कालचक्र

 

कालचक्र


दहावीचा निकाल जाहीर झाल्याची बातमी समजली, आणि अवघ्या काही मिनिटात माझी मैत्रिण मंजू तिच्या लेकीसह घरी धडकली.  पेढ्यांचा बॉक्स माझ्या हातात जवळपास आपटून म्हणाली,  हे घे, पेढे खा...पण हिच्याशी काहीतरी बोल.  आजचा एवढा चांगला दिवस, पण हिच्या हट्टामुळे खराब झालाय.  डोकं फिरलंय हिचं.  कुठे जायचं आहे ते विचार तिला.  आम्ही एवढा विचार करुन ठेवला, पण यांच्या इच्छा काही वेगळ्याच.  आता हिला काय कळतंय ग करिअर म्हणजे काय ते...आपण कधी आपल्या आई वडिलांना शिकवलं का...नाही ना...मग यांनाच बघ शिंग फुटली आहेत.  रिझल्ट लागल्यावर किती खूष होतो आम्ही...पण हिच्या हट्टानं सर्व सुखावर बोळा फिरवलाय...तूच आता जरा समजव तिला.  मंजूच्या लेकीचा, रुहीचा दहावीचा निकाल लागला होता.  खरतंर ती आणि तिचा नवरा रुहीसोबत संध्याकाळी येणार होते.  पण भर दुपारी,  तापलेल्या उन्हासारखीच मंजू घरात दाखल झाली होती.  तिच्यासोबत असलेल्या रुहीचा चेहरा पार पडलेला होता.  ती मान खाली घालून आली आणि तशीच कोप-यात बसून राहिली.  मी खुणेनं मंजूला सर्व ठिक आहे का ते विचारलं.  ती बोलता बोलता धापकन कोचावर बसली होती आणि रागानं आपल्या लेकीकडे बघत होती.  सगळं चांगलं आहे ग बाई....95 टक्के पडलेत तिला.  मी व्वा म्हणत, रुहीची पाठ थोपटली.  तेव्हा पुन्हा मंजू सुरु झाली.  पाठ थोपटून काय करतेस, तिला विचार काय घेणार ते...मॅडम भाषा शिकणार आहेत. 


तेव्हा कुठे मंजूच्या रागाचं कोडं सुटलं.  मला रुहीचं वाईट वाटत होतं.  तिच्यासाठी आज महत्त्वाचा दिवस होता.  आनंदाचा दिवस.  पण...या पणला बाजूला सारत मी स्वयंपाकघरात गेले.  गेल्या रत्नागिरीच्या ट्रिममधून आवळा आणि आल्याचे छान सरबत आणले आहे.  तीन ग्लासं त्या सरबताची भरली आणि हॉलमध्ये त्या दोघींसमोर ठेवली.  मंजूनं घटाघटा सरबत संपवलं...तर रुहीनं फक्त हातात पकडून ठेवलं होतं...

मी विषय बदलला आणि सरबत कसं आहे, हे मंजूला विचारलं.  हा काय आता विचारायचा प्रश्न आहे का...अशा थाटात तिनं माझ्याकडे बघितलं, आणि ठिक, एवढंच उत्तर दिलं.  पुन्हा शांतता.  काय बोलावं.  मंजू तर नुसती धुमसत बसली होती.  रुही हताशपणे एकदा आपल्या आईकडे आणि एकदा माझ्याकडे बघत होती.  शेवटी त्या धुमसत्या मंजूला मी पुन्हा विचारलं, अग सरबत कसं आहे, पुन्हा एक ग्लास आणू का.  आता तिचा धुमसता गोळा माझ्यावरच फुटला.  तुला माझ्या लेकीपेक्षा सरबत महत्त्वाचं वाटतं का...मग थोडी पड घेत तिला सांगितलं, ज्या माणसाकडून सरबत घेतलं, त्यानं सांगितलेली गोष्ट सांगू का तुला.  ऐक ना, तुला फायदा होईल त्याचा.  मंजूनं पुन्हा माझ्याकडे तशाच रागाच्या नजरेनं बघितलं,  आता ही काय गोष्ट ऐकण्याची वेळ आहे का...हा त्याताल अर्थ....मग तिच्या या सर्व जळजळीत नजरा सहन करत मी सुरु झाले. 

रत्नागिरीचा बाजार बघायचा म्हणून मी आणि नवरा दुपारी बाराच्या ठोक्याला फिरत होतो.  आंबे, फणस, काजू, रातांबे यांनी बाजार भरलेला.  बाजार फिरल्यावर आम्ही तिथल्या एका जुन्या हॉटेलमध्ये गेलो.  लिंबू सरबत प्यायचं होतं.  पण हॉटेलच्या मालकानं आवळा सोडा प्या, छान असतो, म्हणून सुचवलं.  आम्ही हो म्हणेपर्यंत त्यानं दोन ग्लास समोर ठेवले.  उन्हाच्या काहिलीनं हैराण झालेल्या आम्ही दोघांनाही एका झटक्यात ते ग्लास संपवले.  तो मालक तिथे आसपासच होता, आणखी देऊ का, म्हणून विचारलं आणि आमची कळी खुलली.  आता समोर आलेले दोन ग्लास चव चाखत संपवत असतांना त्या मालकाबरोबर गप्पा चालू झाल्या.   गाव, नाव पुढे झालं.  बोलतांना नव-याचं लक्ष समोरच्या हॉटेलवर गेलं.  जेवणासाठी हे हॉटेल प्रसिद्ध होतं.  त्याला टाळं लागलं होतं.  त्यानं प्रश्नार्थक नजरेनं


आम्ही बसलो होतो, त्या हॉटेलच्या मालकाकडे बघितलं.  त्यावर तो हसू लागला.  म्हणाला, अहो याला कालचक्र म्हणतात.  एक पिढी येते, आणि जाते.  मग दुसरी...मग तिसरी.  पिढ्यानंपिढ्या चालू असतात.  आता प्रत्येक पिढीला एकच व्यवसाय आवडेल का...आता तर घरातील पोर सुद्धा आपल्या मनाप्रमाणे लग्न करतात.  आपण त्यांना सामावून घेतोच ना कुटुंबात.  बापानं केलं तेच आता पोरं करतील हे सांगता येत नाही.  पोरांना काहीतरी वेगळं करावसं वाटलं तर काय करायचं.  त्यांच्यावर कशाला जबरदस्ती करायची.  शेवटी त्यांनापण मन असतं ना...तसंच या समोरच्याचं झालं आहे.  दोन मुलं आहेत.  एक बाहेर गेलाय.  तिथेच रहाणार म्हणतो.  आणि दुसरा धंद्यातल्या तोट्याला, धावपळीला घाबरतो.  त्यानं मुंबईत मोठ्या पगाराची नोकरी पकडलीय.  ही या हॉटेलवाल्यांची तिसरी पिढी.  बापानं मुलांचा निर्णय मान्य केला.  त्याला त्याच्या बापानं असं स्वातंत्र दिलं नव्हतं.  आता लवकरच हे हॉटेल विकणार आहे आणि मालक मुलाकडे फॉरेनला जाणार आहे. 

हॉटेलवाला हे सर्व सांगत असतांना अचानक शांत झाला.  एव्हाना आमचा त्या आवळ्याच्या सोड्याचा दुसरा ग्लासपण खाली झाला होता.  आम्ही त्याच्यासमोर पैसे ठेवले आणि हात जोडले.  पुढच्यावेळी येऊ तेव्हा नक्की इथेच येणार, म्हणून सांगितले.  तेव्हा त्यानंही हात जोडले.  पुढच्यावेळेचं सांगू नका.  अहो, आमचंही काही खरं नाही.  मुली आहेत दोन.  पण त्यांना या धंद्यात रस नाही.  एक डॉक्टर होतेय तर दुसरीला नाचाची आवड आहे.  आम्हीही समोरच्यासारखंच मान्य केलं आहे.  प्रत्येक गोष्टीचा एक ठराविक काळ असतो.  तो काळ संपला की त्यातून आपला मोह काढून घ्यायचा असतो.  हे स्विकारता आलं की सगळं ठिक होतं.  उगाच आपला हेका चालू ठेवला तर हाती काहीच लागत नाही, फक्त मनाची तगमग होत रहाते....हात जोडून तो हॉटेलचा मालक आमच्याशी बोलत होता.  काही क्षण आम्ही दोघंही तिथेच खोळंबलो.  त्याच्या डोळ्यातील वेदना दिसत होती.  पण त्या वेदनेला त्यानं आपलंस केलं होतं.  भविष्यात त्यातूनच काहीतरी सुखाचं होईल, अशी आशाही त्याच्यात होती.  निघतांना त्यानं त्या आवळ्याच्या सरबताच्या बाटल्या हाती दिल्या, त्याच या आहेत. 

मंजूचा हात हातात पकडून मी हे सर्व सांगत होते.  एव्हाना तिचं धुमसणं शांत झालं होतं.  डोळे भरुन आले होते.  तिनं आणि तिच्या नव-यानं लेकीला इंजिनिअर करायचं स्वप्न बघितलं होतं.  पण रुहीला भाषेची आवड.  तिला परदेशी भाषेमध्ये करिअर करायचं होतं.  आई आणि वडिलांच्या समोर बोलण्याची तिची हिम्मत होत नव्हती.  तिच्या या भाषा प्रेमाला ते दोघंही टाईमपास म्हणूनच बघायचे.  पण रुहीनं फ्रेंच, जर्मनसह चीनच्या मॅडरिनमध्येही चांगली प्रगती केलेली.   दहावीचा निकाल लागल्यानंतर कुठल्या शाखेत प्रवेश घ्यायचा हा निर्णय मंजू घेऊ लागली तेव्हा मात्र रुहीला बोलल्याशिवाय पर्याय राहिला नाही. आणि त्या सर्वांतूनच हे सर्व रामायण घडलं.  दोघीही भर दुपारी आलेल्या.  सगळं शांत होईपर्यंत संध्याकाळ झालेली.  मंजूनं फोन करुन नव-याला आमच्याकडेच बोलवून घेतलं.  रुहीच्या दहावीची पार्टी म्हणून केक घेऊन ये, म्हणून तिनं ऑर्डर सोडली आणि रुहीनं मोकळा श्वास घेतला.  माझा नवरा आईसक्रीम आणण्यासाठी बाहेर गेला.  मला मदतीसाठी म्हणून मंजू स्वयंपाकघरात येऊ लागली.  पण मी तिला अडवत रुहीसोबत गप्पा मारत बस म्हणून सुचवलं.  थोड्यावेळानं मध्येच बाहेर डोकावलं, तर मायलेकी मोबाईलमध्ये काहीतरी बघून हसत होत्या.  माझ्याकडे लक्ष गेल्यावर म्हणाल्या, कॉलेजची नावं बघतोय ग...दोघींचेही डोळे निवळले होते आणि मनही...

रात्री सर्वांनी रुहीच्या भाषा कौशल्याची झलक बघत बघत जेवण केलं.  निघतांना मंजूनं ती सरबताची बाटली, चव छान आहे, म्हणत मागून घेतली.  हातातल्या त्या बाटलीकडे बघत तिनं मला मिठी मारली, सोबत रुहीनंही आणि थॅक्स म्हणत निरोप घेतला.  स्विकारणं हा शब्द खूप सोप्पा आहे.  फक्त त्याच सोप्प्या पद्धतीनं तो स्विकारला तर तो अधिक खुलून जातो, हे मला पुन्हा एकदा जाणवलं. 

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

    

Comments

  1. आता काळ बदलला आहे मुलांवर करिअर लादून चालत नाही. अन्यथा खूप वेगळे परिणाम होतात. खूप छान मांडलय.

    ReplyDelete
  2. सई,कित्ती छान भावस्पर्शी लिहिलंयस हा तर बऱ्याच कुटुंबातील गुंता तुझा विचार वाचून अलगद सुटेल ग 👌🌹

    ReplyDelete
  3. आज का कडवा सच

    ReplyDelete
  4. ❤️👍👍👍🙏🙏🙏🎉

    ReplyDelete
  5. Khup chan lekh

    ReplyDelete
  6. वास्तवावर प्रकाश टाकणारा लेख सई ताई

    ReplyDelete
  7. किती उत्तम प्रकारे प्रश्न सोडवला आहेस, तुझे विचार आणि साध्या सोप्या पद्धतीने बोलल्यासारखं ‌ लिहीणं‌ खूप कौतुकास्पद आहे....ललिता छेडा

    ReplyDelete
  8. थोड्याफार फरकाने बऱ्याच ठिकाणी अशा समस्या येताना दिसतात पण मुलांचा विचार करून आपल्या मताला किंवा विचारांना थोडसं कलत करून मुरड घालून मुलांच्या कलाने घेतलं तर सगळंच सुलभ होईल हे तुझ्या गोष्टीतून दाखवून दिला आहेस.खूप छान लेख आहे.

    ReplyDelete

Post a Comment