लाडूत लाडू कडकडे लाडू

 

लाडूत लाडू कडकडे लाडू


दरवर्षी मार्च महिना लागला, की वर्षाच्या साठवणीचे पदार्थ करण्याची ओढ लागते.  उपवासाचे पापड, तळणीच्या मिरच्या, त-हेत-हेच्या फेण्या आणि जमतील तेवढ्या कुरडया.  या साठवणुकीच्या प्रकारातील अजून एक आवडीचा आणि राजा पदार्थ म्हणजे, मसाला.  अर्थातच हा मसाला नसेल तर सर्वच पदार्थ निरस होतात.  आमच्याकडे दरवर्षी मालवणी मसाला होतो.  त्यासाठी गेली वीस-वाबीस वर्ष मी लालबागच्या मसाले गल्लीत जाते.  मला जी कामं करायला आवडतात, त्यापैकी हे एक सर्वात आवडीचे काम.  याच मसाल्याच्या गल्लीला लागून आहे, ती फरसाण गल्ली.  लालबागच्या या दोन गल्ल्यांमध्ये जो कोणी खवय्या एकदा गेला आहे, तो तिथे वारंवार जाण्याचे निमित्त शोधत असतो.  मी सुद्धा त्यातलीच एक आहे.  दरवर्षी मसाल्याची ऑर्डर देण्यासाठी मसाला गल्लीत गेलं की या फरसाण गल्लीलाही भेट देते.  फरसाणचे अनेक चविष्ठ प्रकार तिथे असतात.  बहुधा एप्रिल महिन्याच्या शेवटी माझी ही फेरी होते,  तेव्हा गावाला जाणा-या अनेक चाकरमान्यांनी ही गल्ली गजबजलेली असते.  गावाला जातांना फरसाण, बेफर्स झालंच तर मिठाईची पाकीटं येथून घेण्यात येतात.  आत्तापर्यंत मी जेव्हा जेव्हा गेले आहे, तेव्हा ही फरसाणची दुकानं फरसाण, वेफर्स सोबत बुंदीच्या कडक लाडवांनी भरलेली असायची.  हे कडकडे लाडू आणि फरसाण हा चाकरमान्यांचा आवडता खाऊ.  मात्र यावर्षी कडकडे लाडू फारसे दिसले नाहीत.  त्यांची जागा, काजू कतली, कचोरी, शंकरपाळी आणि छोट्या समोश्यांनी घेतली होती.  मी उत्सुकतेपोटी दुकानदारांकडे चौकशी केली, तेव्हा समजले की, गेल्या दोन वर्षापासून या कडकडीत लाडवांची जागा, नव्या मिठाईच्या प्रकारांनी घेतली आहे.  फारकाय फरसाण आणि वेफर्सच्या ऐवजी अन्य पदार्थांना मागणी आली आहे.   त्यामुळे या दुकानदारांनीही त्यांची खासियत असलेल्या या कडकडीत लाडवांची संख्या कमी केली असून अन्य मिठाई तयार करण्यावर भर दिला आहे. 


लालबागच्या मसाले गल्लीचा कोपरा न कोपरा मला तोंडपाठ आहे.  इथे मसाल्याच्या निमित्तानं जाणं आणि मनसोक्त भटकणं हे माझं आवडीचं काम.  मसाल्यासोबत या गल्लीमध्ये फेरफटका मारल्यावर अनेक गोष्टींची माहिती मिळते.  मुळात लाल मिरच्यांचे कित्तीतरी प्रकार पहायला मिळतात.  तीच गत हळदीची.  यावेळी अगदी काळी हळदही बघता आली.  शिवाय मसाल्यांच्या पदार्थांची विविधता समजून घेता येते.  काजूचे प्रकार आणि त्यांची खुबी कळते.  सुक्या खोब-याच्या वाट्यांमध्ये काय ते विशेष.  पण या मसाला गल्लीमधील दुकांनांमध्ये एकसारख्या सुक्या खोब-याच्या वाट्या बघितल्यावर पहिला प्रश्न पडतो, की या सर्वांना एकाच साच्यातून तयार केल्या आहेत की काय.  एवढा त्यात सारखेपणा असतो.  मग या सर्वांबाबत दुकानदारांबरोबर चर्चा करायची.  त्यातून या सर्वांचं कोडं सुटत जातं.  नवनवीन माहिती मिळू लागते.  वास्तविक आता येथील सर्वच दुकानदार नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतात.  अगदी ऑनलाईन ऑर्डर देता येते आणि तयार मसाला घरपोच मिळण्याची सोयही आता आहे.  मात्र मलाच उठाठेव भारी.  त्यामुळे वर्षात किमान चार वेळा तरी या गल्लांमध्ये मी फिरुन घेते.  

याच मसाला गल्लीची बहिण म्हणजे, त्याला लागूनच असलेली फरसाण गल्ली.  मसाले गल्ली जशी मसाले, पापड, सुक्या मसाल्यांनी भरलेली असते, तशीच ही गल्ली फरसाणाच्या दुकानांनी भरलेली असते.  अलिकडच्या काही वर्षात येथे मसाला कुटणीचे छोटे कारखाने चालू झाले आहेत.  शिवाय आंब्यांच्या पेट्यांनी काही दुकानं सजलेली असतात.  त्यामुळे या गल्लीत प्रवेश केल्यावर पहिल्यांदा सटकून दोन-चार शिंका तर येणारच.  मसाल्याचा सुगंध आणि आंब्यांचा दरवळ येथे पसरलेला असतो.  शिवाय मसाल्याच्या गल्लीपेक्षा येथे गर्दी जास्त.  मसाले कुटण्याच्या दुकानासमोर रांग लावून बसलेल्या महिलांचे मोठे गट आणि फरसाणच्या दुकानात भल्या मोठ्या पिशव्या घेऊन खरेदीसाठी आलेले चाकरमानी हे येथील नेहमीचे दृश्य.  काही ठिकाणी 1 मे च्या मुहुर्तावर सार्वजनिक पुजा असतात.  शिवाय मे महिन्यापासून गावी जाणा-यांची संख्या अधिक असते.  त्यासाठी येथे मोठी खरेदी होते.  गेल्या काही वर्षाच्या माझ्या अनुभवानुसार येथील सर्वच फरसाणाच्या दुकानात बटाटा वेफर्स आणि


बुंदीचे कडकडीत लाडू यांची मोठी मागणी असते.  एकतर हे लाडू आकारानं लहान असतात.  त्यामुळे ते पुरवठ्याला अधिक येतात.  शिवाय हे लाडू लवकर खराबही होत नाहीत, त्यामुळे त्यांची मागणी जास्त असते.  यावेळी मात्र हे कडकडीत लाडू कुठे गायब झाले होते.  मी दुकानदाराकडे उत्सुकतेनं चौकशी केली, तेव्हा कळलं, की आता या लाडवांऐवजी दुस-या मिठाईची मागणी वाढली आहे.  त्यात काजू कतलीचा नंबर अधिक आहे.  शिवाय शंकरपाळ्या, खाजे,  खोबरा बर्फी यांनीही कडकडीत लाडवांची जागा घेतली आहे.  बरं त्या बटाट्यांच्या वेफर्सचीही मागणी कमी झालीय म्हणे.  त्यांच्या जागी तिखट कचोरी जास्त चालू लागली आहे.  माझ्यापुढे असलेली अनेक मंडळी मोठ्या पिशव्यातून हा खाऊ भरुन घेत होती.   त्यातही याच कचोरी, भाकरवडी, शंकरपाळ्यांचा भरणा होता.  थोडी गर्दी कमी झाल्यावर मी त्या दुकानदाराकडे याबाबत चौकशी केली.  त्यातून कळलं, की अगदी दोन-चार वर्षापूर्वी दिवसाला कमीत कमी पंधरा किलो तरी हे कडकडीत लाडू संपायचे.  आता तिच संख्या पाच किलोवर आली आहे.  त्याचा कडकडीत पणाच त्यांच्या मुळावर उठला आहे.  या लाडवांमध्ये असलेल्या साखरेच्या जादा वापरामुळे नवीन पिढी त्याला नकार देते.  तर वयोवृद्ध हे लाडू बघून नकार देतात.  त्यामुळे ब-याचवेळा

लाडू तसेच पडून रहातात.  मग त्याला पर्याय म्हणून अन्य पदार्थ नेले जात आहेत.  त्यात शंकरपाळी, कचोरी सारख्या पदार्थांनी बाजी मारली आहे. 

आम्हाला ही माहिती सांगतांना दुकानदारानं कालाय तस्मै नमः म्हणत नमस्कार केला.  अर्थातच काळाप्रमाणे बदल होत आहेत.  आम्हीही त्यातलेच.  पण चवीपुढे मी ब-याचवेळा शरणागती पत्करते.  कडकडीत लाडूंवर एवढी चर्चा झाली की, चार लाडू घेतलेच.  अर्थात मी त्यांचा वेगळा वापर करते.  दिवसभर मसालाच्या मागे लागून घरी आल्यावर काहीही खाण्याची इच्छा नव्हती.  अशावेळी मोठ्या कपामध्ये व्हॅनिला आईस्क्रिम भरुन घेतलं.  ते चार कडकडीत लाडू मिक्सरमधून रवाळ बारीक केले.  तो लाडवांचा रवा त्या आईस्क्रिमवर टाकला.  आईस्क्रिमचा थंडावा मिळाला आणि कडकडीत लाडवांची चवही घेता आली...काळाप्रमाणे बदल करावा,  पण त्यासाठी चव कशी विसरायची...त्यासाठीच हा माझा मधला मार्ग..

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

Comments

  1. आमच्या लहानपणी कडकडे लाडू चाकरमानी लोक कोकणातून परत येताना मुंबईकर लोकांना भेट द्यायला हमखास घेऊन यायचे. आता ते मुंबईहून कोकणात जातात, हे वाचून गंमत वाटली. कालाय तस्मै नमः! 🙏🌹
    प्रेषक.... सौ.मृदुला राजे

    ReplyDelete
  2. khup chhan lekh

    ReplyDelete
  3. खूप छान लेख आहे मस्तच

    ReplyDelete
  4. माहीम ला कोकण नगर मध्ये मालवणी बाई चे दुकान आहे. त्या ताजे कडक बुंदीचे लाडू करतात. इतरही लाडू करतात. चविष्ट असतात 👌🏻👌🏻😋

    ReplyDelete

Post a Comment