कथा एक...दृष्य दोन

 

कथा एक...दृष्य दोन


प्रवास.  हा शब्दच ऐकला तरी मी फुल्ल चार्ज होते.  मग विचार करा, प्रत्यक्ष प्रवासात किती उत्साही असेन ते...या उत्साहाला अनेक कारणं आहेत.  मुळात नव्या जागांची माहिती होते.  जी स्थानं माहित आहे, त्यांना नव्यानं शोधण्याचा आनंद मिळतो.  या सर्वात अनेक ओळखी होतात.  आयुष्यभरासाठी मित्रपरिवार जोडला जातो.  काही असे अनुभव गाठीशी येतात, जे मार्गदर्शक होतात.   निसर्गाच्या अनेक छटा बघण्याचा आनंदही वेगळाच असतो.  गेल्या आठवड्यातही असाच प्रवास झाला.  अगदी दोन दिवसांचा.  या प्रवासात अशा अनुभवाचा ठेवा मिळाला.  मुळात त्याची सुरुवात झाली ती गाडीची वाट पाहण्यापासून.  अगदी पहाटे पाचच्या सुमारास धावपळत आम्ही रेल्वे स्थानक गाठलं.  पण ज्या गाडीनं जाणार होतो, ती गाडी पाऊण तास उशीरा.  मग काय गाडीची वाट बघत गप्प बसलो आणि तिथेच एक कथा आणि दोन दृष्य समोर आली. 


ठाणे स्थानकावर पहाटे पाचला एक्सप्रेस गाड्या पकडण्यासाठी गर्दी झालेली.  आम्हीही त्या गर्दीचा एक भाग होतो.  आमची गाडी पाऊण तास उशीरा येणार असल्यामुळे आमच्या दोन बॅंगा जवळ घेत पुस्तकांचा आधार घेतला.  पण आमच्या मागे बसलेल्या एका कुटुंबाच्या गप्पांनी लक्ष वेधून घेतलं.  या कुटुंबातील महिला आपल्या मुलासह बाहेरगावी जाणार होती.  बहुधा तिच्या आईच्या घरी जात असावी.  तिला सोडण्यासाठी तिचा नवरा आलेला.  सोबत चार मोठ्या बॅगा.  ती बाई आली तीच प्रचंड सूचना करीत.  नवरा एकटा रहाणार होता, म्हणजे, मंगळ ग्रहावर रहाणार आहे, अशाच आशयाच्या त्या सूचना होत्या.  स्वयंपाकघरात काय कुठे ठेवलं आहे, याची माहिती सांगितली जात होती.  सकाळी चहा लागेल, तो करुन घ्या.  चहा पावडर बरणीत काढून ठेवली आहे.  ती बरणी पहिल्या रॅकच्या पहिल्या ट्रॉलीमध्ये आहे.  निळ्या रंगाचे झाकण आहे तिचं.  तिच्याच बाजुला साखरेची बरणी आहे.  तुम्हाला चहासाठी आलं लागलं तर फ्रिजमध्ये आहे.  त्याचा चौकोनी डबा आहे.  कप माहित आहेत ना कुठे आहेत ते....ते शेवटच्या रॅकमध्ये आहेत.  पहिली ट्रॉली ओढा, कप दिसतील.  ती ट्रॉली जरा हळू ओढा...मध्ये मध्ये अडकते ती.  या एवढ्या बारीक सारीक सूचना ऐकतांना माझ्या कपाळावरच्या आठ्या वाढत होत्या.  बाजुला नवरा हसत होता.  हळूच म्हणाला, आमच्या घरात मलाच चहा करावा लागतो...पण तिकडे चहाचा सीन अजून संपला नव्हता.  तिच्या नव-यालाच काय, पण आमच्यासह आणखी चार जणांना ऐकू जाईल, या आवाजात ती बाई सूचना करतच होती.  साखर लागेल तुम्हाला जास्तीची का...ती खाली मोठ्या रॅकमध्ये ठेवली आहे.  मोठ्या बरणीत...ओतून घ्या. 

नाही सापडली तर दुकानातून पाव किलो विकत घ्या.  मी आल्यावर त्या बरणीत ओतून ठेवेन.  जेवणाची यादी बाईकडे करुन दिली आहे.  भाजी फ्रिजमध्ये भरली आहे.  ती करेल सर्व मेनूप्रमाणे.  मी रोज तिला फोन करेन...तुम्ही काळजी करु नका.  तुम्ही फक्त गरम करुन घ्या.  ऑफीसमधून आल्यावर जेवण बाहेर काढून ठेवा आणि दहा मिनिटानंतर गरम करा...दह्याचे छोटे डबे आणून ठेवलेत फ्रिजमध्ये...त्यात साखर घालून घ्या....बरणीतील साखर कमी पडेल का तुम्हाला....ती खालच्या रॅकमध्ये....बस्स...मी एवढंच ऐकू शकले.  माझ्या बाजुला हसत या संवादाची मजा घेणा-या माझ्या नव-याला हात धरुन उठवलंच आणि दुस-या बाकड्यावरची जागा पकडली.  आता ज्या नव-याला  स्वतःच्या घरातील साखरेची बरणी कुठे आहे, हे माहित नाही, तो काय पाक करुन पिणार आहे का,  की शिरा करुना खाणार आहे....हे प्रश्न मला त्या बाईला विचारावासे वाटत होते.  आम्ही जागा बदलली, अर्थात तिच्या सूचना चालूच होत्या.  पुढच्या पाच मिनिटांनी त्या महिलेची (नशिबानं) गाडी आली.  नव-यानं तिला आणि मुलाला गाडीमध्ये चढवलं.  सामान सोबत दिलं,  गाडी चालू झाल्यावर दोघांना टाटा करणा-या त्या माणसाचे आम्ही दोघंही निरिक्षण करीत होतो.  त्यानं केवढा तरी मोठा सुस्कारा सोडला होता.  त्याचा तो सुस्कारा बघितल्यावर   मात्र आम्ही दिलखुलास हसलो होतो. 

एक गाडी गेली आणि पुन्हा आमच्या गाडीची स्थिती बघितली.  त्याआधी एक गाडी लावली होती.   आम्ही पुन्हा पुस्तकात डोकं घालण्याचा प्रयत्न केला.  तेवढ्यात दोन मुलं धावपळत आली आणि जवळपास आमच्या पायावरच त्यांनी एक भरलेली गोण टाकली.  काही कळायच्या आधी त्यांचे वडिल आले आणि त्यांनी दोन मोठ्या पिशव्या आम्ही बसलो होतो, त्या बाकड्याच्या बाजुला ठेवल्या आणि ते बाकड्यावर धापकन बसले.  आम्हाला धक्का लागला हे लक्षात आल्यावर सॉरी म्हणाले.  गाडी येईल, म्हणून धावपळत आलो...म्हणत त्यांनी मुलांना आई कुठे राहिली बघा रे, म्हणून ऑर्डर सोडली.  मुलं पुन्हा मागे फिरली आणि दोन मिनिटात आणखी एक मोठी पिशवी घेऊन


हजर झाली.  त्यांच्यापाठोपाठ त्यांची आई होती.  पदर खोचून तिनं पिशव्या मोजल्या.  तिच्यासोबत मोठा मुलगा जाणार होता.  एक मुलगा वडिलांबरोबर रहाणार होता.  तिनंही तिच्या नव-याला आणि मुलाला सूचना दिल्या.  पण त्या मोजक्याच होत्या आणि ठसक्यात होत्या.  दळन टाकलंय...ते आणा....सकाळच्याच भाक-या करुन ठेवा...चटणी हाय केलेली...वाटलंस तर कांदा-बटाट्याचा रस्सा करुन खा...सगळ्या वस्तू जागेवर हायेत...तिथेच ठेवा...बस्स....एवढ्याच सूचना.  या तिच्या सूचनांवर तिच्या नव-यानं आणि मुलानं मान डोलावली.  तेवढ्यात गाडी आली, मोठ्या मुलांनं सामानाची गोण आणि मोठी पिशवी उचलली.  बाकी दोन पिशव्या त्या बाईनं घेतल्या.  गाडीत पटकन चढलेल्या लेकानं आपल्याकडचं सामान बाजुला ठेवत, आईकडचे सामान हातात घेतले.  गाडीत चढतांना तिनं तिच्या हातातली शंभरची नोट धाकट्या लेकाच्या हातात दिली.  ठेव जवळ...पण बाहेरच खाऊ नकोस...म्हणत त्याच्या डोक्यावरुन हात फिरवला आणि ती गाडीत चढली.  आईला टाटा करणा-या बारक्याला त्याच्या वडिलांनी जवळ घेतले आणि हात पकडून ते दोघंही बाप-लेक शांतपणे जाऊ लागले.  आम्ही त्या बाप लेकाकडे बघत होतो.  आयुष्याचे चटके सहन केल्यावर जे सामंज्यस जीवनाच्या खजिन्यात जमा होते, त्यातूनच अशी शांत कृती होते....ते दोघं जात असतांनाच आमच्या गाडीची सूचना झाली.  गाडी आली....आणि तीच शांतता सोबत घेत आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली...

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

Comments

  1. खूप छान अवलोकन आणि शब्दांकन!
    सौ.मृदुला राजे

    ReplyDelete
    Replies
    1. सई खूप शब्दांकन आणि चांगला अनुभव शेअर केलास खूप अभिनंदन

      Delete
  2. खुप छान

    ReplyDelete
  3. खुप छान

    ReplyDelete
  4. महेश टिल्लू16 May 2025 at 11:30

    या कथेमध्ये दोन्ही कुटुंबातील प्रेमभाव सारखाच आहे,फक्त सांगण्यातील फरक आहे.छान आणि वेगळा विषय ...

    ReplyDelete
  5. महेश टिल्लू16 May 2025 at 11:31

    खूप छान आणि वेगळा विषय आहे.दोन्ही कुटुंबातील प्रेमभाव सारखाच आहे फक्त सांगण्यातील फरक आहे एवढेच

    ReplyDelete
  6. Khooop sundar vichar aani avalokan

    ReplyDelete

Post a Comment