छत्री हरवणे...एक परंपरा
छत्री...छत्री कुठे आहे....दारात आलेल्या नव-याच्या हातातली मोठी पिशवी सोडून मी छत्रीची चौकशी केल्यानं, आधीच पावसाच्या मा-यानं वैतागलेल्या नव-यानं तणतणत घरात प्रवेश केला. बाहेर पाऊस बघ किती आहे, मी भिजलोय, तुला मात्र काळजी छत्रीची. असा डायलॉग माझ्या तोंडावर मारत त्यानं पिशवीतली छत्री काढून माझ्या हातात जवळपास कोंबलीच. त्याच्या त्या वैतागण्याकडे दुर्लक्ष करीत मी ती छत्री हाती घेतली, तिला काळजीपूर्वक उघडून पंख्याखाली सुकायला ठेवलं. सध्या आमच्या घरातील चालू स्थितीत असलेली ती एकमात्र छत्री होती, त्यामुळे तिची अशी काळजी घेण क्रमप्राप्त होतं. यावेळी पाऊस अवेळी आलाय. पण या त्याच्या लवकर झालेल्या आगमनातही आमच्या घरातील एक परंपरा कायम राहिली....ती म्हणजे, छत्री हरवण्याची. किती पावसाळे मी बघितले हे उघड आहे. जेवढं वय तेवढे पावसाळे. पण या बहुतांश पावसाळ्यात माझ्या नावावर छत्री हरवण्याचा विक्रम जमा आहे. बरं मला एकटं वाटायला नको, म्हणून नव-याच्या नावावरही हाच विक्रम जमा आहे. त्यामुळे पाऊस सुरु झाला, की आम्ही दोघंही प्राणपणानं छत्रीला जपतो. यावर्षी छत्री हरवायची नाही...असं म्हणतो, आणि नेमकी त्याच दिवशी छत्री हरवतो. यावर्षीही तसाच अनुभव आलाय.
ठरलेल्या वेळेआधी एखादा पाहुणा आपल्या सगळ्या गोतावळ्यासह आला की घरात किती धावपळ होते. तशीच घाई, धावपळ सध्या या अचानक आलेल्या पावसामुळे सुरु झाली आहे. थोडाथोडका नाही, चांगला पंधरा दिवस पाऊस आधी आला. बरं आला तो आला, सोबत आपल्या सर्व गोतावळ्याला घेऊन आलाय. जोरदार वारा काय, विजांचा कडकडाट काय...पावसाळ्यात नाही होत, एवढ्या जोरात पाऊस पडतोय. या वेळेआधी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करतांना आमचीही मोठी धावपळ झाली. पहिली शोधाशोध छत्र्यांची सुरु झाली. ठरलेल्या कप्प्यातील छत्र्या बाहेर आल्या. एकूण संख्या तीन, आणि तिघीही चांगल्या अवस्थेत होत्या, ही एक चांगली बातमी होती. तशी या सर्वांची आजी ठरेल अशी भक्कम छत्री आमच्याकडे आहे. आम्ही तिला फॅमिली छत्री म्हणतो, ती एवढी मोठी आहे. पण प्रवासात तिचा, तिच्या या भल्यामोठ्या आकारामुळे फारसा उपयोग होत नाही. आता ज्या तीन छत्र्या मिळाल्या, त्या बघून आम्ही खूष झालो. कारण दरवर्षी आमच्या घरातून किमान दोन छत्र्या गायब होतात. याला अपवाद फक्त लेकाची छत्री. मला आठवतं, त्याला जी पहिली छत्री खरेदी करुन दिली होती, तिच त्यानं सलग पाच वर्ष वापरली. आमच्यासाठी ही मोठी कौतुकाची गौष्ट ठरली. फक्त छत्रीच नाही, तर तिचं कव्हरही त्यानं जपून वापरलं होतं. आता शिक्षणाच्या निमित्तानं तो जेव्हा बाहेर गेला, तेव्हा त्याच्यासाठी नवीन छत्री घेऊन दिली. अर्थात अजूनही तो तिच छत्री वापरतोय. दरम्यान त्यानं पाच वर्ष जपून वापरलेली छत्री माझ्या हाती आली आणि कुठे गायब झाली होती. असो.
यावर्षी घरातील सुस्थितीत असलेल्या या तीन छत्र्यांना पाहून आम्ही
दरवर्षीप्रमाणे या छत्र्या हरवू देणार नाही हा प्रण घेतला. पण त्याच संध्याकाळी एक छत्री गायब झाली. त्यात माझी काहीही चूक नव्हती. असेल तर पावसाची होती. घराबाहेर पडलो, तेव्हा धो-धो पाऊस होता. मंदिरात गेलो आणि पावसाची जोरदार सर थांबली. मंदिरात जिथे थोडा वेळ बसले होते, तिथेच बाजुला छ्त्री ठेवली. पण निघतांना तिला पार विसरले. नव-यानं मात्र त्याच्या हातातच छत्रीला घट्ट पकडून ठेवलं होतं, त्यामुळे त्याची छत्री घरी आली, माझी मात्र....त्यानंतर राहिलेल्या दोन छत्र्यांमधील एक छत्री घरी आलेल्या पाहुण्यांना उदार मनानं घेऊन जायला परवानगी दिली. ते घरी आले, आणि नेमका पाऊस आला. आता ती छत्री कधी परत येईल, हे माहित नाही. यातून उरलेल्या एका छत्रीची काळजी घेणं क्रमप्राप्त आहे, तशी मी घेत आहे.
छत्री हरवणं...हा दरवर्षीचा मोठा सोहळाच असतो. कितीही प्रयत्न केला तरी एक तरी छत्री हरवली जातेच. त्यामुळे यावर अनेक उपाय करण्याचा प्रयत्न केला आहे. एक म्हणजे मोठ्या दांड्याची छत्री घेतली. पण या मोठ्या छत्रीचा प्रवासात उपयोग होण्यापेक्षा तिची अडचणच जास्त झाली. रेल्वेमध्ये आधीच हातातील ओली छत्री सांभाळणं ही मोठी कसरत असते. अशावेळी ती लांब दांड्याची छत्री आपसूकच बाजुला पडली. तीन फोल्ड असलेली नाजूक छत्रीही वापरुन बघितली. पण हे काम भलतचं नाजूक. एकदा ही छत्री बंद करतांना माझ्याकडून तिच्या काही तारा तुटल्या, आणि मग पुढे ती अशीच अनेकवेळा आजारी पडू लागली. काही वर्षापूर्वी छत्रीवर पेंटींग करण्याचा प्रकारही करुन बघितली. आपण रंगवलेली छत्री, हे सांगतांना अभिमान होत असे. पण ही छत्रीही एका प्रवासात दुरावली. माझी आणि तिची मैत्री फक्त दोन वर्षाची होती, अशीच मी माझ्या मनाची समजूत काढून घेतली. अर्थात छत्री दोन वर्ष माझ्या हातात होती, ही सुद्धा माझ्या नव-याच्या दृष्टीनं
कौतुकाची गोष्ट होती. माझं छत्री हरवण्याचे हे प्रमाण असतांना नवराही याबबतीत कुठे कमी नाही. दरवर्षी ट्रेनला किती छत्र्या दिल्या आहेत, याचा हिशोब लावला तर तो नक्की अव्वल स्थानी असेल. दरवर्षी बहुधा त्याची छत्री पावसाळा संपत आला की हरवते. अशावेळी नवीन छत्री न घेता माझी छत्री घेऊन त्यानं उरलेला पावसाळा पार पाडला आहे. अनेकवेळा चांगली ब्रॉन्डेड छत्री घेण्याचा प्रयोगही त्यानं केला आहे. ब्रॅन्डेड छत्रीच्या भरभक्कम किंमतीमुळे ती कधीही हरवली जाणार नाही, असा त्याचा विश्वास होता. पण हा उपायही फळला नाही. अशावेळी साधी शंभर रुपयांची छत्री मात्र त्याच्या सोबत राहिली आहे. छत्रीवर नाव घालणं हा अजून एक उपाय. अगदी ठसठशीत अक्षरात छत्रीवर पूर्ण नाव आणि एखादं चित्र काढून झालं आहे. अशा कितीतरी नावासह छत्र्या हरवल्या आहेत. कधीतरी आमच्या छत्रीसारखी छत्री दिसली, की आम्ही तिच्यावर नाव शोधण्याचा प्रयत्न करतो, पण त्यात अजून यश आलेलं नाही. असो...या सर्वात घरातील एकमात्र छत्रीचं प्राणपणानी रक्षण करणं गरजेचं होतं. पण पावसाचा वाढता जोर पाहता आणखी एक छत्री लगेच घेऊया म्हणून नवरा अडून राहिला. शेवटी संध्याकाळी छत्रीची खरेदी करुया म्हणून दुपारच्या जेवणाची ताटं मांडली. सहज म्हणून बातम्या लावल्या. पहिली बातमी या अवेळी आलेल्या पावसाचीच होती. थेट हवामान खात्याचा रिपोर्ट सांगत होते. अवेळी आलेला हा पाऊस जून महिन्याच्या सुरुवातीला गायब होणार होता. नव-यानं ही बातमी ऐकून हुश्श केलं. मी सहेतूक त्याच्याकडे बघितलं, तर म्हणाला, आता पुढच्या आठवड्यात छत्री घेऊया....म्हणजे, त्या दुकानात तरी ती निट राहिल. आपल्याकडे आल्यावर ती परत हरवणारच आहे. त्याच्या या डायलॉगवर मी डोक्यावर हात मारुन घेतला. चला, म्हणजे, आमच्याकडे न आलेल्या छत्रीचंही भविष्य निश्चित झालं होतं. अमिताभ बच्चनचा तो डायलॉग आहे ना, परिवार की परंपरा का पालन हमेशा करना चाहिए...तशीच आमच्या घरातील ही परंपरा...छत्री हरवण्याची...आणि आम्ही ही परंपरा दरवर्षी करत आहोत...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
🌈⛈️😀👍👍👍🪄
ReplyDeleteसहजतेने मनातील भावना
Deleteसर आली धावून
ReplyDeleteछत्री गेली वाहून😀
मजा आली वाचताना.
ReplyDeleteकॉमन विषय
मजा आली वाचताना.
ReplyDeleteकॉमन विषय
khup chhan lekh
ReplyDeleteखूप छान लेख आहे अगदी खरं आहे.
ReplyDelete🤑😂😂🌧️⛈️
ReplyDeleteपाऊस नसैल तर आपली छञी विसरण्याची हमखास ठिकाणे....ट्रेन,रिक्शाॅ,बस,टॅक्शी इत्यादी .लेख छान आहै.
ReplyDelete