आहेच मला अ‍ॅटीट्यूड

 



घरी आलेल्या पाहुण्यांनी एक मोठी स्टाईलीश पिशवी पुढे केली, आणि माझ्या मनातील असंख्य प्रश्न चेह-यावर उमटले.  समोरची मंडळी म्हणाली, काहीच नाही, लग्नातील छोटीशी भेट आहे.  मी पुन्हा तशाच चेह-यांनी पाहुण्यांकडे बघितले आणि माझ्या नव-याकडेही.  नव-यानं आलेल्या पाहुण्यांना विचारलं, काय आहे.  तेव्हा त्या दोघांनीही हसून ती पिशवी अक्षरशः माझ्या हातात कोंबली.  मग ती पिशवी उघडून बघणं भाग होतं.  त्यात एक भरजरी साडी आणि नव-यासाठी सूटपिस होता.  माझे पुन्हा प्रश्न,  हे कशाला.  तेव्हा आलेली मंडळी हसून म्हणाली, अहो, ही छोटीशी भेट आहे.  लग्नात आम्ही वेगवेगळ्या थिम केल्या आहेत.  त्याची सविस्तर माहिती पत्रिकेत आहे.  लग्न लागतांना सारख्या साड्या घालायच्या आहेत.  पुरुषमंडळींनाही ड्रेस कोड आहे.  तेच हे कपडे आहेत, हे सांगून त्यांनी या मंडळींनी पत्रिकेच्या नावानं छापलेली एक छोटीशी माहितीपत्रिकाच आमच्या हातात दिली.  या प्रकारानं मी गडबडून गेलेले.  नव-याकडे प्रश्नार्थक नजरेनं बघितलं, आणि त्यानं न बोलताच होकार दिला.  मी ती पिशवी पुन्हा त्याच मंडळींच्या हातात दिली.  या रंगाची साडी माझ्याकडे आहे, मी ती घालेन, पण हे देणं-घेणं प्लीज नको.  आम्ही दोघांनीही याबाबत निर्णय घेतलाय.  प्लीज आम्हाला समजून घ्या, म्हणत मी त्या पाहुण्यांसमोर हात जोडले.  एका क्षणात सर्व  सीन बदलला.  आलेल्या पाहुण्यांचा मुड गेला.  त्यांनी गप्पा आवरत घेतल्या.  चहा-कॉफीचे कप फक्त तोंडाला लावले, आणि ब-याच घरात आमंत्रणं करायची आहेत, आता येतो, म्हणत आमचा निरोप घेतला.

 


झालं असं होतं की,  मित्रपरिवारातील एका कुटुंबातील मुलाचं लग्न ठरलं होतं.  एकुलता एक मुलगा म्हणून या कुटुंबानं ग्रॅण्ड सोहळा कऱण्याचं ठरवलं होतं.  अर्थात तो प्रत्येकाचा आनंदाचा विषय असतो, आणि कोणाला कशात आनंद वाटेल, हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं असतं.  अशा ग्रॅण्ड लग्नाची पत्रिकाही ग्रॅण्डच होती.  गणपती उत्सवात एखाद्या सार्वजनिक गणेशोत्सवाची जशी माहिती पुस्तिका असते, तशीच ती पत्रिका.  चार दिवसांचा सोहळा.  एका फार्महाऊसमध्ये हा सोहळा होणार होता.  त्यात मेहंदी, संगीत यासह आणखीही काही कार्यक्रम होते, जे माझ्या तरी पाहण्यात पहिल्यांदाच आले होते.  बरं सर्वांसाठी वेगळा ड्रेसकोड.  रंगाचं बंधन.  चार दिवसात किती वाजता उठायचं, किती वाजता नाष्टा करायचा, मग दुपारच्या जेवणापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंतचा सगळा कार्यक्रम त्या पुस्तकवजा पत्रिकेत छापला होता.  त्या संगीतसाठी ग्रुप केलेले, आणि सोबत कोरिओग्राफरचा नंबरही शेअर केला होता.  लग्न जवळ आल्यावर घरच्या घरी त्याच्याकडून व्हिडिओ कॉलवरुन डान्स शिकण्याची सुविधाही होती.  एकूण लग्न शाही होतं.  ही मंडळी गेल्यावर आम्ही दोघांनी या पत्रिकेचा चांगला अभ्यास केला.  मुळात लग्न लांबच्या फार्महाऊसला होतं.  तिथे चार दिवस मुक्कामी जाणं शक्य नव्हतं.  पण लग्नाच्या दिवसासाठी वेळ काढूया, म्हणून आम्ही ती पत्रिका वजा माहितीपत्रिका बंद केली आणि मैत्रिणीचा फोन आला.  तिच्याकडे सुद्धा या लग्नाची पत्रिका आलेली.  तिचा पहिला प्रश्न, तू काय करणार.  मी आम्ही दोघांनी घेतलेला निर्णय सांगितला.  चार दिवस शक्य नव्हतं.  शिवाय या सर्व बदललेल्या लग्न प्रथांमध्ये घुसमटायला अधिक होणार होतं,  आम्ही मैत्रिणीला आमची बाजू सांगितली.  तर तिही त्याच मताची निघाली.  पण या सर्वात तिनं सांगितलेली माहिती अधिक धक्कादायक होती.  या लग्नाचं बजेट अव्वाच्या सव्वा होतं.  ज्या फार्महाऊसवर लग्न होणार होतं, ते नव-या मुलीच्या कोणा नातेवाईकांचं होतं.  लग्नासाठी ते आठवडाभर ताब्यात घेण्यात येणार होतं.  अर्थात त्याचा सर्व खर्च मुलीकडचा होता.  लग्नासाठीचे जे पाहुणे येणार होते,

त्यांच्यासाठी याच फार्महाऊसवर रहाण्याची व्यवस्था होती, शिवाय त्याच्या आसपास असलेल्या काही हॉटेलमधील रुम बुक करण्यात आलेल्या होत्या.  तोही खर्च मुलीचा होता.  या वधुवरांच्या कपड्यांवरही लाखात खर्च झाला होता.  तो मुलीच्या मामानं केला होता.  अशी बरीच मोठी यादी माझी मैत्रिण सांगत होती.  आमच्याकडे बिनसल्यावर यजमाणीनबाई या मैत्रिणीकडे गेल्या होत्या.  तिला पत्रिका देता देता ही सर्व माहिती त्यांनी सांगितली होती.  त्यांच्यासाठी यात काहीही विशेष नव्हतं.  आमचा एकुलता एक मुलगा  आहे, घरात सून आली की तिला काहीही कामं नाही.  घरात दोन वेळ काम करायला बाई आहे, अशात थोडाफार खर्च झाला तर काय बिघडतं, हे त्यांचं मत ऐकल्यावर माझी मैत्रिणही उडाली होती.  पण तिला त्या भेटवस्तूला नकार देता आला नव्हता, याची रुखरुख लागली होती.  आम्ही भेटवस्तू परत केली, हे ऐकल्यावर मैत्रिण सुखावली.  निदान तू तरी घेतली नाहीस, बरं वाटलं.  उगा आभाळाएवढा खर्च कशाला ग करतात...म्हणत, तिनं फोन ठेवला. 

लग्न सोहळा आणि लग्न समारंभ यातला हा फरकच असावा.  अलिकडे या लग्न सोहळ्यांना जी आवरणं चढवली गेली आहेत त्यामुळे हे सोहळे संपून समारंभ सुरु झाले.  आणि मग अधिक दिमाखदार समारंभ कोणाचा, याची स्पर्धा सुरु झाली.  या सर्वात अनेक नको त्या प्रथा आपण जोडत गेलो आहोत, याचं भानही विसरलं जात आहे.  ती प्रीवेडिंग नावाची पद्धत अशीच सुरु झाली आहे.  त्यात जो वारेमाप खर्च होतो, त्यातून एक साधा लग्नसोहळा सहज पार पडेल.  मुळात प्री वेडिंग ही संकल्पना पाश्चात्य देशातील आहे.  पाश्चात्य देशात लग्न न करताच अनेक जोडपी एकत्र रहातात.  त्याला लीव्हइन रीलेशन असं मधाळ नाव आहे.  याच लीव्हइनमध्ये राहिल्यावर काही जोडप्यांना मुलंही होतात.  मग काही वर्षानंतर जर ते एकत्रच राहत असले तर त्यांच्यासाठी आणि त्यांच्या परिचितांसाठी ही सुखद गोष्ट ठरते.  मग हे जोडपं, नातेवाईक, मित्रमंडळी झालच तर आपल्या मुलांच्या उपस्थितीत लग्न लावून घेतं.  अर्थात एवढ्या वर्षात आमचं नातं कसं टिकलं हे सांगण्यासाठी त्यांचे लीव्हइन रिलेशनमध्ये असतांना जे फोटो काढलेले असतात, ते फोटो या विवाहाच्या ठिकाणी प्री वेडिंग फोटो म्हणून लावण्यात येतात.  आता  आपल्याकडील जोडपी जेव्हा प्री वेडिंग फोटो शूट करणार असं सांगतात, तेव्हा डोक्याला हात मारुन घ्यावासा वाटतो.  बरं, या सगळ्याला खर्च केवढा येतो.  माझ्या परिचित एका मुलीनं असंच प्री वेडिंग फोटोशूट केलं.  त्यासाठी खरेदी करायची आहे, म्हणून वडिलांचं क्रेडिट कार्ड वापरलं.  ड्रेस, त्याच्यावरची ज्वेलरी अगदी चपलाही वेगळ्या.  सर्वांचं बिल सव्वा लाखाच्या पुढे गेलं.  वडिलांनी बिल बघितलं आणि डोळेच फिरवले.  एवढं करुन जे फोटो काढले


त्यातले चारच फोटो लग्नाच्या हॉलमध्ये लावले.  कारण बाकीचे फोटो लावू नकोस म्हणून वडिलांनी हात जोडले.  त्यातही जे कपडे फोटोशूटसाठी घेतले होते, तेही पुन्हा अंगाला लावता आले नाहीत.  कारण रोज वापरण्यासारखे ते नव्हतेच.  एकूण ते प्री वेडिंगचे फोटो आणि कपडे एका सुटकेसमध्ये भरुन माळ्यावर पडले आहेत. 

अर्थातच या गोष्टी कितीही सांगितल्या तरी तो प्रत्येकाच्या वैचारिक पातळीचा विषय आहे.  पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर तर या अशा खर्चिक लग्नसमारंभावरच अटकाव आणला पाहिजे, असं वाटायला लागलं आहे.  कारण एकदा का अशा समारंभाची चटक लागली की तो अजून हवासा वाटतो.  त्यातही आपल्या खिशावर त्याचा भार पडत नसेल तर तो समारंभ शाही वाटू लागलो.  मग अशा शाही लाचारीच्या हव्यासापोटी समोरचा पार उघडा नागडा झालाय...ओरबडला गेलाय, याचीही जाणीवही रहात नाही.  पण या सर्वात आपण काय करु शकतो.  समाजाचे एक घटक म्हणून या सर्वात आपलीही जबाबदारी आहे, हे जाणूनच आम्ही एक निर्णय घेतला.  हे देणं-घेणं बंद करायचं.  आम्ही लग्नाला येणार, पण ते आमच्या पद्धतीनुसार.  साध्या साड्या घातल्या तरी त्या वधूवरांना शुभेच्छा मात्र भरभरुन देणार, आणि त्याच तर महत्त्वाच्या असतात.  मला आठवलं, जे जोडपं पत्रिका देण्यासाठी आलं होतं, ते जाताना बोलून गेले, हिला अ‍ॅटीट्यूडच जास्त आहे.  हरकत नाही.  काहीतरी चांगला विचार मनात पक्का करतांना कोणी काही बोललं तरी विचार करायचा नसतो.  माझ्या मते अ‍ॅटीट्यूड म्हणजे, स्वत्व.  आणि स्वत्व म्हणजे, माझं अस्तित्व.  माझे विचार.  बाकी जग कधी बदलेल तेव्हा बदलेल, पण या विचारांनी निदान चार व्यक्तींमध्ये जरी बदल घडवला तरी माझ्यासाठी चिक्कार आहे....हाच माझा अ‍ॅटीट्यूड. 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

Comments

  1. सई, सध्याच्या काळातल्या लग्नांचा जो काही देखावा झाला आहे त्यावर तू उत्तम विचार मांडले आहेस! अशा एका लग्नाला मी पण गेले होते आणि पैशाचा अपव्यय बघितला आहे. मी तुझा ब्लॉग पूढे पाठवणार आहे....ललिता छेडा

    ReplyDelete
  2. छान मांडलय. प्री वेडिंग, संगीत हे आपल्याकडे नसलेले उसने प्रयोग अकारण सुरू आहे. एवढं सर्व करून मुलगी सुखात राहील याची काय शाश्वती? आमच्या एका परिचिताच्या मुलांचं इंदोर मध्ये लग्न होते. विमानाची तिकिटे पण दिली होती. जे डेस्टिनेशन वेडिंगला गेले त्यांच्या दिमतीला एक कार सुद्धा हायर करून दिली होती. या खर्चाला काय म्हणायचं?

    ReplyDelete
  3. सद्य परिस्थितीवरचा उत्तम लेख! ...
    .... सौ.मृदुला राजे

    ReplyDelete
  4. आदरणीय सई जी नमस्कार
    आपण आपल्या लेखात जे वर्णन केलेलं आहे ते सर्व सामान्य व्यक्तीसाठी अतिशय उत्तम मत व्यक्त केलेले आहे सध्या परिस्थितीत लग्न कार्यावर भरपूर खर्च होतो आणि त्याचा भार वधू पक्षाकडे येतो असे म्हणण्यास हरकत नाही काही कुटुंबात मोठा थाटामाटात विवाह करणे ह्या कुटुंबाची शान समजली जाते समाजातली प्रतिष्ठा समजली जाते यावेळी येणाऱ्या पाहुण्यांचं कोणी काहीही विचार करत नाही फक्त येणारे पाहुणे हे प्रतिष्ठित भर घालतील या विचारानेच त्यांना बोलावले जाते त्यांना विवाह सोहळ्यातील रंगात रंगवले जाते हे काही बरोबर वाटत नाही बहुतेक समाजात आता जास्तीत जास्त शंभर किंवा दोनशे लोकांना आमंत्रण वराला कुठलीही भेटवस्तू न देता वधू याचा नावाने एफडी करायची जेवणात पाच पदार्थांपेक्षा जास्त नको वैदिक पद्धतीने विवाह उरकवायचा आलेल्या पाहुण्यांना जेवण खाऊ घालून द्यायचे आणि या व्यतिरिक्त काही प्रकार दिसला तर सरळ समाजातील लोकांनी त्या विवाह कडे पाठ फिरवायची अशी एकंदरीत पत्रक प्राप्त होत आहेत असे घडल्यास विवाहातली गोडी वर आणि वधू दोघी पक्षात अधिक वाढेल
    धन्यवाद
    दादा पाटील

    ReplyDelete
  5. आज कालच कटू वास्तव.
    जी कुटुंब या सगळ्या अनिष्ट प्रथांना फाट्यावर मारून साधेपणाने लग्न करतात त्यांचा जाहीर सत्कार करायला पाहिजे असं मला वाटतं. त्यांना सोशल मीडियावर प्रसिद्ध द्यायला हवी.

    ReplyDelete
  6. अगदी खरं आहे

    ReplyDelete
  7. खूप छान विचार मांडले आहेत.असेच लग्न कार्यात पाह्यला मिळते.

    ReplyDelete
  8. Manjiri Pathak7 June 2025 at 15:45

    उत्तम लेख ..मला असं वाटतं की आई वडील पेक्षा इथे मुला मुलीचे निर्णय आणि विचार महत्वाचे वाटतात की ते या सगळ्याला कशा पद्धतीने घेतात. आज काल दोघेही रग्गड कमावतात आणि लग्नाचे वय पण पुढे गेलेले असतात. स्वतः ला so called educated आणि सुद्नय म्हणून घेणारी आजची पिढी या बाबतीत चूप का ?

    ReplyDelete
  9. खूप छान विचार मांडले आहेत . लोकांनी यावर विचार केला पाहिजे.

    ReplyDelete

Post a Comment