एक घर जेव्हा खाली होतं

 

एक घर जेव्हा खाली होतं



कितीही प्रयत्न केला तरी ती दृश्य डोळ्यासमोरुन जात नाहीत.  स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडणारे निरपराध जीव...त्यांचा आरडाओरडा...स्वतःचा नवरा मारला गेला असतांना पोटच्या पोराला वाचवण्यासाठी धडपडणारी आई...अवघ्या आठवडाभराच्या लग्नगाठीनंतर नव-याच्या प्रेताजवळ बसलेली नवविवाहिता...नंतर त्या हल्ल्यातील मृतांचा अंत्यविधी आणि त्यांच्या नातेवाईकांनी फोडलेला टाहो....कितीही बघायचं नाही, म्हटलं, तरी ही दृश्य पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येत आहेत.  मोबाईल हाती घ्या, टिव्ही लावा यातील कुठलेना कुठले दृश्य समोर येतेच.  नाही म्हटलं तर सर्व बंद केल्यावरही मनातून त्यातील दाहकता, आणि त्या निरपराध जीवांचा जीव वाचवण्याचा आटापिटा मनातून जाईना...पुढचे काही काळ ही वेदना मनात रहाणार आहे.  राहून राहून एकच विचार मनात येतो, या हल्ल्यात जे मारले गेले, त्यांचा दोष काय होता...आणि त्यांना मारुन त्या मारेक-यांना काय मिळालं.  एका फटक्यात 26 कुटुंबातील एक व्यक्ती दूर झाली.  त्या घरातील मुलं पोरकी झाली.  आई-वडिलांचा आधार गेला आणि या घरातील पत्नी आपला हक्काचा माणूस गमावून बसली.  हे सर्व वाचतांना, पहातांना एवढी वेदना होत आहे, तर प्रत्यक्ष ज्या घरांवर हे संकट आलं आहे, त्यंची काय अवस्था असेल याची कल्पनाही करता येणार नाही. 


दोन दिवसापूर्वी रात्री स्मशानापर्यंत जाणारा रस्ता काहीसा वेगळा वाटत होता.  ना ओळखीचे ना पाळखीचे असे अनेकजण तिथे जागा मिळेल तसे उभे होते.  भरपूर गर्दी असली तरी कुठेही आवाज नाही, की गोंधळ नाही.  पण प्रत्येकाच्या चेह-यावर एक वेदना होती.  स्मशानभूमीकडे आलेल्या त्या अंतयात्रेतील जीवांना नमस्कार केला आणि नकळत डोळ्यात पाणी आलं.  आमच्यासारखेच अनेकजण होते,  नमस्कार करत होते, घोषणा देत होते, चिड व्यक्त करत होते.  आम्ही दोघांनी पुन्हा त्या निरपराध जीवांना नमस्कार केला, आणि घराची वाट पकडली.  निःशब्द झालो होतो.  पण मनात लाखो विचारांचा पिंगा सुरु होता.  काय वाटलं असेल त्या मुलांना ज्यांच्या समोर त्यांच्या वडिलांना मारलं असेल हा विचार राहून राहून मनात येत होता. 

पहलगाव हल्ल्यामध्ये मारल्या गेलेल्या प्रत्येक भारतीयांपोटी अशाच भावना आहेत.  या हल्ल्यामुळे मुंबईवर झालेल्या हल्ल्याच्या आठवणी जाग्या झाल्या.  हल्ला करुन हल्लेखोर पळून जातात.  मारले जातात.  त्यांचे सरदार कधी पकडले जातात, किंवा मोकाट सुटतात.  अशाप्रकारच्या हल्ल्यांसाठी जे मदत करतात, ते त्यातून मिळालेल्या पैशांवर मजा मारतात.  पण या सर्वात जो मारला जातो, त्याच्या कुटुंबाचं काय होतं, याचा विचार हे क्रूरकर्मा करत असतील का....नक्कीच नाही.  मुंबईवर हल्ला झाला तेव्हा बातमीच्या साठी महिनाभरानं एका कुटुंबाला भेट दिली होती.  त्यांच्या घरातील कर्ता पुरुष या हल्ल्यात मारला गेला होता.  ह्ल्ल्यानंतर सरकारी मदत मिळाली.  अनेकांनी आम्ही सोबत आहोत, काही काळजी करु नका असं सांगितलं होतं.  पण त्या घरातील बाईच्या डोळ्यावरचा पदर काही निघत नव्हता.  तिचा एकच प्रश्न, यांची चूक काय होती ओ....का मारलं त्यांना...मरण काय कधीही येतं.  पण हे मरण नाही.  त्यांना मारलंय, ही जाणीवच कमी होत नाही.  कधीतरी प्रचंड राग येतो.  संताप होतो.  समोर येईल त्याला मारावसं वाटतं.  आम्ही काय त्याचं घोडं मारलं होतं,  आमच्या वाट्याला का हे दुःख आलं.  माझ्यासमोर ती बाई हंबरडा फोडून रडत होती.  तिची दोन्ही मुलं तिला बिलगून रडत होती.  त्यांच्या डोळ्यातून पाणी येत नव्हतं.  पण ते टप्पोरे, भयाण डोळे मी कधीही विसरु शकत नाही. 

आपलं माणूस, आपल्याला सोडून गेलं नाही, तर त्याला कोणीतरी आपल्यातून


जबरदस्तीनं नेलं आहे, याची सल या दुःखात अधिक होती.  तिच सल आता पुन्हा जागी झाली आहे.  कुटुंबासोबत आनंदाचा वेळ घालवण्यासाठी गेलेल्या या कुटुंबाना माहितही नव्हतं की, त्यांचा हा आनंद आयुष्यभरासाठी दुःखाच्या ओरखड्यासारखा त्यांच्या सोबत रहाणार आहे. या कुटुंबांच्यावरील दुःखाचा डोंगर कमी कसा होईल, याची काळजी घेणं हे आपणा सर्वांचं काम आहे.  पण सध्या सोशल मिडियामध्ये जो गोंधळ चालू आहे, तो बघून अधिक त्रास होत आहे.  हल्ला कोणी केला, तो कोणाच्या फायद्यासाठी झाला.  हल्लेखोर कोणाच्या चुकीमळे आले, ते नेमके आत्ताच कसे आले असे अनेक प्रश्न विचारण्यात येत आहेत.  अरे, जरा थांबा ना....आपल्या श्रेयवादाच्या लढाईसाठी या कुटुंबावर अजून आघात कशाला करता.  आपल्या लष्करावर, जवानांवर विश्वास ठेवा.  गल्लीमध्ये निवडणूक झाली तर निवडून येईन की नाही, अशी शंका ज्यांना आहे, तेही काय करायला हवं, कसं करायला हवं, कुठे चुकलं, असे सल्ले देतांना दिसले, की हसवं की रडावं हा प्रश्न पडतो.  आता वेळ आहे, ती या सर्व कुटुंबासोबत रहाण्याची.  फक्त एक दिवसाचा बंद किंवा, श्रद्धांजली सभा नको, त्यांच्यासोबत कायम उभं रहाण्याची शपथ घ्यायला हवी.  त्यांच्या घरातील एक कोपरा रिकामा झाला आहे, हा  कोपरा कधीही भरता येणार नाही.  पण बाकीच्या घराचं घरपण हरवणार नाही, ही आपली जबाबदारी आहे, आणि ती पार पाडायला हवी. 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

Comments

  1. Replies
    1. प्रत्येकाच्या मनातील भावना सईतू शब्दबध्द केल्यास

      Delete
  2. कामाख्या देवीला रेड्यांचा, बकऱ्यांचा बळी देतात.
    तो बळी देताना निरपराध रेड्यांच्या , बकऱ्यांच्या चेहऱ्यावर माझं काय चुकलं म्हणून जो भाव होता.
    त्याची मला आठवण आली.

    ReplyDelete
  3. शब्दांची बांधणी आणि रचना वाचताना स्वानुभावांचा भास होतो. अप्रतिम लिखाण 👌👍

    ReplyDelete
  4. काही नाही होणार, आणखीन दोन-चार दिवस दुःख व संवेदना व्यक्त केली जाईल. नंतर ते कुटुंब आणि त्यांचे प्रश्न व समस्या त्यांनाच सोडवावे लागेल. काही दिवसानंतर या हल्ल्याची फक्त आठवण राहील ते निरपराध मृत्यू पडलेले व त्यांचे कुटुंबीय यांना शासनच काय इतर सर्व देखील विसरून जातील.

    ReplyDelete
  5. जयंत बने26 April 2025 at 12:48

    अप्रतिम लेख

    ReplyDelete
  6. Hinduna parivarala dukha yete asa ka

    ReplyDelete
  7. Tumcha manala lagala manun he shabda ale
    🙏🙏

    ReplyDelete
  8. नि:शब्द!!... ललिता छेडा

    ReplyDelete
  9. महेश टिल्लू2 May 2025 at 17:13

    निरपराध हिंदूंना मारले घटना अत्यंत दुर्दैवी आहे.सरकार आतंकवाद्यांना धडा शिकवण्याचे काम करणार यात शंका नाही.पण आपल्या पातळीवर खूप मोठी जबाबदारी आहे. त्यांच्यावर आर्थिक बहिष्कार घालण्याची.मी ती केली आहे.धर्म विचारून मारले आहे हे या घटनेचे वेगळेपण आहे हे लक्षात घ्यावे. म्यानमारच्या जनतेने हे बहिष्कार अस्त्र यशस्वी करून दाखवले आहे. आपण करू शकतो याची सुरवात प्रत्येकाने करायला हवी.

    ReplyDelete
  10. Tujya shabda ni mala nishabda kele g ,jyanche aaple gele tyanchi Manashtithi samjun ghena ashakya j aste tari sai tu shabdat utravle

    ReplyDelete

Post a Comment