नभं उतरु आलं..

 

नभं उतरु आलं..


नभं उतरु आलं, चिंब थरथर वलं

अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात

जैत रे जैत या चित्रपटातील ना. धो. महानोर यांनी लिहिलेलं आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत, माथेरानमध्ये पहिलं पाऊल ठेवलं आणि ओठावर आलं.  पावसाळ्यातलं माथेरानं अफाट सुंदर असतं.  पण भर पावसात या माथेरानला बघण्याची फार कमी संधी आम्हाला मिळाली होती.  यावेळी नव-याच्या वाढदिवसाला काय करायचं याचा विचार सुरु होता, तेव्हा माथेरानचं नाव लगेच समोर आलं.  एक दिवसासाठी तरी जाऊया का, म्हणून आम्ही दोघांनीही एकमेकांना एकाचवेळी विचारलं आणि आपसूक आमचं आम्हाला उत्तर सापडलं.  ट्रिप नक्की करतांना कितीही पाऊस असला तरी माघार घ्यायची नाही, ही अट समोर ठेऊन, हॉटेलची बुकींग करायला घेतली.  इथेच आमची पहिली विकेट उडाली, कारण आम्ही ज्या हॉटेलमध्ये हमखास जातो, ती सर्व हाऊसफुल्ल...शेवटी एक अन्य हॉटेल मिळालं, आणि आमचं बुकीग झालं.  शुक्रवारचा दिवस असल्यामुळे फार गर्दी असणार नाही, हा आमचा दोघांचा अंदाज होता, पण माथेरानचा घाट चढायला सुरुवात झाली, आणि हा अंदाज धडामकन चुकला.  कारण घाटातच गाड्यांची रांग लागलेली.  नेरळ सोडलं,  जुम्मा पट्टी सोडली, आणि मग नेहमीप्रमाणे माथेरानचं एक-एक रुप समोर येऊ लागलं.  फेसाळते धबधबे खुणावू लागले.  शेवटचं वळन घेत माथेरानमध्ये दाखल झालो आणि स्वागताला दणक्यात पाऊस सुरु झाला.  बॅगेतून रेनकोट काढेपर्यंत पार भिजायला झालं, मग काय, पार्किंग


स्टॅडजवळच्या काकाकडे चहा-कॉफी आणि कांदाभजी.  आम्हाला घाई नव्हती आणि पावसालाही.  चांगली अर्धातास त्यानी धुंवाधार बॅटींग केली आणि तो थांबला.  मग पटापट आवरत आम्ही माथेरानमध्ये अधिकृतपणे दाखल झालो आणि पहिल्याच पावलात स्तब्धही झालो.  ते हॉलिवूड चित्रपटात दाखवतात नाही का, एक कपाट उघडतं, त्यात पाऊल टाकलं की, तिथून पलिकडे दुसरीच दुनिया सुरु होते.  पुन्हा कपाट बंद करुन बाहेर आलं, की अलिकडे सर्वकाही अलबेल.  तसंच इथं.  माथेरानच्या कपाटाची दारं उघडून आत गेलो, आणि ढगांच्यावर स्वार झालो.  अफाट वातावरण.  हिरवाईनं कितीतरी रंग अंगावर घेऊन शृंगार केलेला.  सर्व कसं स्वच्छ, सुंदर, बहारदार...पाऊसानं भिजलेली झाडं अधूनमधून त्या साठलेलेल्या थेंबांचा वर्षाव करीत होती. 

अशाच भिजलेल्या वाटेवरुन आमच्यासारखे अनेक पर्यटक हे सौदर्य बघून स्तब्ध झाले होते.  आमचा नेहमीचा शिरस्ता असतो,  पाठिवर बॅगा घ्यायच्या आणि अमन लॉजपासून सरळ ट्रॅकवर चालायला सुरुवात करायची.  अधीमधी कुठेही थांबायचं नाही, सरळ व्हॅली पॉईंट गाठायचा.  आत्ताही तसंच करण्याचा प्रयत्न केला.  पण आपण ढगांमधून चालत आहोत, या जाणीवेनंच वेगळा उत्साह आला होता.  बरं आम्ही वर्षातून किमान चारवेळा तरी माथेरानला जात असतो.  पण यावेळी पहिल्यांदाच भर पावसात गेलो होतो.  पावसाळ्यात पर्यटकांची जास्त गर्दी असते, हे माथेरानची रहिवासी सांगतात, पण आमचा विश्वास नव्हता.  अर्थात अमन लॉजपासून माथेरानपर्यंत ट्रॅकवरुन पायपीट करतांना हे तंतोतंत खरं असल्याची जाणीव झाली.  कारण अख्खा ट्रॅक भरलेला.  आमच्यासारखेच कितीतही त्या ट्रॅकवरुन चालत होते.  काहीजणांनी घोडे करुन वेगळी वाट पकडलेली.  तर काहीजणं रिक्षाच्या माध्यमातून माथेरान गाढत होते.  पण या वाटेनं व्हॅली पॉईंटचे वैभव बघता येत नाही, म्हणून आम्ही नेहमी चालतच माथेरान गाठतो.  यावेळीही तोच बेत होता.  दरवेळी या व्हॅली पॉईंटवर येऊन अर्धातास तरी बैठक मारतो.  समोर माथेरान व्हॅली आणि असंख्य पक्षांचे थवे दिसतात.  संमोहीत करणा-या या दृश्यानं


सगळा थकवा पळून जातो.  पण यावेळी काही औरच देखावा होता.  त्या व्हॅलीमधील एकाही झाडाचं दर्शन होईल तर शपथ.  सगळीकडे पांढ-या रंगाची चादर पसरलेली.  अगदी आमच्या समोर हवेच्या झोकाबरोबर उडणारे ढग दिसत होते.  त्यात ती व्हॅली कुठे गडप झालेली.  त्या ढगांच्या लहरी बघतानाच पुन्हा तुफान पाऊस सुरु झाला.  अगदी समोरचा माणूस दिसेना एवढा अंधार पसरला.  सुरुवातीला थोडी भीती वाटली.  असाच पाऊस कायम राहीला तर मग फिरयचं कसं, ही शंका मनात आली.  नाही म्हणायला रेनकोट सोबत छत्रीही घेतली होती.  पण पाऊसासोबत असलेल्या वा-यासमोर या छत्रीचा काही निभाव लागेना.  मग तिला मिटवून ठेवलं, आणि या पावसाचा आनंद घेत पुढचा रस्त पकडला.  यावेळीही अर्धातासांची बॅटींग करुन पावसानं विश्रांती घेतली.  यानंतर पावसाचं हे गणित आम्हाला समजलं.  अर्धातास बॅटींग आणि पुढचा चाळीस पंचेचाळीस मिनिटे उन, वारा, आणि ढगांचा खेळ, हे समिकरण समजल्यावर आम्ही सगळा माथेरान पालथा घातला. 

माथेरानमध्ये खूप पॉईंट असले तरी आमचा लाडका पॉईंट म्हणजे, लुईसा पॉईंट.  पण धुंवाधार पडणा-या पावसामुळे पहिल्यांदा शार्लोट पॉईंटला जाऊया म्हणून नव-यानं सुचवलं.  आत्ताशा माथेरानमधील बहुसंख्य वाटा या लालरंगाच्या पेवरब्लॉकनं सजवल्या आहेत.  त्यावरुन चालतांना फारसा त्रास होत नाही.  सकाळी अकरा वाजता या रस्तावरुन आम्ही जात होतो, पण वातावरण बघता, सायंकाळचे सात वाजले आहेत, असा काळोख पसरलेला.  रस्त्यात पर्यटकांची गर्दी होती, त्यातले काही नवखेही होते.  हे नवखे हा काळोख बघून धास्तावले होते.  त्यातील काहींनी आमच्या मागून विश्वासानं वाट पकडली.  लेक जवळ आला, तसा पाण्याचा आवाज वाढला.  या आवाजाचा मागोवा घेत गेलो, तर समोर तुडूंब भरलेला शार्लोट लेक आणि त्यातून फेसाळत बाहेर येणारे पाण्याचे प्रवाह.  याच पाण्यामध्ये डुंबण्यासाठी अनेक पर्यटकांनी गर्दी केलेली.  त्या शार्लेट लेकवरची वाट तर गच्च भरलेली.  नेमकं त्या वाटेच्या मध्यावर पोहचलो आणि पुन्हा पावसाचं आगमन झालं.  मगकाय रेनकोट घालून तिथल्या एका बाकड्यावर बसकण मारली.  तो पावसाचा तुफान मारा, समोर लालसर रंगाच्या पाण्यानं भरलेला शार्लोट लेक आणि आसपास नभं उतरु आलं....असं वातावण.  पाऊस यावेळी थोडा लवकर गेला.  म्हणजे पंधरा मिनिटांनी.  चहा-कॉफी घेऊन पुन्हा त्या शार्लोट लेकचा कोपरा पकडला, आणि समोरचा ढगांचा खेळ बघत राहिलो.  वेळ कसा गेला, हे कळलंच नाही.  हॉटेलवर दुपारी दोनच्या सुमारास परत आलो आणि जो पाऊस सुरु झाला, त्यानं धडकी भरली.  आमचा माथेरानचा सर्वात लाडका पॉईंट म्हणजे, लुईसा पॉईंट.  तो पॉईंट बघितल्याशिवाय परत यायचं, या विचारानंच मन खट्टू झालं.  कारण हा सर्वात लांबचा पॉईंट.  शिवाय येथे फारशी गर्दीही नसते.  त्यामुळे अशा पावसात जाणं नको, म्हणून पाऊस कमी


होईल, याची वाट पहात बसलो. 

तासभर झाला तरी पाऊस काही कमी होईना.  आणखी तासभर वाट बघू असं म्हटलं, तर नवरा म्हणाला, जाऊदे...पाऊस कितीही असला तरी लुईसाला जायचंच.  तो पॉईंट न बघता गेलो, तर चुटपुट लागेल.  मला हेच तर ऐकायचं होतं.  रेनकोट घातला, हाती छत्री घेत लुईसाची वाट पकडली.  नशीबानं पाऊसानं थोडं आवरतं घेतलेलं.  तरीही काळोख भरपूर.    सायंकाळ झाल्यासारखं...हनीमून पॉईंट आला आणि पाऊस  कमी झाला.  अगदी उन्हाची एखादी तिरीप डोकवायला लागली.  मग ते रेनकोट काढून बॅगेत भरले आणि झपाझप पावले टाकत लुईसा पॉईंटवर पोहचलो.  तिथे जे दिसलं ते अफाट होतं.  आम्हाला वाटलं त्यापेक्षा दुप्पट, तिप्पट गर्दी या पॉईंटवर होती.  आमच्यासारखेच निसर्गवेडे, तिथं दोन-तीन तास बसून होते.  समोर सुरु असलेला उन पावसाचा खेळ अनुभवत होते.  अवघा लुईसा पॉईंट ढगांनी भरलेला.  पाय-यांवरुन खाली आलो तर समोर अद्भूत सोहळा चालू असलेला.  शार्लोट लेकवरुन जो धबधबा कोसळतो, तो धबधबा या लुईसा पॉईंटवरुन दिसतो.  इथे वारा एवढा असतो, की हा धबधबा खाली कोसळ्याऐवजी हवेसोबत वर उडतोय असं वाटतं.  क्षणासाठी ढगांची चादर दूर व्हायची आणि हे विलोभनीय दृश्य दिसायचे.  मग अनेक चित्कार यायचे.  टाळ्या वाजवल्या जायच्या.  पुन्हा ढग, मग पाऊस, मग वारा..असं बराच वेळ चालू होतं.  आम्ही चारच्या सुमारास लुईसावर दाखल झालो होतो.  सायंकाळी साडेपाचपर्यंत हा सर्व खेळ बघत हरखून गेलो.  मग त्या इको पॉईंटची आठवण झाली.  लुईसावरील जादूनं मोहिनी घातली होती.  ती डोळ्यात साठवून इको पाईंटकडे वळलो.  वाटेतच माथेरानला पहिल्यांदाच आलेलं एक पर्यटक कुटुंब भेटलं.  त्यांना लुईसावरुन तो उलटा धबधबा बघायचा होता.  पण समोरची काळोखी वाट बघून भीती वाटत होती.  त्यांना दिलासा दिला, तशी त्यांनीही ती लुईसा पॉईंटची वाट पकडली आणि आम्ही इको पॉईंटकडे आलो.  तिथंही पर्यटकांची ही....गर्दी.  समोरची सर्व दरी त्या ढगांमध्ये दडलेली.  अगदी काही क्षणांसाठी ढग दूर व्हायचे आणि समोर व्ही आकारातला धबधबा आणि हिरवाईची दाटी दिसायची.  काही क्षण हा नजारा डोळ्यात साठवला की पुन्हा ती ढगांची चादर.  संध्याकाळचे साडेसहा वाजून गेले तरी इको पॉईंटवरुन निघायचं मन नव्हतं.  एव्हाना रात्र झाल्यासारखा किर्र अंधार पसरला होता.  पावसाच्या सरी आणि रातकिड्यांची किरकिर यामुळे एखाद्या हिंदी हॉरर चित्रपटासारखे दृश्य होतं.  पण हे फक्त चित्रपटांमध्येच....कारण वास्तवात माथेरानमध्ये कधीही, कुठेही फिरतांना भीती वाटत नाही.  अलिकडे माथेरानच्या सर्वच पॉईंटच्या वाटेवर लावलेल्या


पेवरब्लॉकमुळे हे रस्ते रात्रीही अधिक सुरक्षित झाले आहेत. 

आम्ही रमतगमत रात्री आठच्या सुमारास माथेरानच्या बाजरापेठेत दाखल झालो.  पाऊस मी...म्हणत होता.  पण बाजारात गर्दी होती.  आमच्या नेहमीच्या दुकानदारांना भेटलो.  गप्पा मारल्या.  पावसात हल्ली चांगली गर्दी होत असल्यामुळे तेही खुष होते.   दुस-या दिवशी मात्र पावसाचं धुमशान वाढलं.  सर्व आवरुन रानभाजी मिळेल म्हणून बाजारपेठेत गेलो तर तिथंही पाणी साठत होतं.  भाजीवाल्यांचा पत्ता नव्हता, म्हणून थोडं मन खट्टू झालं. आम्ही परतीची वाट पकडली, पण माथेरानकडे येणा-या पर्यटकांचे थवे बघून आनंद झाला.  सगळा ट्रॅक पर्यटकांनी भरला होता.  अमन लॉजमध्ये तर पाय ठेवायला जागा नाही, एवढी गर्दी.  गाडी केली आणि घाट उतरायला सुरुवात केली, तेव्हा चक्क ट्रॅफीक जाममध्ये अडकलो.  नेरळला पोहचल्यावर तर परिस्थिती अधिक बिकट होती.  शेवटी गाडीवाल्यानं मधल्याच एका रस्त्यामधून गाडी टाकली.  नेरळ स्टेशन परिसरातल्या बाजारपेठेत आलो आणि या जॅममध्ये पुरते अडकून गेलो.  आसपास बघितलं, आणि माझी कळी खुलली.  माथेरानमध्ये राहून गेलेली गोष्ट या नेरळच्या बाजारात होती.  कंटोळी, गिलके, दोडके, अळूची पानं, काकडी असा भरपूर रानमेवा खरेदी केला.  हातात भाजीची पिशवी आली, की ट्रिप सफल आणि संपूर्ण झाली याची खात्री असते.  तशीच ही छोटी ट्रिप सफल झाली होती.  नेरळमध्ये उन होतं, आणि माथेरानच्या डोंगरावर काळ्या ढगांची छाया दिसत होती.  मनात ते दृश्य साठवून घेतलं,  पुन्हा दोन-चार महिन्यात येतो, असं सांगून निरोप घेत त्या जादूच्या कपाटातली अलिकडच्या जगात जड मनानं प्रवेश केला. 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

Comments

  1. छान! माथेरानची सफर घडवली.

    ReplyDelete
  2. निसर्गाचे आगळेवेगळे दर्शन म्हणजे माथेरान, आणि शब्दात उतरवलेला माथेरानचा लेख म्हणजे माथेरानला काही वर्षांपूर्वी दिलेल्या भेटीचा डोळ्यासमोर उभा केलेला आठवणीचा देखावाच म्हणावा.

    ReplyDelete
  3. Tujya sundar shabdhane Nabh ajun sundar disu lagla 🌈💗🙏👍

    ReplyDelete
  4. निसर्ग वर्णन खूप छान.माथेरान दर्शन झाले.

    ReplyDelete
  5. Khup chhan

    ReplyDelete
  6. वॉव घरबसल्या टूर झाली 😍

    ReplyDelete
  7. 👌👌निसर्गाची कित्ती सुंदर रूप बघितलिस वाचताना स्वतः अनुभवतोय असं वाटय 👍

    ReplyDelete
  8. Me jyotishi raj jadhav, mazya patnine pratham ha lekh vachla aani tila aawadla mhanun mla vachayla sangitla, kharokhar sarva matheran dolyasamor ubhe rahile, tumchya sobat hi adbhut aani vilobhniy safar aamhi keli tyabaddal mnapasun dhanyavad, far chan lihita madam

    ReplyDelete

Post a Comment