सहज जमुनी आले
मी उद्या सकाळी येतेय, सोबत इराही आहे...कॉलेजमधील मैत्रिण, विणाचा हा मेसेज दोन दिवसापूर्वी रात्री वॉटस्अपवर आला आणि माझी कोण धावपळ उडाली. माझ्या सगळ्या मैत्रिणींमधील विणा हे एक वेगळं प्रकरण. बाई आपल्या मनाच्या राणी. म्हणजे, जेव्हा तिला वाटेल तेव्हाच ती संपर्क करणार. अगदी आजच्या सोशल मिडियाच्या काळातही बाई या सर्वांपासून चार काय, चाळीस पावलं दूर आहेत. परिस्थिती एवढी गंभीर की हिला एखादा मेसेज पाठवला तर तो आठवडाभर तरी तसाच पडून रहाणार. मग तो न ओपन झालेला मेसेज बघून मला कंटाळा आली की, मीच तिला चिडून फोन करणार. अग, जरा मेसेज वाच ना कधीतरी. असं वैतागलेल्या आवाजात बोललं तरी पलिकडून तेवढ्याच थंड आवाजात विणा बोलणार...एवढ्यासाठीच फोन केलास ना...मग आत्ता सांग ना, काय आहे ते, त्यासाठी तो मेसेज कशाला. मग काय, डोक्यावर हात मारत तिला आपण पाठवलेला मेसेज आपणच वाचून दाखवायचा. असं सगळं प्रकरण असलेली ही विणा घरी येणार म्हणून माझी धावपळ सुरु झाली. मुळात सकाळी किती वाजता बाई येणार, हेही सांगितलं नव्हतं. मी ते विचारणारे मेसेज विणाला रात्री केले. किती वाजेपर्यंत येशील. तुम्ही दोघीच आहात की नवरा सोबत आहे. थांबशील ना...वगैरे वगैरे...पण बिशाद एकापण मेसेजचे उत्तर तिनं दिले असेल तर. शेवटी विणा...असं जोरात म्हणून मी फोन बाजुला ठेवला. तेव्हा रात्रीचे अकरा वाजलेले. एक फोन करुया का...असा विचार आला आणि तिला फोनही केला. पण पलिकडून फोनला उत्तर नाही. परत विणाचा आणखी एक नियम आठवला. बाई रात्री दहा नंतर फोन शक्यतो करत नसत किंवा कोणाचाही घेत नसत. मी पुन्हा डोक्याला हात लावून घेतला आणि दुस-या दिवसाच्या तयारीला लागले. मुळात विणाचा प्रश्न नव्हता. अगदी साधा वरण भात वाढला तरी ती आनंदानं खाणार. पण तिची लेक अवघी पाच वर्षाची होती. इराला काय आवडेल, हा प्रश्न होता. मग इराला आवडेल अशा पदार्थांची यादी केली, आणि त्याची तयारी सुरु केली. रात्री उशीरापर्यंत हे चालू असतांना अचानक मनात विचार आला, तो खेळण्यांचा. लेकाच्या सर्व गाड्या अजूनही त्यानं जपून ठेवलेल्या आहेत. पण इरा खेळेल का
त्यांच्यांसोबत हा प्रश्न होता. मग नवरा मदतीला आला. सकाळी लवकर जाऊन एखादा खेळ घेऊन येतो, असे त्यानं आश्वासन दिल्यावर मी शांत झाले.
विणा आणि इराच्या स्वागताच्या तयारीमध्ये आम्ही रात्री उशिरा झोपी
गेलो. सकाळी सहाच्या ठोक्याला आमची
दोघांचीही झोप एका फटक्यात उडाली. कारण
दरवाजाची बेल जोरात वाजत होती. एवढ्या
जोरात कोण बेल वाजवतंय, म्हणून दोघंही
सुरुवातीला वैतागलो. कचरावाली मावशी की
दुधवाला...नेमकं एवढ्या सकाळी कोण आलं, म्हणून दरवाजा उघडायला जाईपर्यंत बेल
अधिकाधिक कर्कश होत गेली. एक मिनिट...असं
म्हणत दरवाजा उघडला आणि माझा आवाज बंद झाला.
माझ्यापाठोपाठ नवराही आला. समोर
विणा आणि तिची लेक इरा होती. या दोघींना
पाहून दरवाजा उघडायचं भानही माझ्याकडे राहिलं नाही. सकाळी येणार, म्हणजे, एवढ्या सकाळी हे मी
लक्षातच घेतलं नव्हतं. अग, दरवाजा उघड
तर...असं म्हटल्यावर आम्ही दोघंही भानावर आलो.
दरवाजा उघडल्यावर सगळ्या घराचा ताबा या दोघींनी घेतला. मी मेसेज पाठवला होता ना, सकाळी येतेय, आणि तू आत्ता उठतेस. कधी सगळं आवरणार. ही काय उठायची वेळ आहे, म्हणत बाई सुरु
झाल्या. माझी किती गडबड उडाली हे शब्दात
सांगता येणार नाही. नवरा तर आधीच पळाला
होता. तिला बस आत्ता, आले, असं सांगत
स्वयंपाकघरात पाणी आणण्यासाठी गेले. तर
बाई लगेच पाठी हजर. पाणी ना...नको..मी
घेते...तू आवरायचं बघ. माझ्यासाठी तूझं घर
परकं नाही, असं ठसक्यात आणखी एक वाक्य माझ्या तोंडावर मारलं.
मग काय पुढचा सगळा तास घराच्या आणि माझ्या आवराआवरीचा. मी घराची आवराआवर करत असतांना विणा आणि इरानं आपल्यापरीनं सुरु
झाल्या होत्या. पडदे उघडून झाले. विणानं झाडू घेतली, तशी इरानं कचरा गोळा करण्याचं सूपडं आणून ठेवलं. तिनं इराला झाडांना पाणी घालं, म्हणून सांगितलं आणि ती छोटी, तिला झेपेल असा छोटा ग्लास घेऊन झाडांना पाणी घालू लागली. मी लादी पुसायला घेतली तोपर्यंत विणानं टेबल, खुर्च्या पुसायला घेतल्या. छोटी इराही आई करेल, त्याची कॉपी करत होती. माझी आंघोळ झाली, आणि मी सॉरी सॉरी म्हणत बाहेर आले. तोपर्यंत या बाईंनी पुढची तयारी करुन ठेवली होती. दुध तापवून झाले होते. इराला तिनं दूध दिलं आणि कॉफीचे तीन कप भरले होते. इरासाठी केलेला केक बाहेरच ठेवला होता. त्याचे छानसे तुकडे करुन तोही बाहेर आला होता. मी काय बोलणार, पुन्हा सॉरी. मग कुठे बाई हसल्या. अग मला माहित होतं, पहिल्यांदा विचार केला, एवढ्या सकाळी नकोच, पण तुला सरप्राईज कधी देणार, म्हणून आलेच लवकर. बघ कसं वाटलं सरप्राईज, म्हणत त्या माय लेकींनी टाळ्या दिल्या. मग काय गप्पांच्या ओघात सकाळचा नाष्टा त्या केकवरच झाला. आमच्याबरोबर ती छोटी इराही खाली बसून व्यवस्थित खात होती. मध्येमध्ये ती काहीतरी गम्मत जम्मत सांगत होती. नाष्टा झाल्यावर बाकीची आवराआवर करायला विणासोबत इराही पुढे आली.
मग जेवणाच्या तयारीली लागले. विणा माझ्यासोबत येऊ लागली, तेव्हा मी तिला इरासोबत थांबायला सांगितलं. इराला टीव्ही लावून देऊ का, म्हणून विचारलं, पण तिनं नकार दिला. नवरा पुजेच्या तयारीला लागला होता. इरा काका...काका मी पण, म्हणून त्यांच्यासोबत देवाची पुजा करु लागली. देवाच्या फुलांचा डबा हातात घेतला. सगळी एका रंगाची फुलं वेगळी काढली, अगदी अगरबत्ती ओवळतांनाही घंटी वाजवायची जबाबदारी तिनं घेतली. नवरा खूप कौतुकानं तिच्यासोबत रमला होता. ते दृश्य बघून मी सुद्धा सुखावले. विणा येणार म्हणून जेवणाचा विशेष बेत ठरवला होता. इराला पनीर आवडेल असा माझा अंदाज होता, त्यामुळे पनीरची भाजी, बिर्याणी, पराठे करतेय म्हणून विणाला सांगितलं. तिनं मला थांबवलं आणि साधी बटाट्याची भाजी कर, आंबट वरण आणि तुझा स्पेशल पुदिना राईस कर म्हणून ऑर्डर सोडली.
काकडीची कोशिंबीर आणि पोह्याची मिरगुंड. आमचा हा बेत होईपर्यंत, इकडे पुजा झाली होती. एव्हाना दहा वाजत आलेले. नवरा इराला घेऊन बाहेर पडला. आंबटवरण, बटाट्याची भाजी व्हायला कितीसा वेळ. ते होईपर्यंत विणानं पु-या आणि पापड तळलेही. पुदिना राईसही तयार झाला. तासाभरानं नवरा आणि इराबाई मोठी पिशवी घेऊन परत आले. नवरा इराचं कौतुक सांगत होता. खेळण्यांच्या दुकानात तिला तो घेऊन गेला होता. पण कुठलिही बाहुली किंवा गाडी घेण्याऐवजी कुठलासा बॉक्सचा खेळ तिनं घेतला होता.
जेवण तयार झालं, पण तासाभरानं जेऊया, म्हणत आम्ही तिघंही इरासोबत खेळ
खेळू लागलो. या खेळाच्या नादात बारा कधी
वाजले हे समजलं नाही. मग जेवणाची तयारी सुरु झाली. सगळ्यात इराही मदतीला पुढे होती. जेवणाची ताटं वाढली, अगदी छोट्या इराचंही ताट
वाढून झालं. भरलेल्या ताटाला विणासोबत
इरानं नमस्कार केलेलं आम्ही दोघांनी बघितलं, आणि तोडातून एकदम व्वा...अशी दाद
निघाली. आरामात गप्पा मारत जेवणं
झाली. मग आवराआवर. तुला आराम करायचाय का बाळा, म्हणून विचारल्यावर
इरानं जोरात नाही सांगितलं. मग तुला
टीव्ही लावून देते, म्हणून विचारलं, परत नाही.
मग काय परत खेळणार का, असं विचारल्यावर नको. तुला फुलं येतात ना...मला फुलं शिकव, म्हणून ती
सांगू लागली.
माझा कापडापासून दागिने करण्याचा छंद विणाला माहित होता. तिला आणि इरालाही तसे कापडाचे दागिने मी भेट
म्हणून दिलेले. पण इरानं तसेच दागिने
करण्याची फर्माईश केल्यावर परत माझी धावपळ सुरु झाली. एक जुना हेअरबेल्ट हाती लागला. रेशमाचे दोरे घेतले. मोठे मोती आणि कुंदन घेतले. मग तिघी मिळून त्या हेअर बेल्टला सजवायला
लागलो. ते झाल्यावर खुष झालेल्या इराला
बघून तिच्या ड्रेसला मॅचिंग होईल असं कापड शोधलं आणि एक नेकलेस तयार करायला
घेतला. मी पण...मी पण...म्हणून मध्येमध्ये
धडपणारी इरा बघून कोण कौतुक वाटत होतं. या
सर्वात आम्हा मैत्रिणींच्या गप्पाही चालू होत्या.
त्यात विणाचा नवरा शशांक, ठाण्याला एका सेमिनारला आला होता. त्याच्यासोबत या दोघीही आल्या होत्या. तो सेमिनारच्या गडबडीत असल्यामुळे या दोघी
भल्या सकाळी उठून माझ्याकडे आल्या होत्या.
गप्पा होत असतांना आमचा छोटासा नेकलेसही तयार झाला. सायंकाळचे
पाच पाजले. पुन्हा कॉफी टाईम, आणि इराची गडबड. कॉफीचं ब्लेंडिंग मशीन हातात धरुन तिनं आमची कॉफी तयार करुन दिली. झटपट भेळ तयार केली आणि पुन्हा चौघं एकत्र बसलो. इरानं सर्व तयार झालेल्या वस्तू कौतुकानं घातल्या. नवरा त्याचं कौतुक करत होता. संध्याकाळी थोडं बाहेर जाऊन येऊया आणि बाहेरच जेऊया का, म्हणून मी विणाला विचारलं. बाहेर जाऊया पण घरी जेऊया. अगदी साधी खिचडी आणि पापडच कर म्हणून तिनं हट्ट धरला. तिच्या म्हणण्याप्रमाणे संध्याकाळचा फेरफटका झाला आणि मग रात्रीचं जेवण.
जेवण झालं, आणि विणाच्या नव-याचा फोन आला, कधी येणार म्हणून तो
विचारु लागला आणि विणाची निरोपाची तयारी सुरु झाली. जरा थांब ग, आईसक्रीम तरी खाऊया, म्हटलं तर
विणानं नको म्हणत, राहिलेला केक मागून घेतला.
इरा चॉकलेट खात नाही, हे आधीच विणानं सांगितलं होतं, त्यामुळे आम्ही संध्याकाळी
बाहेर गेलो, तेव्हा नव-यानं भरपूर पुस्तकं आणि रंग, खेळणी इरासाठी आणली होती. ती खेळण्यांची पिशवी देऊन, आता आम्ही तुझ्याकडे
खेळायला येणार म्हणून सांगितलं, ती पोर
त्या शब्दांनी इतकी आनंदली की उड्या मारुन टाळ्या मारायला लागली. आता वेळ विणाला निरोप द्यायची. अत्तराची बाटली तिच्या हातात दिली आणि
दोघींचेही डोळे भरुन आले. सकाळी आल्याआल्या
राहिलेली मिठी, आत्ता झाली. माहेरपण झालं ग
एक दिवसाचं, असं विणानं म्हटल्यावर आम्ही दोघींनीही मुकपणे अश्रूंना वाट मोकळी
करुन दिली. विणानं बुक केलेली गाडी दारात
हजर झाली. पुढच्या भेटीच्या तारखा नक्की
झाल्या. खरं सागू विणापेक्षा त्या गोड
इराला निरोप देतांना जिवावर आलं होतं.
गाडी डोळ्याआड होईपर्यंत दोघंही टाटा करत हात हलवत होतो. नंतर घरी आल्यावर जाणवलं की, या दोघींच्या सोबत
दिवस कसा गेला ते कळलंही नव्हतं. विशेष
म्हणजे, छोटी इरा सोबत असतांना दिवसभरात एकदाही टीव्ही लावला नव्हता आणि त्या मोबाईलला तर हात लावायलाही वेळ मिळाला
नव्हता. अगदी व्हॉटस्अपचे मेसेजही तसेच
होते. मोबाईल त्या दिवसभरात एवढा दूर
सारला गेला की, विणा आणि इरासोबत एक फोटोही काढण्याचे भान राहिले नाही.
इरा गेल्यावर मात्र ही चुटपूट अधिक वाटू लागली. दिवसभरानं फोन हातात घेतला. व्हॉटस्अपवर मेसेजचा महापूर आला होता. पण समोर इराचा चेहरा येऊ लागला. विणाला मेसेज करायचा विचारही आला आणि तिचा नियम
आठवला. ती जाऊन अर्धा तास झाला होता, पण
आम्ही दोघंही बेचैन झालो होतो. शेवटी तिला
फोन केला. इरा झोपली होती. विणाचा आवाज भरुन आला होता. पुन्हा भेटण्याच्या आणाभाका घेतल्या गेल्या. निट जा, म्हणून सांगून तिचा फोनवरुन परत एकदा
निरोप घेतला. आदल्या दिवशी साधारण याचवेळी
तिचा मेसेज आला होता, आणि माझी धावपळ सुरु झाली होती. आता तिच विणा आणि इरा येऊन गेल्या होत्या आणि
त्यांच्या गोड आठवणीत आम्ही पुढचे काही दिवस मग्न रहाणार होतो.
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
अशी सगळीच माणसं असती तर किती मज्जा आली असती.
ReplyDeleteवीणा आणि इरा यांना खरोखरच हॅलो सांग माझ्या वतीने
💞❣️💖❤️👍
ReplyDeleteअसे पाहुणे येती असं एक मराठी सिरीयल होतं त्याची आठवण झाली. भन्नाट वर्णन केलंय
ReplyDeleteKKK Khooop sundar
Deletekhup chhan lekh
ReplyDeletekhup chhan
ReplyDeleteमनापासुन व निस्वार्थी असलेली मैत्री सर्व संबधापेक्षा वेगळीच असते. विणा आणि इरा सोबत आपली भेट नेहमी अशीच घडत राहो.
ReplyDeleteMast mast aahe ❤️❤️
ReplyDeleteखूप छान लेख आहे
ReplyDeleteसुचत कस तुला हे सगळं
ReplyDeleteनाही पत्रकार होतीस तेव्हा ठीक होतं आता हे पात्र कुठून येतात सतवायला