झणझणीत पदार्थांचा सराव

 

झणझणीत पदार्थांचा सराव


आपला मसाला केलास का...हा अवचित प्रश्न लेकानं विचारला आणि मी चमकले.  सध्या आमचं दिवसातून दोन वेळा फोनवरुन बोलणं होतं. त्यातील माझे, आज काय नाष्टा केलास, काय जेवलास हे छापील प्रश्न झाले आहेत.  त्याची त्यावर येणारी उत्तरंही छापीलच असतात.  काही नाही, नेहमीचच...यापलीककडे कुठल्या पदार्थाचं नाव सांगेल तर शप्पथ.  पण तरीही मी नेटानं त्याला विचारतेच.  पण गाडी तिकडे फार बिघडली असेल तर मग एकदम रागात उत्तर देते, भाजी आणि चपाती.  मग मी पुन्हा तयार, कुठली भाजी.  त्यावर त्याचं आणखी एक ठराविक उत्तर...ही अशी उलट-सुलट तपासणी गेल्या आठ महिन्यापासून फोनच्या माध्यमातून सुरु आहे.  तशाच या प्रश्न-उत्तरांच्या फैरीमध्ये त्याचा अचानक नूर पलटला.  तू मसाला केलास का. कसा झालाय, नेहमीप्रमाणे झणझणीत केलायस ना...म्हणून त्याचे प्रश्न मला आल्यावर मी क्षणभर चक्रावले.  याला तिकडे घरच्या मसाल्याची आठवण कशाला झाली, म्हणून विचार करत असतांनाच त्यानं सांगितलं, काही नाही, मी चार दिवसासाठी यायचा विचार करतोय.  तू तयार रहा.  सगळा बेत आपल्या नव्या मसाल्याचा आणि झणझीत हवा.  मिसळ, मोदकाची आमटी, भरल्या मिरच्या, आळूवड्या, कोथिंबीर वड्या, बटाटा वडा, येता जाता भजी....त्याची यादी संपेचना.  अर्थात ती यादी कितीही लांबली तरी मी सुखावले होते.  लेक आठ-नऊ महिन्यांनी भेटणार ही बातमीही मला सुखावणारी होती.  त्याला यायला अजून एक-सव्वा महिन्याचा अवघी आहे,


पण त्याचे एक वाक्य ऐकून मी चाचपले होते.  तू काही यातलं करतेस की नाही हल्ली, की रोज भाजी भाकरीच असते.  त्याच्या या वाक्यानं जाणवलं, त्यानं सांगितलेले बरेच पदार्थ बरेच दिवसात काय वर्षभरातही केलेले नव्हते.  त्यातलाच एक म्हणजे, मोदकाची आमटी.  ब-याचवेळा या पदार्थाचं नाव ऐकलं की याचा मोठा घाट असेल असं वाटतं.  पण मोदकाच्या आमटीसारखा पटकन होणारा पदार्थ नाही.  भाजी आणि भातावरची आमटी या दोघांचीही भूमिका एकट्यानच समर्थपणे पार पाडणारी ही मोदकाची आमटी अशा पावसाळी दिवसात अधिक चवदार लागते. 

लेकाचा फोन झाला आणि मी लगेच त्या मोदकाच्या आमटीचा घाट घातला.  अर्थात घाट हा फक्त नाममात्र.  या पदार्थाचं सगळं गणित मोदक करण्यासाठी जे चण्याचं पिठ मळलं जातं, त्यावर अवलंबून असतं.  प्रमाणही सोप्प.  तीन चमचे चण्याचं पिठ आणि त्यात एक चमचा गव्हाचं पिठ.  यात अगदी नावाला ओवा, मिठ, तेल, हळद आणि तिखट घालायचं.  हे चांगलं मिसळून घेतलं, की पिठ मळतांना एखाद चमचा पाणी घालायचं.  याच पहिल्या स्टेपवर अवघी मोदकाची आमटी अवलंबून असते.  कारण या चण्याच्या पिठाचा मळून घट्ट गोळा करणे हे फार अवघड काम.  कितीही काळजी घेतली तरी त्यात पाणी जास्त होतंच.  त्यामुळेच अगदी सुरुवातीला चमचाभर पाणी घालून सर्व पिठ एकजीव करत घ्यायचं आणि पिठाचा गोळा झाला की पुन्हा वर तेलाचा हात लावून हा पिठाचा गोळा झाकून बाजूला ठेवायचा.  मग या मोदकाच्या आमटीचं वाटण भाजायचं.  त्यात सुकं खोबरं


आणि कांदा समप्रमाणात घ्यायचा.  त्यातच आलं, लसूण आणि आवडत असेल तर बडीशेप घालायची.  हे वाटण चांगलं बारीक वाटून झालं की, त्याला मोठ्या कढईत कडीपत्याची फोडणी द्यायची.  इथे  भाजी आणि आमटी या दोघांची भूमिका ही मोदकाची आमटी पार पाडणार आहे, हे लक्षात ठेवत तेलावरचा हात जरा मोकळा करायचा.  हे वाटण छान खमंग होईपर्यंत मग मोदकातील सारणाचा नंबर लावायचा.  त्यासाठी सुकं खोबरं बारीक करुन ते खरपूस भाजून घ्यायचं, त्यावरच खसखस आणि तिळ, हवे असल्यास काजूचे बारीक तुकडे भाजून घ्यायचे.  या सर्वात आलं, लसूण पेस्ट घालायची.  कोथिंबीर बारीक करुन घ्यायची.  शिवाय आपल्या चवीप्रमाणे शेंगदाण्याचा कूट.  सर्व मिश्रण एकत्र करतांना अगदी अर्धा चमचा तेल घालायचं,  मिठ जरा जपून आणि तिखट जरा जास्त.  सगळं मळून घेतलं की मी याचे वाटे करते.  मग त्या मळलेल्या पिठाचेही तेवढेच लहान गोळे तयार करुन घेते.  यामुळे नंतर मोदक पटापट भरता येतात, आणि सर्वांमध्ये समान सारण भरलं जातं.  हे होईपर्यंत फोडणीला घातलेलं वाटण खरपूस भाजून झालेलं असतं. मग पुन्हा यावर बेतानं मिठ, तिखट आणि हळद घालायची.  पुन्हा छान परतायचं आणि मग यावर गरम पाणी घालायचं.  अगदी ताकासारखी पातळ ही आमटी सुरुवातीला वाटते.  पण तयार झाली की ती छान घट्टा होते.  गरम पाणी वाटणावर घातल्यावर त्याच्यावर झाकण ठेऊन मग मोदक करायला घ्यायचे.  आपल्या गोड्या मोदकांसारखे मोदक करायचे, पण थोडे आकारानं लहान.  इथे पहिल्या स्टेपचा उपयोग होतो. 

चण्याच्या पिठाचा छान घट्ट गोळा झाला असेल तर तो चांगला लाटला जातो. पण हाच गोळा सैलसर भिजवला गेला तर मग गडबड होते,  त्यामुळेच सुरुवातीलाच त्याची काळजी घ्यावी.  लहान गोळे करत लाटत बसायचा कंटाळा वाटत असले तर पुरीसारखी मोठी चपाती करुन घ्यायची आणि नंतर लहान वाटीनं त्याचे गोल करुन घ्यायचे.  कसेही घेतले तरी या लहान पु-या थोड्या पातळ लाटायच्या.  त्यात सारण भरुन होईपर्यंत तिथं गॅसवर ती आमटी चांगली रटरटायला लागलेली असते.  त्यावर हे तयार मोदक हळूवार सोडून द्यायचे आणि पुन्हा झाकण लावायचे.  आठ ते दहा मिनिटांनी छोटुसे मोदक मस्त फुगून त्या आमटीत डुलू लागले की समजायचे आमटी तयार.  मग वरुन कोथिंबीर पेरून द्यायची आणि सरळ ताटं वाढायची. 

मी सुद्धा अशीच केली.  लेक महिन्याभरानं का होईना पण येणार आहे, यामुळेच उत्साह एवढा आला की नेहमीपेक्षा ही आमटी जरा लवकरच तयार झाली.  आणि ब-याच दिवसांनी केल्यामुळे की काय, तिची चवही झकास झाली होती.   आता हा अवघा महिना असाच जाणार...म्हणत, मी एक यादीच तयार करायला घेतली.  त्यातून लेकाच्या आवडीच्या पदार्थाची उजळणी सुरु झाली.  माझ्या या सर्व गडबडीत शांत असलेला नवरा मात्र ती यादी बघून गालात हसत होता....घरात पुन्हा चलह-पहल सुरु झाली याचा हा आनंद....

 

सई बने

डोंबिवली

ब्लॉगला Follow, Share आणि Comment करा

 

 

Comments

  1. काय मस्त लिहिलं आहेस तू सई. वाचूनच तोंडाला पाणी सुटलं. मी पहिल्यांदाच हा पदार्थ ऐकला. कधीतरी नक्की करून बघा

    ReplyDelete
  2. खुसखुशीत लिहिलंय, पाककृती अशी लिहिली की वाचणाऱ्याला आमटीचा स्वाद घ्यायला आवडेल! मस्त!

    ReplyDelete
  3. तुझं स्वैपाकावरचं प्रेम शब्दाशब्दात आमच्या मनापर्यंत पोहचत. मी कित्येक वर्षात ही आमटी खाल्ली नाही 🙂‍↔️ वाचताना खाल्ल्याचा आनंद मिळाला.ललिता छेडा

    ReplyDelete
  4. सई ताई खूप छान लिहिले आहे.पदार्थाची रेसिपी वाचूनच किती चविष्ट पदार्थ असेल करून बघायला नक्की आवडेल.👍🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  5. मस्तच झणझणीत आमटीची रेसिपी आणि कल्पनेनेही तोंडाला सुटलेले पाणी व्वा सईताई! समोरच्याच्या मनात शिरकाव करायचा असेल तर तो मार्ग खिलवय्याच्या प्रेमातून जातो म्हणतात.पण इथेतर तूमच्या जादूई शब्दामधून वाचकांच्या मनात अलगदपणे शिरकाव केलात सईताई.मस्त पावसाळी हवेबरोबर गरमागरम रेसिपीने आज मन तृप्त झाले वाचून.नविन रेसिपी शिकायला मिळाली .आता लौकरच बनवून बघेन..धन्यवाद

    ReplyDelete
  6. जयंत बने26 July 2025 at 14:50

    खूप छान लेख

    ReplyDelete
  7. व्वा झकास, वर्णन वाचून च तोंडाला पाणी सुटलं, माझी कोल्हापूरची ताई मावशी करायची ही आमटी सगळे नुसते तुटून पडायचे त्यावर 👌👌

    ReplyDelete
  8. खूपच छान ताई.. मला पण खूप आवडते ही मोदकाची आमटी.. खूप वर्ष झालेत खाऊन.. करेल आता मी ही एकदा

    ReplyDelete
  9. खूप छान रेसिपी आहे.

    ReplyDelete
  10. महेश टिल्लू31 July 2025 at 18:58

    अगदी आगळावेगळा आणि कधीही न ऐकलेला पदार्थाची ओळख झाली.हा नक्की घरी करायला सांगणार.नक्कीच चांगला आणि चमचमीत होईल

    ReplyDelete
  11. मस्त झणझणीत पदार्थ आणि खुसखुशीत लेख!
    ... सौ.मृदुला राजे

    ReplyDelete

Post a Comment