या सोबत ध्यानधारणा करण्यात मग्न होत्या. बरं या मंडळींना फिरण्यासाठी काही विशेष सोबत असावं लागतं असं नाही. आम्ही रत्नेश्वर महादेव मंदिराच्या बाजुला असलेल्या पाय-यांवर बसलो होतो, तेव्हा तिथे मोठा भंडारा चालू होता. दोन परदेशी तरुण आले, भंडा-यासाठी रांग लावली. हाती आलेल्या खिचडीच्या द्रोणाला आधी डोक्याला लावून नमस्कार केला. मग एका पायरीवर बसून हातांनी ती खिचडी खाल्ली आणि टाकीत ठेवलेलं पाणी पिऊन निघून गेले. पुढे आम्ही चालत एका शांत
असलेल्या घाटावर गेल्यावर हेच तरुण ध्यानस्त बसलेले आढळून आले. अशाच एका घाटावर पिझ्झेरिया वाटिका कॅफे आहे. तिथे आम्ही गेल्यावर सगळा माहौलच वेगळा होता. बहुधा सगळेच परदेशी होते. वेटींग होती म्हणून त्या कॅफेच्या चालकांनी बाजुलाच असलेल्या पुस्तकाचे दुकान कम वाचनालयात फेरफटका मारा म्हणून सांगितले. तिथे आमच्यासारखे वेटिंगवाले होते. पण त्यांच्यातही परदेशी पर्यटकांची संख्या मोठी होती. या वाचनालयचे मोहनसिंग सांगत होते, वाचनालयात नव्वद टक्के परदेशी वाचक येतात. त्यामुळे सगळीच पुस्तकं इंग्रजी होती. कोरोनानंतर वाराणसीमध्ये धार्मिक पर्यटनासाठी येणा-या परदेशी नागरिकांची संख्या वाढल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः यात तरुणांचा अधिक भरणा असल्याचेही मोहनकुमार म्हणाले. ते स्वतः गेली अनेक वर्ष प्रयागराजमध्ये होणा-या माघ मेळ्यात कॅम्प उभा करतात. अलिकडे यातही परदेशी भाविक मोठ्या संख्नेनं येतात आणि महिनाभर पुजा अर्चना, ध्यान धारणा करतात, अशीही माहिती मिळाली. वाराणसीमध्ये असतांना जेवढा जमेल तेवढा वेळ घाटांवर काढला. अगदी मध्यरात्रीपर्यंत या घाटांवर बसून गंगा नदिचा शांत प्रवाह बघत बसलो. पण या सर्वात एकच गोष्ट वारंवार लक्ष वेधून घेत होती ती म्हणजे, या घाटांवरील परदेशी तरुणांची संख्या. गर्दीच्या घाटांपासून दूर ही मंडळी एक कोपरा शोधून ध्यानमग्न झालेली पाहिली आणि आपल्या भारतमातेला नमस्कार केला.
पुढे वृंदावनच्या मुक्कामातही असाच अनुभव आला. तिथे ज्या हॉटेलमध्ये आम्ही उतरलो होतो, त्याच्या अगदी बाजुलाच एक मंदिर होते. दुपारी हे मंदिर बंद होत नसल्यामुळे तिथे नक्की जा, असा हॉटेलचालकांनी आग्रह धरला. आम्ही गेलो, तेव्हा दुपारचे दोन वाजले होते. मंदिरात भजन सेवा चालू होती. दोन परदेशी तरुण कृष्णाची भजने गात होते, आणि त्याला पेटीवर साथ देणाराही परदेशी तरुणच होता. मंदिरातून बाहेर पडतांना एक परदेशी तरुणी मागे आली. तिनं आम्हाला थांबवून हातात शंकरपाळ्यांची एक छोटी पिशवी दिली. देवाचा प्रसाद आहे, आम्ही इथेच करतो, रात्री आलात तर भोजन मिळेल सांगून हात जोडून जय श्री कृष्ण म्हणाली, आम्हीही जय श्रीकृष्ण म्हणत तिचे आभार व्यक्त केले. मी तिच्याकडे बघत होते.
कॉटनचा पंजाबी ड्रेस, डोक्यावर ओढणी, हातात बांगड्या, कपाळावर लाल रंगाची टिकली आणि गळ्यात तुळशीच्या मण्यांची माळ. पुढे वृंदावनच्या मुक्कामात असे अनेक तरुण तरुणी भेटले. मंदिरात भक्तीभावानं कृष्णाची आराधना करणा-या काही तरुणांबरोबर बोलण्याची संधी मिळाली. ही सर्व मंडळी नियमीत भारतात येतात. कृष्णभक्तीत लीन होतात. वर्षाला जी ठराविक काळासाठी सुट्टी मिळते, त्याचा वापर ते यासाठी करतात. यातून काय मिळतं, या माझ्या प्रश्नावर त्यांचं उत्तर अधिक बोलकं होतं. या काळात त्यांना वर्षाची उर्जा मिळते. वर्षभरात कितीही आव्हानं आली, दुःख आली, नकारात्मक विचार आले, तरी त्यावर मात करण्याची ताकद त्यांना इथे मिळते. आता या मंडळींचा हा उत्साह बघून त्यांच्या कुटुंबातील आणि मित्र परिवारातील सदस्यही सोबत येत आहेत. इथे आल्यावर सगळे मोह बाजूला पडतात. सर्व समान होतात. फक्त श्रीकृष्ण, राधा नामाचा जप करायचा, यातून खूप आनंद मिळतो, हे परदेशी पाहुण्यांच्या कडून ऐकल्यावर आमच्याही डोळ्यात नकळत पाणआलं. आम्ही ज्या ज्या परदेशी तरुणांबरोबर बोललो, त्यांनी भारतीय पदार्थांचे तोंडभरुन कौतुक केले. वृदांवनमध्ये अनेक आश्रम आहेत, या आश्रमात असे अनेक परदेशी पाहुणे येऊन रहातात. त्यातील काही रोज वृंदावन परिक्रमा करतात. अगदी क्वचित येथील प्रमुख मंदिरात जातात. जमेल तेवढा वेळ राधाकृष्णाचे भजन करतात. त्यांच्यामते वृंदावनमध्ये सगळीकडे कृष्ण आहे. जरा शांत राहून ध्यान लावलं की कृष्णाच्या बासुंरीचे स्वर कानी पडतात. हेच खरं जीवन आहे, असं सांगणा-या परदेशी तरुणाला आम्ही दोघांनीही एकचवेळी नमस्कार केला. आमच्यासाठी तोच कृष्ण होता. डोळ्यात अंजन घालणारा...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
जय श्री कृष्ण
ReplyDeleteराधे राधे
Khup sundar ! Prashan vatat vachl ki 🙏
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteKhup mast
ReplyDeleteसुरेख
ReplyDeleteअगदी बरोबर वर्णन केले आहे, आपल्या संस्कृती ची महती आपल्यापेक्षा परकियांना जास्त पटली आहे.अनेक han हिंदू धर्म स्वीकारत आहेत. आपण मात्र या रूढी परंपरा जुनाट, कालबाह्य झाल्या आहेत असे समजून सोडून दिल्या आहेत.या सर्व गोष्टी शाळेपासून शिकवण्याची गरज आहे,तरच आपल्या संस्कृतीची ओळख आणि महत्त्व येणाऱ्या पिढीला कळेल.
ReplyDelete