फिरस्तीची पंचविशी

 

फिरस्तीची पंचविशी


फिरस्ती...पर्यटन...अस्सल मराठमोळ्या शब्दात भटकायची आवड.  ही आवड कोणाला नसते.  सर्वानाच फिरायला आवडतं.  पण या फिरण्यातून इतरांनाही आनंद मिळवून देणारे फार थोडे असतात.  अशीच एक मैत्रिण म्हणजे, स्नेहल प्रमोद शिंदे.  स्नेहल शिंदे या शिक्षिका.  तेही गणितासारख्या विषयाच्या.  स्वामी विवेकानंद शाळेच्या स्नेहल मुख्याध्यापिकाही राहिल्या आहेत.  सोबतच अनेक सामाजिक कार्यात त्यांनी नेहमी पुढाकार घेतला आहे.  शाळेत असतांना विद्यार्थ्यांची सहल नेण्याचे काम त्यांच्याकडे असायचे.  मध्यमवर्गीय घरातील मुलांची सहल नेतांना पहिली काळजी घ्यावी लागते, ती बजेटची.  कारण अत्यंत कमी पैशात, या सहलीचे नियोजन करायला लागायचे.  स्नेहल यांनी यासाठी अनेक पर्यटन स्थळे पिंजून काढली.  विद्यार्थ्यांना सवलत देण्यासाठी त्या विविध कार्यालयात जाऊ लागल्या.  या सर्वातून स्नेहल यांनी नैनीताल, दिल्ली, चेन्नई, हैद्राबाद सारख्या शहरात विद्यार्थी सहलींचे आयोजन केले.  एकदा तर विद्यार्थ्यांना विमान प्रवासाचा अनुभव हवा म्हणून त्यांनी एअरलाईन्स कंपनीकडे मोठी सवलत मागितली.  संबंधित अधिका-यांना भेटून विद्यार्थी आणि शाळेबाबत माहिती दिली.  एका शिक्षिकेची विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ बघून त्यांना विमान प्रवासासाठी 50 टक्के सवलही मिळाली.  या सर्वातून स्नेहल यांचा आत्मविश्वास वाढला.  मग एक दिवस जवळच्या मैत्रिणी आणि नातेवाईक महिला यांच्या आग्रहातखातर पहिली परदेशी सहल आयोजीत केली.  ही सहल यशस्वी झाल्यावर स्नेहल शिंदे यांचा आत्मविश्वास वाढला.  या क्षेत्रात आपण स्वतंत्रपणे उभे राहू शकतो, याची जाणीव झाली.  सोबत मराठी माणसांना परदेशात फिरतांना येणा-या अडचणींचीही जाणीव झाली.  यातूनच 2000 साली त्यांनी आपले पती, डॉ. प्रमोद शिंदे यांच्या सोबतीनं एज्यु इंटरनॅशनल टूर्सची स्थापना केली.  आता या कंपनीला 25 वर्ष होत आहेत.  स्नेहल यांनी या पंचवीस वर्षात युरोप, अमेरिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड अशा अनेक देशातून हजारो मराठी जनांना फिरवून आणले आहे.  फक्त पर्यटन करणे हा एज्यु इंटरनॅशनल टूर्सचा उद्देश नाही, तर त्यातून त्या भागातील संस्कृती आणि परंपरा यांची ओळख मराठी पर्यटकांना त्या आवर्जून करुन देतात.  त्यामुळेच पंचवीशीनंतरही एज्यु इंटरनॅशनल टूर्स भक्कमपणे उभी आहे.  याच एज्यु इंटरनॅशनल टूर्सच्या माध्यमातून स्नेहल शिंदे या जिद्दी महिलेची ओळख आपण आज करुन घेऊयात....


स्नेहल शिंदे नावाच्या शिक्षिकेला मी गेली अनेक वर्ष ओळखत आहे.  अनेक सामाजिक कार्यक्रमाला स्नेहल आवर्जून उपस्थित असतात.  अशाच एका कार्यक्रमात स्नेहल यांच्या पर्यटन क्षेत्रातील कार्याची माहिती मिळाली.  गेली पंचवीस वर्ष एज्यु इंटरनॅशनल टूर्स नावाची पर्यटन संस्था त्या यशस्वीपणे चालवत आहेत.  पण फक्त पंचवीस वर्षाचा अनुभव त्यांच्या गाठी आहे का,  अजिबात नाही.  काही जणांचा पिंडच फिरस्तीचा असतो, स्नेहल त्याच पिंडाच्या आहेत.  स्वामी विवेकानंद सारख्या शाळेत शिक्षिका ते मुख्याध्यापिका असा त्यांचा यशस्वी प्रवास आहे.  गणितासारख्या अवघड विषयाच्या शिक्षिका असलेल्या स्नेहल स्वभावानं जिज्ञासू.  या जिज्ञासू पणातूनच त्यांना पर्यटनाची आवड लागली.  शाळेच्या सहलींची जबाबदारी त्यांच्यावर होती.  शाळेतील मुलांच्या सहलीवर पालक सहसा जास्त पैसे खर्च करीत नाहीत.  अशावेळी कमी पैशात मुलांना आपल्या देशातील समृद्ध संस्कृतीचे दर्शन करुन द्यायला त्यांनी सुरुवात केली.  त्यांच्या या धडपडीचा चांगला फायदा मुलांना झाला.  शिवाय पालकांचा विश्वासही वाढला.  त्यामुळे शाळेनं सहलीची घोषणा केली की, सुरुवातीला अनुत्सक असलेले पालकच मग सहल आयोजित करण्याचे आर्जव करु लागले.  अशावेळी स्नेहल यांनी नैनीतालपासून चेन्नईपर्यंत मुलांना फिरवले.  अगदी विमानानंही मुलांची यशस्वी सहल केली, तिही अर्ध्या पैशामध्ये.  स्नेहल यांनी दिल्लीला आपल्या विद्यार्थ्यांना  अनोखी भेट दिली.  तेव्हा दिल्लीमध्ये उच्चपदस्थ पोलीस अधिकारी असलेल्या किरण बेदी आणि मुलांचा संवाद त्यांनी घडवून आणला.  तब्बल 40 मिनिटे किरण बेदी विद्यार्थ्यांबरोबर होत्या.  ही गोष्ट मुलांसाठी, शाळेसाठी आणि संपूर्ण पालकवर्गासाठी अभिमानास्पद ठरली.  स्नेहल शिंदे यांचे सहल आयोजनातले कसब सर्वांचाच कौतुकाचा विषय ठरले. 

या सर्वात वैयक्तिक सहलींमध्येही स्नेहल यांचे कौशल्य दिसत होते.  त्यांच्या


मैत्रिणी आणि नातेवाईकांमध्येही हा कौतुकाचा विषय होता.  यातूनच काही मैत्रिणींनी, आम्हाला पण परदेशात फिरवूण आण, म्हणून त्यांच्याकडे आग्रह धरला.  मैत्रिणी आणि कुटुंबातील महिला असा 38 जणींचा एक ग्रुप झाला.  1997 मध्ये बॅंकॉक, पटाया, थायलंड अशी ही सहल स्नेहल घेऊन गेल्या.  बाकी ट्रॅव्हल कंपनीपेक्षा स्नेहल यांचा हा दौरा कमी पैशामध्ये झाला.  शिवाय परदेशात वावरतांना सोबत असलेल्या महिलांना कुठेही बिचकल्यासारखे वाटणार नाही, एवढे परफेक्ट मार्गदर्शन स्नेहल यांनी केले होते.  यासोबत रहाण्याची आणि जेवण्याची उत्तम व्यवस्था झाली होती.  या सर्व सहभागी महिलांनी स्नेहल यांच्या या कौशल्याला 100 टक्के गुण दिले.  हाडाची शिक्षिका असलेल्या स्नेहल यांना या 100 टक्क्यामध्ये पुढची वाट दिसू लागली.  त्यांनी स्वतःची ट्रॅव्हल कंपनी चालू करण्याची चाचपणी सुरु केली.  यावेळी त्यांची समर्थपणे साथ दिली ती त्यांचे पती, डॉ. प्रमोद शिंदे यांनी.  अभ्यासक आणि मुंबई विद्यापीठात प्रोफेसर असलेल्या प्रमोद शिंदे यांनी आपल्या पत्नीच्या या कौशल्याला आकार दिला.  या शिंदे दांम्पत्यांनी जसा अभ्यास सुरु केला, तसं एक गोष्ट स्पष्ट झाली.  शक्यतो मराठी माणसं पर्यटनासाठी परदेश दौरा करणे टाळतात, कारण त्यातील भरपूर पैसे आणि त्यांना मिळणारी वागणूक.  यामुळे स्नेहल आणि प्रमोद शिंदे यांनी स्वतःची ट्रॅव्हल कंपनी चालू करण्याचा निश्चय अधिक दृढ केला.  त्यातूनच 2000 साली एज्यु इंटरनॅशनल टूर्सची मुहूर्तमेढ रोवली गेली. 

एज्यु इंटरनॅशनल टूर्सच्या स्थापनेपासूनच स्नेहल शिंदे यांनी स्वतःवर काही नियम घालून घेतले.  त्यातील मुख्य नियम म्हणजे, कुठल्याही ट्रीपमध्ये पर्यटकांची जबाबदारी कुठल्याही मदतनीसावर सोपवायची नाही.  स्वतः या पर्यटकांसोबत जायचे आणि त्यांना फिरवायचे.  या त्यांच्या नियमामुळे एज्यु इंटरनॅशनल टूर्सतर्फे वर्षभर ट्रीप नेता आल्या नाहीत.  पण वर्षातून ज्या दोन-तीन ट्रीप होऊ लागल्या, त्या एवढ्या उत्तम नियोजनाच्या होत्या की, स्नेहल यांना आपल्या ट्रॅव्हल कंपनीची स्वतंत्र जाहीरात करावी लागली नाही.  आपसूकच लोकं जोडली गेली.  परदेशात वावरतांना अनेक नियम असतात.  ते पाळणं बंधनकारक असतं.  ब-याचवेळा हॉटेलमध्ये गेल्यावर तिथल्या


बारीक सारीक गोष्टींची तपासणी करावी लागले.  टॉवेल, उशा, चादरी अशा वापरातील वस्तूंवर एखादाही डाग असला तर त्याचे पैसे तिथे रहाणा-यांकडून वसूल करण्यात येतात.  याबाबत अनेक पर्यटकांना माहिती नसते.  त्यातून त्यांची फसवणूक होते, आणि हजारो रुपये दंड म्हणून भरावे लागतात.  या सर्व गोष्टींबाबत स्नेहल आपल्यासोबत येणा-या सर्वच पर्यटकांना सूचना देतात.  त्यामुळे एज्यु इंटरनॅशनल टूर्सच्या गेल्या पंचवीस वर्षातील सर्वच ट्रीप यशस्वी ठरल्या आहेत. 

युरोप, सिंगापूर, थायलंड, मलेशिया, दुबईसह मॉरिशिस, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, व्हिएतनाम, श्रीलंका अशा अनेक देशात एज्यु इंटरनॅशनल टूर्स पर्यटकांना फिरवून आणत आहे.  एखाद्या नव्या देशात सहल न्यायची असेल, किंवा एखाद्या ट्रीपमध्ये बदल करुन नवी सहल करायची असेल, तर स्नेहल या सर्वांसाठी स्वतः आधी दौरे करतात.  त्यासाठी फोनवरुन चौकशी करण्यापेक्षा आपण स्वतः गेल्यास आपल्यावर विश्वास ठेऊन सोबत येणा-या पर्यटकांना त्याचा फायदा होतो, असे त्या सांगतात.  या आधीच्या पायलट दौ-यामध्ये हॉटेल, खाद्यव्यवस्था, त्या भागातील संस्कृती, ज्या भागात फिरायचे आहे, तो परिसर आदी सर्वांची त्या पाहणी करतात.  लोकांशी बोलतात, मगच आपला आराखडा तयार करतात.  याचा फायदाही खूप मिळतो.  कारण स्नेहल यांच्या एज्यु इंटरनॅशनल टूर्सच्या सिंगापूर-थायलंड-मलेशिया या परदेशी सहलीबरोबर 2 रात्रीची श्रीलंका सहल कित्येक वर्ष मोफतमध्ये देत होत्या. श्रीलंकन विमानकंपनीसोबत स्नेहल यांनी थेट बोलणी केली.   यातून मिळालेल्या सवलतीचा फायदा त्या आपल्यापर्यंत न ठेवता आपल्या सोबतच्या पर्यटकांना मिळवून दिला.  अशीच एक भन्नाट ट्रीप होते ती, व्हिएतनामची.  अलिकडेच व्हिएतनामला थेट विमानसेवा उपलब्ध झाली आहे.  स्नेहल आणि प्रमोद शिंदे यांनी मग स्वतः या देशात जाऊन ट्रीपचे नियोजन केले.  त्यातून तेथील आय़लंड, निसर्गानं तयार केलेल्या गुंफा, मार्बल माऊंटन, स्वर्गाचा मार्ग या सर्वांसह व्हिएतनामवर अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याच्या खुणा जपणा-या जागाही पर्यटकांना दाखवण्यात येतात.  जगभर फिरलेल्या स्नेहल या व्हिएतनामच्या प्रेमात आहेत.  येथील संस्कृती आणि सौदर्य हे सर्वात चांगले असल्याचे त्या सांगतात.

परदेशात फिरवणा-या स्नेहल भारतातील केरळ, कन्याकुमारी, लेह, लडाख, कारगिल, आसाम, मेघालय, काझिरंगा येथेही सहलींचे आयोजन करतात.  अगदी वैयक्तिक सहलींचे नियोजनही त्यांच्या एज्यु इंटरनॅशनल टूर्सतर्फे करण्यात येते.  या कस्टमाईज टूर हल्ली मोठ्या प्रमाणात जात आहेत.  अशावेळी पर्यटकांना विश्वासू संस्था हवी असते,  हे सर्व पर्यटक एज्यु इंटरनॅशनल टूर्सवर त्यासाठी डोळे मिटून विश्वास ठेवतात, ही स्नेहल आणि प्रमोद शिंदे यांना सुखावणारी गोष्ट आहे.  या पंचवीस वर्षाच्या कालावधीत त्यांच्यापुढे अनेक समस्याही निर्माण झाल्या.  मात्र त्यामुळे व्यथित न होता, जिद्दीनं त्या समस्या त्यांनी दूर केल्या आहेत.  आता भारत आणि पाकिस्तानमध्ये


तणाव असतांनाही त्यांची एक परदेशातील सहल  होती.  यासाठी अगदी काही दिवस शिल्लक असतांना ऑपरेशन सिंदूर स्थगित झाले, आणि स्नेहल यांनी आपल्यासोबत असलेल्या पर्यटकांसह भारत माता की जय म्हणत, व्हिएतनामकडे उड्डान केले. 

Travel to Learn-Learn to Travel हे ब्रिदवाक्य असलेल्या स्नेहल आणि प्रविण शिंदे यांच्यासोबत आज अनेक मान्यवरांना परदेशात पर्यटन केले आहे.  अभिनय क्षेत्रात असलेले अविनाश आणि ऐश्वर्या नारकर,  ज्येष्ठ साहित्यिक श.ना. नवरे, प्रविण दवणे, दादासाहेब लाड, नृत्यांगना मंजिरी देव, मिथीलेश पाटणकर, डॉ. अरुण पाटील अशी ही भलीमोठी यादी आहे.  एज्यु इंटरनॅशनल टूर्ससोबत युरोप पर्यटनास गेलेल्या रजनी पाटणकर यांनी चैतन्यमयी युरोप नावाचे पुस्तकही लिहिले आहे.  या सर्वांमुळेच एज्यु इंटरनॅशनल टूर्स ही कंपनी नसून आमचे कुटुंब असल्याचे स्नेहल अभिमानानं सांगतात.  सध्याच्या छोटं कुटुंब असणा-या जगात या मोठ्या कुटुंबाची व्याप्ती अधिक वाढत आहे.  कारण या कुटुंबाचा पाया विश्वास आणि आपलेपणावर ठेवला आहे.  स्नेहल, या सर्व यशाचे श्रेय आपल्या कुटुंबाला देतात.  यासर्वात त्यांना त्यांच्या लहान वहिनीची, रुपाली पाटील यांची खूप मोठी साथ मिळाली.  सर्वात मोठं म्हणजे,त्यांच्या आईनं, नलिनी पाटील यांनी नेहमी नेहमी शाळेच्या सहलीमध्ये जाण्यासाठी प्रेरीत केलं.  यामुळे लहानपणीच हे पर्यटनाचे बीज त्यांच्या रुजले आणि आता त्याचा वटवृक्ष झाला आहे.  स्नेहल आणि त्यांना साथ देणारे त्यांचे पती डॉ. प्रमोद शिंदे,  आई-वडिलांच्या मागे भक्कमपणे उभी रहाणारी मुलगी प्रांजली आणि या पंचवीस वर्षात जोडलेले हजारो फिरस्ते हिच स्नेहल यांची एज्यु इंटरनॅशनल टुर्सच्या खात्यातील मोठी जमापुंजी आहे.  

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

 

 

 

 

Comments

  1. अभिनंदन आणि शुभेच्छा

    ReplyDelete
  2. Khup chhan lekh

    ReplyDelete
  3. महेश टिल्लू21 June 2025 at 19:31

    पर्यटनातून मिळणारा आनंद खूप वेगळा असतो आणि यातून तो व्यवसाय म्हणून विकसित करणे खरेच आव्हानात्मक आहे.कारण खूप मोठ्या ट्रॅव्हल कंपन्या आहेत त्यांच्याशी स्पर्धा करताना लोकांचा विश्वास संपादन करणे आवश्यक आहे, शाळेची जबाबदारी सांभाळून देश विदेश फिरणे, लोकांना त्याचा आनंद देणे ही सुद्धा एक समाजसेवा आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा

    ReplyDelete
  4. खुप छान लेख,अभिनंदन!!

    ReplyDelete

Post a Comment