शाळेचा पहिला दिवस
सकाळी बरोबर अकराच्या सुमारास दाराची बेल जोरात वाजली. माझी अंदाज बरोबर होता, नमिता आली होती. आज तिच्या मुलाच्या शाळेचा पहिला दिवस. पहिला दिवस म्हणून ती लेकाला शाळेत पोहचवायला जाणार होती. येतांना तो बसनं येणार होता. त्याचा बसस्टॉप आमच्या घराजवळ. त्यामुळे तिला आग्रहानं घरी बोलवलं होतं. तेवढंच शाळेच्या गप्पा मारल्याचा आनंद. नमिता ज्या जोशात बेल वाजवत होती, त्यावरु शाळेचा पहिला दिवस छानच झाल्याचा माझा अंदाज होता. मात्र दरवाजा उघडला आणि नमिताचा वेगळा जोश बघून माझा अंदाज साफ चुकल्याची जाणीव झाली. आज पहिला दिवस असा गाजवून आलेय, विचारु नकोस, या वाक्यासह तिनं कोचावर जोरात बसकण मारली, आणि तिचा सगळा पराक्रम ऐकून मी डोक्यावर हात मारुन घेतला.
लेकाची शाळा सुटली तरीही जून महिन्यात मला या दिवसाची फार ओढ लागते. शाळेचा पहिला दिवस हा आनंदाचा असतो. अर्थात शाळेचा प्रत्येक
दिवस आनंदाचा असतो, पण त्यातही पहिला दिवस खास असतो. लेक शाळेत जायचा, तेव्हा या पहिल्या दिवशी, घरात एखाद्या सणासारखे वातावरण असायचे. गोडधोड, देवाची पहाटे झालेली पूजा....शाळेचा पहिला दिवस अशा छान सुरु झाला की, मग वर्षभर असाच गोडवा शाळेत जातांना रहायचा. त्यामुळे आजही या दिवसाची आठवण येते. पण लेक आता शाळेत जाण्यासारखा राहिला नाही, मग काय करायचं. अशावेळी मैत्रिणी मदतीला येतात. नमिता, ही अशीच एक मैत्रिण. तिचा लेक अनिष, आत्ता पहिलीला गेलाय. आमच्यामधील वयाच्या अंतरामुळे नमिता मला ताई म्हणते, पण बहिणीसह मैत्रीचे नातं आम्ही अधिक जपलं आहे. म्हणूनच तिच्या अनिषचा शाळेचा पहिला दिवस साजरा करायला तिला मी माझ्याकडे बोलवालं होतं. शाळेच्या पहिल्या दिवशी ती लेकाला गाडीवरुन शाळेत घेऊन जाणार होती. बाराच्या सुमारास शाळा सुटणार होती, आणि तो येतांना बसनं येणार होता. आमच्या घराजवळ ती बस साडेबाराच्या दरम्यान येणार होती. तिथून ती दोघंही आमच्या घरी येणार होते. त्याआधी नमिता हजर झाली होती, आणि तिचा पराक्रम पाहून मी हैराण झाले होते.
अनिषच्या शाळेत आज पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. सर्व मुलांना एक-एक नॅपकीन वाटण्यात आले. सर्वांनी बसतांना आपल्या डेक्सची साफसफाई करायला सांगण्यात आले. तसेच शाळेच्या रोजच्या तासामध्ये काही मिनिटं शाळेच्या स्वच्छतेची म्हणून ठेवण्यात आली होती. जे पालक विद्यार्थ्यांना पोहचवायला शाळेत गेले होते, त्यांना या उपक्रमाची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या आसपास
स्वच्छता कशी ठेवायची, हे शिकवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न होता. मात्र यावरुनच नमिता आणि काही पालकांनी तीव्र शब्दात आक्षेप घेतला. आम्ही काय आमच्या मुलांना साफसफाई करायला शाळेत पाठवतो का, यावरुन वाद सुरु झाला. आमच्या लहान मुलांकडून शाळेची सफाई तुम्ही कशी करुन घेऊ शकता, अशापर्यंत वाद पोहचला. पहिल्याच दिवशी शाळेच्या गेटवर सुरु झालेल्या या वादामुळे शाळेत नवीनच येणारे विद्यार्थी अधिक बिचकले. मग रडारड सुरु झाली आणि वाद चिघळला. शिक्षक सांगत होते, हा फक्त उपक्रम आहे. शाळा नेहमीच स्वच्छ असते. सफाई कर्मचारी शाळेत आहेत. ते विद्यार्थ्यांचे डेक्स आणि वर्गही नेहमी स्वच्छ करतात. फक्त विद्यार्थ्यांना त्या स्वच्छतेची जाणीव हवी, म्हणून आम्ही ही नवीन सुरुवात करीत आहोत, हे सांगण्यात आलं. मग प्रकरण फीवर गेलं. आम्ही एवढी फी भरुन शाळेत काय स्वच्छता वर्गासाठी पाठवतो का, असा प्रश्न विचारण्यात आला. शेवटी शाळेच्या पहिल्या दिवशी कुठलाही वाद नको, म्हणून शाळेच्या शिक्षिकांनी माफी मागितली, आणि नमिता आणि त्याच्या बरोबरचे पालक युद्ध जिंकल्याच्या आनंदात घराकडे परतले. नमिता त्यानंतर माझ्याकडे आली होती, आणि शाळेत झालेला सर्व प्रकार सांगत होती. एवढ्या लहान मुलांना आपण घरी काम सांगत नाही, आणि शाळा कामाला लावतेय, आपण कसं ऐकून घ्यायचं, सांग तू...असा सवाल तिनं मला केला.
मी यावर काय बोलणार. बस यायला अजून तासाभराचा अवघी होता. कॉफी घेऊया...म्हणून मी आत गेले. कॉफी करतांना माझ्या शाळेच्या दिवसांमध्ये हरवून गेले. आमच्या शाळेत वर्ग सजावटीचा भाग असायचा. आपल्या
वर्गाला इतर वर्गांपेक्षा जास्त सुंदर सजवतांना आम्ही काय काय करायचो, हे विचारु नका. त्यात वर्गाची सफाई हा एक भाग असायचा. बरं तेव्हा ते गोटीव पेपर इतके प्रसिद्ध होते, की विचारायची सोय नाही. या गोटीव पेपरच्या कितीतरी चटया केल्या जायच्या. त्या वर्गाच्या भींतींवर लावायच्या मग कोणी वर्गमैत्रिणी फुलं तयार करायच्या तर कोणी पताका. एकूण वर्ग ही आमची संपत्ती होती. ती अधिक संपन्न करण्यासाठी तेव्हा कोण धडपड असायची. पण प्रत्येक पिढीची वेगळी संकल्पना असते. मात्र आता नमितानं सांगितेलला प्रकार ऐकून मी हबकून गेले होते. पहिल्या दिवशी हौशेनं शाळेत जाणा-या मुलांनी पालक आणि शिक्षक यांच्यातील विसंवाद बघितल्यावर काय वाटत असेल, याची चिंता लागून राहिली. कॉफी पितांनाही नमिताचे चालू होते. आपल्याकडच्या शाळांमध्ये किती कमरता आहे, परदेशातील शाळांमध्ये मुक्त शिक्षण पद्धती कशी आहे, यावर तिनं मला एक छोटंसं लेक्चरही दिलं. एवढ्या वेळात अनिष यायची वेळ झाली. नमिता त्याला घ्यायला खाली गेली, आणि मी जेवणाची तयारी करु लागले. शाळेच्या पहिल्या दिवशी नेहमी मी आवर्जून गोडधोडाचे जेवण करायचे. अनिषसाठीही तसेच जेवण केले होते. पुरी, बटाट्याची भाजी, श्रीखंड आणि पुलाव असा बेत. दहा-पंधरा मिनीटातच ही आई-लेकाची जोडी परत आली. अनिष आनंदात होता. पहिल्या दिवशी शाळेत खूप खेळ खेळला होता. काही कविताही शिकवल्या होत्या. नमिता, त्याच्यासाठी दुसरा ड्रेस घेऊन आली होती. तो बदलता बदलता तिनं चारवेळा त्याला सफाई केलीस का म्हणून विचारुन झालं. त्यानं नाही बोलूनही तिचं समाधान झालं नाही. मग त्याची बॅग बघितली. तेव्हा अनिष धावत आला. त्यातली एक छोटीशी पिशवी काढून आम्हाला दाखवू लागला. त्यात एक छोटासा नॅपकीन आणि एक छोटीशी सॅनिटायझरची बाटली होती. ती पिशवी हातात धरुन नमिता म्हणाली, बघ, यावरुनच सर्व महाभारत झालं, सकाळी. आता ही रोज शाळेत कशाला द्यायची पुन्हा. मी ती सगळी बॅग बाजुला केली. टम्म फुगलेल्या पु-या अनिष समोर ठेवल्या. त्याचा चेहरा खुलला...मग तो शाळेचा विषय बाजुला झाला. पुरी आणि श्रीखंडानं सगळं विसरायला झालं. जेवणं झाल्यावर अनिषला टीव्ही बघायचा होता. आज त्याचा दिवस, म्हणून टीव्ही लावला आणि त्याला एक गम्मत बघायची आहे का हे विचारलं. युट्यूबवरुन जपानी शाळांची माहिती देणारा एक व्हिडिओ लावला. व्हिडिओ सुरु झाल्यावर नमिता पुन्हा आपल्या शाळा आणि त्यांच्या शाळा, हा फरक करायला लागली. पण व्हिडिओ जसजसा पुढे जाऊ लागला, तशी आपसूक शांत झाली. त्या शाळेमधील विद्यार्थी शाळेत आल्यावर आपल्या चप्पला बाजुला काढून ठेवत होते. शाळेत घालायच्या दुस-या चप्पला त्यांनी घातल्या. मग आपल्या बॅगा बाजुला ठेऊन त्यांनी शाळेचा
वर्ग साफ करायला सुरुवात केली. त्यानंतर वर्ग भरले. काही तासांनी मधली सुट्टी झाली. यात जेवणाची व्यवस्था होती. सगळी मुलं रांगेत उभी होती. एकामागून एक मुलं येत होती आणि आपल्या डिश, चमचा, वाट्या घेत होती. जेवण झाल्यावर मुलांनीच आपल्या हातांनी त्या डिश, चमचा आणि वाटीला धुवून स्वच्छ केलं. मग पुन्हा थोडावेळ वर्ग झाल्यावर शाळेची सुट्टी झाली. त्यावेळी कुठलिही मुलं घाईघाईनं शाळेबाहेर पडली नाहीत. तर अगदी आधी ठरल्याप्रमाणे सर्वजणं सफाईला लागली. शाळेतील वर्गांची पुन्हा एकदा सफाई झाली. अगदी टॉयलेट आणि बाथरुमही मुलांनीच स्वच्छ केले. काही मुलांनी यावेळी बगिचाची निगा राखली. झाडांना पाणी घातलं, तर काहींनी झाडांमध्ये पडलेला पानांचा कचरा साफ केला. अशी स्वच्छता मोहीम झाल्यावर सगळ्यांनी हात स्वच्छ धुतले. रांगेनं उभ्या असलेल्या शिक्षकांना नमस्कार केला आणि मग सगळी मुलं शाळेबाहेर पडली. व्हिडिओ जसा चालू झाला, तसाच संपलाही. नमिता शांत झाली होती. ब-याचवेळा काही गोष्टी न बोलताही सांगता येतात. हे त्यातलंच एक होतं. छोटा अनिष टाळ्या वाजवत होता. आम्हीपण असं करणार...टिचर सांगत होती, गुड हॅबिट्स बद्दल...म्हणून ती बॅग टिचरनं दिलीय. पुन्हा ती शाळेची बॅग आणि त्यातील ती छोटुशी बॅग अनिषनं समोर ओढून घेतली. त्या मोठ्या बॅगेत ती बॅग त्यानं भरुन ठेवली आणि बॅग खांद्याला अडकवली. मी उद्या माझा बेंच क्लिन करणार...म्हणून तो पुन्हा टाळ्या वाजवू लागला. त्याच्या या निरागस कृतीमुळे आमच्याही ओठावर हसू आलं. विशेषतः नमितानं मान हलवली. थोडं चुकलंच ग...उद्या पुन्हा याला शाळेत घेऊन जाते, आणि टिचरला सॉरी बोलते, म्हणत तिनंही तिची बॅग खांद्याला लावली. दोघंही मायलेक टाटा करत बाहेर पडले. मग मी पुन्हा त्या जपानी व्हिडिओला पाहू लागले. कुठूनही शाळेत जायची संधी मिळाली की दिवस छानच होतो...
सई बने
डोंबिवली
ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा
आदरणीय सई जी नमस्कार
ReplyDeleteआपण अतिशय सुंदर लिखाण केलं लिखाणात सर्व बारकावे सुंदर इतक्या सादर केले
धन्यवाद
Lovely Memories, excellent explanation 👍👍👍
ReplyDeleteLovely memories
ReplyDeleteNice
ReplyDeleteखूप छान लेख
ReplyDeleteहल्ली सारासार बुद्धी कोणालाच उरली नाहीये असं मला मनापासून वाटतं.
ReplyDeleteशाळा आपली आहे ती स्वच्छ आपणच ठेवायला हवी. तिच्याबद्दल प्रेम कसं वाटणार ना जर आपण तिच्यासाठी काही नाही केलं तर.
कोणाकोणाच्या ब्रेन वॉश साठी वर्कशॉप घ्यावेत
खूप छान लेख आहे.
ReplyDeleteखुप छान शाळांमध्ये स्वच्छता सारख्या प्राथमिक शिस्तीचे धडे देणे आता आवश्यक ठरले आहे
ReplyDeleteमुलांना स्वावलंबी बनवलेच पाहिजे .
ReplyDeleteसई बाई लेख छानच आहे अशी सुधारणा सगळ्या शाळेत झाली पाहिजे.
खरे आहे,शाळेचा पहिला दिवस नेहमीच उत्साहाचा ,आनंदाचा आणि कायम आठवणीत राहिला
ReplyDelete